१. हे ऐकून यार्देनेच्या पश्चिमेकडे डोंगरवटीत, तळवटीत आणि लबानोनासमोरील महासमुद्राच्या सबंध किनार्यावरील हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्यांचे सर्व राजे
२. एकोपा करून यहोशवा व इस्राएल ह्यांच्याशी लढायला जमा झाले.
३. यहोशवाने यरीहो आणि आय ह्या नगरांचे काय केले हे गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले,
४. तेव्हा आपल्यापरीने त्यांनीही कपटाची युक्ती योजली; त्यांनी प्रवासासाठी शिधासामग्री घेतली१ आणि आपल्या गाढवांवर जुनी गोणपाटे व झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले;
५. त्यांनी आपल्या पायांत झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले, अंगात जुनेपुराणे कपडे चढवले; त्यांच्या शिदोरीच्या सर्व भाकरी वाळून बुरसल्या होत्या.
६. ते गिलगाल येथील छावणीत यहोशवाकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांना म्हणाले, “आम्ही दूर देशाहून आलो आहोत म्हणून आता आमच्याबरोबर करारमदार करा.”
७. इस्राएल पुरुषांनी त्या हिव्वी लोकांना म्हटले, “आम्ही तुमच्याबरोबर करारमदार कसा करावा? न जाणो तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल.”
८. ते यहोशवाला म्हणाले, “आम्ही तुझे दास आहोत.” यहोशवाने त्यांना विचारले, “तुम्ही कोण व कोठून आलात?”
९. त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे;
१०. आणि यार्देनेच्या पलीकडील अमोर्यांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथनिवासी बाशानाचा राजा ओग, ह्या दोघांचे त्याने काय केले हेही आम्ही जाणून आहोत.
११. तेव्हा आमची वडील माणसे आणि आमच्या देशातील सर्व रहिवासी आम्हांला म्हणाले, ‘प्रवासासाठी आपल्याबरोबर शिदोरी घ्या व त्यांना भेटायला जा आणि त्यांना सांगा की, आम्ही तुमचे दास आहोत, तेव्हा आता आमच्याशी करारमदार करा.’
१२. ह्या पाहा आमच्या भाकरी! आम्ही घरून तुमच्याकडे येण्यास निघालो त्या दिवशी, प्रवासात शिदोरी म्हणून घेतल्या तेव्हा ऊनऊन होत्या; पण आता त्या वाळून बुरसल्या आहेत.
१३. हे द्राक्षारसाचे बुधले आम्ही भरून घेतले तेव्हा ते नवे होते, पण आता ते फाटूनतुटून गेले आहेत; हे आमचे कपडे व आमचे जोडे फार लांबच्या प्रवासाने जीर्ण झाले आहेत.”
१४. तेव्हा लोकांनी त्यांचे अन्न स्वीकारले; पण परमेश्वराचा सल्ला घेतला नाही.
१५. मग यहोशवाने त्यांच्याशी सलोखा करून त्यांना जीवदान देण्याचा करार केला; मंडळीच्या सरदारांनीही त्यांच्याशी आणभाक केली.
१६. त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत.
१७. नंतर इस्राएल लोक कूच करत तिसर्या दिवशी त्यांच्या नगरास जाऊन पोहचले. त्यांच्या नगरांची नावे ही: गिबोन, कफीरा, बैराथ व किर्याथ-यारीम.
१८. पण इस्राएल लोकांनी त्यांना मारून टाकले नाही, कारण मंडळीच्या सरदारांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली होती; तेव्हा सर्व मंडळीने सरदारांविरुद्ध कुरकुर केली.
१९. तेव्हा सर्व सरदार सगळ्या मंडळीला म्हणाले, “आम्ही त्यांच्यासमोर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेतली आहे, म्हणून आता आम्हांला त्यांना हात लावता येत नाही.
२०. त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जीवदान देणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.”
२१. सरदारांनी लोकांना सांगितले की, “त्यांना जिवंत राहू द्या.” सरदारांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते सर्व मंडळीचे लाकूडतोडे व पाणके झाले.
२२. यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, “तुम्ही आमच्यामध्ये राहत असून ‘आम्ही फार दूरचे आहोत’ असे सांगून आम्हांला का फसवले?
२३. म्हणून आता तुम्हांला असा शाप आहे की, तुमच्यातल्या कोणालाही दास होणे चुकायचे नाही; तुम्ही माझ्या देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणके होऊन राहाल.”
२४. त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “हा सर्व देश तुम्हांला द्यावा आणि तुमच्यासमोर देशातील सर्व रहिवाशांचा संहार करावा असे तुझा देव परमेश्वर ह्याने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञापिले होते, हे तुझ्या दासांना पक्के कळले होते; तुमच्यामुळे आम्हांला आमच्या जिवाची भीती वाटली म्हणून आम्ही हे काम केले.
२५. आता आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”
२६. त्याने त्यांचे तसे केले; त्यांना इस्राएल लोकांच्या हातांतून सोडवले; त्यांची कत्तल केली नाही.
२७. यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या ठिकाणातील त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.
१. यहोशवाने आय नगर घेऊन त्याचा समूळ नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले; पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी तह करून त्यांच्यामध्ये आहेत, हे यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्याने ऐकले;
२. तेव्हा त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजधानीसारखे होते; ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष बलाढ्य होते.
३. मग यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर ह्यांना निरोप पाठवला की,
४. “माझ्याकडे येऊन मला कुमक द्या, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी तह केला आहे.”
५. तेव्हा यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढू लागले.
६. हे पाहून गिबोनातल्या माणसांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊ नकोस; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.”
७. तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर ह्यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.
८. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”
९. यहोशवा रातोरात गिलगालाहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला.
१०. परमेश्वराने इस्राएलापुढे त्यांची गाळण उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.
११. ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळे ते ठार झाले; इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांनी मेले.
१२. परमेश्वराने अमोर्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; “हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोर्यावर स्थिर हो.”
१३. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.
१४. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
१५. मग यहोशवा सर्व इस्राएलांसह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
१६. ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
१७. “मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत” असे यहोशवाला कोणी कळवले.
१८. तेव्हा यहोशवा म्हणाला, “गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर माणसांचा पहारा बसवा;
१९. पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका, आपल्या शत्रूंचा पाठलाग करा, त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांना पोहचू देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.”
२०. यहोशवा आणि इस्राएल लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले, पण त्यांच्यातले काही लोक वाचून तटबंदीच्या नगरात गेले.
२१. मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे आले; इस्राएल लोकांपैकी एकाच्याही विरुद्ध कोणी एक शब्ददेखील उच्चारला नाही.
२२. मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.”
२३. त्याप्रमाणे त्यांनी केले म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
२४. ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल पुरुषांना बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योद्ध्यांच्या नायकांना म्हणाला, “पुढे येऊन ह्या राजांच्या मानांवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानांवर पाय दिले.
२५. यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, खंबीर व्हा, हिंमत धरा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूंचे परमेश्वर असेच करील.”
२६. नंतर यहोशवाने त्यांना ठार मारवून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर लटकत राहिले.
२७. सूर्यास्तसमयी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरवले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. ते आजपर्यंत तसेच आहेत.
२८. त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्याचा व त्याच्या राजाचा संहार केला; त्यांच्याबरोबरच तेथल्या सगळ्या प्राण्यांचाही त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही; त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
२९. मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलाला बरोबर घेऊन यहोशवा लिब्नावर चालून गेला व त्याच्याशी लढला;
३०. परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा ह्यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्या नगरातल्या सर्व प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.
३१. त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला आणि त्याच्यासमोर तळ देऊन त्याच्याशी लढला.
३२. परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसर्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या सगळ्या प्राण्यांचा त्याने तलवारीने संहार केला.
३३. तेव्हा गेजेराचा राजा होराम लाखीशाला कुमक देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्याचा व त्याच्या लोकांचा एवढा संहार केला की त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.
३४. मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्याच्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
३५. त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील सगळ्या प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला.
३६. मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला, आणि ते त्याच्याशी लढले;
३७. त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यांतले सर्व प्राणी ह्यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या सर्व प्राण्यांचा समूळ नाश केला.
३८. नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरावर चालून गेला आणि त्याच्याशी लढला.
३९. त्याने ते, तेथला राजा व त्याची सर्व उपनगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला आणि तेथील सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला; त्याने कोणालाही जिवंत राहू दिले नाही; हेब्रोनाचे तसेच लिब्ना व त्याचा राजा ह्यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा ह्यांचेही केले.
४०. ह्या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण ह्यांतील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्यांचा धुव्वा उडवला; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आज्ञा केल्याप्रमाणे सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला.
४१. यहोशवाने कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलुख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत ह्यात त्यांचा धुव्वा उडवला.
४२. हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलातर्फे लढला.
४३. मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथे छावणीकडे परतला.
१. मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे मस्कील (बोधपर स्तोत्र). हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.
२. तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.
३. ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती.
२४. जो आपली छडी आवरतो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करतो तो त्याच्यावर प्रीती करणारा होय.
२५. नीतिमान पोटभर जेवतो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते.
१. ह्यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर३ जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे-दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.
२. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.
३. आता जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे.
४. पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका; वाटेने कोणाला मुजरा करू नका.
५. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ‘ह्या घरास शांती असो,’ असे प्रथम म्हणा.
६. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील; नसला तर तुमच्याकडे ती परत येईल.
७. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरोघर फिरू नका.
८. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा.
९. त्यात जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, ‘देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.’
१०. तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणा:
११. ‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील तुमची तुम्हांला झाडून टाकतो; तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.’
१२. मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल.
१३. हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन बसून पश्चात्ताप केला असता.
१४. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सीदोन ह्यांना सोपे जाईल.
१५. हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील.’
१६. जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो; जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो; आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.”
१७. नंतर ते बाहत्तर१ जण आनंदाने परत येऊन म्हणाले, “प्रभूजी, आपल्या नावाने भुतेदेखील आम्हांला वश होतात.”
१८. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले.
१९. पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही.
२०. तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना.”
२१. त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले.
२२. माझ्या पित्याने सर्वकाही माझ्या स्वाधीन केले आहे; पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”
२३. मग शिष्यांकडे वळून तो त्यांना एकान्तात म्हणाला, “तुम्ही जे पाहत आहात ते पाहणारे डोळे धन्य होत!
२४. मी तुम्हांला सांगतो, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्याची पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली तरी त्यांना पाहायला मिळाले नाही; आणि जे तुम्ही ऐकत आहात ते ऐकण्याची इच्छा बाळगली तरी त्यांना ऐकायला मिळाले नाही.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide