१. सातव्या वर्षी यहोयादाने आपली मजबुती करून शतपती अजर्या बिन यहोराम, इश्माएल बिन यहोहानान, अजर्या बिन ओबेद, मासेया बिन अदाया आणि अलीशाफाट बिन जिक्री ह्यांच्याशी करार करून त्यांना आपल्या पक्षाचे केले.
२. त्यांनी यहूदात फिरून त्यातील सर्व नगरांतून लेवी आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांना एकत्र केले आणि ते यरुशलेमेस आले.
३. सर्व मंडळीने देवाच्या मंदिरात राजाशी करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “दाविदाच्या वंशजांविषयी परमेश्वराने सांगितले आहे त्याप्रमाणे राजपुत्राने गादीवर बसावे.
४. तुम्हांला करायचे ते हेच की तुमच्यातल्या याजकांपैकी व लेव्यांपैकी एकतृतीयांश लोक शब्बाथ दिवशी येत असतात, त्यांनी द्वारपालांचे काम करावे;
५. एक तृतीयांश लोकांनी राजमंदिरावर पहारा करावा आणि एक तृतीयांश लोकांनी तळाच्या वेशीजवळ असावे आणि बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात राहावे.
६. याजक व सेवा करणारे लेवी ह्यांच्याखेरीज कोणी देवाच्या मंदिरात येऊ नये; त्यांनीच मात्र आत यावे, कारण ते पवित्र होत; बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराचा पहारा करावा.
७. लेव्यांपैकी प्रत्येक मनुष्याने आपापल्या हाती शस्त्रे घेऊन राजासभोवती उभे राहावे; कोणी मंदिराच्या आत आला की त्याला मारून टाकावे; राजा आतबाहेर येईल-जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असावे.”
८. यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे लेव्यांनी व सर्व यहूद्यांनी केले; त्यांतल्या प्रत्येकाने शब्बाथ दिवशी आत येण्याची ज्यांची पाळी असे व कामावरून परत जाण्याची ज्यांची पाळी असे त्यांची व्यवस्था केली; यहोयादा याजकाने कोणत्याही पाळीपाळीने येणार्या लेव्यांना निरोप दिला नव्हता.
९. दावीद राजाचे भाले, बरच्या व ढाली जी देवाच्या मंदिरात होती ती यहोयादा याजकाने घेऊन शतपतींना दिली.
१०. त्याने प्रत्येक मनुष्याला आपापल्या हाती हत्यार घेऊन मंदिराच्या वेदीच्या व मंदिराच्या जवळ राजासभोवती उजव्या व डाव्या बाजूस उभे राहायला सांगितले.
११. मग त्याने राजकुमारास बाहेर आणून त्याच्या शिरी मुकुट ठेवला आणि त्याला आज्ञापट देऊन राजा केले; यहोयादा व त्याचे पुत्र ह्यांनी त्याला अभिषेक केला; तेव्हा सर्व लोक म्हणाले, “राजा चिरायू होवो.”
१२. लोक धावतपळत आहेत व राजाची स्तुती करीत आहेत, ही गडबड ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात लोकांकडे आली;
१३. आणि पाहते तर राजा प्रवेशस्थानी आपल्या नेहमीच्या स्तंभाजवळ उभा आहे, सेनानायक व कर्णे वाजवणारे राजाजवळ आहेत; देशाचे सर्व लोक कर्णे वाजवून आनंद करीत आहेत; गाणारे व स्तवन शिकवणारे वाद्ये वाजवत आहेत; हे अथल्येच्या दृष्टीस पडले, तेव्हा ती आपली वस्त्रे फाडून, “फितुरी रे फितुरी!” असे म्हणाली.
१४. मग यहोयादा याजकाने सेनेवरील शतपतींना बाहेर आणून आज्ञा केली की, “तिला सैन्याच्या रांगेतून बाहेर काढा; तिच्यामागून जो जाईल त्याचा वध करा;” कारण परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये असे याजकाने सांगितले.
१५. तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली; राजमंदिरी जाण्याच्या घोडेवेशीने ती निघून गेली; तेथे त्यांनी तिला जिवे मारले.
१६. ह्यानंतर यहोयादा, राजा व प्रजा ह्यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करवला.
१७. तेव्हा सर्व लोकांनी बआलदैवताच्या देवळात जाऊन ते मोडून त्याच्या वेद्या व मूर्ती ह्यांचा भुगाभुगा केला आणि बालाचा याजक मत्तान ह्याचा वेद्यांसमोर वध केला.
१८. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे व दाविदाने नेमून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पून आनंदाने गायन करावे म्हणून दाविदाने लेवीय याजकांची परमेश्वराच्या मंदिरात वाटणी करून दिली होती, त्यांच्या हाती यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराचे अधिकार सोपवले.
१९. कोणत्याही प्रकारे कोणी अशुद्ध असला तर त्याचा आत प्रवेश होऊ नये म्हणून त्याने परमेश्वराच्या द्वाराशी द्वारपाळ नेमले.
२०. शतपती, अमीरउमराव, लोकांचे सुभे व देशाचे सर्व लोक ह्यांना त्याने बरोबर घेऊन परमेश्वराच्या मंदिरातून राजाला बाहेर आणले; ते वरच्या वेशीतून निघून राजमंदिरात आले आणि राजा राजासनावर बसला.
२१. ह्या प्रकारे देशाचे सर्व लोक आनंदित झाले व नगरात शांतता झाली; अथल्येचा त्यांनी तलवारीने वध केला.
१. योवाश राज्य करू लागला तेव्हा तो सात वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव सिब्या; ती बैर-शेबा येथली.
२. यहोयादा याजक ह्याच्या सर्व हयातीत योवाश हा परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करीत असे.
३. यहोयादाने त्याला दोन बायका करून दिल्या; त्याला पुत्र व कन्या झाल्या.
४. ह्यानंतर परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे योवाशाच्या मनात आले;
५. म्हणून त्याने याजक व लेवी ह्यांना एकत्र करून म्हटले, “वर्षानुवर्षे तुमच्या देवाच्या मंदिराची दुरुस्ती व्हावी म्हणून तुम्ही यहूदाच्या सर्व नगरांत जा व सर्व इस्राएलांपासून पैसे जमा करा; हे कार्य त्वरित करा;” असे त्याने सांगितले असताही लेव्यांनी ते त्वरेने केले नाही.
६. राजाने त्यांचा नायक यहोयादा ह्याला बोलावून विचारले, “आज्ञापटाच्या तंबूसाठी परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएलाची मंडळी ह्यांनी वहिवाट लावून दिल्याप्रमाणे यहूदा आणि यरुशलेम ह्यांतल्या लोकांपासून लेव्यांना कर जमा करण्यास का सांगितले नाही?”
७. त्या दुष्ट अथल्येच्या पुत्रांनी देवाचे मंदिर मोडूनतोडून टाकले होते आणि परमेश्वराच्या मंदिरातील सगळ्या समर्पित वस्तू त्यांनी बआलदैवतांना वाहिल्या होत्या.
८. राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या बाहेर ठेवली.
९. मग संबंध यहूदा व यरुशलेमेत असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे ह्याने रानात इस्राएलांवर जो कर बसवला होता तो परमेश्वराप्रीत्यर्थ लोकांनी आणावा.
१०. तेव्हा सर्व सरदार व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकत गेले.
११. लेव्यांच्या हातून राजाच्या प्रधानाकडे ती पेटी पोचती होई व तिच्यात बराच पैसा आहे असे त्यांच्या नजरेस पडले म्हणजे राजाचा चिटणीस व मुख्य याजकांचा नायक हे येऊन ती पेटी रिकामी करीत, मग ती परत जागच्या जागी नेऊन ठेवत. त्यांनी दिवसेंदिवस असे करून पुष्कळ पैसा जमवला.
१२. मग राजाने व यहोयादाने तो पैसा परमेश्वराच्या मंदिराचे काम करण्यास दिला व त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी रोजाने गवंडी व सुतार लावले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोखंडी व पितळी काम करणार्या कारागिरांना कामास लावले.
१३. ह्या प्रकारे कारागिरांनी कामास लागून ते पुरे केले; त्यांनी देवाचे मंदिर नीटनेटके करून त्याला मजबुती आणली.
१४. ते सर्व काम आटोपल्यावर बाकी राहिलेले पैसे त्यांनी नेऊन राजाला व यहोयादाला दिले; परमेश्वराच्या मंदिरा-प्रीत्यर्थ त्या पैशांची सेवेची व अर्पणाची पात्रे, चमचे आणि सोन्यारुप्याची इतर पात्रे बनवली. यहोयादाच्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात होमबली नित्य अर्पण करीत असत.
१५. पुढे यहोयादा वृद्ध व पूर्ण वयाचा होऊन मृत्यू पावला; तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे वय एकशे तीस वर्षांचे होते.
१६. त्याला दावीदपुरात राजांमध्ये मूठमाती देण्यात आली. कारण त्याने इस्राएलात देव व त्याचे मंदिर ह्यांच्यासंबंधाने चांगले काम केले होते.
१७. यहोयादा मरण पावल्यानंतर यहूदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्याला मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले.
१८. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती व इतर मूर्ती ह्यांची उपासना करू लागले. ह्या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदावर व यरुशलेमेवर भडकला.
१९. तरी त्यांना आपल्याकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले; त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात.
२०. मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्या ह्याच्या ठायी आला; त्याने उंच जागी उभे राहून लोकांना म्हटले, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघता? अशाने तुम्हांला यश येणार नाही; तुम्ही परमेश्वरास सोडले म्हणून त्यानेही तुम्हांला सोडले आहे.”’
२१. मग त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार केला.
२२. ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.”
२३. नवे वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने त्यांच्यावर स्वारी केली; यहूदा व यरुशलेम ह्यांच्यावर चालून येऊन त्यांनी लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला व त्यांचे सर्व धन लुटून दिमिष्काच्या राजाकडे पाठवून दिले.
२४. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी परमेश्वराने त्यांच्या हाती फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा त्याग केला होता. ह्या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले.
२५. ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले, तेव्हा त्याच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरता त्याच्याशी फितुरी करून तो बिछान्यावर पडला असता त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कबरस्तानात दिली नाही.
२६. ज्यांनी त्याच्याशी फितुरी केली ते हे: शिमथ अम्मोनीण हिचा पुत्र जाबाद१ व मवाबीण शिम्रिथ२ हिचा पुत्र यहोजाबाद.
२७. योवाशाचे पुत्र, त्याला सांगितलेली मोठी शिक्षा व देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार ह्यांविषयी सर्वकाही राजांच्या बखरीच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याच्या जागी त्याचा पुत्र अमस्या हा राजा झाला.
९. मिद्यानाला आणि सीसरा व याबीन ह्यांना कीशोन नदीजवळ तू जसे केलेस, तसे त्यांना कर;
१०. ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.
११. ओरेब व जेब ह्यांच्यासारखे त्यांच्या सरदारांना कर. जेबह व सलमुन्ना ह्यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमिरांना कर.
१२. ते म्हणतात, “देवाची निवासस्थाने२ आपल्या ताब्यात घेऊ या.”
१३. हे माझ्या देवा, वावटळीच्या धुरळ्यासारखे, वार्याने उडवलेल्या भुसासारखे त्यांना कर.
१५. त्याप्रमाणे तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर व आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
१६. हे परमेश्वरा, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जित कर.
१७. ते सदासर्वकाळ फजीत व भयभीत होवोत; ते लज्जित होवोत, ते नष्ट होवोत;
१८. म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर३ ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.
२. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे.
३. नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.
१. त्यानंतर तो अथेनै सोडून करिंथास गेला.
२. तेव्हा पंत येथील अक्विल्ला नावाचा कोणीएक यहूदी त्याला आढळला. सर्व यहूद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता; त्यांच्याकडे तो गेला.
३. आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता.
४. तो दर शब्बाथ दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहूद्यांची व हेल्लेण्यांची खातरी करून देत असे.
५. सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून आले, तेव्हा पौल आत्म्याने प्रेरित होऊन ‘येशू हाच ख्रिस्त आहे,’ अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात गढून गेला होता.
६. परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, “तुमचे रक्त तुमच्याच माथ्यावर; मी निर्दोष आहे; आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार.”
७. मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला.
८. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला, आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.
९. तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टान्तात म्हटले, “भिऊ नकोस; बोलत जा, उगा राहू नकोस.
१०. कारण मी तुझ्याबरोबर आहे, आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही; कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत.”
११. तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवत दीड वर्ष राहिला.
१२. नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहूद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले,
१३. “हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो.”
१४. तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लियोने यहूद्यांना म्हटले, “अहो यहूद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अथवा दुष्कृत्याचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते;
१५. परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या; ह्या गोष्टींची पंचाईत मला नको.”
१६. असे म्हणून त्याने त्यांना न्यायासनापुढून हाकून लावले.
१७. तेव्हा सर्व हेल्लेणी लोकांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायासनासमोर मार दिला, पण गल्लियोने ह्यांपैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही.
१८. ह्यानंतर पौल तेथे बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूरिया देशात गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विल्ला हे गेले. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंख्रियात आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले.
१९. मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले; आणि स्वत: सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला.
२०. नंतर त्याने आणखी काही दिवस राहावे अशी ते विनंती करत असताही तो कबूल झाला नाही;
२१. तर त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास [येणार्या सणात यरुशलेमेत] मी तुमच्याकडे पुन्हा येईन” असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला.
२२. मग कैसरीयास पोहचल्यावर तो वरती गेला, आणि मंडळीचा निरोप घेऊन अंत्युखियास खाली गेला.
२३. तेथे काही दिवस राहून तो निघाला, आणि क्रमाक्रमाने गलतिया प्रांत व फ्रुगिया ह्यांतील सर्व शिष्यांना स्थैर्य देत फिरला.
२४. तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहूदी इफिसास आला.
२५. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते; आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता.
२६. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला.
२७. नंतर त्याने अखया प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले; तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले.
२८. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहूद्यांचे खंडण करत असे.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide