बायबल एकाच वर्षात

१. मग जिफी लोक गिबा येथे शौलाकडे जाऊन म्हणाले, “रानासमोरील हकीला डोंगरात दावीद लपून राहिला आहे ना?”
२. तेव्हा शौल इस्राएलातले तीन हजार निवडक योद्धे बरोबर घेऊन दाविदाचा शोध करायला जीफ रानात निघून गेला.
३. शौलाने आपली छावणी रस्त्याच्या बाजूला हकीला डोंगरावर केली. दावीद त्या रानात राहत होता; शौल आपला पाठलाग करीत रानात आला आहे हे त्याला समजले.
४. तेव्हा दाविदाने हेर पाठवून शौल खरोखरच आला आहे की काय ह्याची माहिती काढली.
५. मग दावीद उठून जेथे शौलाचा तळ पडला होता तेथे आला; तेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा पुत्र अबनेर हे निजले होते ते स्थळ त्याने पाहिले. शौलाच्या सभोवती छावणी होती, आणि लोकांनी त्याच्या सभोवती आपले डेरे दिले होते.
६. तेव्हा दाविदाने अहीमलेख हित्ती आणि यवाबाचा भाऊ सरूवेचा पुत्र अबीशय ह्यांना म्हटले, “माझ्याबरोबर त्या छावणीत शौलाकडे येण्यास कोण तयार आहे?” अबीशय म्हणाला, “मी आपल्याबरोबर येतो.”
७. तेव्हा दावीद व अबीशय त्या लोकांजवळ रात्रीचे गेले; तेथे जाऊन पाहतात तर शौल छावणीच्या आड निजला आहे, त्याच्या उशाजवळ त्याचा भाला भूमीत रोवलेला आणि अबनेर व इतर लोक त्याच्या सभोवती निजले आहेत असे त्यांच्या दृष्टीस पडले.
८. तेव्हा अबीशय दाविदाला म्हणाला, “देवाने आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे; तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर असा एकच वार करू द्या की तो त्याला भेदून जमिनीत शिरेल; भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही.”
९. दावीद अबीशयास म्हणाला, “त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?”
१०. दावीद आणखी म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वरच त्याला मारील अथवा त्याचा काळ आला म्हणजे तो मरेल अथवा युद्धात त्याचा अंत होईल.
११. परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकायचे माझ्याकडून न घडो; पण आता त्याच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे; मग आपण निघून जाऊ.”
१२. तेव्हा दाविदाने शौलाच्या उशाजवळून भाला आणि पाण्याचा चंबू उचलून घेतला, आणि ते निघून गेले. ते निघून गेले तेव्हा कोणी त्यांना पाहिले किंवा ओळखले नाही व कोणी जागाही झाला नाही. ते सर्व निद्रिस्त होते; परमेश्वराने त्यांना गाढ निद्रा लावली होती.
१३. मग दावीद पलीकडील बाजूस एका दूरवरच्या टेकडीच्या माथ्यावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते.
१४. दावीद त्या लोकांना आणि नेराचा पुत्र अबनेर ह्यांना मोठ्याने हाक मारून म्हणाला, “अबनेरा, ओ का देत नाहीस?” तेव्हा अबनेराने म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”
१५. दावीद अबनेरास म्हणाला, “तू मर्द आहेस ना? इस्राएलात तुझ्या तोडीचा कोण आहे? असे असून आपल्या स्वामीराजाचे तू का रक्षण केले नाहीस? एक जण तर तुझा स्वामीराजा ह्याचा घात करण्यास आला होता.
१६. तू हे जे काम केले ते काही चांगले नव्हे; परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुम्ही मरणदंडास पात्र आहात, कारण प्रभू परमेश्वर ह्याचा अभिषिक्त आपला स्वामी ह्याचे रक्षण तुम्ही केले नाही. राजाचा भाला व त्याच्या उशाजवळ असलेला पाण्याचा चंबू कोठे आहे तो पाहा.”
१७. तेव्हा शौल दाविदाचा शब्द ओळखून म्हणाला, “माझ्या पुत्रा दाविदा, हा तुझाच शब्द काय?” दावीद म्हणाला, “माझे स्वामीराज, होय, हा माझाच शब्द.”
१८. तो आणखी म्हणाला, “माझे स्वामी आपल्या दासाच्या पाठीस का लागले आहेत? मी काय केले आहे? माझ्या हातून कोणती कसूर झाली आहे?
१९. आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.
२०. तर आता परमेश्वराच्या दृष्टिवेगळे माझे रक्त भूमीवर न पडो; डोंगरात कोणी तितराची शिकार करावी तसा इस्राएलाचा राजा एक पिसू धुंडायला निघाला आहे.”
२१. तेव्हा शौल म्हणाला, “मी अपराधी आहे; माझ्या पुत्रा दाविदा, माघारी ये; आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मोलवान वाटला म्हणून ह्यापुढे मी तुला काहीएक उपद्रव करणार नाही; मी मूर्खपणाने वागलो आहे, माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे.”
२२. दावीद म्हणाला, “महाराज, हा पाहा भाला; हा घेऊन जाण्यासाठी एखाद्या सेवकाला पाठवा.
२३. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या नीतिमत्तेचे व सचोटीचे फळ देईल; आज परमेश्वराने आपणाला माझ्या हाती दिले होते तरी मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकला नाही.
२४. पाहा, आपला प्राण जसा माझ्या दृष्टीला मोलवान वाटला तसाच माझाही प्राण परमेश्वराच्या दृष्टीस मोलवान वाटो व तो मला सर्व संकटांतून सोडवो.”
२५. तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “माझ्या पुत्रा, दाविदा, तू धन्य हो; तू मोठा पराक्रमी होशील आणि खरोखर यशस्वी होशील.” मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौल स्वस्थानी परत आला.
१. दावीद आपल्या मनात म्हणाला, “मी कोणत्या तरी दिवशी शौलाच्या हातून मरणारच तर पलिष्ट्यांच्या देशात पळून जावे ह्यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही; अशाने शौल माझ्यासंबंधाने निराश होऊन इस्राएल देशाच्या कोणत्याही प्रांतात माझा ह्यापुढे शोध करणार नाही; ह्याप्रमाणे मी त्याच्या हातून सुटून जाईन.”
२. तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरचे सहाशे लोक निघून गथचा राजा मावोखपुत्र आखीश ह्याच्याकडे गेले.
३. दावीद व त्याचे लोक आपापल्या परिवारांसह गथात आखीशाच्या जवळ राहिले; दावीद आपल्या दोन स्त्रिया म्हणजे इज्रेलीण अहीनवाम व नाबालाची स्त्री कर्मेलीण अबीगईल ह्यांना घेऊन राहिला.
४. दावीद गथ येथे पळून गेला हे वर्तमान शौलाला समजल्यावर त्याने त्यानंतर त्याचा शोध केला नाही.
५. दावीद आखीशास म्हणाला, “माझ्यावर आपली कृपादृष्टी असेल तर एखाद्या खेडेगावात मला जागा द्या म्हणजे मी तेथे राहीन; आपल्या दासाने आपल्याबरोबर राजधानीत का राहावे?”
६. तेव्हा आखीशाने त्या दिवशी त्याला सिकलाग हे नगर दिले; म्हणून सिकलाग हे नगर आजवर यहूदाच्या राजाचे आहे.
७. पलिष्ट्यांच्या देशात दावीद जाऊन राहिला त्या घटनेस पुरे एक वर्ष चार महिने झाले.
८. मग दावीद व त्याचे लोक ह्यांनी गशूरी, गिरजी व अमालेकी ह्यांच्यावर स्वारी केली; शूराकडून मिसर देशाकडे जाताना जो प्रदेश लागतो त्यात ही राष्ट्रे प्राचीन काळापासून वसली होती.
९. दाविदाने त्या प्रदेशावर मारा केला आणि तेथल्या कोणाही स्त्रीपुरुषास जिवंत सोडले नाही, आणि तेथली शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे, उंट आणि वस्त्रप्रावरणे घेऊन तो परत आखीशाकडे गेला.
१०. आखिशाने विचारले, “आज तू कोणावर स्वारी केलीस?” दावीद म्हणाला, “यहूदाचा दक्षिण प्रांत, यरहमेल्यांचा दक्षिण प्रांत व केन्यांचा दक्षिण प्रांत ह्यांवर.”
११. दाविदाने गथ येथे आणायला कोणी स्त्री किंवा पुरुष जिवंत ठेवला नाही; तो म्हणाला, “त्यांना आणले असते तर दाविदाने असे असे केले अशी त्यांनी आमची चहाडी केली असती.” तो पलिष्ट्यांच्या देशात राहिला तोपर्यंत त्याचा असाच क्रम चालू राहिला.
१२. आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.”
६. देव आपल्या पवित्रतेला अनुसरून१ म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन;
७. गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे, एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझे राजवेत्र आहे;
८. मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे; अदोमावर मी आपले पायतण फेकीन; हे पलेशेथा, माझ्यामुळे तू आरोळी मार.”
९. मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल?
१०. हे देवा, तू आमचा त्याग केलास ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस.
११. शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे.
१२. देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.
४. परमेश्वराने सर्वकाही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.
५. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो; त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो.
१. नंतर तिसर्‍या दिवशी गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.
२. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते.
३. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”
४. येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा-माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.”
५. त्याची आई चाकरांना म्हणाली, “हा तुम्हांला जे काही सांगेल ते करा.”
६. तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते; त्यांत दोन-दोन, तीन-तीन मण पाणी मावेल असे ते होते.
७. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा,” आणि ते त्यांनी काठोकाठ भरले.
८. मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यांतले काढून भोजनकारभार्‍याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले.
९. द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले, (तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणार्‍या चाकरांना ठाऊक होते), तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला,
१०. “प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो; तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”
११. येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
१२. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत.
१३. मग यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला.
१४. आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले.
१५. तेव्हा त्याने दोर्‍यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले.
१६. आणि तो कबुतरे विकणार्‍यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”
१७. तेव्हा ‘तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.
१८. त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हांला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?”
१९. येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन.”
२०. ह्यावरून यहूदी म्हणाले, “हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?”
२१. तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता.
२२. म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले, आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला.
२३. वल्हांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
२४. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता;
२५. शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide