तेव्हा शौलाने सर्व इस्राएलमधून सक्षम असलेले तीन हजार तरुण पुरुष घेतले आणि ते दावीदाचा व त्याच्या माणसांचा शोध करण्यासाठी रानबकर्यांच्या खडकाळ भागात गेले.
दावीदाची माणसे म्हणाली, “हाच तो दिवस आहे, ज्याविषयी याहवेहने तुम्हाला सांगितले होते, ‘मी तुझ्या शत्रूला तुझ्या हाती देईन तेव्हा तुला वाटेल तसे तू त्याचे कर.’ ” तेव्हा दावीदाने हळूवारपणे सरकत जाऊन शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला.
तो त्याच्या माणसांना म्हणाला, “मी माझ्या धन्यावर, याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट याहवेह माझ्या हातून न घडवो; कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहे.”
नंतर दावीद गुहेच्या बाहेर आला आणि शौलाला हाक मारली, “महाराज, माझ्या धन्या!” जेव्हा शौलाने मागे पाहिले, तेव्हा दावीदाने भूमीकडे आपले तोंड करून दंडवत घातले.
आज तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहिले आहे की, कशाप्रकारे याहवेहने गुहेमध्ये तुम्हाला माझ्या हाती दिले होते. तुम्हाला मारून टाकावे असे काहीजण म्हणाले, परंतु मी तुम्हाला सोडले; मी म्हणालो, ‘मी माझ्या धन्यावर हात टाकणार नाही, कारण ते याहवेहचे अभिषिक्त आहेत.’
पाहा, माझ्या पित्या, तुमच्या झग्याचा तुकडा माझ्या हातात आहे तो पाहा! मी तुमच्या झग्याचा काठ कापून घेतला परंतु तुम्हाला मारून टाकले नाही. यावरून माझ्याकडे दुष्ट किंवा फितुरी असल्याचा दोष नाही. मी तुमच्याशी चुकीचे वागलो नाही, तरीही तुम्ही माझ्या जिवाची शिकार करण्यास टपला आहात.
कोणा मनुष्याला त्याचा शत्रू सापडला तेव्हा त्याला इजा केल्याशिवाय जाऊ देईल काय? ज्याप्रकारे तू आज माझ्याशी वागलास त्याचे चांगले प्रतिफळ याहवेह तुला देवो.