१. लोकांमध्ये काही वाद उपस्थित झाला आणि ते न्याय मागण्यासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा निवाडा करावा; निर्दोष्याला निर्दोषी ठरवावे आणि दोष्याला दोषी ठरवावे.
२. दोषी मनुष्य फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडवून आपल्यासमक्ष त्याच्या दोषाच्या मानाने मोजून फटके मारवावेत.
३. त्याला चाळीसपर्यंत फटके मारावेत, अधिक मारू नयेत; अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्यादेखत अप्रतिष्ठा होईल.
४. मळणी करताना बैलाला मुसके घालू नकोस.
५. भाऊभाऊ एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणा परक्याशी लग्न करू नये; तिच्या दिराने तिच्यापाशी जाऊन तिला बायको करून घ्यावे, व तिच्याबाबत दिराचे कर्तव्य करावे.
६. त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे म्हणजे इस्राएलातून तो नामशेष होणार नाही.
७. आपल्या भावजयीला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली तर तिने गावच्या वेशीत वडीलवर्गाकडे जाऊन म्हणावे की, ‘माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्राएलात ठेवायला कबूल नाही आणि माझ्याशी दिराच्या कर्तव्याला अनुसरून वागायची त्याची इच्छा नाही.’
८. मग त्याच्या नगरातल्या वडीलवर्गाने त्याला बोलावून आणून त्याच्याशी बोलणे करावे; तो आपलाच हेका चालवून म्हणाला की, ‘हिला बायको करून घेण्याची माझी इच्छा नाही,’
९. तर त्याच्या भावजयीने वडीलवर्गादेखत त्याच्याजवळ येऊन त्याच्या पायातले पायतण काढावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, ‘जो कोणी आपल्या भावाचे घराणे चालवत नाही त्याचे असेच करावे.’
१०. पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असे त्याचे नाव इस्राएलात पडेल.
११. दोन पुरुषांची मारामारी चालली असताना त्यांच्यापैकी एकाच्या बायकोने आपल्या नवर्याला मारणार्याच्या हातून सोडवण्यासाठी जवळ जाऊन आपला हात पुढे करून त्याचे जननेंद्रिय पकडले,
१२. तर त्या स्त्रीचा हात कापून टाकावा; तिच्यावर दयादृष्टी करू नये.
१३. तुझ्या थैलीत जास्त व कमी अशी दोन प्रमाणांची वजने ठेवू नकोस.
१४. तुझ्या घरी जास्त व कमी अशी दोन प्रमाणांची मापे ठेवू नकोस.
१५. तुझी वजने यथायोग्य व बरोबर असावीत, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील.
१६. जे खोटी कामे करून अनीतीने वागतात त्या सर्वांचा तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.
१७. तुम्ही मिसर देशातून बाहेर निघालात तेव्हा वाटेने अमालेक तुमच्याशी कसा वागला ह्याची आठवण ठेवा;
१८. वाटेत तुला गाठून तू थकला भागलेला असताना त्याने देवाला न भिता दमून मागे पडलेल्या तुझ्या सगळ्या लोकांवर हल्ला चढवून त्यांना ठार मारले.
१९. म्हणून तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला विश्राम दिल्यावर अमालेकाची आठवण पृथ्वीतलावरून बुजवून टाक; विसरू नकोस.
१. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील,
२. आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.
३. आणि त्या वेळी जो याजक असेल त्याच्याकडे जाऊन त्याला असे म्हण: ‘तुझा देव परमेश्वर ह्याच्यापुढे मी जाहीर करतो की, परमेश्वराने आम्हांला जो देश देण्याविषयी आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्यात मी आलो आहे.’
४. मग याजकाने तुझ्या हातून ती पाटी घेऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या वेदीसमोर खाली ठेवावी.
५. तेव्हा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमक्ष असे म्हण: ‘माझा मूळ पुरुष मरता मरता वाचलेला१ एक अरामी होता; तो मिसर देशात गेला व तेथे आपल्या लहानशा परिवारासह उपरा म्हणून राहिला; त्याच्यापासून तेथे एक महान, पराक्रमी व दाट वस्तीचे राष्ट्र उत्पन्न झाले;
६. तेथे मिसरी लोकांनी आम्हांला निर्दयतेने वागवले, गांजले व आम्हांला वेठीस लावले;
७. पण आम्ही आमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला तेव्हा त्याने आमची आरोळी ऐकली; आणि आमचे दु:ख, कष्ट व छळ पाहिला.
८. तेव्हा परमेश्वराने पराक्रमी बाहूने व उगारलेल्या हाताने महाभयंकर उत्पात, चिन्हे व चमत्कार ह्यांच्या योगे आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले;
९. आणि आम्हांला ह्या स्थळी आणून पोहचवले व दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत असा हा देश आम्हांला दिला.
१०. आता, हे परमेश्वरा, जमिनीचे प्रथमउत्पन्न, तू मला दिले आहेस त्यातले काही मी तुला आणले आहे.’ मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर ती पाटी खाली ठेवून त्याला दंडवत घाल;
११. आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला व तुझ्या घराण्याला जे जे चांगले दिले आहे त्या सर्वांबद्दल आनंद कर; तुझ्याबरोबरचा लेवी व तुझ्याबरोबरचा उपरा ह्यांनीही त्यांचा आनंदाने उपभोग घ्यावा.
१२. तिसर्या वर्षी, म्हणजे दशमांश वेगळा काढण्याच्या वर्षी, जेव्हा तू आपल्या उत्पन्नाचा सबंध दशमांश वेगळा काढण्याचे संपवशील तेव्हा तो तू लेव्याला, उपर्याला, अनाथाला व विधवेला दे म्हणजे ते तुझ्या गावात तो खाऊन तृप्त होतील;
१३. मग तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर असे म्हण: ‘पवित्र केलेल्या वस्तू मी आपल्या घरातून काढल्या आहेत आणि तू मला दिलेल्या सर्व आज्ञांना अनुसरून त्या मी लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांना दिल्या आहेत; मी तुझ्या कोणत्याही आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही किंवा त्या मी विसरलोही नाही.
१४. मी सुतकी असताना ह्यांतले काही खाल्ले नाही, अथवा अशुद्ध असताना ह्यांतले काही काढून टाकले नाही, अथवा मृतांसाठी त्यांतले काही दिले नाही. मी आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द मानला आहे; मी तुझ्या सर्व आज्ञांप्रमाणे केले आहे.
१५. तू आपल्या पवित्र निवासातून, स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या इस्राएल प्रजेला आशीर्वाद दे आणि तू आमच्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे जो देश तू आम्हांला दिला आहे त्या ह्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशाला बरकत दे.’
१६. हे विधी व नियम तू पाळावेस अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ.
१७. परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहेस की, मी तुझ्या मार्गांनी चालेन, तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन.
१८. आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे की, ‘तुला सांगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाला आहेस; तू माझ्या सर्व आज्ञा पाळ,
१९. म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.”
७. तर आता हे प्रभू, मी कशाची अपेक्षा करू? माझी आशा तुझ्याच ठायी आहे.
८. माझ्या सर्व अपराधांपासून मला सोडव; मला मूर्खांच्या निंदेस पात्र करू नकोस.
९. मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस.
१०. तुझा प्रहार माझ्यावरून दूर कर; तुझ्या हाताच्या तडाख्याने माझा क्षय होत आहे.
११. तू मनुष्याला अनीतीबद्दल धमकावून शासन करतोस, तेव्हा तू त्याचे सौंदर्य पतंगाप्रमाणे विलयास नेतोस; खरोखर सर्व माणसे श्वासवत आहेत. (सेला)
४. आळशाच्या जिवाला हाव असते तरी त्याला काही मिळत नाही; उद्योग्यांचा जीव पुष्ट होतो.
५. नीतिमानाला असत्याचा तिटकारा असतो, परंतु दुर्जन अप्रतिष्ठा व निंदा ह्यांना कारण होतो.
१. मग एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले.
२. तेव्हा परूश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता?”
३. येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले,
४. तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”
५. आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.”
६. नंतर दुसर्या एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता.
७. तेव्हा शास्त्री व परूशी त्याच्यावर दोष ठेवण्यास सापडावा म्हणून तो शब्बाथ दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहण्यास टपून राहिले.
८. परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, “ऊठ व मध्ये उभा राहा.” मग तो उठून उभा राहिला.
९. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?”
१०. मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात दुसर्या हातासारखाच पूर्ण बरा झाला.
११. मग त्यांचे डोके फिरले व येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसांत विचार करू लागले.
१२. त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.
१३. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले, आणि त्यांच्यातून पुढील बारा जणांना निवडून त्यांना ‘प्रेषित’ असे नावही दिले.
१४. शिमोन (ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले) व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,
१५. मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन,
१६. याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहूदा इस्कर्योत.
१७. येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला, आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय, आणि सर्व यहूदीया व यरुशलेम येथून व सोर व सीदोन ह्यांकडल्या समुद्रकिनार्यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता;
१८. तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले.
१९. तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते.
२०. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो दीनांनो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
२१. अहो, जे तुम्ही आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य; कारण तुम्ही हसाल.
२२. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य.
२३. त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत.
२४. परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात.
२५. अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांला भूक लागेल. अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल व रडाल.
२६. जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide