मग दावीद व त्याचे लोक कईलास गेले; त्यांनी पलिष्ट्यांशी युद्ध करून त्यांची गुरेढोरे हाकून आणली आणि त्यांची मोठी कत्तल केली. ह्या प्रकारे दाविदाने कईला येथील रहिवाशांचे रक्षण केले.
दावीद कईला येथे गेला हे कोणी शौलाला कळवले तेव्हा तो म्हणाला, “आता देवाने त्याला माझ्या हाती दिले आहे; कारण दरवाजे व अडसर असलेल्या नगरात जाऊन तो आयताच कोंडला गेला आहे.”
मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, शौल माझ्यामुळे कईला नगराचा नाश करण्यासाठी येऊ पाहत आहे, हे वर्तमान तुझ्या दासाने तरी नक्की ऐकले आहे.
कईला येथील लोक मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या दासाच्या कानावर आले आहे त्याप्रमाणे शौलाचे येणे होईल काय? हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तुझी मी विनवणी करीत आहे. तुझ्या दासाला काय ते सांग.” परमेश्वर म्हणाला, “तो येईल.”
तेव्हा दावीद व त्याचे सुमारे सहाशे लोक कईलातून निघून वाट फुटेल तिकडे गेले. दावीद कईलाहून निसटून गेला हे शौलाला कोणी सांगितले, तेव्हा त्याने निघण्याचे रहित केले.
मग दावीद रानातील गढ्यांमध्ये राहू लागला; तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शौल त्याचा शोध नित्य करीत असे; पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही.
त्याने त्याला म्हटले, “भिऊ नकोस, माझा पिता शौल ह्याच्या हाती तू लागणार नाहीस, तू इस्राएलाचा राजा होणार व मी तुझा दुय्यम होणार. माझा बाप शौल ह्यालाही हे ठाऊक आहे.”
नंतर जिफी लोक गिबा येथे शौलाकडे येऊन म्हणाले, “रानाच्या दक्षिणेस हकीलाच्या डोंगरात उंचवट्यावरील झाडीतल्या गढ्यांमध्ये आमच्याकडे दावीद लपून राहिला आहे ना?
तुम्ही जाऊन आणखी खात्री करून घ्या; त्याची बसण्याउठण्याची जागा कोठे आहे, तेथे तो कोणाच्या दृष्टीस पडला, ह्याची सगळी माहिती काढा; कारण तो मोठा धूर्त आहे;
तो कोणकोणत्या जागी दडी मारून असतो त्या सगळ्या जागांची माहिती काढून अवश्य परत या, म्हणजे मी तुमच्याबरोबर परत येईन; तो ह्या देशात कोठेही असला तरी मी ह्या यहूदाच्या हजारो लोकांतून त्याला हुडकून काढीन.”
शौल आपले लोक बरोबर घेऊन त्याच्या शोधासाठी गेला; ही बातमी दाविदाला समजली तेव्हा तो खडकाळीतून उतरून मावोनाच्या रानात जाऊन राहिला. हे शौलाला समजले तेव्हा त्याने मावोनाच्या रानात दाविदाचा पाठलाग केला.
शौल डोंगराच्या ह्या बाजूने चालला आणि दावीद व त्याचे लोक डोंगराच्या त्या बाजूने चालले. शौलाच्या भीतीने दावीद निसटून जाण्याची त्वरा करीत होता, कारण शौल व त्याचे लोक दाविदाला व त्याच्या लोकांना पकडण्यासाठी त्यांना घेरू पाहत होते.