१. ह्या गोष्टी घडल्यावर व अशी निष्ठा प्रकट झाल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने येऊन यहूदात प्रवेश केला आणि तटबंदी नगरे जिंकून घेण्याच्या हेतूने त्याने त्यांच्यासमोर तळ दिला.
२. सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिज्कीयाने पाहिले.
३. तेव्हा त्याने आपले सरदार व योद्धे ह्यांची मसलत घेऊन नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद केले व ह्या कामी त्यांनी त्याला साहाय्य केले.
४. पुष्कळ लोक जमा होऊन त्यांनी सर्व झरे बंद केले व देशामधून वाहणारा ओहोळही झाकून टाकला; ते म्हणाले, “अश्शूरचा राजा आल्यास त्याला मुबलक पाणी का मिळू द्यावे?”
५. कोट मोडून पडला होता तो हिज्कीयाने हिंमत धरून पुन्हा बांधून काढला व त्यावरील बुरूज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला, दावीदपुरातल्या मिल्लो नावाच्या बुरुजाची मजबुती केली आणि शस्त्रे व ढाली मुबलक बनवल्या.
६. त्याने प्रजेवर सेनापती नेमून त्यांना नगराच्या वेशीच्या चौकात आपल्याकडे एकत्र केले व त्यांना धीर देण्यासाठी तो त्यांना म्हणाला,
७. “दृढ व्हा, हिंमत धरा, अश्शूरचा राजा व त्याच्याबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका; त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे.
८. मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.
९. ह्यानंतर अश्शूरचा राजा सन्हेरीब हा आपल्या सर्व सैन्यासह लाखीशासमोर तळ देऊन राहिला होता. त्याने आपले सेवक हिज्कीया राजाकडे व यरुशलेमेत असलेल्या यहूद्यांकडे पाठवले व त्यांना निरोप कळवला की,
१०. “अश्शूराचा राजा सन्हेरीब म्हणतो, ‘यरुशलेम घेरले असता तुम्ही त्यात बसून राहिला आहात, तर तुमची भिस्त कशावर आहे?
११. आमचा देव परमेश्वर आम्हांला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवील असे सांगून हिज्कीया तुम्हांला भ्रमात घालून तहानेने व भुकेने मारत आहे ना?’
१२. त्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना ह्याच हिज्कीयाने आज्ञा दिली की, ‘तुम्ही एकाच वेदीपुढे आराधना करावी व तिच्यावरच धूप जाळावा, हे खरे ना?’
१३. मी व माझ्या वडिलांनी देशोदेशीच्या सर्व लोकांचे काय केले हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आपला देश माझ्या हातून सोडवण्यास देशोदेशींच्या राष्ट्रांचे कोणी देव समर्थ झालेत का?
१४. माझ्या वाडवडिलांनी ज्या राष्ट्रांचा सर्वस्वी संहार केला त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकांना माझ्या हातातून वाचवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तुम्हांला माझ्या हातातून कसा सोडवील?
१५. ह्यास्तव तुम्ही हिज्कीयास असे भुलवू व बहकवू देऊ नका; त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका; माझ्या हातातून व माझ्या वाडवडिलांच्या हातातून आपल्या लोकांचा बचाव करण्याची ताकद कोणत्याही राष्ट्राच्या किंवा राज्याच्या देवाला झाली नाही; तर माझ्या हातातून तुमचा बचाव करण्याची तुमच्या देवाला काय ताकद?”
१६. त्याच्या सेवकांनी परमेश्वर देवाची व त्याचा सेवक हिज्कीया ह्याची ह्यांहूनही अधिक निंदा केली.
१७. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची निंदा करावी व त्याच्याविरुद्ध बोलावे ह्या हेतूने त्याने पत्रेही पाठवली; त्यात त्याने लिहिले की, “निरनिराळ्या देशांतील राष्ट्रांच्या देवांना आपले लोक माझ्या हातातून सोडवता आले नाहीत, त्याप्रमाणेच हिज्कीयाच्या देवाला आपले लोक माझ्या हातून सोडवता यायचे नाहीत.”
१८. जे यरुशलेमकर कोटावर बसले होते त्यांना त्यांनी यहूदी भाषेत हे शब्द उच्च स्वराने सांगितले; हेतू हाच की त्यांना घाबरवून त्यांची धांदल उडवावी आणि नगर हस्तगत करावे.
१९. ‘पृथ्वीवरील मनुष्यांच्या हातांनी बनवलेल्या दैवतां-सारखाच यरुशलेमेचा देव आहे’ असे ते बोलले.
२०. ह्यावरून हिज्कीया राजा आणि संदेष्टा यशया बिन आमोज ह्या दोघांनी प्रार्थना केली आणि स्वर्गाकडे पाहून धावा केला.
२१. मग परमेश्वराने एक दूत पाठवला. त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व शूर वीर, प्रमुख व नायक ह्यांची कत्तल केली; तेव्हा तो फजीत होऊन आपल्या देशास परत गेला. तो आपल्या दैवतांच्या देवळात असता त्याच्या पोटच्याच मुलांनी त्याला तलवारीने मारून टाकले.
२२. ह्या प्रकारे परमेश्वराने हिज्कीयाला व यरुशलेमकरांना अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचवले, आणि तो त्यांना सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला.
२३. पुष्कळ लोकांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेस भेटी आणल्या आणि यहूदाचा राजा हिज्कीया ह्याला मौल्यवान वस्तू नजर केल्या; ह्यामुळे तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने थोर झाला.
२४. त्या दिवसांत हिज्कीया आजारी पडून मरायला टेकला. त्याने परमेश्वराची प्रार्थना केली तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला व त्याला एक चिन्ह दिले.
२५. पण हिज्कीयाने आपल्यावर झालेल्या उपकारांची फेड केली नाही; त्याचे हृदय उन्मत्त झाल्यामुळे त्याच्यावर, यहूदावर व यरुशलेमेवर कोप झाला.
२६. तथापि हिज्कीया आणि यरुशलेमकर आपल्या हृदयाच्या उन्मत्ततेविषयी अनुताप पावून नम्र झाले, म्हणून परमेश्वराचा क्रोध हिज्कीयाच्या काळात त्यांच्यावर भडकला नाही.
२७. हिज्कीयाला बहुत धन व मान मिळाला; त्याने सोने, रुपे, रत्ने, सुगंधी द्रव्ये, ढाली व नाना प्रकारची चांगली पात्रे ह्यांसाठी भांडारे बनवली.
२८. धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा उपज साठवण्यासाठीही त्याने कोठारे बांधली; तसेच सर्व तर्हेचे पशू व शेरडेमेंढरे ह्यांसाठी तबेले व मेंढवाडे बांधले.
२९. त्याने नगरे वसवली; शेरडेमेंढरे व गाईबैल ह्यांचे विपुल धन संपादले. परमेश्वराने त्याला बहुत धन दिले.
३०. ह्याच हिज्कीयाने गीहोन नावाचा वरचा पाट अडवून त्याचे पाणी दावीदपुराच्या पश्चिमेकडे नीट खाली आणले. हिज्कीया आपल्या सर्व कार्यांत यशस्वी झाला.
३१. तरीपण बाबेलच्या अधिपतींनी देशात घडलेल्या चमत्काराविषयी चौकशी करण्यास वकील पाठवले, तेव्हा त्याची पारख करावी व त्याच्या मनात काय आहे ते जाणावे म्हणून देवाने त्याला सोडून दिले.
३२. हिज्कीयाची बाकीची कृत्ये व सत्कृत्ये संदेष्टा यशया बिन आमोज ह्याच्या दृष्टान्तग्रंथात आणि यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत.
३३. हिज्कीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्यांनी त्याला दावीद वंशाच्या कबरस्तानातील उंचवट्यावर मूठमाती दिली. तो मृत्यू पावल्यावर सर्व यहूदी व यरुशलेमकर ह्यांनी त्याच्यासंबंधाने आदर व्यक्त केला. त्याचा पुत्र मनश्शे हा त्याच्या जागी राजा झाला.
१. मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत पंचावन्न वर्षे राज्य केले.
२. इस्राएल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रांना घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले.
३. त्याचा बाप हिज्कीया ह्याने उच्च स्थाने काढून टाकली होती ती त्याने पुन्हा बांधली; बआल मूर्तींसाठी वेद्या बांधून त्याने अशेरा मूर्ती केल्या; त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करत असे.
४. परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की, “यरुशलेमेत माझे नाम चिरकाल राहील” त्यात त्याने वेद्या बांधल्या.
५. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधल्या.
६. त्याने आपली मुले हिन्नोमपुत्रांच्या खोर्यात अग्नीत होम करून अर्पण केली; तो शकुनमुहूर्त मानत असे; जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.
७. आपण केलेली कोरीव मूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली; ह्या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्यांना परमेश्वर म्हणाला होता की, “हे मंदिर आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतून निवडून घेतलेले यरुशलेम ह्यांत मी आपले नाम निरंतर ठेवीन;
८. मी त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे ह्याने त्यांना जे नियमशास्त्र विदित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील तर जो देश इस्राएल लोकांच्या पूर्वजांना दिला आहे तेथून ते भटकतील असे मी करणार नाही.”
९. मनश्शेने यहूद्यांना व यरुशलेमकरांना एवढे बहकवले की परमेश्वराने इस्राएलांपुढून ज्या राष्ट्रांचा नाश केला होता त्यांच्याहूनही अधिक दुराचार त्यांनी केला.
१०. परमेश्वराने मनश्शे व त्याचे लोक ह्यांची कानउघाडणी केली, पण त्यांनी पर्वा केली नाही.
११. ह्यास्तव परमेश्वराने त्यांच्यावर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले.
१२. तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला.
१३. त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्याला पुन्हा यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्याला दिले. तेव्हा परमेश्वरच देव आहे असे मनश्शेला कळून आले.
१४. ह्यानंतर त्याने दावीदपुराच्या बाहेर गीहोनाच्या पश्चिमेस खोर्यात मत्सवेशीपर्यंत एक कोट बांधला, ओफेलाभोवती कोट बांधून तो उंच केला आणि यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांत त्याने सेनानायक ठेवले.
१५. मग त्याने अन्य देव व मूर्ती परमेश्वराच्या मंदिरातून काढून आणि परमेश्वराच्या मंदिराच्या पर्वतावर व यरुशलेमेत केलेल्या सर्व वेद्या काढून नगराबाहेर फेकून दिल्या.
१६. त्याने परमेश्वराच्या वेदीचा जीर्णोद्धार केला व तिच्यावर शांत्यर्पणे व उपकारस्मरणाचे बली अर्पण केले आणि इस्राएलांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करण्याची यहूदास आज्ञा केली.
१७. तरी इस्राएल लोक अजूनही उच्च स्थानी यज्ञ करीतच असत; मात्र ते आपला देव परमेश्वर ह्यालाच ते करीत.
१८. मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने आपल्या देवास केलेली प्रार्थना आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाने त्याच्याशी जे द्रष्टे बोलले त्यांची वचने ही सर्व इस्राएलाच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत.
१९. त्याने केलेली प्रार्थना ती कशी मान्य झाली ते, त्याचे सर्व पाप व अपराध, तो दीन होण्यापूर्वी त्याने उच्च स्थाने कोठेकोठे बांधली ते आणि अशेरा मूर्ती व कोरीव मूर्ती त्याने कशा उभारल्या ते सर्व द्रष्ट्यांच्या१ बखरीत लिहिले आहे.
२०. मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, त्यांनी त्याला त्याच्याच घरात मूठमाती दिली; त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन राजा झाला.
२१. आमोन राज्य करू लागला तेव्हा तो बावीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत दोन वर्षे राज्य केले.
२२. त्याने आपला बाप मनश्शे ह्याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले; त्याचा बाप मनश्शे ह्याने केलेल्या सर्व कोरीव मूर्तींपुढे आमोनाने यज्ञ करून त्यांची उपासना केली.
२३. त्याचा बाप मनश्शे परमेश्वरापुढे जसा लीन झाला तसा तो न होता अधिकाधिक पाप करीत गेला.
२४. त्याच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी करून त्याला त्याच्याच वाड्यात जिवे मारले.
२५. पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वांना देशाच्या लोकांनी जिवे मारले. त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशीया ह्याला राजा केले.
८. परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन; कारण तो आपल्या लोकांशी व आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील; मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये.
९. खरोखर त्याचे भय धरणार्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.
१०. दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; नीती व शांती ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे;
११. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे; स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करीत आहे.
१२. जे उत्तम ते परमेश्वर देईल; आणि आमची भूमी आपले फळ देईल.
१३. त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.
१२. न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तींत पाडतो.
१७. मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले.
१८. ते त्याच्याजवळ आल्यावर त्याने त्यांना म्हटले: “मी आशिया प्रांतात पहिल्याने पाऊल टाकल्या दिवसापासून तुमच्याबरोबर नेहमी कसा होतो,
१९. म्हणजे फार नम्रतेने, आसवे गाळत आणि यहूद्यांच्या कटामुळे माझ्यावर आलेली संकटे सोसत मी प्रभूची सेवा कशी केली, हे तुम्हांला ठाऊक आहे;
२०. जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही.
२१. पश्चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे ह्यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्यांना मी साक्ष देत होतो.
२२. पण आता पाहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरुशलेमेस जात आहे. तेथे मला काय काय होईल ते माहीत नाही;
२३. केवळ इतके कळते की, बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत; ह्याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे.
२४. मी कशाचीही काळजी करीत नाही; मी आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.
२५. आणि आता पाहा, ज्यांच्यामध्ये मी देवाच्या राज्याची घोषणा करत फिरलो त्या तुमच्या कोणाच्याही दृष्टीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही, हे मला ठाऊक आहे.
२६. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे;
२७. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हांला सांगण्यास मी कसूर केली नाही.
२८. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हांला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, ह्यासाठी की, देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरता मिळवली तिचे पालनपोषण तुम्ही करावे.
२९. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे.
३०. तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.
३१. म्हणून मी तीन वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही ही आठवण ठेवून सावध राहा.
३२. आता बंधूंनो, मी तुम्हांला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो; तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन देण्यास समर्थ आहे.
३३. मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही.
३४. माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरता ह्याच हातांनी श्रम केले, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.
३५. सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि ‘घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे,’ असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”
३६. असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली.
३७. तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.
३८. ‘माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही,’ असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दु:ख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचवले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide