१. मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत,
२. गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”
३. ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले.
४. दावीद राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
५. साडेसात वर्षे त्याने हेब्रोनात यहूदावर राज्य केले आणि तेहेतीस वर्षे यरुशलेमेत सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर राज्य केले.
६. राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे त्या देशाचे रहिवासी यबूसी ह्यांच्यावर स्वारी केली. ते म्हणाले, “तुला येथे येणे साधायचे नाही; येथले आंधळेपांगळे तुला हाकून लावतील;” त्यांचा भावार्थ असा होता की दाविदाला येथे येणे साधायचे नाही.
७. तरी दाविदाने सीयोन गड घेतला; हेच ते दावीदपूर.
८. त्या दिवशी दावीद म्हणाला, “जो कोणी यबूशांना मारील त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जिवाचा द्वेष करणार्या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा संहार करावा.” ह्यावर अशी म्हण पडली आहे की, ‘येथे आंधळे व लंगडे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हायचा नाही.’
९. दावीद त्या गडावर राहू लागला; त्याला दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली.
१०. दाविदाचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत गेला, कारण सेनाधीश देव परमेश्वर त्याच्याबरोबर असे.
११. सोरेचा राजा हीराम ह्याने दाविदाकडे जासूद पाठवले; तसेच त्याने गंधसरूचे लाकूड, सुतार व गवंडी पाठवले; त्यांनी दाविदासाठी राजमंदिर बांधले.
१२. परमेश्वराने इस्राएलावरील आपले राज्य स्थिर केले आहे आणि आपल्या इस्राएली प्रजेप्रीत्यर्थ आपल्या राज्याची उन्नती केली आहे हे दाविदाच्या ध्यानात आले.
१३. मग दावीद हेब्रोनाहून आला तेव्हा त्याने यरुशलेमेतून आणखी काही उपपत्नी व पत्नी केल्या; दाविदाला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
१४. यरुशलेमेत त्याला पुत्र झाले त्यांची नावे ही: शम्मूवा, शोबाब, नाथान, शलमोन,
१५. इभार, अलीशवा, नेफग, याफीय,
१६. अलीशामा, एल्यादा व अलीफलेट.
१७. दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी दाविदाच्या शोधासाठी निघाले; हे कानी येताच दावीद खाली आपल्या गढीत गेला.
१८. पलिष्टी येऊन रेफाईम खोर्यात पसरले.
१९. दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला, “मी पलिष्ट्यांवर चढाई करू काय? तू त्यांना माझ्या हाती देशील काय?” परमेश्वराने दाविदाला म्हटले, “चढाई कर; मी खात्रीने पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.”
२०. मग दावीद बाल-परासीम येथे आला; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले.
२१. पलिष्टी तेथे आपल्या मूर्ती टाकून गेले; त्या दाविदाने व त्याच्या लोकांनी नेल्या.
२२. मग पुन्हा पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोर्यात पसरले.
२३. मग दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला असता त्याने सांगितले, “त्यांच्याशी सामना करू नकोस, तर वळसा घेऊन त्यांच्या पिछाडीस जा आणि तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर छापा घाल.
२४. तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच उठावणी कर, कारण परमेश्वर पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी तुझ्या पुढे गेला आहे असे समज.”
२५. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.
१. नंतर दाविदाने पुन्हा एकदा इस्राएलातले तीस हजार निवडक पुरुष जमा केले.
२. यहूदातील बाला येथून देवाचा कोश आणावा म्हणून दावीद आपल्याजवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला; करूबारूढ असलेला सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाचा हा कोश.
३. त्यांनी देवाचा कोश एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढला, अबीनादाबाचे पुत्र उज्जा व अह्यो हे दोघे ती नवी गाडी हाकत होते.
४. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अबीनादाबाच्या घरातून बाहेर काढली; अह्यो हा कोशापुढे चालत होता.
५. दावीद व इस्राएल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाची नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले.
६. नाखोनाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने देवाचा कोश हात लांब करून धरला.
७. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्याला ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशाजवळ गतप्राण झाला.
८. परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले; ते नाव आजवर चालत आहे.
९. त्या दिवशी दाविदाला परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?”
१०. दावीद परमेश्वराचा कोश दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल होईना; त्याने तो ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला.
११. परमेश्वराचा कोश ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी तीन महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-अदोम व त्याचे सर्व घराणे ह्यांना बरकत दिली.
१२. परमेश्वराने ओबेद-अदोम ह्याच्या घराण्याला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले; तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला.
१३. परमेश्वराचा कोश उचलणारे सहा पावले चालून गेले तेव्हा दाविदाने एक बैल व एक पुष्ट गोर्हा ह्यांचा यज्ञ केला.
१५. दाविदाने व सर्व इस्राएल घराण्याने परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला.
१६. परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या मीखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचतबागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला.
१७. लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.
१८. होमबली व शांत्यर्पणे अर्पण केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला.
१९. मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे इस्राएलाच्या समुदायातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकेक भाकर, मांसाचा एकेक तुकडा, खिसमिसांची एकेक ढेप अशी वाटून दिली. मग सर्व लोक घरोघर गेले.
२०. आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”
२१. दावीद मीखलेस म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्राएली प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो; आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच.
२२. मी ह्याहूनही तुच्छ बनेन; मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन; पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदरगौरव करतील.”
२३. शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही.
१. यहूदाच्या रानात असताना रचलेले दाविदाचे स्तोत्र. हे देवा, तू माझा देव आहेस; मी आस्थेने तुझा शोध करीन; शुष्क, रुक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे.
२. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे.
३. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करतील.
४. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन; तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन.
५. मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल; आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील.
६. मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो.
७. कारण तू माझे साहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन.
८. माझ्या जिवाने तुझी कास धरली आहे; तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो;
९. पण जे माझ्या जिवाचा घात करण्यास टपले आहेत, ते पृथ्वीच्या अधोभागी जातील.
१०. तलवारीने त्यांचा निःपात होईल; ते कोल्ह्यांचे खाद्य होतील.
११. राजा देवाच्या ठायी हर्ष पावेल; जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील; कारण असत्य बोलणार्यांचे तोंड बंद होईल.
१६. ज्ञानप्राप्ती उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! सुज्ञता संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.
१७. दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय; जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखतो.
१. त्यानंतर यहूद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला.
२. यरुशलेमेत मेंढरेदरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत.
३. त्यांमध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत;
४. कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.]
५. तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता.
६. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?”
७. त्या दुखणेकर्याने त्याला उत्तर दिले, “महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्याआधी उतरतो.”
८. येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
९. लगेचच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बाथ होता.
१०. ह्यावरून यहूदी त्या बर्या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.”
११. त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
१२. त्यांनी त्याला विचारले, “‘आपली बाज उचलून चाल,’ असे ज्याने तुला सांगितले, तो कोण माणूस आहे?”
१३. तो कोण आहे हे त्या बर्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते; कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता.
१४. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”
१५. त्या माणसाने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”
१६. ह्यामुळे यहूदी येशूच्या पाठीस लागून त्याला जिवे मारायला पाहू लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करत असे.
१७. येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे.”
१८. ह्यामुळे तर यहूदी त्याला जिवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करत असे.
१९. ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले: मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो ते पुत्रही तसेच करतो.
२०. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हांला आश्चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील.
२१. कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.
२२. पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे;
२३. ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide