बायबल एकाच वर्षात

१. इस्राएलांना परमेश्वराने त्यांच्या आसपासच्या सर्व शत्रूंपासून स्वास्थ्य दिल्यावर बराच काळ लोटला; आणि यहोशवा वृद्ध व वयातीत झाला;
२. तेव्हा यहोशवाने सर्व इस्राएलांना म्हणजे त्यांचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश आणि अंमलदार ह्यांना बोलावून म्हटले, “मी आता वृद्ध व वयातीत झालो आहे;
३. तुमच्यासाठी तुमचा देव परमेश्वर ह्याने ह्या सर्व राष्ट्रांचे काय केले हे तुम्ही पाहिले आहे, कारण तुमचा देव परमेश्वर स्वत: तुमच्यासाठी लढला.
४. यार्देनेपासून पश्‍चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हांला तुमच्या वंशांचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत.
५. आणि तुमचा देव परमेश्वर स्वत: त्यांना तुमच्यापुढून हाकून लावील आणि तुमच्या दृष्टीसमोरून घालवून देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचा देश वतन करून घ्याल.
६. म्हणून मोठी हिंमत धरा, मोशेच्या नियमशास्त्राच्या ग्रंथांत जे लिहिले आहे ते सगळे काळजीपूर्वक पाळा, त्यापासून उजवीडावीकडे वळू नका;
७. तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका; त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला वाहायला लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका;
८. तर तुम्ही आजवर आपला देव परमेश्वर ह्याला धरून राहिला आहात तसेच राहा.
९. परमेश्वराने तुमच्यापुढून मोठमोठी व बलाढ्य राष्ट्रे घालवून दिली आहेत; तुमच्यासमोर तर आजवर कोणीही टिकला नाही.
१०. तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणारा आहे.
११. म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम करण्याची तुम्ही खबरदारी घ्या;
१२. पण जर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्यापासून परावृत्त व्हाल, तुमच्यात वस्ती करून असलेल्या उरलेल्या राष्ट्रांना धरून राहाल व त्यांच्याशी सोयरीक करून दळणवळण ठेवाल,
१३. तर हे पक्के समजा की, ह्यापुढे तुमचा देव परमेश्वर ह्या राष्ट्रांना तुमच्या दृष्टीपुढून घालवून देणार नाही, पण ती तुम्हांला पाश व सापळा, तुमच्या कुशीला चाबूक व डोळ्यांना काटे अशी होतील; आणि अखेरीस जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला दिली आहे तिच्यातून तुमचा नायनाट होईल.
१४. मी जगाच्या रहाटीप्रमाणे आता जात आहे. तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्या बाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकही निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यांतली एकही व्यर्थ गेली नाही.
१५. तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितलेल्या सर्व हिताच्या गोष्टी सिद्धीस गेल्या त्याप्रमाणेच अहिताचे प्रसंग परमेश्वर तुमच्यावर आणील आणि ही जी उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला दिली आहे तिच्यामधून तुमचा नायनाट करील.
१६. तुमचा देव परमेश्वर ह्याने जो करार पाळण्याची तुम्हांला आज्ञा दिली आहे त्याचे उल्लंघन करून अन्य देवांची सेवा कराल व त्यांना दंडवत घालाल तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकेल आणि जो उत्तम देश त्याने तुम्हांला दिला आहे त्यातून तुमचा नायनाट त्वरित होईल.”
१. नंतर यहोशवाने इस्राएलाच्या सर्व वंशांना शखेम येथे जमवले आणि इस्राएलाचे वडील जन, प्रमुख, न्यायाधीश व अंमलदार ह्यांना बोलावणे पाठवले; आणि ते देवासमोर हजर झाले.
२. तेव्हा यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राहाम व नाहोर ह्यांचा बाप तेरह हे फरात महानदीपलीकडे राहत व अन्य देवांची सेवा करत.
३. तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला.
४. मग मी इसहाकाला याकोब व एसाव दिले, आणि एसावाला सेईर डोंगर वतन करून दिला; याकोब आपल्या मुलाबाळांसह मिसर देशास गेला.
५. नंतर मी मोशे व अहरोन ह्यांना पाठवून मिसर देशात जी कृत्ये केली त्या कृत्यांनी त्या देशाला पिडले; नंतर मी तुम्हांला बाहेर आणले.
६. मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून काढून आणले; मग तुम्ही समुद्रापर्यंत येऊन पोहचला आणि मिसरी लोकांनी रथ व स्वार ह्यांसह तांबड्या समुद्रापर्यंत तुमच्या पूर्वजांचा पाठलाग केला.
७. त्यांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने तुमच्या व मिसर्‍यांच्या मध्ये अंधार पाडला आणि त्यांच्यावर समुद्र आणून त्यांना गडप केले; मिसर देशात मी जे काही केले ते तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले. नंतर तुम्ही पुष्कळ दिवस रानात राहिलात.
८. मग मी तुम्हांला यार्देनेच्या पूर्वेस राहणार्‍या अमोरी लोकांच्या देशात आणले; ते तुमच्याशी लढले; मी त्यांना तुमच्या हाती दिले व तुम्ही त्यांच्या देशाचा ताबा घेतला; तुमच्यापुढून मी त्यांचा संहार केला.
९. नंतर मवाबाचा राजा बालाक बिन सिप्पोर ह्याने इस्राएलाशी युद्ध केले; तुम्हांला शाप देण्यासाठी त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलावून घेतले;
१०. पण मी बलामाचे ऐकायला तयार नव्हतो म्हणून त्याने तुम्हांला उलट आशीर्वाद दिला; अशा प्रकारे मी तुम्हांला त्याच्या हातातून सोडवले.
११. तुम्ही यार्देन नदी उतरून यरीहोस आला तेव्हा यरीहोच्या नागरिकांनी आणि अमोरी, परिज्जी, कनानी, हित्ती, गिर्गाशी, हिव्वी व यबूसी ह्यांनी तुमच्याशी लढाई केली आणि मी त्यांना तुमच्या हाती दिले.
१२. मी तुमच्या आघाडीस गांधीलमाशा पाठवल्या व त्यांनी अमोर्‍यांचे दोन राजे तुमच्यापुढून हाकून दिले;
१३. मग जी जमीन तुम्ही कसली नाही ती मी तुम्हांला दिली; जी नगरे तुम्ही बांधली नाहीत त्यांत तुम्ही राहत आहात आणि जे द्राक्षांचे मळे व जैतुनांचे बाग तुम्ही लावले नाहीत त्यांचे उत्पन्न तुम्ही खात आहात.
१४. तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.
१५. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हांला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोर्‍यांच्या देवांची? मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.”
१६. तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो;
१७. कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून, दास्यगृहांतून काढून आणले; त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले;
१८. आणि ह्या देशात राहणार्‍या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले; आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे.”
१९. यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्हांला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे; तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही.
२०. तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील.”
२१. लोक यहोशवाला म्हणाले, “नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार.”
२२. यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहात.” ते म्हणाले, “आम्हीच साक्षी आहोत.”
२३. यहोशवा म्हणाला, “आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या. आपले मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा.”
२४. लोक यहोशवाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.”
२५. तेव्हा यहोशवाने त्या दिवशी त्या लोकांबरोबर करार केला आणि शखेमात त्यांना विधी व नियम लावून दिले.
२६. ह्या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्रस्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली.
२७. यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “पाहा, ही शिला आपल्याविरुद्ध साक्षीदार होईल, कारण परमेश्वराने आम्हांला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत; एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल म्हणून ही तुमच्याविरुद्ध साक्षीदार होईल.”
२८. मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले.
२९. ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा आपल्या वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला.
३०. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-सेरह येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठमाती दिली.
३१. यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्राएलासाठी काय कार्ये केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली.
३२. योसेफाच्या अस्थी इस्राएल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या त्या शखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा (एक चलन) देऊन विकत घेतली होती. हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले.
३३. नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला; त्याला त्यांनी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिनहास ह्याला दिलेल्या गिबा गावी मूठमाती दिली.
१. मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलांचे स्तोत्र. अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा; उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा.
२. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे; तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.
३. तो लोकांना आमच्या ताब्यात देतो; तो राष्ट्रांना आमच्या पायांखाली घालतो.
४. त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे. (सेला)
५. जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.
६. देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा; आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.
७. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
८. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे.
९. राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत; अब्राहामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत; तो परमथोर आहे.
१४. भ्रांत चित्ताचा मनुष्य आपल्या वर्तनाचे फळ भोगतो, आणि सत्पुरुष आपल्या ठायी तृप्त असतो.
२३. तेव्हा कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?”
२४. तो त्यांना म्हणाला, “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा; कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही.
२५. घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकत म्हणू लागाल, ‘प्रभूजी, आमच्यासाठी दार उघडा.’ तेव्हा तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठले आहात, हे मला माहीत नाही.’
२६. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, ‘आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले, आणि तुम्ही आमच्या रस्त्यांवर शिक्षण दिले.’
२७. परंतु तो म्हणेल, ‘मी तुम्हांला सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही; अहो, सर्व अन्याय करणार्‍यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा.’
२८. तुम्ही जेव्हा अब्राहाम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्यांना देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल.
२९. पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील.
३०. आणि पाहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.”
३१. त्याच घटकेस कित्येक परूशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हांला जिवे मारायला पाहत आहे.”
३२. त्याने त्यांना म्हटले, “त्या खोकडाला जाऊन सांगा, ‘पाहा, मी आज व उद्या भुते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसर्‍या दिवशी मी परिपूर्ण होईन.
३३. तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे; कारण यरुशलेमेबाहेर संदेष्ट्याचा नाश झाला असे व्हायचे नाही.’
३४. यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकत्र करते तसे तुझ्या मुलाबाळांना एकत्र करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!
३५. पाहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide