हन्ना हिने प्रार्थना केली ती ही: “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.
जे पोटभर खात होते ते अन्नासाठी मोलमजुरी करत आहेत. जे क्षुधित होते त्यांना आता आराम प्राप्त झाला आहे; वंध्येला सात मुले झाली आहेत; बहुपुत्रवती क्षीण झाली आहे.
तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.
परमेश्वराशी झगडणार्यांचा चुराडा होईल. तो त्यांच्यावर आकाशातून गर्जेल; परमेश्वर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत न्याय करील; तो आपल्या राजाला बल देईल, तो आपल्या अभिषिक्ताचा उत्कर्ष करील.”
आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्राएल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करत.
वपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणार्याला म्हणत असे, “भाजण्यासाठी याजकाला मांस दे, तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही, तर कच्चेच घेईल.”
एलीने एलकाना व त्याची स्त्री ह्यांना असा आशीर्वाद दिला की, “तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला त्याबद्दल परमेश्वर तुला ह्या स्त्रीपासून संतती देवो.” मग ती उभयता आपल्या घरी गेली;
एली फार वृद्ध झाला होता; त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्राएल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शनमंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले.
कोणा मनुष्याने दुसर्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील, पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करील?” तरीपण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते.
मग देवाचा एक मनुष्य एलीकडे जाऊन म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या मूळ पुरुषाचे कुटुंब मिसरात फारोच्या घरी दास्य करीत होते तेव्हा त्याला मी प्रकट झालो होतो की नाही?
तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावेत, धूप जाळावा आणि माझ्यासमोर एफोद ल्यावे म्हणून इस्राएलाच्या सर्व वंशांतून त्याला मी निवडून नेमले होते की नाही? आणखी तुझ्या मूळ पुरुषाच्या घराण्यास इस्राएल लोकांची सर्व हव्ये मी दिली की नाही?
माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?
ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.
तुझे डोळे क्षीण होतील व तुझे मन शोकाकुल होईल; तरीपण तुझ्या कुळातील सर्वच पुरुषांचा उच्छेद करून त्यांना मी आपल्या वेदीपासून दूर करणार नाही; तुझ्या घरी उत्पन्न होतील तेवढे पुरुष भरज्वानीत मरतील.
आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करीन; तो माझ्या अंतःकरणात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे करील; मी त्याचे घराणे कायमचे स्थापीन आणि तो माझ्या अभिषिक्तासमोर निरंतर चालेल.
तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चवलीपावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याच्याकडे जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकपणाचे कोणतेतरी काम मला द्या म्हणजे मला घासभर अन्न मिळेल.”