बायबल एकाच वर्षात

१. “माझा प्राणनाश होत आहे. माझे दिवस संपले आहेत; मला कबर काय ती राहिली आहे.
२. लोकांच्या विटंबनेने मला घेरले आहे; त्यांचे खिजवणे माझ्या नेत्रांसमोर सतत चालू आहे.
३. आता हडप दे, तुझ्यामाझ्यामध्ये तूच माझा जामीन हो; माझ्या हातावर हात मारील असा दुसरा कोण आहे?
४. तू त्यांच्या मनात अकलेचा प्रवेश होऊ दिला नाहीस; म्हणून तू त्यांचे वर्चस्व होऊ देणार नाहीस.
५. जो आपल्या मित्रांशी दगा करून त्यांना लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलाबाळांचे डोळे जातील.
६. त्याने माझे नाव लोकात निंदाव्यंजक केले आहे; लोक माझ्या तोंडावर थुंकत आहेत.
७. माझे डोळे दुःखाने अंधुक झाले आहेत; माझे सर्व अवयव छायारूप झाले आहेत.
८. हे पाहून सरळ मनाचे लोक चकित होतील; निर्दोष जन भक्तिहीनामुळे क्रुद्ध होतील;
९. तरी नीतिमान आपला मार्ग धरून राहील, निर्मळ हाताच्या मनुष्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल;
१०. पण तुम्ही सर्व पुन्हा वादास या; तुमच्यामध्ये मला एकही सुज्ञ आढळायचा नाही.
११. माझे दिवस आटोपले आहेत; माझे मनोरथ, माझ्या मनातले विचार, निष्फळ झाले आहेत.
१२. ते रात्रीला दिवस ठरवतात; ‘अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे’ असे ते म्हणतात.
१३. जर अधोलोक माझे निजधाम आहे, एवढीच मला आशा आहे. जर मी आपली शय्या अंधकारात केली आहे,
१४. जर मी गर्तेस म्हणालो, ‘तू माझा बाप;’ किडीला म्हणालो आहे ‘तू माझी आईबहीण;’
१५. तर आता मला आशा राहिली आहे कोठे? माझ्या आशेविषयी म्हणाल तर ती कोणाला दिसेल?
१६. ती अधोलोकाच्या अडसरांपर्यंत उतरेल, तेव्हा मातीत एकदाचा आम्हांला विराम मिळेल.”
१. मग बिल्दद शूही म्हणाला,
२. “तुम्ही कोठवर शब्द शोधून योजत बसाल? तुम्ही समज घ्या, मग आम्ही बोलू.
३. तुमच्या हिशोबी आम्ही पशू का ठरलो? तुमच्या दृष्टीने आम्ही अशुद्ध का झालो?
४. अरे क्रोधाने स्वतःस फाडून टाकणार्‍या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय? खडक आपल्या ठिकाणचा ढळेल काय?
५. तरी दुष्टाचा दीप मालवेल, त्याच्या अग्नीची ज्वाला झळकणार नाही.
६. त्याच्या डेर्‍यातला प्रकाशाचा अंधकार होईल, त्याचा लामणदिवा विझून जाईल.
७. त्याच्या जोराच्या ढांगा संकोच पावतील, त्याचीच युक्ती त्याचा निःपात करील.
८. तो आपल्या पायांनी जाळ्यात अडकतो, तो पाशात पाऊल टाकत आहे.
९. त्याची टाच सापळ्यात अडकते; पाश त्याला धरून ठेवतो.
१०. त्याच्यासाठी पाश जमिनीत गुप्त ठेवला आहे; त्याच्या मार्गात सापळा ठेवला आहे.
११. त्याला दहशत चोहोकडून घाबरे करते; ती त्याचा पिच्छा पुरवते.
१२. त्याची शक्ती क्षुधिताप्रमाणे क्षीण होईल; तो केव्हा पडेल ह्याची अरिष्ट वाट पाहत आहे.
१३. ते त्याच्या शरीराचे अवयव तोडून खाईल; मृत्यूचा ज्येष्ठ पुत्र त्याचे अवयव ग्रासील.
१४. ज्या डेर्‍याचा तो भरवसा धरी त्यातून त्याला ओढून काढतील; त्याला भयाच्या राजापुढे हजर करतील.
१५. जे त्याचे नव्हत ते त्याच्या डेर्‍यात वास करतील त्याच्या वसतिस्थानांवर गंधक उधळतील.
१६. खालून त्याचे मूळ सुकेल, व वरून त्याची डाहळी छाटतील.
१७. देशातून त्याची आठवण बुजेल, व पेठेत त्याचे नाव राहणार नाही.
१८. ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटतील, त्याला जगातून पळवतील.
१९. त्याच्या लोकांत त्याचे कोणी पुत्रपौत्र आढळणार नाहीत; त्याच्या बिर्‍हाडात कोणी उरणार नाही.
२०. त्याचा दुर्दिन पाहून पश्‍चिमेकडे राहणारे चकित होतील, पूर्वेकडे राहणारे कंपित होतील.
२१. कुटिलाच्या निवासांचे निःसंशय असेच होणार; देवाला न ओळखणार्‍याच्या स्थानाचे असेच होणार.”
१. याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू.
२. उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
३. कारण परमेश्वर थोर देव आहे; सर्व देवांहून तो थोर राजा आहे.
४. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत; पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
५. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला; कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली.
१. अधिपतीबरोबर भोजनास बसतोस तेव्हा तुझ्यापुढे कोण आहे ह्याचा पूर्ण विचार कर;
२. तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.
३. त्याच्या मिष्टान्नांची इच्छा करू नकोस; ती कपटाची खाद्ये आहेत.
१. म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
२. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
३. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.
४. कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही,
५. तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.
६. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;
७. सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणार्‍याने शिक्षण देण्यात,
८. बोध करणार्‍याने बोध करण्यात तत्पर असावे, दान देणार्‍याने ते औदार्याने द्यावे, अधिकार्‍याने आपले काम आस्थेने करावे, दया करणार्‍याने ती संतोषाने करावी.
९. प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;
१०. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसर्‍याला आदराने आपल्यापेक्षा थोर माना.
११. आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची सेवा करा;
१२. आशेने हर्षित व्हा; संकटात धीर धरा; प्रार्थनेत तत्पर राहा;
१३. पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.
१४. तुमचा छळ करणार्‍यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका.
१५. आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा.
१६. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. स्वत:ला शहाणे समजू नका.
१७. वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व माणसांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.
१८. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा.
१९. प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.
२०. उलटपक्षी, “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखार्‍यांची रास करशील.”
२१. वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide