शास्त्यांच्या अमदानीत देशात दुष्काळ पडला त्या दिवसांत बेथलेहेम-यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व दोन पुत्र ह्यांना घेऊन मवाब देशात काही दिवस राहायला गेला.
त्या पुरुषाचे नाव अलीमलेख व त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्यांच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती; हे एफ्राथी म्हणजे बेथलेहेम-यहूदा येथील रहिवासी होते; ते मवाब देशात जाऊन राहिले.
परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोन्ही सुनांसह परत जाण्यास ती निघाली.
माझ्या मुलींनो, माघारी जा; मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही; मी म्हटले की मला पती मिळायची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले,
तरी ते प्रौढ होतील तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवर्यांवाचून राहाल काय? छे, छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे; परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे.”
रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव;
तुम्ही मराल तेथे मीही मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल; मृत्युखेरीज तुमचा-माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर माझे त्यानुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो.”
मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेहेमास पोहचल्या. त्या बेथलेहेमास जाऊन पोहचल्या, तेव्हा त्यांना पाहून सर्व नगर गलबलून गेले; तेथील बायका म्हणू लागल्या, “ही नामीच काय?”