१. अथारीमच्या वाटेने इस्राएल लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणार्या अरादाच्या कनानी राजाने ऐकले, तेव्हा त्याने इस्राएलांशी युद्ध करून कित्येकांना कैद केले.
२. तेव्हा इस्राएलाने परमेश्वराला असा नवस केला की, “जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करीन.”
३. इस्राएलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला; म्हणून त्या ठिकाणाचे नाव हर्मा (म्हणजे विनाश) असे पडले.
४. मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले.
५. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”
६. तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले; त्यांच्या दंशाने इस्राएलातील बरेच लोक मेले.
७. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.
८. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.”
९. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे.
१०. नंतर इस्राएल लोकांनी कूच करून ओबोथ येथे तळ दिला.
११. ओबोथाहून कूच करून उगवतीकडे मवाबासमोरील रानात ईये-अबारीम येथे त्यांनी तळ दिला.
१२. तेथून कूच करून त्यांनी जेरेद खोर्यात तळ दिला.
१३. तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी, अमोर्यांच्या सीमेवरून वाहणारी जी आर्णोन नदी तिच्या पैलतीरी तळ दिला. ही आर्णोन नदी मबाव देशाची सरहद्द आहे. ती मवाबी व अमोरी ह्यांच्यामधील सरहद्दीवरून वाहते.
१४. ह्यामुळे ‘परमेश्वराचे संग्राम’ नावाच्या ग्रंथात येणेप्रमाणे लिहिले आहे: “सुफातला वाहेब, व आर्णोनेची खोरी
१५. आणि आर येथील वस्तीपर्यंत व मवाबाच्या सरहद्दीपर्यंत पसरत गेलेली त्या खोर्यांची उतरण.”
१६. तेथून कूच करून ते बएर (म्हणजे विहीर) येथे गेले. ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते की, ‘लोकांना एकत्र कर म्हणजे मी त्यांना पाणी देईन’ तीच ही विहीर.
१७. त्या समयी इस्राएलाने हे गीत गाइले: “हे विहिरी, उसळून ये; तिला उद्देशून गा.
१८. राजदंडाने१ व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणली इस्राएलातील अमिरांनी ती खोदली.” मग ते रानातून मत्तनाला गेले;
१९. आणि मत्तनाहून नाहालीयेलास आणि नाहालीयेलाहून बामोथास गेले;
२०. आणि बामोथाहून कूच करून रानापुढील (येशीमोनापुढील) पिसगाच्या माथ्याजवळ असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोर्याकडे ते जाऊन पोहचले.
२१. मग इस्राएलाने अमोर्यांचा राजा सीहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,
२२. “आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे. आम्ही आजूबाजूला वळून कोणत्याही शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही, आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच जाऊ.”
२३. पण सीहोनाने इस्राएलास आपल्या देशातून जाऊ दिले नाही. आपले सर्व लोक जमा करून इस्राएलाशी सामना करण्यासाठी तो निघाला आणि रानाकडे आला; त्याने याहस येथे येऊन इस्राएलाशी लढाई केली.
२४. तेव्हा इस्राएलाने त्याच्यावर तलवार चालवली आणि आर्णोनेपासून अम्मोनी लोकांच्या सरहद्दीवरील यब्बोक नदीपर्यंत त्याचा देश काबीज केला; परंतु अम्मोनी लोकांची सरहद्द मजबूत होती.
२५. ह्याप्रमाणे इस्राएलाने अमोर्यांची ही सर्व नगरे घेतली. अमोर्यांच्या सर्व नगरांत म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावांत इस्राएल वस्ती करून राहिला.
२६. हेशबोन हे अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे नगर होते; त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून आर्णोनेपर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता.
२७. ह्यावरून शाहीर गातात की, “हेशबोनाला या; सीहोनाचे नगर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या;
२८. कारण हेशबोनातून अग्नी निघाला आहे. सीहोनाच्या नगरातून ज्वाला निघाली आहे; तिने मवाबाचे आर, आणि आर्णोनेच्या गढ्यांचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.
२९. हे मवाबा! तू हायहाय करशील; कमोशाचे लोकहो तुम्ही नष्ट झालात, त्याने आपल्या मुलांना पळपुटे होऊ दिले, आणि आपल्या कन्या अमोर्यांचा राजा सीहोन ह्याच्या बंदीत पडू दिल्या आहेत.
३०. आम्ही त्यांना बाण मारले आहेत; दीबोनापर्यंत हेशबोनाचा नाश झाला आहे, आणि नोफापर्यंत सर्व देश आम्ही उजाड केल्यावर मेदबापर्यंत आग पसरली आहे.”
३१. ह्याप्रमाणे इस्राएल लोक अमोर्यांच्या देशात वस्ती करून राहिले.
३२. मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठवले; इस्राएल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोर्यांना देशाबाहेर हाकून लावले.
३३. नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले, तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करायला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि एद्रई येथे युद्धास उभा राहिला.
३४. पण परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला, त्याच्या सर्व लोकांना व त्याच्या देशाला तुझ्या हाती दिले आहे. हेशबोनात राहणारा अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे जसे तू केलेस तसेच ह्याचेही कर.”
३५. मग त्यांनी त्याला, त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला.
१. मग इस्राएल लोकांनी कूच करून यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला.
२. इस्राएलांनी अमोर्यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले.
३. इस्राएल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मवाब अतिशय घाबरला; इस्राएल लोकांमुळे तो हवालदिल झाला.
४. तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांना मवाबी म्हणाले, “बैल जसा शेतातील गवत फस्त करतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्वकाही फस्त करील.” त्या वेळी सिप्पोराचा मुलगा बालाक हा मवाबाचा राजा होता.
५. बौराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशात, फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता. त्याला बोलावण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळवले की, “पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि ते माझ्यासमोर राहत आहेत;
६. म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे; कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत; तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन; कारण मला ठाऊक आहे की, ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो.”
७. मग मवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला.
८. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आज रात्री येथे वस्तीस राहा; परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हांला उत्तर देईन;” तेव्हा मवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले.
९. नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, “तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत?”
१०. बलामाने देवाला उत्तर दिले, “मवाबाचा राजा, सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठवला आहे की,
११. ‘पाहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे; तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे; तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लावता येईल.”’
१२. देव बलामास म्हणाला, “तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस, कारण ते आशीर्वादित लोक आहेत.”
१३. सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले, “आपल्या देशाला परत जा, कारण तुमच्याबरोबर यायला परमेश्वराने मला मनाई केली आहे.”
१४. तेव्हा मवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की, “बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही.”
१५. मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठवले.
१६. ते बलामाकडे जाऊन म्हणाले, “सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याची विनंती आहे की, ‘माझ्याकडे येण्यास काही अनमान करू नकोस,
१७. मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन; तरी तू अवश्य येऊन माझ्याकरता ह्या लोकांना शाप दे.”’
१८. बलाम बालाकाच्या सेवकांना म्हणाला, “बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले तरी परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमीजास्त काहीएक करता येत नाही.
१९. तरीपण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल.”
२०. रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, “हे पुरुष तुला बोलवायला आलेले असतील तर त्यांच्याबरोबर जा; मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर.”
२१. बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मवाबी सरदारांबरोबर गेला.
२२. पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडवण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला आडवा आला. बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे दोन सेवक होते.
२३. परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली; तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारले.
२४. मग द्राक्षमळ्यांच्या मधल्या अरूंद वाटेवर परमेश्वराचा दूत उभा राहिला. तिच्या दोन्ही बाजूंना कुंपणाच्या भिंती होत्या.
२५. परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी भिंतीला अशी लगटली की, बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला, म्हणून त्याने तिला पुन्हा मारले.
२६. मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला.
२७. तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली म्हणून बलामाने रागाने पेटून आपल्या काठीने तिला झोडपले.
२८. तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?”
२९. बलाम गाढवीला म्हणाला, “तू माझी चेष्टा केलीस; माझ्या हाती तलवार असती तर मी आताच तुला छाटून टाकले असते.”
३०. गाढवी बलामाला म्हणाली, “तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आलास तीच मी तुझी गाढवी आहे ना? तुझ्याशी मी कधी अशी वागले काय?” तो म्हणाला, “नाही.”
३१. तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले.
३२. परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते;
३३. आणि मला पाहून ती गाढवी माझ्यासमोरून तीनदा बाजूला हटली; ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आताच मी तुला मारून टाकले असते व तिला जिवंत ठेवले असते.”
३४. बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे; तू माझ्याविरुद्ध वाटेत उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते; तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो.”
३५. परमेश्वराचा दूत बलामाला म्हणाला, “ह्या मनुष्यांबरोबर जा, मात्र जे शब्द मी तुला सांगेन तेवढेच बोल.” मग बलाम बालाकाच्या सरदारांबरोबर गेला.
३६. बलाम आल्याचे ऐकून बालाक त्याचे स्वागत करण्यासाठी आर्णोन नदीतीरी देशाच्या अगदी सीमेवर असलेल्या मवाब नगराकडे गेला.
३७. बालाक बलामाला म्हणाला, “मी तुला मोठ्या निकडीचे बोलावणे पाठवले होते ना? माझ्याकडे का नाही आलास? तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नाही काय?”
३८. बलाम बालाकाला म्हणाला, “पाहा, मी तुझ्याकडे आलो आहे खरा; पण मला स्वतःला काही बोलण्याचे सामर्थ्य आहे काय? जे वचन देव माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन.”
३९. मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्याथ-हसोथ येथे आले.
४०. तेथे बालाकाने गुरामेंढरांचे बळी अर्पण केले आणि बलाम व त्याच्याबरोबर असलेल्या सरदारांकडे वाटे पाठवले.
४१. सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.
१०. राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.
११. परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.
१२. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!
१३. परमेश्वर आकाशातून पाहतो; सर्व मानवजातीला तो निरखतो.
१४. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणार्या सर्वांना न्याहाळून पाहतो.
१५. त्या सर्वांची हृदये घडणारा व त्यांची सर्व कामे जाणणारा तो आहे.
१६. कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही; वीरपुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही.
१७. जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय; त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करता येणार नाही.
२५. उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल.
२६. जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात; जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल.
२८. तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, “सर्वांत पहिली आज्ञा कोणती?”
२९. येशूने उत्तर दिले, सर्वांत पहिली ही की, ‘हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;’
३०. आणि ‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’
३१. दुसरी ही की, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर.’ ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.”
३२. तो शास्त्री त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ठीक व खरे बोललात की, ‘देव एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही;’
३३. आणि ‘संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जिवाने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे’ आणि ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती करणे’ हे सर्व ‘होमार्पण व यज्ञ’ ह्यांपेक्षा अधिक आहे.”
३४. त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.
३५. नंतर येशू मंदिरात शिक्षण देत असता म्हणाला, “ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे, असे शास्त्री म्हणतात ते कसे?
३६. कारण दाविदाने स्वत: पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने म्हटले, ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’
३७. दावीद स्वत: त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती.
३८. आणखी तो आपल्या शिकवणीत त्यांना म्हणाला, शास्त्र्यांविषयी जपून राहा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणे, बाजारांत नमस्कार घेणे,
३९. आणि सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य बैठका ह्यांची आवड असते.
४०. ते विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करतात; त्यांना अधिकच शिक्षा होईल.”
४१. मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते.
४२. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने दोन टोल्या, म्हणजे एक दमडी टाकली.
४३. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे.
४४. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले; परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide