त्या ताऱ्याने अथांग विवर उघडला, तेव्हा त्यातून अवाढव्य भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या विवरातल्या धुराने सूर्य व अंतराळही अंधकारमय झाले.
त्यांना असे सांगण्यात आले होते की, पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा.
त्यांना ठार मारण्याचे त्यांच्याकडे सोपविले नव्हते तर फक्त पाच महिने पीडा देण्याचे सोपविले होते. ती पीडा, विंचू माणसाला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती.
त्या टोळांचे रूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखे काही तरी दिसत होते. त्यांचे चेहरे माणसांसारखे होते.
त्या दृष्टान्तात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे: त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक हे सारे निघत होते.
कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे. त्यांच्या शेपट्या सापांसारख्या असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांच्या साहाय्याने ते उपद्रव करतात.
त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या दैवतांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही