२. “परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा: इस्राएल लोकांना सांग की, निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवले नाही अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या;
३. ती एलाजार याजकाकडे द्यावी; त्याने तिला छावणीबाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्यासमोर वधावे;
४. मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे थोडे रक्त घेऊन ते दर्शनमंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे;
५. आणि त्याच्यादेखत ती कालवड जाळावी, म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे.
६. तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे.
७. नंतर याजकाने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी आणि छावणीत यावे; पण संध्याकाळपर्यंत त्याने अशुद्ध राहावे.
८. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुऊन अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
९. मग शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी; ही राख इस्राएल मंडळीच्या पापहरणार्थ अशौचक्षालनाचे (अशुद्धी दूर करण्याचे) पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी.
१०. कालवडीची राख जमा करणार्याने आपले कपडे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; इस्राएल लोक व त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय ह्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय.
११. एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे;
१२. त्याने तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी ती राख घेऊन स्वतःला शुद्ध करावे; तथापि तिसर्या दिवशी आणि सातव्या दिवशी त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही.
१३. कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल; असल्या मनुष्याचा इस्राएल लोकांतून उच्छेद व्हावा; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर शिंपडले नसल्यामुळे तो अशुद्ध होय; त्याच्या ठायी त्याचे अशुद्धपण तसेच राहते.
१४. एखादा मनुष्य डेर्यात मरण पावला तर त्याच्यासंबंधाने नियम हा: जो कोणी त्या डेर्यात जाईल किंवा राहत असेल त्याने सात दिवस अशुद्ध राहावे.
१५. तशीच झाकणे न लावलेली आणि उघडी पात्रे तेथे असतील तर ती सर्व अशुद्ध समजावीत.
१६. खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या शवाला, मृत देहाला, मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने सात दिवस अशुद्ध असावे.
१७. अशुद्ध झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झर्याचे पाणी ओतावे;
१८. आणि शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी व ते पाणी त्याने त्या डेर्यावर व तेथील सर्व पात्रे, माणसे ह्यांच्यावर शिंपडावे; तसेच ज्याने हाडाला, वधलेल्याला, मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे;
१९. शुद्ध असलेल्या माणसाने अशुद्ध माणसावर तिसर्या दिवशी व सातव्या दिवशी ते शिंपडावे; ह्याप्रमाणे सातव्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे; त्याने आपले कपडे धुऊन अंघोळ करावी म्हणजे तो संध्याकाळी शुद्ध होईल.
२०. जर अशुद्ध झालेल्या कोणा माणसाने स्वतःला शुद्ध करून घेतले नाही तर मंडळीतून त्याचा उच्छेद व्हावा, कारण तो परमेश्वराचे पवित्रस्थान भ्रष्ट करणारा होय; अशौचक्षालनाचे पाणी त्याच्यावर टाकले नाही म्हणून तो अशुद्ध होय.
२१. त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय; अशौच-क्षालनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावेत आणि जो त्या अशौचक्षालनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
२२. ज्या कशाला तो अशुद्ध मनुष्य स्पर्श करील ते अशुद्ध ठरेल, व जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”
१. पहिल्या महिन्यात इस्राएल लोकांची सर्व मंडळी त्सीन रानात आली; त्यांनी कादेश येथे मुक्काम केला; तेथे मिर्याम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मूठमाती दिली.
२. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध एकत्र झाले.
३. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले, “परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद मेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते!
४. तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून?
५. मिसर देश सोडायला लावून आम्हांला ह्या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणीसुद्धा नाही.”
६. तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळीपुढून निघून दर्शनमंडपाच्या दाराशी पालथे पडले, आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले.
७. परमेश्वर मोशेला म्हणाला,
८. “आपली काठी घे. तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा. त्यांच्यादेखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल; ह्याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. ह्या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज.”
९. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्यासमोरून ती काठी आणली.
१०. मोशे व अहरोन ह्यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले, आणि त्यांना मोशे म्हणाला, “अहो, बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढायचे काय?”
११. मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले, आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली.
१२. ह्यावर परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना म्हटले, “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.”
१३. त्या झर्याचे नाव मरीबा (म्हणजे भांडण) पडले, कारण इस्राएल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले, आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रकट केले.
१४. नंतर मोशेने कादेशाहून अदोमाच्या राजाकडे जासुदांच्या हाती असा निरोप पाठवला, “तुझा भाऊ इस्राएल म्हणतो की, आमच्यावर जे क्लेश ओढवले ते तुला ठाऊकच आहेत;
१५. म्हणजे आमचे पूर्वज मिसर देशात गेले होते, तेथे आम्ही दीर्घकाळ राहिलो; आणि मिसरी लोकांनी आम्हांला व आमच्या पूर्वजांना छळले;
१६. पण आम्ही परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने आमचे ऐकले आणि दूत पाठवून आम्हांला मिसर देशातून बाहेर काढून आणले; आम्ही हल्ली तुझ्या सीमेवरील कादेश नगरात आलो आहोत;
१७. तेव्हा कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे; आम्ही कोणाच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही; आम्ही नीट राजमार्गाने कूच करू आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही.”
१८. पण अदोमाने उत्तर दिले, “माझ्या देशातून तू जायचे नाहीस; जाशील तर मी तलवार घेऊन तुझ्याशी सामना करायला येईन.”
१९. इस्राएल लोकांनी त्याला पुन्हा निरोप पाठवला की, “आम्ही राजमार्गानेच जाऊ आणि आम्ही किंवा आमची जनावरे तुझे पाणी प्यालो तर त्याची किंमत मी देईन; फक्त तुझ्या देशातून मला पायी जाऊ दे; दुसरे काही नको.”
२०. तरीपण तो म्हणाला, “तू जायचेच नाहीस.” मग अदोम त्यांच्याशी सामना करण्यासाठी मोठ्या सैन्यानिशी सशस्त्र बाहेर पडला.
२१. ह्याप्रमाणे इस्राएल लोकांना अदोमाने आपल्या हद्दीतून जाऊ देण्याचे नाकारले, तेव्हा इस्राएल लोक तेथून दुसरीकडे वळले.
२२. इस्राएल लोकांची सर्व मंडळी कादेश येथून कूच करून होर डोंगराजवळ येऊन पोहचली.
२३. अदोम देशाच्या सरहद्दीवर होर डोंगराजवळ परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला की,
२४. “अहरोन आता आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल; जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यात त्याचा प्रवेश होणार नाही; कारण तुम्ही मरीबाच्या पाण्याजवळ माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.
२५. अहरोन व त्याचा मुलगा एलाजार ह्यांना घेऊन होर डोंगरावर जा;
२६. आणि अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घाल; मग अहरोन तेथे मृत्यू पावेल आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळेल.”
२७. मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; सर्व मंडळीदेखत ते होर डोंगर चढून गेले.
२८. तेथे मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरवून त्याचा मुलगा एलाजार ह्याला घातली; आणि अहरोन तेथेच डोंगरमाथ्यावर मृत्यू पावला. नंतर मोशे व एलाजार हे डोंगरावरून खाली उतरले.
२९. अहरोन मरण पावल्याचे सर्व मंडळीला कळले तेव्हा सार्या इस्राएल घराण्याने अहरोनासाठी तीस दिवस शोक केला.
१. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जयजयकार करा; सरळ माणसांना स्तुतिगान शोभते.
२. वीणेवर परमेश्वराचे उपकारस्मरण करा; दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा.
३. त्याच्यापुढे नवे गीत गा; जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा;
४. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे; त्याची सर्व कृती सत्याची आहे.
५. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत; परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
६. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.
७. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करतो; महासागराचे निधी साठवतो.
८. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो; जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगोत.
९. कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले.
२२. डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.
२३. नीतिमानांची इच्छा शुभच असते; दुर्जनांची अपेक्षा रोषरूप आहे.
२४. एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो, तरी तो भिकेस लागतो.
१. मग तो दाखले देऊन त्यांच्याबरोबर बोलू लागला. “एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याच्याभोवती कुंपण घातले, द्राक्षारसासाठी कुंड खणले, माळा बांधला, आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशास निघून गेला.
२. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले.
३. त्याला त्यांनी धरून मारहाण केली व रिकामे लावून दिले.
४. पुन्हा त्याने दुसर्या एका नोकराला त्यांच्याकडे पाठवले; त्याचे तर दगडांनी डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला.
५. त्याने आणखी एका जणास पाठवले; त्याला तर त्यांनी जिवे मारले; आणि दुसर्या अनेकांना तसेच केले; म्हणजे त्यांच्यातील कित्येकांना त्यांनी मारहाण केली व कित्येकांचा जीव घेतला.
६. अद्यापि त्याच्याजवळ एक जण उरला होता, तो म्हणजे त्याचा आवडता मुलगा. ‘आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील’ असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले.
७. परंतु ते माळी आपसांत म्हणाले, ‘हा वारस आहे; चला, आपण ह्याला मारून टाकू म्हणजे वतन आपले होईल.’
८. मग त्यांनी त्याला धरून जिवे मारले व द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले.
९. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे? तो येऊन त्या माळ्यांचा समूळ नाश करील व द्राक्षमळा दुसर्यांना देईल.
१०. तुम्ही हा शास्त्रलेखही वाचला नाही काय की, ‘जो दगड बांधकाम करणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला;
११. हे परमेश्वराकडून झाले, आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे’?”
१२. तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.
१३. नंतर त्यांनी त्याला बोलण्यात धरण्याकरता परूशी व हेरोदी ह्यांच्यातील काहींना त्याच्याकडे पाठवले.
१४. ते येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आपण खरे आहात व कोणाची भीडमुरवत धरत नाही, कारण आपण माणसांचे तोंड पाहून बोलत नसता, तर देवाचा मार्ग सात्त्विक भावाने शिकवत असता, हे आम्हांला ठाऊक आहे. कैसराला कर देणे रास्त आहे की नाही? आम्ही तो द्यावा की न द्यावा?”
१५. पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, “माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या.”
१६. त्यांनी ते आणले; तेव्हा त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते त्याला म्हणाले, “कैसराचा.”
१७. येशू त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना त्याच्याविषयी फार आश्चर्य वाटले.
१८. मग ‘पुनरुत्थान नाही’ असे म्हणणारे सदूकी त्याच्याकडे आले व ते त्याला विचारू लागले,
१९. “गुरूजी, मोशेने आमच्यासाठी असे लिहून ठेवले आहे की, ‘कोणाएकाचा भाऊ मेला, आणि त्याची बायको मागे राहिली आणि त्याला मूलबाळ झालेले नसले तर त्याच्या भावाने त्या बायकोबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा.’
२०. कोणी सात भाऊ होते, त्यांच्यापैकी पहिल्या भावाने बायको केली व तो संतती न होता मेला.
२१. मग ती दुसर्याने केली; तोही संतती न होता मेला; आणि तशीच तिसर्याचीही गोष्ट झाली.
२२. ह्याप्रमाणे सातही जण संतती न होता मेले. सर्वांच्या शेवटी बायकोही मेली.
२३. तर पुनरुत्थानसमयी ते उठतील तेव्हा ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिला बायको करून घेतले होते.”
२४. येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना?
२५. कारण मेलेल्यांतून उठल्यानंतर कोणी लग्न करून घेत नाहीत किंवा लग्न करून देतही नाहीत; तर ते स्वर्गातील देवदूतांसारखे असतात.
२६. पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे?’
२७. तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे. तुमचे तर अगदीच चुकत आहे.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide