बायबल एकाच वर्षात

१. यहोशाफाट हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याला त्याच्या पूर्वजांमध्ये दावीदपुरात मूठमाती देण्यात आली, त्याचा पुत्र यहोराम त्याच्या जागी राजा झाला.
२. त्याचे भाऊ यहोशाफाटाचे पुत्र हे होत: अजर्‍या, यहीएल, जखर्‍या, अजर्‍या, मीखाएल व शफाट्या, हे सर्व इस्राएलाचा राजा यहोशाफाट ह्याचे पुत्र होत.
३. त्यांच्या बापाने त्यांना सोने, रुपे व अमूल्य वस्तू ह्यांच्या मोठ्या देणग्या दिल्या आणि यहूदातील तटबंदीची नगरे दिली; पण यहोरामास त्याने राज्य दिले, कारण तोच ज्येष्ठ पुत्र होता.
४. यहोराम आपल्या बापाच्या गादीवर कायम होऊन बलाढ्य झाला, तेव्हा त्याने आपल्या सर्व भावांना व इस्राएलाच्या काही सरदारांना तलवारीने वधले.
५. यहोराम बत्तीस वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत आठ वर्षे राज्य केले.
६. अहाबाच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलाच्या राजांच्या रीतीप्रमाणे तो चालला; त्याने अहाबाच्या कन्येशी लग्न केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
७. तथापि जो करार परमेश्वराने दाविदाशी केला होता त्यामुळे आणि त्याने त्याचा व त्याच्या वंशजांचा दीप सर्वकाळ राहील असे वचन दिले होते त्यामुळे तो दाविदाचे घराणे नाहीसे करीना.
८. त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला राजा नेमला.
९. तेव्हा यहोराम आपले सेनानायक व आपले सर्व रथ बरोबर घेऊन तिकडे गेला. ज्या अदोमी लोकांनी त्याला घेरले होते त्यांना व रथांच्या नायकांना त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला.
१०. अदोमाने यहूदाचे स्वामीत्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने त्याचे स्वामित्व झुगारून दिले; त्याने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला सोडले होते म्हणून असे झाले.
११. त्याने आणखी यहूदाच्या पहाडांवर उच्च स्थाने बांधली आणि यरुशलेमेतल्या रहिवाशांना व्यभिचारी मतीने चालायला लावून यहूदास बहकवले.
१२. एलीया संदेष्ट्याकडून त्याला एक लेख आला तो असा: “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू आपला बाप यहोशाफाट ह्याच्याप्रमाणे व यहूदाचा राजा आसा ह्याच्याप्रमाणे चालला नाहीस;
१३. तर इस्राएलाच्या राजाप्रमाणे चाललास आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांना व्यभिचारी मतीने चालायला लावले, त्याचप्रमाणे तुझ्याहून चांगले असे जे तुझ्या बापाच्या घराण्यातील तुझे भाऊबंद त्यांचा तू वध केलास;
१४. ह्यामुळे पाहा, तुझे लोक, तुझी मुलेबाळे, तुझ्या स्त्रिया व तुझे सर्व धन ह्यांवर परमेश्वर मोठा प्रहार करील;
१५. तू आतड्यांच्या रोगाने बहुत पीडा पावशील; तो रोग इतका वाढेल की त्यामुळे दिवसानुदिवस तुझी आतडी गळून पडतील.”’
१६. परमेश्वराने पलिष्टी व कूशी लोकांच्या शेजारचे अरबी लोक ह्यांची मने क्षुब्ध करून त्यांना यहोरामावर उठवले;
१७. ते यहूदावर स्वारी करून त्यात घुसले आणि राजमंदिरात जितकी संपत्ती मिळाली तितकी सर्व आणि राजपुत्र व राजस्त्रिया ही अवघी त्यांनी नेली; त्याचा कनिष्ठ पुत्र यहोआहाज१ ह्याच्याखेरीज त्याच्याजवळ कोणी पुत्र राहिला नाही.
१८. ह्यानंतर परमेश्वराने त्याच्या आतड्यांना असाध्य रोगाची पीडा लावली.
१९. उत्तरोत्तर त्या रोगामुळे त्याची आतडी गळत गेली आणि तो अत्यंत पीडा भोगून दोन वर्षांच्या अंती मरण पावला. त्याच्या वाडवडिलांसाठी लोकांनी जशी धूपद्रव्ये जाळली होती तशी त्याच्यासाठी मुळीच जाळली नाहीत.
२०. तो राज्य करू लागला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता; त्याने आठ वर्षे यरुशलेमेत राज्य केले; तो सर्वांना अप्रिय होऊन मरण पावला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, पण ती राजांच्या थडग्यांत दिली नाही.
१. यरुशलेमकरांनी त्याच्या जागी त्याचा कनिष्ठ पुत्र अहज्या२ ह्याला राजा केले, कारण जी माणसांची टोळी अरबी लोकांबरोबर छावणीत आली होती तिने त्याच्या सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता. ह्या प्रकारे अहज्या बिन यहोराम हा यहूद्यांचा राजा झाला.
२. अहज्या राज्य करू लागला तेव्हा तो बेचाळीस१ वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या; ही अम्रीची नात.
३. त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्ये करण्यास त्याची आई त्याला सल्ला देत असे.
४. अहाबाच्या घराण्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले; त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर त्या घराण्यातील लोकांनी त्याला असा सल्ला दिला की त्यायोगे त्याचा नाश झाला.
५. तो त्यांच्या मसलतीने इस्राएलाचा राजा यहोराम बिन अहाब ह्याच्याबरोबर रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढायला गेला, तेव्हा अरामी लोकांनी योरामास घायाळ केले.
६. तो हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्याला झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अजर्‍या२ त्याच्या समाचारास गेला.
७. अहज्याचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगत धरली होती; अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वराने येहू बिन निमशी ह्याला अभिषिक्त केले होते; त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता.
८. येहू अहाबाच्या घराण्यास शासन करीत असता यहूदाचे सरदार व अहज्याचे पुतणे हे अहज्याच्या सेवेस असलेले त्याला आढळले; तेव्हा त्याने त्यांचा वध केला.
९. त्याने अहज्याचा शोध लावला; त्याला त्याच्या लोकांनी पकडले; तो शोमरोन येथे लपून राहिला होता; त्यांनी त्याला येहूकडे नेऊन त्याचा वध केला. त्याला मूठमाती दिली; ते म्हणाले, “जो यहोशाफाट परमेश्वराला जिवेभावे शरण गेला त्याचा हा पुत्र.” अहज्याच्या घराण्यात राज्य करण्यास समर्थ असा कोणी उरला नाही.
१०. अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला.
११. तरी राजकन्या यहोशबाथ३ हिने अहज्याचा पुत्र योवाश ह्याला त्या वधायच्या राजपुत्रांतून चोरून नेले आणि बिछाने ठेवण्याच्या कोठडीत त्याच्या दाईने त्याला लपवून ठेवले. ह्याप्रमाणे यहोराम राजाची कन्या जी यहोयादा याजकाची पत्नी यहोशबाथ (जी अहज्याची बहीण होती) तिने योवाशाला अथल्येपासून लपवले म्हणून तिला त्याचा वध करता आला नाही.
१२. देवाच्या मंदिरात त्याला त्यांच्याबरोबर सहा वर्षे लपवून ठेवले होते; तेव्हा अथल्येने देशावर राज्य केले.
१. एक गीत; आसाफाचे संगीतस्तोत्र. हे देवा, तू स्तब्ध राहू नकोस. हे देवा, मौन धरू नकोस, स्वस्थ राहू नकोस.
२. कारण पाहा, तुझे शत्रू दंगल करीत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढले आहे.
३. ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात; तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करतात.
४. ते म्हणतात, “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.”
५. कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे, ते तुझ्याविरुद्ध कट करतात;
६. तंबूंत राहणारे अदोमी व इश्माएली, मवाबी व हगारी,
७. गबाल, अम्मोन व अमालेक, पलेशेथ व सोरकर हे ते आहेत;
८. अश्शूरही त्यांना सामील झाला आहे; त्यांनी लोटाच्या वंशजांना हात दिला आहे. (सेला)
१. राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.
१६. पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.
१७. ह्यामुळे तो सभास्थानात यहूद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालत असे.
१८. तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्यापैकी कित्येक तत्त्वज्ञान्यांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो;” कारण येशू व पुनरुत्थान ह्यांविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करत असे.
१९. नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हांला समजावून सांगाल काय?
२०. कारण तुम्ही आम्हांला अपरिचित गोष्टी ऐकवत आहात; त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.”
२१. (काहीतरी नवलविशेष सांगितल्या किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.)
२२. तेव्हा पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला: “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतींत धर्मभोळे (देवदेवतांना फार मान देणारे) आहात असे मला दिसते.
२३. कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो.
२४. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही;
२५. आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.
२६. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत;
२७. अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसेतरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही;
२८. ‘कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहोत;’ तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की, ‘आपण वास्तविक त्याचा वंश आहोत.’
२९. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.
३०. अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.
३१. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे.”
३२. तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”
३३. इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला.
३४. तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला; त्यांत दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide