म्हणून किर्याथ-यआरीमचे लोक आले आणि त्यांनी याहवेहचा कोश घेऊन टेकडीवर अबीनादाबाच्या घरी नेऊन ठेवला व कोशाचे राखण करण्यासाठी अबीनादाबाचा पुत्र एलअज़ार याला पवित्र केले.
आणि शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “जर तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने याहवेहकडे परत वळत आहात, तर तुम्ही अन्य दैवते व अष्टारोथचा त्याग करा; आणि याहवेहकडे चित्त लावून केवळ त्यांचीच सेवा करा; म्हणजे याहवेह तुम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून सोडवतील.”
जेव्हा ते मिस्पाह येथे एकत्र जमले, तेव्हा त्यांनी पाणी काढले व ते याहवेहसमोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास करून कबुली दिली, “आम्ही याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” त्यावेळी शमुवेल मिस्पाहमध्ये इस्राएलचा पुढारी म्हणून सेवा करीत होता.
इस्राएल लोक मिस्पाह येथे जमले आहेत, हे जेव्हा पलिष्ट्यांनी ऐकले, तेव्हा पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले. हे जेव्हा इस्राएली लोकांनी ऐकले, तेव्हा ते पलिष्ट्यांना घाबरले.
शमुवेल होमार्पण करत असताना, पलिष्टी लोक इस्राएली लोकांशी युद्ध करावयाला जवळ आले. तेव्हा याहवेहने प्रचंड गडगडाटाने गर्जना करून पलिष्ट्यांना असे भयभीत केले की, इस्राएली लोकांपुढे त्यांचा बीमोड झाला.
नंतर शमुवेलाने एक दगड घेतला आणि तो मिस्पाह आणि शेन यांच्यामध्ये उभारला. “येथपर्यंत याहवेहने आमचे साहाय्य केले आहे” असे म्हणत त्याने त्याला एबेन-एजर असे नाव दिले.
अशाप्रकारे पलिष्टी लोक पराभूत झाले आणि त्यांनी इस्राएलच्या सीमेवर पुन्हा हल्ला केला नाही आणि शमुवेलच्या सर्व जीवनकाळात याहवेहचा हात पलिष्ट्यांविरुद्ध होता.
एक्रोनपासून गथपर्यंत पलिष्ट्यांनी जी नगरे इस्राएलपासून ताब्यात घेतली होती ती इस्राएली लोकांस परत मिळाली आणि इस्राएली लोकांनी आसपासच्या प्रदेश सोडवून घेतला. व इस्राएली व अमोरी लोकात शांतता होती.