१. अमित्तयाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,
२. “ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे.”
३. पण परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शीशास पळून जाण्यास निघाला, तो याफोस गेला; तेथे त्याला तार्शीशास जाणारे जहाज आढळले; त्याने त्याचे प्रवासभाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शीशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला.
४. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले.
५. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले; मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता.
६. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही.”
७. त्यांनी एकमेकांना म्हटले, “चला, आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली.
८. त्यांनी त्याला विचारले, “कोणामुळे हे संकट आमच्यावर आले सांग; तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?”
९. तो त्यांना म्हणाला, “मी इब्री आहे; ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे.”
१०. तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली; ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस?” तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते.
११. ते त्याला विचारू लागले की, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे?” समुद्र तर अधिकाधिक खवळत होता.
१२. तो त्यांना म्हणाला, “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.”
१३. जहाज किनार्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ही मारमारून थकली, पण त्यांना ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता.
१४. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, “हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की ह्या माणसाच्या जिवामुळे आम्हांला मारू नकोस व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आमच्यावर आणू नकोस; कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करतोस.”
१५. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळायचा राहिला.
१६. त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला; त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले.
१७. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता; योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता.
१. माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली;
२. तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास.
३. तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस, प्रवाहाने मला व्यापले; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले.
४. मी म्हणालो, ‘तुझ्या दृष्टिवेगळे मला फेकून दिले आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन.’
५. जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले.
६. मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस.
७. माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली.
८. जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात;
९. पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”
१०. परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले.
१. परमेश्वराचे वचन दुसर्यांदा योनाला प्राप्त झाले की,
२. “ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.”
३. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत.
४. योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.”
५. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणताट नेसले.
६. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला.
७. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, “कोणा माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये.
८. तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हातच्या जुलूमापासून मागे फिरावे.
९. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”
१०. देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा ‘त्यांच्यावर अरिष्ट आणीन’ असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही.
१. ह्याचे योनाला फार वाईट वाटले व त्याला राग आला.
२. तो परमेश्वराला विनंती करू लागला की, “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस.
३. तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.”
४. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तुला क्रोध येणे हे बरे आहे काय?”
५. मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला; तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला.
६. परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगववला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे केले. ह्या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला.
७. पण दुसरा दिवस उजाडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला; तो त्या तुंबीला लागला, तेव्हा ती सुकून गेली.
८. मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”
९. तेव्हा देव योनाला म्हणाला, “तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले.”
१०. परमेश्वर म्हणाला, “ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस!
११. तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”
१. दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर जो माझा दुर्ग त्याचा धन्यवाद होवो; तो माझ्या हातांना लढायला शिकवतो; माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो.
२. तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय धरतो; तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो.
३. हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावीस? मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावेस?
४. मनुष्य श्वासवत आहे; त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे.
५. हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर म्हणजे ते धुमसतील.
६. वीज पाडून त्यांची दाणादाण कर; तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडव.
७. वरून आपले हात लांब कर; व महापुरांतून, परक्यांच्या हातातून, मला सोडवून मुक्त कर.
८. त्यांचे मुख असत्य बोलते; त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे.
६. त्याच्या वचनांत तू काही भर घालू नकोस, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील.
७. मी तुझ्याजवळ दोन वर मागतो; मी मरण्यापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नकोस;
८. व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे.
९. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि “परमेश्वर कोण आहे?” असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.
१. त्याने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले.
२. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांना सात कर्णे देण्यात आले.
३. मग आणखी एक देवदूत येऊन ‘वेदीपुढे उभा राहिला’ त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह धूप’ ठेवण्याकरता त्याच्याजवळ पुष्कळ ‘धूप’ दिला होता.
४. देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला.
५. तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यात ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला.
६. मग ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपापले कर्णे वाजवण्यास सिद्ध झाले.
७. पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर’ वृष्टी झाली; आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला; एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.
८. दुसर्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा ‘अग्नीने पेटलेल्या’ मोठ्या ‘डोंगरासारखे’ काहीतरी समुद्रात टाकले गेले; समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले;
९. आणि समुद्रातील प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले; तसेच एक तृतीयांश तारवांचा नाश झाला.
१०. तिसर्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झर्यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला;
११. त्या तार्याचे नाव कडूदवणा; आणि पाण्याच्या एक तृतीयांशाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली; कारण ते कडू झाले होते.
१२. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.
१३. मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले: “जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणार्या ध्वनीने पृथ्वीवर राहणार्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide