बायबल एकाच वर्षात

१. सोराविषयीची देववाणी: तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा; त्याचा विध्वंस झाला आहे; तेथे आता घरदार किंवा बंदर राहिले नाही; कित्ती लोकांच्या देशातून त्यांना ही खबर कळली.
२. समुद्रतीरींच्या रहिवाशांनो, भीतीने स्तब्ध व्हा; समुद्रपर्यटन करणारे सीदोनी व्यापारी तुला समृद्ध करीत.
३. महासागरावरून आलेले शीहोर थडीचे उत्पन्न, नील नदीचे पीक ही त्याची मिळकत होती; ते शहर राष्ट्रांची पेठ झाले होते.
४. हे सीदोना, फजीत हो; समुद्र, समुद्रदुर्ग म्हणत आहे: “मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणांना वाढवले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत.”
५. मिसर देशास ही बातमी पोहचेल तेव्हा सोराच्या ह्या वर्तमानाने ते घोरात पडतील.
६. तार्शीशास निघून जा; समुद्रतीरीच्या रहिवाशांनो, हायहाय करा.
७. हेच का तुमचे आनंदपूर्ण नगर? ते अति प्राचीन काळापासून वसलेले आहे; त्याचे पाय वसाहतीसाठी त्याला दूरदूर घेऊन गेले.
८. सोर ही राजमुकुटदात्री; तिचे व्यापारी सरदार, तिचे उदमी जगातले महाजन; तिच्याविरुद्ध हे कोणी योजले?
९. सर्व डामडौलास बट्टा लागावा व जगातील सर्व महाजनांची अप्रतिष्ठा व्हावी, म्हणून हे सेनाधीश परमेश्वराने योजले आहे.
१०. अगे तार्शीशकन्ये, तू नील नदीप्रमाणे आपली भूमी व्यापून टाक, तुला आता अटकाव करणारा कटिबंध राहिला नाही.
११. परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.
१२. तो म्हणाला, “हे कलंक लागलेल्या सीदोनाच्या कुमारिके, तू इतःपर उल्लासणार नाहीस; ऊठ, कित्ती लोकांच्या देशात निघून जा; तेथेही तुला थारा मिळणार नाही.”
१३. खास्द्यांचा देश पाहा, तो आता राष्ट्र नाही; त्यांची भूमी अश्शूर्‍यांनी वनचरांसाठी सोडली आहे; त्यांनी मोर्चे लावून तिचे महाल जमीनदोस्त करून ती उद्ध्वस्त केली आहे.
१४. तार्शीशच्या गलबतांनो, हायहाय करा. तुमचा दुर्ग उद्ध्वस्त केला आहे.
१५. त्या दिवशी असे होईल की एकाच राजाच्या कारकिर्दीच्या इतकी म्हणजे सत्तर वर्षे सोराची विस्मृती पडेल; सत्तर वर्षे संपल्यावर वेश्येच्या ह्या गाण्यात सांगितल्याप्रमाणे सोराचे होईल:
१६. “स्मरणातून गेलेल्या वेश्ये, हाती किनरी घे, शहरभर भटक, चांगले वाजव, पुष्कळ गा, म्हणजे तुझे स्मरण राहील.”
१७. ही सत्तर वर्षे गेल्यावर असे होईल की परमेश्वर सोरेचा समाचार घेईल; ती पुन्हा आपल्या कमाईकडे फिरेल; ती भूपृष्ठावरील सर्व राष्ट्रांशी व्यभिचार करील.
१८. तिच्या व्यापाराची प्राप्ती व तिची कमाई परमेश्वराला समर्पून पवित्र होईल; ती भांडारात ठेवणार नाहीत; तिचा संचय करणार नाहीत; तर जे परमेश्वराच्या सन्निध असतात त्यांना भरपूर खाण्यास मिळावे व त्यांनी उंची वस्त्रे ल्यावीत म्हणून तिच्या व्यापाराची प्राप्ती त्यांच्या कामी लागेल.
१. पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.
२. तेव्हा जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनिणीची, विकत घेणार्‍याची तशी विकत देणार्‍याची, सावकाराची तशी कुळाची, धनकोची तशी ऋणकोची स्थिती होईल.
३. पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल; कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.
४. पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत.
५. पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडला आहे.
६. ह्यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगत आहेत; पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत.
७. नवा द्राक्षारस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहे, हर्षित मनाचे सर्व जन उसासे टाकत आहेत.
८. डफांचा हर्षनाद बंद पडला आहे, उत्सव करणार्‍यांचा कल्ला थांबला आहे, किनरीचा हर्षनाद बंद झाला आहे.
९. ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते.
१०. व्यवस्थाभ्रष्ट नगर भंग पावले आहे; प्रत्येक घर बंद पडले आहे, कोणाचाही आत रिघाव होत नाही.
११. बाहेर रस्त्यात द्राक्षारसास्तव ओरड चालली आहे, सर्व उत्सव मावळला आहे, पृथ्वीचा हर्ष लोपला आहे;
१२. नगरात नुसती ओसाडी झालेली आहे; वेशीचा भुगाभुगा झाला आहे.
१३. जैतून वृक्ष हलवल्यावर, द्राक्षांचा हंगाम आटोपल्यावर, सरवा वेचताना जशी थोडीशी फळे राहतात तसे पृथ्वीवरील राष्ट्रांचे होईल.
१४. ते उच्च स्वराने गजर करतील, परमेश्वराच्या प्रभावास्तव समुद्रावरून गजर करतील.
१५. ह्यास्तव उगवतीकडल्या लोकांनो, परमेश्वराचे गौरव करा; समुद्रतीरी राहणार्‍यांनो, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाचे गौरव करा.
१६. नीतिमानाची प्रतिष्ठा होवो अशी गीते दिगंतापासून आमच्या कानी पडली. तेव्हा मी म्हणालो, “माझा नाश झाला हो नाश झाला! हायहाय! ठकांनी ठकवले, ठकांनी ठकबाजीने ठकवले.”
१७. हे पृथ्वीवरील रहिवाशा, दरारा, खाडा व पाश हे तुझ्यापुढे आहेत!
१८. असे होईल की दरार्‍याच्या शब्दामुळे पळणारा खाड्यात पडेल, खाड्यातून निभावलेला पाशात सापडेल; कारण आकाशाची द्वारे उघडली आहेत, पृथ्वीचे आधार हालत आहेत.
१९. भूमी अगदी फाटून गेली आहे, भूमी साफ फुटून गेली आहे, भूमी अतिशय हादरून गेली आहे.
२०. भूमी मद्यप्यासारखी झोकांड्या खात आहे, माचाळासारखी झुलत आहे; तिच्या अपराधांचा भार तिला दाबत आहे; ती पडेल, आणि पुन्हा उठणार नाही.
२१. त्या दिवशी असे होईल की उच्च आकाशात आकाशस्थांचे सैन्य व भूमीवर भूमीचे राजे ह्यांची परमेश्वर झडती घेईल.
२२. बंदिवानांना जसे अंधारकोठडीत कोंडतात, तसे त्यांना कोंडतील व कारागृहात ठेवतील; आणि बहुत दिवसांनी त्यांची झडती घेतील.
२३. चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.
१०. काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्युच्छायेत बसले होते,
११. कारण त्यांनी देवाच्या आज्ञांविरुद्ध बंडाळी करून परात्पराचा बोध तुच्छ मानला होता.
१२. त्यांना कष्ट देऊन त्याने त्यांचा ताठा उतरवला; ते पतन पावले, त्यांना साहाय्य करण्यास कोणी नव्हता;
१३. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला, आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले.
१४. त्याने त्यांना अंधकारातून व मृत्युच्छायेतून बाहेर आणले. व त्यांची बंधने तोडून टाकली.
१५. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत;
१६. कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले.
१७. मूर्खांना त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कृत्यांमुळे पीडा भोगावी लागते.
१८. त्यांच्या जिवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा वीट येतो; ते मृत्युद्वाराजवळ पोहचतात.
१९. ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांना क्लेशांतून मुक्त करतो.
२०. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो.
२१. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
२२. ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत.
१७. शेजार्‍याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.
८. बंधुजनहो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटांविषयी तुम्हांला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो; इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हांला झाले.
९. फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हांला सांगत होते; आम्ही स्वत:वर नव्हे तर मृतांना सजीव करणार्‍या देवावर भरवसा ठेवावा, म्हणून हे झाले.
१०. त्याने आम्हांला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हांला ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
११. तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हांला साहाय्य करावे; असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हांला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकारस्तुती करावी.
१२. आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.
१३. कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करता त्यांवाचून दुसरे काही आम्ही तुम्हांला लिहीत नाही; आणि तुम्ही शेवटपर्यंत ते कबूल कराल अशी माझी आशा आहे;
१४. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हांला मान्यता दिली की, जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत.
१५. असा भरवसा बाळगून तुम्हांला दोनदा कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे,
१६. तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे, आणि तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता.
१७. तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय, नाही नाही, अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देहस्वभावाप्रमाणे योजतो काय?
१८. देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे, होय, नाही असे नाही.१
१९. कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली ती होय, नाही, अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती.
२०. देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे;२ म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.
२१. जो आम्हांला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे तो देव आहे;
२२. त्याने आम्हांला मुद्रांकित केले व आमच्या अंत:करणात आपला आत्मा हा विसार दिला.
२३. देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की, मी करिंथास येणे रहित केले, ह्यात तुमची गय केली.
२४. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवतो असे नाही, तर तुमच्या आनंदात साहाय्यकारी आहोत; तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide