१५. उत्कृष्ट सुवर्ण देऊन ते मिळत नाही; चांदी तोलून देऊन त्याचे मोल होत नाही.
१६. ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही.
१७. सोने व काचमणी ही त्याच्या बरोबरीची नाहीत; उंची सोन्याच्या नगांनी त्याचा मोबदला होत नाही.
१८. प्रवाळ व स्फटिक ह्यांची काय कथा? ज्ञानाचे मोल मोत्यांहून अधिक आहे.
१९. कूश देशाचा पुष्कराज त्याच्या तोडीचा नाही; बावनकशी सोने त्याच्याशी तुल्य नाही.
२०. तर मग ज्ञान कोठून येते? बुद्धीचे स्थान कोणते?
२१. ते सर्व जिवंतांच्या नेत्रांना अगोचर आहे; आकाशातील पक्ष्यांना ते गुप्त आहे.
२२. विनाशस्थान१ व मृत्यू म्हणतात, आमच्या कानी त्याची केवळ वार्ता आली आहे.
२३. देवच त्याचा मार्ग जाणतो; त्याचे स्थान त्यालाच ठाऊक आहे.
२४. कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंतांना पोचते; तो आकाशमंडळाखालचे सर्वकाही पाहतो.
२५. त्याने वायूचे वजन ठरवले व जल मापून दिले;
२६. त्याने पर्जन्यास नियम लावून दिला; गर्जणार्या विद्युल्लतेस मार्ग नेमून दिला;
२७. तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले; त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणले.
२८. तो मानवाला म्हणाला, ‘पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”’
१. परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी उल्लास करो; द्वीपसमूह हर्ष करो!
२. ढग व अंधार त्याच्याभोवती आहेत; नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.
३. त्याच्यापुढे अग्नी चालतो, आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो.
४. त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली.
५. परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले.
६. आकाशाने त्याची नीती प्रकट केली; सर्व लोकांनी त्याचा गौरव पाहिला.
१३. मुलास शिक्षा करण्यास अनमान करू नकोस, कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही.
१४. तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव.
१. किंख्रियातील मंडळीची सेविका - आमची बहीण फीबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो;
२. अशासाठी की, तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यांत तिला साहाय्य करावे; कारण ती स्वत: पुष्कळ जणांस व मलाही साहाय्य करणारी अशी झाली आहे.
३. ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना सलाम सांगा;
४. त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला.१ त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात.
५. जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा; माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा; तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथमफळ आहे.
६. मरीयेला सलाम सांगा; तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत.
७. माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा; ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते.
८. प्रभूमध्ये माझा प्रिय आंप्लियात ह्याला सलाम सांगा.
९. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना सलाम सांगा.
११. माझा नातेवाईक हेरोदियोन ह्याला सलाम सांगा. नार्किससच्या घरातील जी माणसे प्रभूमध्ये आहेत त्यांना सलाम सांगा.
१२. प्रभूमध्ये श्रम करणार्या त्रुफैना व त्रुफासा ह्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले.
१३. प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला, आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा.
१४. असुंक्रित, फ्लगोन, हर्मास, पत्रबास, हर्मेस ह्यांना व त्यांच्याबरोबर जे भाऊ आहेत त्यांना सलाम सांगा.
१५. फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना सलाम सांगा.
१६. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.
१७. आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.
१८. कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.
१९. तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे.
२०. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.
२१. माझा सहकारी तीमथ्य व माझे नातेवाईक लूक्य, यासोन व सोसिपतेर हे तुम्हांला सलाम सांगतात.
२२. हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये सलाम सांगतो.
२३. माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम.
२५. आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हांला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide