आणि त्यांना अशी आज्ञा दे: यार्देनेच्या मध्यभागातून म्हणजे याजकांचे पाय जेथे स्थिर झाले होते तेथून बारा धोंडे उचलून आपल्याबरोबर पलीकडे घेऊन जा आणि आज रात्री ज्या स्थळी तुमचा मुक्काम होईल तेथे ते ठेवा.”
यहोशवा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या कोशासमोर यार्देनेच्या मध्यभागी जाऊन इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे एकेक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या,
तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की, यार्देनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभंगले; तो यार्देनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे दोन भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्राएल लोकांसाठी कायमचे स्मारक होतील.”
यहोशवाच्या ह्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने यहोशवाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी इस्राएल लोकांच्या वंशांच्या संख्येप्रमाणे बारा धोंडे यार्देनेच्या मध्यभागातून उचलून आणून आपल्याबरोबर मुक्कामावर ठेवले.
मोशेने यहोशवाला जे आज्ञापिले होते तेच लोकांना सांगण्याची आज्ञा परमेश्वराने यहोशवाला केली; त्याप्रमाणे करण्याचे संपेपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी उभे राहिले. मग लोक लवकर लवकर पार उतरून गेले.
त्या दिवशी परमेश्वराने सर्व इस्राएलाच्या दृष्टीने यहोशवाची थोरवी वाढवली; म्हणून जसे ते मोशेचे भय धरत तसेच त्यांनी यहोशवाचे भय त्याच्या सगळ्या हयातीत बाळगले.
मग परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्देनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि पूर्ववत दुथडी भरून वाहू लागले.
आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता, त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली.