१. मग बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्हे व सात मेंढे तयार ठेव.”
२. बलामाच्या सांगण्याप्रमाणे बालाकाने केले; आणि बालाक व बलाम ह्यांनी प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला.
३. तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, “तू आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा जाऊन येतो; कदाचित परमेश्वर मला दर्शन देईल; जे काही तो मला सांगेल ते मी तुला कळवीन.” असे म्हणून तो एका उजाड टेकडीवर गेला.
४. देवाने बलामाला तेथे दर्शन दिले, तेव्हा बलाम त्याला म्हणाला, “मी सात वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला आहे.”
५. तेव्हा परमेश्वराने बलामाच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, “बालाकाकडे परत जा आणि ह्याप्रमाणे बोल.”
६. तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक व सर्व मवाबी सरदार हे आपल्या होमबलीजवळ उभे होते.
७. बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बालाकाने मला अरामाहून, मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे:
८. ‘ये, मजप्रीत्यर्थ याकोबाला शाप दे. ये, इस्राएलाला धमकी दे.’ ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी शाप कसा देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी धमकी कशी देऊ?
९. डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत, टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे; पाहा, हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे, ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणत नाही.
१०. याकोबाचे रजःकण कोण मोजू शकेल? इस्राएलाच्या चौथ्या भागाची१ तरी गणती कोण करू शकेल? नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो! माझा अंत त्याच्यासारखा होवो!”
११. ह्यावर बालाक बलामाला म्हणाला, “तू माझ्याशी असा का वागलास? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले आणि तू तर त्यांना आशीर्वादच दिलास!”
१२. त्याने म्हटले, “परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालील तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना?”
१३. बालाक त्याला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर दुसर्या ठिकाणी ये. तेथून ते तुझ्या दृष्टीस पडतील, पण ते सर्व तुला दिसायचे नाहीत, केवळ कडेकडेचे दिसतील. तेथून माझ्याकरता त्यांना शाप दे.”
१४. तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफिमाच्या माळावर घेऊन गेला; तेथे त्याने सात वेद्या बांधल्या व प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला.
१५. मग बलाम बालाकाला म्हणाला, “तू येथे आपल्या होमबलीजवळ उभा राहा, मी जरा पलीकडे दर्शनास जाऊन येतो.”
१६. परमेश्वराने बलामाला दर्शन दिले आणि त्याच्या तोंडी शब्द घातले व म्हटले, “बालाकाकडे परत जाऊन त्याला असे बोल.”
१७. तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक मवाबी सरदारांसह होमबलीजवळ उभा होता. आणि बालाकाने त्याला विचारले, “परमेश्वर काय बोलला?”
१८. तेव्हा बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला,
१९. “बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?
२०. पाहा, आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे; त्याने आशीर्वादच दिला आहे, तो मला मागे घेता येत नाही.
२१. त्याने याकोबात अनीती पाहिली नाही, त्याला इस्राएलात क्लेश दिसले नाहीत; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे; राजघोष त्याच्यामध्ये होत आहे.
२२. देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले; जणू काय रानबैलांचे बळ त्यांच्या ठायी आहे.
२३. याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्राएल ह्यांच्याविषयी असे म्हणतील, ‘देवाने केवढे कार्य केले!’
२४. पाहा, हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे. सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे; शिकार भक्षण करीपर्यंत, वधलेल्याचे रुधिर प्राशन करीपर्यंत ते बसायचे नाहीत.”
२५. बालाक बलामाला म्हणाला, “तू त्यांना शापही देऊ नकोस आणि आशीर्वादही देऊ नकोस.
२६. बलाम बालाकाला म्हणाला, “परमेश्वर सांगेल त्याचप्रमाणे मला केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
२७. मग बालाक बलामाला म्हणाला, “आता चल, मी तुला दुसर्या ठिकाणी नेतो, तेथून तू त्यांना माझ्याकरता शाप द्यावा असे कदाचित देवाला योग्य वाटेल.”
२८. तेव्हा बालाकाने बलामास रानाच्या कडेला असलेल्या पौर डोंगराच्या माथ्यावर नेले.
२९. बलाम बालाकाला म्हणाला, “येथे माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि सात गोर्हे व सात मेंढे तयार ठेव.”
३०. बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्हा व एकेक मेंढा अर्पण केला.
१. इस्राएलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसले असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकुन पाहायला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले.
२. बलामाने दृष्टी वर करून पाहिले तर, इस्राएल लोक आपापल्या वंशांप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले; देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला.
३. तो काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;
४. जो देवाची वचने श्रवण करतो ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे:
५. हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्राएला, तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत!
६. खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदीतीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लावलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत.
७. त्याच्या मोटेतून पाणी वाहील. त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल; त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल.
८. देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे; त्याचे बळ रानबैलाच्या बळासारखे आहे; तो आपल्या शत्रुराष्ट्रांना ग्रासून टाकील, त्यांच्या हाडांचा चुराडा करील, आपल्या बाणांनी त्यांना छेदून टाकील.
९. तो सिंहाप्रमाणे, सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील? जो तुझे अभिष्ट चिंतील, त्याचे अभिष्ट होईल; जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल.”
१०. तेव्हा बलामावर बालाकाचा क्रोध भडकला; तो हात आपटून बलामाला म्हणाला, “माझ्या शत्रूंना शाप द्यावा म्हणून मी तुला बोलावून आणले, पण तू तर तीनही वेळा त्यांना आशीर्वादच दिलास;
११. तेव्हा तू आता येथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा; ‘तुझा मोठा सन्मान करीन’ असे मी म्हटले होते, पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आला आहे.”
१२. बलाम बालाकाला म्हणाला, “तू माझ्याकडे पाठवलेल्या दूतांनासुद्धा मी असे सांगितले नव्हते काय की,
१३. ‘बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले तरी परमेश्वराच्या शब्दाबाहेर मला आपल्याच मनाने बरेवाईट काहीही करता येणार नाही, परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन?’
१४. पाहा, आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच, तरी चल, हे लोक शेवटल्या दिवसांत तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवतो.”
१५. मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला, “बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे;
१६. जो देवाची वचने श्रवण करतो, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थाचे दर्शन घडते; जो दंडवत घालतो व ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे:
१७. मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.
१८. त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील तोवर इस्राएल आपला प्रभाव दाखवील.
१९. याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील.”
२०. मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”
२१. मग केनी राष्ट्राला उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “तुझे वसतिस्थान तर मजबूत आहे, तुझे घरटे खडकात आहे;
२२. तरी काइन१ उजाड होईल. अश्शूर तुला बंदिवान करून नेण्यास किती विलंब लावील?”
२३. तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, “हाय! हाय! देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल?
२४. तरी कित्ती ह्यांच्या किनार्यावरून जहाजे येतील, ती अश्शूरास व एबेरास त्रस्त करतील; तरी शेवटी त्यांचाही नाश होईल.”
२५. तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला.
१८. पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व त्याच्या दयेची अपेक्षा करतात,
१९. त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.
२०. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे; आमचे साहाय्य व ढाल तोच आहे.
२१. त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे.
२२. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. म्हणून आमच्यावर तुझी कृपादृष्टी असो.
२७. जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधतो; जो अरिष्टाच्या शोधात असतो त्याला तेच प्राप्त होईल.
१. मग तो मंदिरातून निघून जात असता एक शिष्य त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे चिरे व कशा ह्या इमारती!”
२. येशू त्याला म्हणाला, “ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना? जमीनदोस्त केला जाणार नाही असा चिर्यावर चिरा येथे राहणार नाही.”
३. नंतर तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकान्तात विचारले,
४. “ह्या गोष्टी कधी घडतील? आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हांला सांगा.”
५. येशू त्यांना म्हणू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
६. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन ‘मीच तो [ख्रिस्त] आहे’ असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील.
७. आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे; परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही.
८. कारण, ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’. आणि जागोजागी भूमिकंप [व दंगे] होतील व दुष्काळ पडतील; हा तर वेदनांचा प्रारंभ होय.
९. तुम्ही आपणांला सांभाळा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हांला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हांला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल.
१०. प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.
११. ते तुम्हांला धरून नेऊन चौकशीकरता स्वाधीन करतील तेव्हा आपण कसे काय बोलावे ह्याविषयी अगोदर चिंता करू नका; तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवून दिले जाईल ते बोला; कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे.
१२. तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारवण्याकरता धरून देईल आणि ‘मुले आपल्या आईबापांवर उठतील’ व त्यांचा प्राणघात करवतील;
१३. आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल.
१४. [दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला] ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.
१५. जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये;
१६. आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये.
१७. त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणार्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!
१८. तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.
१९. कारण देवाने निर्माण केलेल्या ‘सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत’ व पुढेही होणार नाहीत ‘इतक्या हालअपेष्टांचे’ ते दिवस होतील.
२०. आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide