१. आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही.
२. तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गांनी चालला; त्याने बआल दैवतांच्या ओतीव मूर्ती केल्या.
३. त्याने हिम्मोनपुत्राच्या खोर्यात धूप जाळला आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ कृतींना अनुसरून त्याने आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पण केली.
४. तो उच्च स्थानी, टेकड्यांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करी व धूप जाळी.
५. म्हणून त्याचा देव परमेश्वर ह्याने त्याला अरामी लोकांच्या राजाच्या हाती दिले; त्यांनी त्याला जिंकून त्याचे पुष्कळ लोक पाडाव करून दिमिष्कास नेले. ह्याशिवाय त्याला इस्राएलाच्या राजाच्या हाती दिले; त्याने मोठी कत्तल उडवून त्याला जेर केले.
६. रमाल्याचा पुत्र पेकह ह्याने एका दिवसात यहूदातल्या एक लक्ष वीस हजार वीरांचा संहार केला, कारण त्यांनी आपल्या वडिलांचा देव परमेश्वर ह्याला सोडून दिले होते.
७. एफ्राइमातल्या एका जिख्री नामक महावीराने राजपुत्र मासेया, घरकारभारी अज्रीकाम व राजाचा नायक एलकाना ह्यांचा वध केला.
८. इस्राएल लोकांनी आपल्या भाऊबंदांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या मिळून दोन लक्ष माणसे पाडाव करून नेली आणि त्यांना पुष्कळ लुटून ती लूट शोमरोनास नेली.
९. पण ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा तेथे होता; शोमरोनास सैन्य परत आले तेव्हा त्याला मार्गात गाठून तो म्हणाला, “पाहा, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर हा यहूदावर रागावला म्हणून त्याने त्याला तुमच्या हाती दिले; तुम्ही इतक्या क्रोधाने त्यांची कत्तल केली की तो गगनापर्यंत पोहचला आहे.
१०. यहूदी व यरुशलेमकर ह्यांना आपले दास व दासी करून ठेवावे असा तुमचा इरादा आहे; तर तुम्हीही आपला देव परमेश्वर ह्याचे अपराधी नाही काय?
११. तर आता माझे ऐका; तुम्ही आपल्या पाडाव केलेल्या भाऊबंदांना परत पाठवून द्या, कारण परमेश्वराचा कोप तुमच्यावर अतिशय भडकला आहे.”
१२. तेव्हा एफ्राइमातले कित्येक मुख्य-मुख्य पुरुष म्हणजे अजर्या बिन योहानान बरेख्या बिन मशिल्लेमोथ, यहिज्कीया बिन शल्लूम आणि अमासा बिन हदलाई हे लढाईहून परत येणार्यांना आडवे जाऊन म्हणाले,
१३. “ह्या पाडाव केलेल्या लोकांना आत आणू नका; तुम्ही जो संकल्प केला आहे त्याच्यामुळे आम्ही परमेश्वराचे अपराधी होऊ व आमच्या पापांत व दोषात भर पडेल; आमचा दोष तर मोठा आहे आणि इस्राएलावर बहुत कोप भडकला आहे.”
१४. तेव्हा त्या हत्यारबंद लोकांनी ते पाडाव केलेले लोक आणि आणलेली लूट ही सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमक्ष सोडून दिली.
१५. मग वर नावे सांगितलेल्या पुरुषांनी पाडाव केलेल्या लोकांतल्या उघड्यानागव्यांना लुटीतली वस्त्रे नेसवली, जोडे घालायला दिले, त्यांना खाऊपिऊ घातले, त्यांना तैलाभ्यंग केला आणि सर्व निर्बल लोकांना गाढवांवर बसवून खर्जूर नगर जे यरीहो तेथे त्यांच्या भाऊबंदांकडे पोहचते केले, आणि मग ते शोमरोनास परत गेले.
१६. त्या वेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजाकडे जासूद पाठवून कुमक मागितली.
१७. कारण अदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहूदास मार देऊन काही लोक पाडाव करून नेले होते.
१८. आणि पलिष्टी लोक तळवट व यहूदाचा दक्षिण प्रांत ह्यांतील नगरांवर स्वारी करून बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिम्जो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यांत राहू लागले.
१९. इस्राएलाचा राजा आहाज ह्याच्यामुळे परमेश्वराने यहूदाला नमवले. कारण यहूदात स्वैरपणे वागून त्याने परमेश्वराविरुद्ध उल्लंघन केले.
२०. ह्यामुळे अश्शूराचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्याने त्याच्याकडे येऊन त्याला त्रस्त केले; त्याला साहाय्य केले नाही.
२१. आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातून आणि राजाच्या व सरदारांच्या घरांतून धन घेऊन अश्शूरच्या राजाला दिले, तरी त्याचा त्याला काही उपयोग झाला नाही.
२२. संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.
२३. दिमिष्काच्या ज्या दैवतांनी त्याला मार दिला होता त्यांना त्याने यज्ञ केले. तो म्हणाला, “अरामी राजांना त्यांच्या दैवतांनी साहाय्य केले तर मी त्यांना यज्ञ केल्यास मलाही ते साहाय्य करतील, पण ते त्याच्या व सर्व इस्राएलाच्या नाशास कारण झाले.
२४. आहाजाने देवाच्या मंदिरातील पात्रे जमा करून ती फोडूनतोडून टाकली; त्याने परमेश्वराच्या मंदिराची द्वारे बंद केली आणि यरुशलेमेच्या कोनाकोपर्यातून वेद्या बांधल्या.
२५. त्याने यहूदाच्या प्रत्येक नगरात अन्य दैवतांना धूप जाळण्यासाठी उच्च स्थाने बांधली आणि आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला संतप्त केले.
२६. अथपासून इतिपर्यंतची त्याची बाकीची कृत्ये व त्याचे सर्व वर्तन हे यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे.
२७. आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला यरुशलेम नगरात मूठमाती दिली; पण त्याला इस्राएलाच्या राजांच्या कबरस्तानात नेले नाही; मग त्याचा पुत्र हिज्कीया हा त्याच्या जागी राजा झाला.
१. हिज्कीया राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने एकोणतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव अबीया, ती जखर्याची कन्या.
२. आपला पूर्वज दावीद ह्याच्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत असे. हिज्कीया मंदिरामधील उपासना पुन्हा चालू करतो
३. त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली.
४. मग त्याने याजकांना व लेव्यांना आणून पूर्वेकडील चौकात जमा केले;
५. आणि तो त्यांना म्हणाला, “लेव्यांनो, माझे ऐका! तुम्ही स्वत: पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर पवित्र करा; पवित्रस्थानातून सर्व अमंगलता दूर करा.
६. आपल्या पूर्वजांनी अपराध करून आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले व त्याला सोडून दिले; परमेश्वराच्या निवासस्थानापासून आपली तोंडे फिरवून त्याकडे त्यांनी पाठ फिरवली.
७. त्याप्रमाणेच त्यांनी देवडीचे दरवाजे बंद केले, दीप मालवले आणि पवित्रस्थानात इस्राएलाच्या देवाप्रीत्यर्थ धूप जाळला नाही की होमबली अर्पण केले नाहीत.
८. म्हणून परमेश्वराचा क्रोध यहूदा व यरुशलेम ह्यांवर भडकला; त्याने त्यांना दहशत व विस्मय ह्यांस कारण केले आहे व ते धिक्कारास पात्र झाले आहेत हे तुम्ही डोळ्यांनी पाहत आहात.
९. ह्यामुळे आमच्या वाडवडिलांचा तलवारीने वध झाला; आमचे पुत्र, कन्या व स्त्रिया पाडाव होऊन गेल्या.
१०. आता माझ्या मनात आहे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याशी आपण करार करावा, म्हणजे त्याचा आमच्यावरील संताप दूर होईल.
११. मुलांनो, आता हयगय करू नका, कारण तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहावे, त्याची सेवाचाकरी करावी व त्याचे सेवक होऊन धूप जाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हांला निवडले आहे.”
१२. मग लेवी उठून उभे राहिले ते हे: कहाथी वंशातले महथ बिन अमासय व योएल बिन अजर्या; मरारी वंशातले कीश बिन अब्दी व अजर्या बिन यहल्लेलेल; गेर्षोनी वंशातले यवाह बिन जिम्मा आणि एदेन बिन यवाह;
१३. अलीसाफानाच्या वंशातले शिम्री व ईयेल; आसाफाच्या वंशातले जखर्या व मत्तन्या;
१४. हेमान वंशातले यइएल व शिमी; यदूथूनाच्या वंशातले शमाया व उज्जीएल.
१५. त्यांनी आपल्या भाऊबंदांना एकत्र जमवून स्वतःस पवित्र केले, आणि परमेश्वराच्या वचनानुसार राजाने आज्ञा केली होती तिच्याप्रमाणे परमेश्वराच्या मंदिराच्या शुद्धीसाठी ते मंदिरात गेले.
१६. याजक परमेश्वराच्या मंदिराचा गाभारा शुद्ध करण्यासाठी त्यात गेले. आत जाऊन परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुद्ध वस्तू त्यांना सापडल्या तेवढ्या सर्व बाहेर काढून परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यांनी नेल्या. लेव्यांनी त्या उचलून बाहेर नेऊन किद्रोन ओहळात टाकल्या.
१७. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस त्यांनी पवित्रीकरणास आरंभ केला व त्याच महिन्याच्या अष्टमीस ते परमेश्वराच्या देवडीपर्यंत आले; त्यांनी परमेश्वराचे मंदिर आठ दिवसांत पवित्र केले; पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी सर्व काम त्यांनी समाप्त केले.
१८. मग ते राजमंदिरी हिज्कीया राजाकडे जाऊन त्याला म्हणाले, “आम्ही परमेश्वराचे सर्व मंदिर, होमवेदी व तिची सर्व उपकरणे आणि समर्पित भाकरीचे मेज व त्याची सर्व उपकरणे शुद्ध केली आहेत.
१९. जेवढी पात्रे आहाज राजाने आपल्या कारकिर्दीत अत्याचार करून फेकून दिली होती, तेवढी सर्व आम्ही नीट करून पवित्र केली आहेत; पाहा, ती परमेश्वराच्या वेदीपुढे आहेत.”
२०. मग हिज्कीया राजा सकाळी उठून नगराचे सर्व सरदार एकत्र करून परमेश्वराच्या मंदिरात गेला.
२१. तेव्हा राज्य, पवित्रस्थान व यहूदा ह्यांच्यासाठी त्यांनी सात गोर्हे, सात एडके, सात कोकरे व पापार्पणासाठी सात बोकड आणले. मग ते परमेश्वराच्या वेदीवर अर्पावेत अशी अहरोन वंशातील याजकांना त्याने आज्ञा केली.
२२. मग त्यांनी ते गोर्हे कापले आणि याजकांनी त्यांचे रक्त घेऊन वेदीवर शिंपडले. त्यांनी मेंढरे मारून त्यांचेही रक्त वेदीवर शिंपडले; त्याप्रमाणेच कोकरेही मारून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले.
२३. आणि त्यांनी पापार्पणाचे बकरे राजाच्या व मंडळीच्या समोर आणले; त्यांवर त्यांनी आपले हात ठेवले;
२४. मग याजकांनी ते कापून इस्राएलाबद्दल प्रायश्चित्त होण्यासाठी त्यांचे रक्त पापबली म्हणून वेदीवर शिंपडले; सर्व इस्राएलासाठी होमार्पण व पापार्पण करावे अशी राजाज्ञा झाली.
२५. दावीद व राजाचा द्रष्टा गाद आणि नाथान संदेष्टा ह्यांच्या आज्ञेप्रमाणे झांजा, सारंग्या व वीणा वाजवण्यासाठी लेव्यांना परमेश्वराच्या मंदिरात उभे केले; ही आज्ञा परमेश्वराने आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे केली होती.
२६. दाविदाची वाद्ये घेऊन लेवी उभे राहिले व याजक कर्णे घेऊन उभे राहिले.
२७. मग हिज्कीयाने वेदीवर होमबली अर्पण करण्याची आज्ञा दिली. होमार्पणास आरंभ झाला तेव्हा परमेश्वराच्या स्तोत्रासही आरंभ झाला, आणि कर्णे व इस्राएलाचा राजा दावीद ह्याची वाद्ये वाजू लागली.
२८. सर्व मंडळी आराधना करू लागली, गायक गाऊ लागले व कर्णेकरी कर्णे वाजवू लागले; होमार्पणाची समाप्ती होईपर्यंत हे सर्व चालले होते.
२९. यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा राजाने व त्याच्याबरोबरच्या सर्व लोकांनी नमन करून आराधना केली.
३०. मग हिज्कीया राजा व सरदार ह्यांनी लेव्यांना आज्ञा केली की दावीद व आसाफ द्रष्टा ह्यांची कवने गाऊन परमेश्वराची स्तुती करा. तेव्हा त्यांनी आनंदाने स्तुती केली व आपली मस्तके लववून आराधना केली.
३१. मग हिज्कीया म्हणाला, “आता तुम्ही आपणांस परमेश्वराला समर्पण केले आहे तर जवळ येऊन परमेश्वराच्या मंदिरात यज्ञ व उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा मंडळीने यज्ञ व उपकारस्मरणाची अर्पणे आणली आणि जे उदार मनाचे होते त्यांनी होमार्पणे आणली.
३२. मंडळीतील लोकांनी यज्ञपशू आणले, त्यांची संख्या सत्तर बैल, शंभर मेंढे व दोनशे कोकरे एवढी होती; ही सर्व परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पणासाठी होती.
३३. सहाशे बैल व तीन हजार शेरडेमेंढरे एवढे वाहिलेले पशू होते.
३४. पण याजकांची संख्या फार थोडी असल्यामुळे त्या सर्व होमबलींची कातडी काढता येईना म्हणून काम समाप्त होईपर्यंत व याजक आपणांस पवित्र करीपर्यंत त्यांचे बांधव लेवी ह्यांनी त्यांना मदत केली; कारण आपणांस पवित्र करण्याच्या कामी याजकांपेक्षा लेवी विशेष सात्त्विक मनाचे होते.
३५. होमबली पुष्कळ होते आणि शांत्यर्पणांच्या पशूंची चरबीही पुष्कळ होती; प्रत्येक होमबलीबरोबर त्यांनी पेयार्पणेही दिली. ह्या प्रकारे परमेश्वराच्या मंदिरातील उपासना व्यवस्थितपणे स्थापण्यात आली.
३६. तेव्हा हिज्कीया व सर्व प्रजा आनंदित झाली, कारण देवाने आपल्या लोकांसाठी ह्या सर्व गोष्टींची सिद्धता केली होती; हे अचानक घडून आले.
८. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक; हे याकोबाच्या देवा, कान दे. (सेला)
९. हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.
१०. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे२ मला इष्ट वाटते.
११. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
१२. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य!
६. असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात.
७. दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात.
८. अपराधांचा भार वाहणार्याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते.
२१. हे झाल्यावर मासेदोनिया व अखया ह्या प्रांतांतून यरुशलेमेस जावे असा पौलाने आपल्या मनात निश्चय करून म्हटले, “तेथे गेल्यावर मला रोम शहरही पाहिले पाहिजे.”
२२. मग आपली सेवा करणार्यांपैकी तीमथ्य व एरास्त ह्या दोघांना मासेदोनियास पाठवून तो स्वतः काही दिवस आशिया प्रांतात राहिला.
२३. ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली.
२४. कारण देमेत्रिय नावाचा कोणीएक सोनार अर्तमी देवीचे रुप्याचे देव्हारे करून कारागिरांना बराच कामधंदा मिळवून देत असे.
२५. त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे.
२६. तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.
२७. ह्यामुळे ह्या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे, तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहुना जगसुद्धा करते तिचे देऊळ क:पदार्थ ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.”
२८. हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की, “इफिसकरांची अर्तमी थोर!”
२९. इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले.
३०. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्यांनी त्याला जाऊ दिले नाही.
३१. शिवाय आशिया प्रांताच्या अधिकार्यांपैकी कित्येक जण त्याचे मित्र होते, त्यांनीही त्याला निरोप पाठवून आग्रह केला की, नाटकगृहात जाऊन स्वत:ला धोक्यात घालू नका.
३२. तेव्हा कोणी काही, कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले; लोकांचा एकच गोंधळ उडाला; आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकांना कळले नाही.
३३. मग आलेक्सांद्राला यहूदी लोकांनी पुढे केल्यावर कित्येकांनी त्याला गर्दीतून बाहेर ओढले; तेव्हा आलेक्सांद्र हाताने खुणावून लोकांची समजूत घालू पाहत होता;
३४. परंतु तो यहूदी आहे असे समजल्यावर, सुमारे दोन तासपर्यंत, “इफिसकरांची अर्तमी थोर!” अशी सर्वांची एकच आरोळी झाली.
३५. मग नगराचा शिरस्तेदार लोकांना शांत करून म्हणाला, “अहो इफिसकरांनो, महान अर्तमीचे देऊळ व आकाशातून पडलेल्या मूर्ती ह्यांचे इफिस नगर हे संरक्षक आहे, हे ज्याला ठाऊक नाही असा कोण माणूस आहे?
३६. ह्या गोष्टी निर्विवाद आहेत म्हणून तुम्ही शांत असावे, काही उतावळी करू नये.
३७. कारण जी माणसे तुम्ही येथे आणली आहेत ती देवळे लुटणारी किंवा आपल्या देवीची निंदा करणारी नाहीत.
३८. म्हणून देमेत्रिय व त्याच्या सोबतीचे कारागीर ह्यांचा कोणाशी वाद असल्यास न्यायगृहे उघडी आहेत व न्यायाधीशही आहेत; त्यांच्यापुढे त्यांनी एकमेकांवर फिर्यादी कराव्यात.
३९. पण ह्यापलीकडे तुमची काही मागणी असली तर तिच्याबद्दल कायदेशीर सभेत ठरवले जाईल.
४०. ह्या दंगलीचे कारण काय ह्याचा जबाब आपल्याला देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपल्यावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे.”
४१. असे बोलून त्याने सभा बरखास्त केली.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide