बायबल एकाच वर्षात

१. मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजर्‍या ह्याला स्फूर्ती दिली;
२. तो आसाच्या भेटीस जाऊन त्याला म्हणाला, “हे आसा, अहो यहूदी व बन्यामिनी लोकहो, मी म्हणतो ते ऐका; तुम्ही परमेश्वराच्याबरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हांला पावेल. पण तुम्ही त्याला सोडाल तर तो तुम्हांला सोडील.
३. बहुत काळपर्यंत इस्राएलला खर्‍या देवाची ओळख नव्हती, त्यांना शिकवायला कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते;
४. पण ते आपल्या संकटावस्थेत इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यांना पावला.
५. त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे ह्यांपैकी कोणासही शांती नसे; देशाच्या सर्व रहिवाशांना फारच संकटे प्राप्त होत असत.
६. राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुराडा होत असे, कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यांना त्रस्त करीत असे;
७. पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हांला फळ मिळेल.”
८. आसाने ही वचने व ओदेद संदेष्ट्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्याला धीर आला व त्याने यहूदा व बन्यामीन ह्यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राइमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्याने घेतली होती त्यांतून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या देवडीपुढे होती तिचा जीर्णोद्धार केला.
९. त्याने सर्व यहूदी व बन्यामिनी लोकांना व त्यांच्याबरोबर राहणार्‍या एफ्राईम, मनश्शे व शिमोन ह्या प्रांतांतल्या लोकांना एकत्र केले; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा इस्राएलातले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले.
१०. आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसर्‍या महिन्यात ते यरुशलेमेत एकत्र झाले.
११. त्यांनी आणलेल्या लुटीतून सातशे बैल व सात हजार शेरडेमेंढरे त्या दिवशी परमेश्वराला अर्पण केली.
१२. त्यांनी असा करार केला की आम्ही जिवेभावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला शरण जाऊ;
१३. लहान असो की थोर असो, स्त्री असो की पुरुष असो, जो कोणी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याला शरण जाणार नाही त्याचा वध व्हावा.
१४. त्यांनी जयघोष करून आणि कर्णे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्वरासमक्ष शपथ वाहिली.
१५. सर्व यहूदी लोक आणभाक करून हर्षभरित झाले; त्यांनी मनःपूर्वक शपथ वाहिली, ते मोठ्या उत्कंठेने त्याला शरण गेले आणि तो त्यांना पावला; परमेश्वराने त्यांना चोहोकडून स्वास्थ्य दिले.
१६. आसा राजाने आपली आई माका हिला राजमातेच्या पदावरून दूर केले, कारण तिने अशेराप्रीत्यर्थ एक अमंगळ मूर्ती केली होती; तिने केलेली ती मूर्ती आसाने फोडूनतोडून किद्रोन ओहळाजवळ जाळून टाकली.
१७. त्याने उच्च स्थाने इस्राएलातून काढून टाकली नाहीत; तथापि आसाचे हृदय सार्‍या हयातीत सात्त्विक राहिले.
१८. त्याच्या बापाने व त्याने स्वत: सोने, चांदी व पात्रे परमेश्वराला वाहिली होती ती सर्व त्याने देवाच्या मंदिरात नेऊन ठेवली.
१९. आसा राजाच्या कारकिर्दीच्या पस्तिसाव्या वर्षापर्यंत पुन्हा युद्ध झाले नाही.
१. आसाच्या कारकिर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशा ह्याने यहूदावर स्वारी केली; यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा म्हणून इस्राएलाचा राजा बाशा ह्याने रामा नगराची मजबुती केली.
२. परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारातले सोने व चांदी काढून आसाने दिमिष्कवासी अरामाचा राजा बेन-हदाद ह्याच्याकडे पाठवली; आणि त्याला असे सांगून पाठवले की
३. “माझ्या बापाचा व आपल्या बापाचा सलोखा होता तसा आपला व माझा सलोखा होवो; तर पाहा; मी आपणाला सोने व चांदी पाठवली आहे. इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्याशी केलेला करार मोडून टाका म्हणजे तो माझ्यामागे लागण्याचे सोडून देईल.”
४. आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हदादाने आपल्या सैन्याच्या सरदारांना इस्राएली नगरांवर स्वारी करायला पाठवले; त्यांनी ईयोन, दान, आबेल-मईम व नफतालीची सर्व भांडारनगरे जिंकली.
५. हे ऐकून रामा शहराची मजबुती करण्याचे सोडून बाशाने ते काम तसेच टाकले.
६. आसा राजाने सर्व यहूदी लोकांना बोलावून आणले व जे दगड व जी लाकडे घेऊन बाशा रामा नगराची तटबंदी करत होता ती त्याने काढून नेली आणि गेबा व मिस्पा ही नगरे बांधण्याच्या कामी लावली.
७. त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहूदाचा राजा आसा ह्याच्याकडे येऊन म्हणाला, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर भरवसा ठेवला नाहीस व अरामाच्या राजावर भरवसा ठेवला म्हणून अरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे.
८. कूशी व लूबी ह्यांचे मोठे सैन्य नव्हते काय? त्यांच्याजवळ बहुत रथ व घोडेस्वार नव्हते काय? तरी त्या प्रसंगी तू परमेश्वरावर भिस्त ठेवली म्हणून त्याने त्यांना तुझ्या हाती दिले.
९. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”
१०. हे ऐकून आसा त्या द्रष्ट्यावर रागावला, व त्याने त्याला अटकेत ठेवले; कारण त्यामुळे तो त्याच्यावर फार कोपायमान झाला होता. ह्याच सुमारास आसाने काही लोकांवर जुलूम चालवला.
११. आसाची अथपासून इतिपर्यंतची सगळी कृत्ये यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत लिहिलेली आहेत.
१२. आसाच्या पायांना त्याच्या कारकिर्दीच्या एकोण-चाळिसाव्या वर्षी व्याधी झाला; तो व्याधी बराच वाढला; तथापि त्या रोगात तो परमेश्वराला शरण न जाता वैद्यांना शरण गेला.
१३. मग आसा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; तो आपल्या कारकिर्दीच्या एकेचाळिसाव्या वर्षी मृत्यू पावला.
१४. दावीदपुरात जे थडगे त्याने खोदवले होते त्यात त्याला मूठमाती दिली आणि सुवासिक द्रव्ये आणि गांध्यांनी केलेले तर्‍हेतर्‍हेचे मसाले ह्यांनी भरलेल्या बिछान्यावर त्याला त्यांनी निजवले व त्याच्याप्रीत्यर्थ त्यांनी बहुत सुवासिक द्रव्ये जाळली.
६. “मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे; त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे.
७. तू संकटात असता आरोळी केली तेव्हा मी तुला सोडवले; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थलातून उत्तर दिले; मरीबाच्या जलांजवळ मी तुला पारखले. (सेला)
८. अहो माझ्या लोकांनो, ऐका, मी तुम्हांला बोध करतो; हे इस्राएला, तू माझे ऐकशील तर बरे होईल!
९. तुला अन्य देव नसावा, तू परक्या देवाच्या पाया पडू नये.
१०. मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुला मिसर देशातून बाहेर काढले, तू आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन;
२४. मनुष्याचे जाणेयेणे परमेश्वराच्या हाती आहे. तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल?
२५. “हे पवित्र आहे,” असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे, हे मनुष्याने पाशात पडणे होय.
१. मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणार्‍या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता; पण त्याचा बाप हेल्लेणी होता.
२. त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधू नावाजत होते.
३. त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती; तेव्हा त्या ठिकाणी जे यहूदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली; कारण त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते.
४. तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरुशलेमेतील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळण्यास नेमून दिले.
५. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.
६. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतांमधून गेले.
७. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही;
८. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसाला खाली गेले.
९. तेथे रात्री पौलाला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करत आहे की, “इकडे मासेदोनियात येऊन आम्हांला साहाय्य कर.”
१०. त्याला असा दृष्टान्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगण्यास देवाने आम्हांला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लगेच विचार केला.
११. तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसर्‍या दिवशी नियापुलीस गेलो;
१२. तेथून फिलिप्पैस गेलो; ते मासेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो.
१३. मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हांला वाटले तेथे जाऊन बसलो; आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो.
१४. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंत:करण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.
१५. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.
१६. मग असे झाले की, आम्ही प्रार्थनास्थळाकडे जात असता कोणीएक मुलगी आम्हांला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैवप्रश्‍न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.
१७. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवतात.”
१८. असे ती पुष्कळ दिवस करत असे; मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्चाला म्हणाला, “येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की, तू हिच्यामधून निघून जा.” आणि ते तत्काळ निघून गेले.
१९. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सीला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले.
२०. आणि त्यांनी त्यांना अधिकार्‍यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात,
२१. आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाहीत ते हे सांगतात.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide