बायबल एकाच वर्षात

१. हे ऐकून हिज्कीयाने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
२. तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वृद्ध लोक ह्यांना गोणपाट नेसलेले असे आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा ह्याच्याकडे त्याने पाठवले.
३. ते जाऊन त्याला म्हणाले, “हिज्कीया असे म्हणतो की आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे, कारण मुले जन्मायला आली पण प्रसवण्याची शक्ती नाही.
४. जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूराच्या राजाने रब-शाके ह्याच्याबरोबर जो निरोप पाठवला त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल, व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील, म्हणून जे काही शेष उरले आहे त्यासाठी आपण रदबदली करा.”
५. ह्याप्रमाणे हिज्कीया राजाचे सेवक यशया ह्याच्याकडे आले.
६. तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, ‘अश्शूराच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत; त्यांनी तू घाबरू नकोस.
७. पाहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशाला परत जाईल व त्याच्याच देशात तो तलवारीने पडेल असे मी करीन.”’
८. नंतर रब-शाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराशी लढताना त्याला आढळला; कारण लाखीशाहून त्याने तळ उठवला अशी त्याला खबर लागली होती.
९. मग “कूशाचा राजा तिर्‍हाका तुझ्याशी लढायला निघाला आहे” असे कोणी बोलताना त्याने ऐकले; हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,
१०. “तुम्ही हिज्कीया राजाकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवतोस तो, ‘अश्शूराच्या राजाच्या हाती यरुशलेम लागणार नाही, असे बोलून तुला न फसवो.
११. अश्शूराच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा; त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय?
१२. गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय?
१३. हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, आणि सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे राजे हे कोठे आहेत?”’
१४. हिज्कीयाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले; मग हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले.
१५. हिज्कीयाने परमेश्वराची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस; तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली.
१६. हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा आणि सन्हेरिबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठवला आहे त्याचे शब्द ऐक.
१७. हे परमेश्वरा, खरोखर अश्शूराच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत;
१८. त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत; कारण ते देव नव्हते, ते माणसांच्या हातांनी घडलेले काष्ठ व पाषाण होते म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला.
१९. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस.”
२०. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया ह्याने हिज्कीयाला सांगून पाठवले की, “परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्याविषयी तू माझी प्रार्थना केलीस ती मी ऐकली आहे.
२१. तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे: सीयोनाची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून, आपले मस्तक हालवते.
२२. तू कोणाची निंदा केलीस? कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस? कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास? कोणावर आपल्या भुवया चढवल्या? इस्राएलाचा जो पवित्र त्यावर!
२३. तू आपल्या जासुदांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, ‘मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.
२४. मी खणून परस्थलांचे पाणी प्यालो; माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन.’
२५. तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावेत?
२६. ह्यासाठी त्यांतील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजीत झाले; शेतातील हिरवे गवत, धाब्यांवरचे गवत, वाढ पुरी होण्यापूर्वी करपलेले धान्य ह्यांसारखे ते झाले.
२७. तुझे बसणेउठणे, तुझे जाणेयेणे व तुझा माझ्यावरचा संताप मला ठाऊक आहे.
२८. माझ्यावरच्या तुझ्या संतापामुळे व माझ्या कानावर आलेल्या तुझ्या उन्मत्तपणामुळे मी तुझ्या नाकात वेसण व तुझ्या तोंडात लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.
२९. आता तुला हे चिन्ह देतो: यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल; पुढल्या वर्षी त्याचा खोंडवा फुटेल तो खाल; तिसर्‍या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा.
३०. यहूदा वंशातील निभावलेला शेष पुन्हा खाली मूळ धरील आणि वर फळ देईल.
३१. कारण यरुशलेमेतून शेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल.
३२. ह्यासाठी अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो ह्या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही.
३३. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल; त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
३४. मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा उद्धार होईल असे ह्याचे संरक्षण करीन.”
३५. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!
३६. मग अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.
३७. तेथे तो आपला देव निस्रोख ह्याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याचा तलवारीने वध केला आणि ते अराराट देशात पळून गेले; मग एसर-हद्दोन त्याच्या जागी राजा झाला.
१. त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निरवानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस.”
२. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली; तो म्हणाला,
३. “हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.
४. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहचतो तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा:
५. “परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिज्कीया ह्याला सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत; मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसर्‍या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील.
६. मी तुझे आयुष्य पंधरा वर्षांनी वाढवतो; मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन; माझ्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी मी ह्या नगराचे संरक्षण करीन.”
७. यशयाने सांगितले, “अंजिराची एक चांदकी आणा.” ती त्यांनी आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला.
८. हिज्कीयाने यशयाला विचारले की, “तिसर्‍या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिराकडे चढून जाईन ह्याची खूण काय?”
९. यशया म्हणाला, “परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच ह्याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे: शंकुयंत्रावरील छाया दहा अंश पुढे जावी की मागे यावी?”
१०. हिज्कीयाने म्हटले, “छाया दहा अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे; तर छाया दहा अंश मागे यावी.”
११. यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया दहा अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली.
१२. त्या वेळेस बाबेलचा राजा बलदानाचा पुत्र बरोदख बलदान ह्याने हिज्कीयाला पत्र व नजराणा पाठवला. कारण तो आजारी असल्याचे त्याने ऐकले होते.
१३. तेव्हा हिज्कीयाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यांना दाखवले; आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखवले; हिज्कीयाने दाखवले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते.
१४. मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ती माणसे काय म्हणाली व ती तुझ्याकडे कोठून आली होती?” हिज्कीयाने उत्तर दिले, “ती दूर देशाहून माझ्याकडे आली होती.”
१५. मग त्याने विचारले, “त्यांनी तुझ्या घरात काय काय पाहिले?” हिज्कीया म्हणाला, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; माझ्या भांडारातले मी त्यांना दाखवले नाही असे काहीच नाही.”
१६. तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन ऐक:
१७. पाहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी जे आजवर साठवून ठेवले आहे ते सर्व बाबेलास घेऊन जातील, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
१८. तुझ्यापासून होणारे तुझ्या पोटचे पुत्र ह्यांना ते नेतील व बाबेलच्या राजवाड्यात ते खोजे होऊन राहतील.”
१९. तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “आपण सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे.” तो आणखी म्हणाला, “माझ्या कारकिर्दीत तरी शांतता व स्थिरता ही राहणार ना?”
२०. हिज्कीयाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
२१. हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला.
१. मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचावन्न वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव हेफ्सीबा असे होते.
२. इस्राएल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रांना घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले.
३. त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती ती त्याने पुन्हा बांधली; इस्राएलाचा राजा आहाब ह्याच्याप्रमाणे बआलमूर्तीसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरामूर्ती केली; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.
४. परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत मी आपले नाव ठेवीन” त्यात त्याने वेद्या बांधल्या.
५. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या.
६. त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.
७. आपण केलेली अशेरामूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यात मी आपले नाम निरंतर ठेवीन;
८. मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र दिले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते निघून चोहोकडे भटकतील असे मी करणार नाही.”
९. पण त्यांनी ऐकले नाही. मनश्शेने त्यांना एवढे बहकवले की इस्राएलांदेखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्यापेक्षाही ते अधिकच दुष्कर्म करू लागले.
१०. ह्यासाठी परमेश्वर आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्या द्वारे बोलला, तो म्हणाला,
११. “यहूदाचा राजा मनश्शे ह्याने ही अमंगळ कृत्ये केली आहेत; पूर्वीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्कर्म केले आहे आणि आपण मूर्तींच्या नादी लागून यहूदालाही पाप करायला लावले आहे;
१२. म्हणून इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो,“पाहा, मी यरुशलेम व यहूदा ह्यांवर एवढे अरिष्ट आणणार आहे की ज्याच्या कानावर ते जाईल त्याचे दोन्ही कान भणभणतील.
१३. मी शोमरोनावर लावलेले मापनसूत्र व अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा यरुशलेमेला लावीन; थाळी जशी घासूनपुसून व उलथीपालथी करून ठेवतात तसेच मी यरुशलेमेचे करीन.
१४. शेष राहिलेल्या माझ्या वतनरूप लोकांचा मी त्याग करीन; त्यांना शत्रूंच्या हाती देईन; ते आपल्या सर्व शत्रूंचे भक्ष्य व लूट होतील;
१५. कारण त्यांचे पूर्वज मिसर देशातून बाहेर निघाले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी मला संताप आणला आहे.”
१६. मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहूदाला पाप करायला लावले, एवढेच नव्हे तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला, एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत यरुशलेम रक्तमय केले.
१७. मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते सर्व आणि त्याने केलेले पापकर्म ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
१८. मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याच्या वाड्याच्या बागेत म्हणजे अर्थात उज्जाच्या बागेत त्याला मूठमाती देण्यात आली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन हा राजा झाला.
१९. आमोन राज्य करू लागला तेव्हा तो बावीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत दोन वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ असे होते; ती यटबा येथला हारूस ह्याची कन्या.
२०. त्याने आपला बाप मनश्शे ह्याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
२१. त्याचा बाप ज्या मार्गांनी चालला त्याने तो चालला; ज्या मूर्तींची त्याच्या बापाने पूजा केली त्यांची पूजा त्यानेही केली.
२२. आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला त्याने सोडले; तो परमेश्वराच्या मार्गाने चालला नाही.
२३. आमोनाच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी केली; त्यांनी राजाला त्याच्याच वाड्यात जिवे मारले;
२४. पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांना देशातल्या लोकांनी जिवे मारले, आणि त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया ह्याला राजा केले.
२५. आमोनाची बाकीची कृत्ये यहूदाच्या राजांच्या बखरीत वर्णन केली आहेत, नाहीत काय?
२६. आमोनाला उज्जाच्या बागेत त्यानेच बांधलेल्या थडग्यात मूठमाती देण्यात आली; त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया हा राजा झाला.
९. आमची चिन्हे आमच्या दृष्टीस पडत नाहीत; कोणी संदेष्टा उरला नाही; असे कोठवर चालेल हे जाणणारा आमच्यामध्ये कोणी नाही.
१०. हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भर्त्सना सदा करणार काय?
११. तू आपला हात, म्हणजे आपला उजवा हात, का आवरून धरतोस? तो आपल्या छातीवरून काढून तू त्याचा संहार कर.
१२. तरी देव पुरातन कालापासून माझा राजा आहे; पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे.
१३. तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागलास; जलाशयातील मगरींची मस्तके तू ठेचून टाकलीस.
१४. तू लिव्याथानाच्या मस्तकांचा चुराडा केलास, ओसाड प्रदेशातील प्राण्यांना तो तू खाऊ घातलास.
१५. तू झरा खोदून जलप्रवाह बाहेर काढलास; तू निरंतर वाहणार्‍या नद्या सुकवून टाकल्यास.
१६. दिवस तुझा आहे, रात्रही तुझी आहे; चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.
१७. पृथ्वीच्या सर्व सीमा तूच ठरवल्यास. उन्हाळा व हिवाळा हे तूच केलेस.
१. ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे, त्याच्यापेक्षा सात्त्विकपणे चालणारा दरिद्री बरा.
२. आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही; उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो.
१. नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते.
२. तेव्हा अकस्मात मोठ्या वार्‍याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले.
३. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या.
४. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
५. त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेमेत राहत होते.
६. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला; कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले.
७. ते सर्व आश्‍चर्याने थक्क होऊन म्हणाले, “पाहा, हे बोलणारे सर्व गालीली ना?
८. तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे?
९. पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेम्या, यहूदीया, कप्पदुकिया, पंत, आसिया,
१०. फ्रुगिया, पंफूलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिबुवा देश ह्यांत राहणारे, यहूदी व यहूदीयमतानुसारी असे रोमी प्रवासी,
११. क्रेतीय, अरब, असे आपण त्यांना आपापल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो.”
१२. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकांना म्हणाले, “हे काय असेल?”
१३. परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, “हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत.”
१४. तेव्हा पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, “अहो यहूदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या.
१५. तुम्हांला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे;
१६. परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे:
१७. ‘देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील, व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील;
१८. आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील;
१९. ‘आणि’ वर ‘आकाशात अद्भुते, व’ खाली ‘पृथ्वीवर’ चिन्हे, ‘म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन;
२०. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल;
२१. तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide