२. “इस्राएल लोकांच्या वतीने मिद्यान्यांचा सूड घे; त्यानंतर तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील.”
३. त्याप्रमाणे मोशे लोकांना म्हणाला, “युद्धासाठी तुमच्यातल्या पुरुषांना सशस्त्र करा म्हणजे ते मिद्यानावर चढाई करून परमेश्वराच्या वतीने मिद्यानाचा सूड घेतील.
४. इस्राएलाच्या सर्व वंशांतून, प्रत्येक वंशामागे एकेक हजार पुरुष युद्धासाठी पाठवा.”
५. ह्याप्रमाणे इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांतून प्रत्येक वंशामागे एक हजार असे बारा हजार सशस्त्र पुरुष युद्धासाठी उभे करण्यात आले.
६. मोशेने प्रत्येक वंशातले एक हजार पुरुष घेऊन त्यांना आणि एलाजार याजकाचा मुलगा फीनहास ह्याला लढाईला पाठवले; आणि पवित्रस्थानातली पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे त्याच्या हवाली केली.
७. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी मिद्यानाशी लढून एकूणएक पुरुषाची कत्तल केली.
८. मारण्यात आलेल्या ह्या पुरुषांबरोबर त्यांनी अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्या मिद्यानाच्या पाच राजांचाही वध केला; त्यांनी बौराचा मुलगा बलाम ह्यालाही तलवारीने मारले.
९. शिवाय इस्राएल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रिया व मुलेबाळे ह्यांना कैद केले; आणि त्यांची सर्व गुरेढोरे, सर्व शेरडेमेंढरे आणि सर्व मालमत्ता लुटली.
१०. त्यांच्या वस्तीची सर्व नगरे आणि त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या.
११. मग सारी लूट, सर्व पाडाव केलेली माणसे आणि जनावरे त्यांनी बरोबर घेतली.
१२. आणि यरीहोजवळ यार्देनेतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, एलाजार याजक आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांनी ते बंदिवान, धरलेली जनावरे व लूट आणली.
१३. तेव्हा मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सर्व सरदार छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले.
१४. जे सहस्रपती, शतपती इत्यादी सेनापती युद्धाहून परत आले होते त्यांच्यावर मोशे रागावला.
१५. मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व स्त्रिया जिवंत ठेवल्या काय?
१६. पाहा, पौराच्या प्रकरणी इस्राएल लोकांनी परमेश्वराशी फितुरी केली त्याला ह्याच स्त्रिया बलामाच्या मसलतीमुळे कारणीभूत झाल्या आणि त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली.
१७. तर आता मुलाबाळांतील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषांशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका.
१८. पण ज्या मुलींनी पुरुषांशी संग केलेला नाही त्या सर्व आपणांसाठी जिवंत ठेवा.
१९. सात दिवस तुम्ही छावणीबाहेर तळ देऊन राहा; तुमच्यापैकी ज्यांनी एखाद्याला जिवे मारले असेल आणि ज्यांना मारलेल्याचा स्पर्श झाला असेल तितक्यांनी तिसर्या व सातव्या दिवशी स्वतःला व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.
२०. प्रत्येक वस्त्र, चामड्याची प्रत्येक वस्तू, बकर्याच्या केसांची प्रत्येक वस्तू व सर्व लाकडी सामान शुद्ध करावे.”
२१. मग एलाजार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, “परमेश्वराने मोशेला आज्ञापिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा होय:
२२. सोने, चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे वगैरे
२३. जे काही अग्नीत टिकण्याजोगे असेल ते अग्नीत टाकून काढले म्हणजे शुद्ध होईल; तरीपण ते अशौचक्षालनाच्या पाण्यानेही शुद्ध करावे, जे काही अग्नीत टिकण्याजोगे नसेल ते पाण्यात घालून काढावे.
२४. सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावीत आणि शुद्ध होऊन छावणीत यावे.”
२५. परमेश्वर मोशेला म्हणाला,
२६. “तू एलाजार याजक आणि मंडळीतील पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख मिळून लुटून आणलेल्या माणसांची व जनावरांची मोजदाद करा.
२७. त्या लुटीचे दोन भाग करावेत; एक भाग युद्धास गेलेल्या योद्ध्यांना द्यावा, व दुसरा भाग इतर सर्व मंडळीला द्यावा.
२८. युद्धास गेलेल्या योद्ध्याच्या हिश्शातून माणसे, गाईबैल, गाढवे व शेरडेमेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पाचशेमागे एक ह्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ कर म्हणून घ्यावा;
२९. त्यांच्या हिश्शातून तो घेऊन परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश म्हणून एलाजार याजकाला द्यावा.
३०. मग इस्राएल लोकांना मिळालेल्या हिश्शातून माणसे आणि गाईबैल, गाढवे, शेरडेमेंढरे वगैरे सर्व पशू ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाचे रक्षण करणार्या लेव्यांना द्यावे.”
३१. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व एलाजार याजक ह्यांनी केले.
३२. सैन्यातील शिपायांनी लुटून घेतलेल्या वस्तूंखेरीज सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेरडेमेंढरे,
३३. बहात्तर हजार गाईबैल,
३४. एकसष्ट हजार गाढवे,
३५. आणि माणसांपैकी ज्यांनी पुरुषांशी संग केला नव्हता अशा बत्तीस हजार स्त्रिया एवढी ती लूट होती.
३६. युद्धास गेलेल्यांच्या वाट्याला ह्या लुटीचा अर्धा भाग आला त्यात तीन लक्ष सदतीस हजार पाचशे शेरडेमेंढरे होती;
३७. त्यांपैकी सहाशे पंचाहत्तर ही परमेश्वराचा कर होती.
३८. गाईबैल छत्तीस हजार असून त्यांतील बहात्तर हे परमेश्वराचा कर होते.
३९. गाढवे तीस हजार पाचशे असून त्यांतील एकसष्ट ही परमेश्वराचा कर होती.
४०. माणसे सोळा हजार असून त्यांतील बत्तीस ही परमेश्वराचा कर होती.
४१. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने एलाजार याजकाला दिला.
४२. युद्धास गेलेल्या पुरुषांखेरीज इतर इस्राएल लोकांच्या वाट्याला आलेला अर्धा भाग मोशेने बाजूला काढला होता तो ह्याप्रमाणे:
४३. तीन लक्ष सदतीस हजार पाचशे शेरडेमेंढरे,
४४. छत्तीस हजार गाईबैल,
४५. तीस हजार पाचशे गाढवे,
४६. आणि सोळा हजार माणसे.
४७. मंडळीला मिळालेल्या हिश्शातून मोशेने माणसे व जनावरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाचे रक्षण करणार्या लेव्यांना दिले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.
४८. मग हजारो सैनिकांवर असलेले सेनापती म्हणजे सहस्रपती आणि शतपती मोशेकडे येऊन म्हणाले,
४९. “जे सैनिक आमच्या स्वाधीन आहेत त्यांची मोजदाद तुझ्या दासांनी केली आहे; त्यांच्यापैकी एकही कमी झालेला नाही;
५०. म्हणून आम्हा प्रत्येकाला जे सोन्याचे दागिने मिळाले, म्हणजे तोडे, कडी, अंगठ्या, कुंडले व बाजूबंद ही आम्ही आमच्या जिवांबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराला अर्पण करायला आणली आहेत.”
५१. तेव्हा मोशे व एलाजार याजक ह्यांनी ते सोने म्हणजे सर्व जडावाचे दागिने त्यांच्यापासून स्वीकारले.
५२. सहस्रपती व शतपती ह्यांनी परमेश्वराला समर्पण केलेले सर्व सोने सोळा हजार सातशे पन्नास शेकेल भरले.
५३. ह्या योद्ध्यांनी आपापल्यासाठी ही लूट मिळवली होती.
५४. मोशे व एलाजार याजक ह्यांनी हे सोने सहस्रपती व शतपती ह्यांच्यापासून घेऊन इस्राएल लोकांच्या प्रीत्यर्थ परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शनमंडपात नेऊन ठेवले.
१. रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती; याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले.
२. म्हणून गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सरदार ह्यांच्याकडे येऊन म्हणाले,
३. “अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन
४. ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या मंडळीसमक्ष पादाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.”
५. ते पुढे म्हणाले, “तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे; आम्हांला यार्देनेपलीकडे नेऊ नकोस.”
६. गादाच्या वंशजांना व रऊबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, “तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय?
७. जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता?
८. तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले.
९. त्यांनी अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्राएल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन त्यांनी निरुत्साही केले.
१०. त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने शपथ वाहिली की,
११. ‘मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे आहेत त्यांतील कोणीही अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो देश पाहणार नाहीत, कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत;
१२. कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र तो देश पाहतील, कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत.’
१३. परमेश्वराचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात चाळीस वर्षे भटकायला लावले.
१४. आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात.
१५. तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.”
१६. मग ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, “आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलाबाळांसाठी नगरे वसवू;
१७. तरी इस्राएल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवीपर्यंत आम्ही स्वत: हत्यारबंद होऊन त्यांच्या आघाडीस चालू; मात्र आमची मुलेबाळे ह्या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदी नगरात राहतील.
१८. इस्राएल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही.
१९. आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनेच्या पैलतीरी किंवा त्यांच्याही पलीकडे वतन घेणार नाही; कारण यार्देनेच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हांला मिळाला आहे.”
२०. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही ही गोष्ट कराल, म्हणजे जर तुम्ही युद्ध करण्यासाठी परमेश्वरापुढे सशस्त्र व्हाल,
२१. आणि परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून हाकून देईपर्यंत यार्देनेपलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल,
२२. तर तो देश परमेश्वराच्या स्वाधीन झाल्यानंतर तुम्हांला परत येता येईल आणि परमेश्वराच्या व इस्राएलाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल, आणि हा देश परमेश्वरासमक्ष तुमचे वतन होईल.
२३. असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा.
२४. तर तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी नगरे वसवा आणि आपल्या शेरडामेंढरांसाठी वाडे बांधा; आणि तुम्ही शब्द दिला तो पाळा.”
२५. तेव्हा गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशेला म्हणाले, “स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे दास करतील.
२६. आमची मुलेबाळे, स्त्रिया, शेरडेमेंढरे व गुरेढोरे गिलादातील नगरात राहतील;
२७. पण स्वामीच्या सांगण्याप्रमाणे त्याचा प्रत्येक दास युद्धासाठी सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे युद्ध करायला पलीकडे जाईल.”
२८. तेव्हा मोशेने एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वंशांच्या वाडवडिलांच्या घराण्यातले प्रमुख ह्यांना त्यांच्यासंबंधाने आज्ञा केली.
२९. मोशे त्यांना म्हणाला, “जर गादाच्या व रऊबेनाच्या वंशजांतील प्रत्येक पुरुष सशस्त्र होऊन तुमच्याबरोबर परमेश्वरापुढे यार्देनेपलीकडे गेला व देश तुमच्या ताब्यात आला, तर तुम्ही त्यांना गिलाद प्रदेश वतन करून द्यावा;
३०. पण तुमच्याबरोबर सशस्त्र होऊन ते पलीकडे गेले नाहीत तर कनान देशात त्यांना तुमच्याबरोबर वतन मिळावे.”
३१. तेव्हा गादाच्या वंशजांनी व रऊबेनाच्या वंशजांनी उत्तर दिले की, “परमेश्वराने आम्हा तुझ्या दासांना सांगितले तसे आम्ही करू.
३२. आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे.”
३३. मग मोशेने गादाचे वंशज, रऊबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याचा अर्धा वंश ह्यांना अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे अर्धे राज्य दिले; म्हणजे देश, नगरे व त्यांच्या आजूबाजूची भूमी, अर्थात देशातली चोहोबाजूंची नगरे दिली.
३४. गादाच्या वंशजांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,
३५. अटारोथ-शोफान, याजेर, यागबहा,
३६. बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही नगरे तटबंदी केली; आणि शेरडामेंढरांसाठी वाडे केले.
३८. आणि मूळची नबो व बाल-मौन (ह्यांची नावे बदलून) व सिब्मा ही नगरे वसवली आणि त्यांनी वसवलेल्या नगरांना निरनिराळी नावे दिली.
३९. मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांनी गिलाद प्रदेश काबीज केला आणि तेथे राहणार्या अमोरी लोकांना घालवून दिले.
४०. तेव्हा मोशेने मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांना गिलाद प्रदेश दिला आणि ते तेथे राहू लागले.
४१. आणि मनश्शेचा वंशज याईर ह्याने अमोर्यांची खेडी काबीज केली आणि त्यांना हव्वोथ-याईर (याइराची खेडी) हे नाव दिले.
४२. नोबह ह्याने कनाथ व त्याच्या आसपासची खेडी काबीज केली आणि त्यांना नोबह हे आपले नाव दिले.
१. दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मला विरोध करणार्यांना विरोध कर; माझ्याबरोबर लढणार्यांशी लढ.
२. ढाल व कवच धारण कर, माझ्या साहाय्यासाठी उभा राहा.
३. भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग.
४. माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजीत होवोत; माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो.
५. ते वार्याने उडून चाललेल्या भुसासारखे होवोत, परमेश्वराचा दूत त्यांना उधळून लावो.
६. त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो.
७. कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली.
८. त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो.
१. ज्याला ज्ञान प्रिय, त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखतो तो पशुतुल्य होय.
५५. मुख्य याजक व सर्व न्यायसभा ह्यांनी येशूला जिवे मारण्याकरता त्याच्याविरुद्ध साक्षीचा शोध केला पण ती त्यांना मिळेना.
५६. बर्याच जणांनी त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली, परंतु त्यांच्या साक्षीत मेळ बसेना.
५७. काही जण उभे राहून त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले,
५८. “हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे तीन दिवसांत उभारीन, असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.”
५९. परंतु त्यांच्या ह्याही साक्षीत मेळ नव्हता.
६०. तेव्हा प्रमुख याजकाने मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?”
६१. तथापि तो उगाच राहिला; त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा प्रमुख याजकाने त्याला विचारले, “धन्यवादिताचा पुत्र जो ख्रिस्त तो तू आहेस काय?”
६२. येशू म्हणाला, “मी आहे; आणि तुम्ही ‘मनुष्याचा पुत्र सर्वसामर्थ्याच्या उजवीकडे बसलेला’ व ‘आकाशातील मेघांसह येत असेलला’ असा पाहाल.”
६३. तेव्हा प्रमुख याजक आपले कपडे फाडून म्हणाला, “आपणांला साक्षीदारांची आणखी काय गरज?
६४. हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे; तुम्हांला कसे वाटते?” तेव्हा तो मरणदंडास पात्र आहे असे सर्वांनी मिळून ठरवले.
६५. मग कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता दाखव आपले अंतर्ज्ञान!” आणि कामदारांनी त्याला चपराका मारून आपल्या ताब्यात घेतले.
६६. इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासींपैकी एक तेथे आली;
६७. आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.”
६८. परंतु तो नाकारून बोलला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” ह्यावर तो बाहेर देवडीवर गेला; इतक्यात कोंबडा आरवला.
६९. मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.”
७०. तरी त्याने पुन्हा नाकारले; मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखरच त्यांच्यापैकीच आहेस, कारण तू गालीली आहेस [व तुझी बोलीही तशीच आहे.]”
७१. परंतु तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही.”
७२. तत्क्षणी दुसर्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले; तेव्हा त्याचे अवसान सुटले व संकोच न करता मोठा गळा काढून तो रडू लागला.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide