१. हासोराचा राजा याबीन ह्याने हे ऐकल्यावर मादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना,
२. तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात, किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात, तळवटीत आणि पश्चिमेकडील नाफोत-दोरात असलेल्या राजांना,
३. आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेच अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीतले यबूसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी ह्यांना बोलावणे पाठवले.
४. तेव्हा ते सगळे आपापल्या सेनांचा समुद्रकिनार्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले, त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते.
५. ह्या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला.
६. मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या मी ह्याच वेळी ते सर्व कापून काढलेले इस्राएलाच्या हाती देईन; त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाक.”
७. तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यांसह मेरोम सरोवराजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला.
८. परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले; त्यांनी त्यांना मार देऊन सीदोन महानगरापर्यंत व मिस्रफोथ-माईमापर्यत आणि पूर्वेस मिस्पे खोर्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की, त्यांच्यातला एकही जिवंत राहिला नाही.
९. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले.
१०. त्या वेळेस यहोशवाने मागे परतून हासोर घेतले, व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले; कारण पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते.
११. तेथल्या सर्व प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; कोणताही प्राणी जिवंत ठेवला नाही; आणि त्याने हासोर नगराला आग लावून ते जाळून टाकले.
१२. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजांसह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला.
१३. टेकड्यांवर असलेल्या नगरांपैकी कोणतेही नगर इस्राएलाने जाळले नाही; हासोर मात्र यहोशवाने जाळले.
१४. ह्या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्राएल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक माणूस मारून टाकला, एकही प्राणी जिवंत ठेवला नाही.
१५. परमेश्वराने आपला सेवक मोशे ह्याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले; परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही.
१६. अशा प्रकारे यहोशवाने डोंगरी मुलुख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, अराबा इस्राएलाचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट,
१७. तसेच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोर्यातील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले.
१८. त्या सर्व राजांशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले.
१९. गिबोनात राहणार्या हिव्व्यांखेरीज कोणत्याही नगराने इस्राएल लोकांशी तह केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतली,
२०. कारण परमेश्वराचा असा हेतू होता की, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा, आणि त्यांना काहीच दयामाया न दाखवता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्राएलाशी युद्ध करायला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची मने कठीण केली.
२१. त्या वेळी यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब येथे राहणार्या आणि यहूदाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणार्या अनाकी लोकांचा उच्छेद केला; यहोशवाने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला.
२२. इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.
२३. परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्राएलाला त्याच्या वंशांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून वाटून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.
१. ज्या राजांना ठार मारून त्यांचे यार्देनेपलीकडे उगवतीकडील आर्णोन खोर्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत असलेले प्रदेश आणि पूर्वेकडील सर्व इस्राएल लोकांनी काबीज केले ते राजे हे:
२. अमोर्यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर,
३. आणि पूर्वेस किन्नेरोथ सरोवरापासून बेथ-यशिमोथाच्या वाटेवरल्या अराबापर्यंत म्हणजे पूर्वेकडील अराबाच्या समुद्रापर्यंत किंवा क्षार समुद्रापर्यंत आणि दक्षिणेस पिसगाच्या उतरणीपर्यंत त्याची सत्ता होती;
४. उरलेल्या रेफाई लोकांतला बाशानाचा राजा ओग; हा अष्टारोथ व एद्रई येथे राहत असे,
५. आणि हर्मोन पर्वत, सलका, गशूरी व माकाथी ह्यांच्या सीमेपर्यंतचा सगळा बाशान प्रांत आणि हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत अर्ध्या गिलादावर त्याची सत्ता होती.
६. ह्यांचा मोड परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक ह्यांनी केला होता; आणि परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तो रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतन म्हणून दिला होता. यहोशवाने पराभूत केलेले राजे
७. यार्देनेच्या पश्चिमेस लबानोन खोर्यातील बाल-गादापासून सेईरास जाणार्या घाटातील हालाक डोंगरापर्यंत ज्या राजांचे देश होते व ज्यांचा यहोशवा व इस्राएल लोक ह्यांनी मोड केला ते हे: (हा देश यहोशवाने इस्राएलवंशांना त्यांच्या हिश्शांप्रमाणे वतन म्हणून दिला,
८. तेथील डोंगराळ प्रदेशात, तळवटीत, अराबात, उतरणीत, रानात आणि नेगेबात, हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी राहत होते.)
९. यरीहोचा राजा, बेथेलाच्या बाजूस जे आय त्याचा राजा,
१०. यरुशलेमाचा राजा, हेब्रोनाचा राजा,
११. यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा,
१२. एग्लोनाचा राजा, गेजेराचा राजा,
१३. दबीराचा राजा, गेदेराचा राजा,
१४. हर्माचा राजा, अरादाचा राजा,
१५. लिब्नाचा राजा, अदुल्लामाचा राजा,
१६. मक्केदाचा राजा, बेथेलाचा राजा,
१७. तप्पूहाचा राजा, हेफेराचा राजा,
१८. अफेकाचा राजा, लशारोनाचा राजा,
१९. मादोनाचा राजा, हासोराचा राजा,
२०. शिम्रोन-मरोनाचा राजा, अक्षाफाचा राजा,
२१. तानखाचा राजा, मगिद्दोचा राजा,
२२. केदेशाचा राजा, कर्मेलातील यकनामाचा राजा,
२३. नाफत-दोर येथील दोराचा राजा, गिलगाल१ येथील गोयीमाचा२ राजा,
२४. तिरसाचा राजा; ह्याप्रमाणे नगरागणिक एक असे एकंदर एकतीस राजे होते.
४. हे देवा, तूच माझा राजा आहेस; याकोबाला जयावर जय प्राप्त होईल असे कर.
५. आम्ही तुझ्या साहाय्याने आपल्या शत्रूंना उलथून टाकू; आमच्यावर उठणार्यांना तुझ्या नावाने पायदळी तुडवू.
६. मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवत नाही, माझी तलवार माझा बचाव करणार नाही;
७. तर आमच्या शत्रूंपासून तू आमचा बचाव करतोस आणि आमचा द्वेष करणार्यांना तू फजीत करतोस.
८. आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो, आणि तुझ्या नावाचे सर्वकाळ उपकारस्मरण करतो. (सेला)
९. तरी आता तू आम्हांला टाकले आहेस, आम्हांला फजीत केले आहेस; आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस.
१०. तू आम्हांला शत्रूला पाठ दाखवायला लावलेस, आमचा द्वेष करणारे आम्हांला यथेच्छ लुटतात.
११. तू आम्हांला मेंढरांसारखे भक्ष्यरूप केले आहेस; आणि तू राष्ट्राराष्ट्रांमध्ये आमची दाणादाण केली आहेस.
१२. तू आपले लोक विनामूल्य विकलेस, त्यांचे मोल घेऊन आपला फायदा केला नाहीस.
१३. तू आम्हांला आमच्या शेजार्यांच्या निंदेचा विषय केलेस, आमच्या सभोवतालच्या लोकांच्या उपहासाचा व धिक्काराचा विषय केलेस.
१४. राष्ट्रांनी आमच्यावर म्हणी रचाव्या असे तू आम्हांला केले आहेस. व आम्हांला पाहून लोकांनी डोके हलवावे असे तू केलेस.
१५. माझी फजिती नित्य माझ्यापुढे आहे आणि माझ्या मुखावरील लज्जेने मला व्यापले आहे;
१६. कारण निंदा व निर्भर्त्सना करणार्यांचे शब्द मी ऐकत आहे.
१७. हे सर्व आमच्यावर आले तरी आम्ही तुला विसरलो नाही, तुझ्या करारासंबंधाने आम्ही विश्वासघात केला नाही.
१८. आमचे मन फितूर झाले नाही; आमची पावले तुझ्या मार्गातून ढळली नाहीत;
१९. तरी तू आम्हांला कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचले, मृत्युच्छायेने आच्छादले.
१. प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.
२. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण ज्याचे मार्ग कुटिल असतात तो त्याला तुच्छ मानतो.
२५. मग पाहा, कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, “गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?”
२६. त्याने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे?”
२७. त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने ‘प्रीती कर;’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.”’
२८. त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.”
२९. परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”
३०. येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.
३१. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसर्या बाजूने चालता झाला.
३२. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसर्या बाजूने चालता झाला.
३३. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला;
३४. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली.
३५. दुसर्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ‘ह्याची काळजी घ्या; आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन.’
३६. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?”
३७. तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”
३८. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला; तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले.
३९. तिला मरीया नावाची एक बहीण होती; तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली.
४०. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.”
४१. प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस;
४२. परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide