बायबल एकाच वर्षात

१. परमेश्वर मवाबाच्या मैदानात यरीहोसमोर यार्देनेतीरी मोशेला म्हणाला,
२. “इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की, तुम्ही आपल्या ताब्यात मिळणार्‍या वतनातून लेव्यांना राहण्यासाठी नगरे द्यावीत आणि त्या नगरांच्या आसपासची शिवारेही त्यांना द्यावीत.
३. नगरे त्यांच्या वस्तीसाठी असावीत आणि शिवारे त्यांची गुरेढोरे, शेरडेमेंढरे आणि त्यांच्या सर्व जनावरांसाठी असावीत.
४. लेव्यांना जी शिवारे द्याल ती नगराच्या तटाबाहेर दक्षिण बाजूस दोन हजार हात सभोवार असावीत.
५. आणि नगराच्या बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दक्षिण बाजूस दोन हजार हात, पश्‍चिम बाजूस दोन हजार हात, उत्तर बाजूस दोन हजार हात मोजावेत आणि नगर मध्ये असावे, हेच त्यांच्या नगराचे शिवार असावे.
६. लेव्यांना जी नगरे द्याल त्यांपैकी सहा शरणपुरे असावीत, मनुष्यवध करणार्‍यांना तेथे पळून जाऊ द्यावे; त्या सहांखेरीज आणखी बेचाळीस नगरे त्यांना द्यावीत.
७. अशी एकंदर अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची शिवारे लेव्यांना द्यावीत.
८. इस्राएल लोकांच्या वतनातून जी नगरे लेव्यांना द्यायची ती मोठ्या वतनातून अधिक व लहान वतनातून कमी अशी द्यावीत; प्रत्येक वंशाने आपापल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावीत.”
९. परमेश्वर मोशेला म्हणाला,
१०. “इस्राएल लोकांना सांग: यार्देन ओलांडून तुम्ही कनान देशात पोहचाल,
११. तेव्हा तुमच्याकरता शरणपुरे म्हणून काही नगरे ठरवा; म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे.
१२. सूड उगवणार्‍यापासून आश्रयस्थानादाखल ही नगरे तुमच्या उपयोगी पडतील, आणि खुनी मनुष्याचा मंडळीसमोर न्याय होईपर्यंत त्याला कोणी मारून टाकू नये.
१३. जी नगरे तुम्ही द्याल त्यांपैकी सहा तुमची शरणपुरे असावीत.
१४. तीन नगरे यार्देनेच्या पूर्वेस द्यावीत आणि तीन नगरे कनान देशात द्यावीत, ही शरणपुरे होत.
१५. ही सहा नगरे इस्राएल लोकांसाठी, त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपर्‍यासाठी आश्रयस्थाने म्हणून नेमली आहेत; एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे.
१६. तथापि एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
१७. ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
१८. ज्याकडून मृत्यू घडेल असे लाकडी शस्त्र एखाद्याने हातात घेऊन कोणाला मारले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे; अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
१९. रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने स्वत: त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; तो सापडेल तेथे त्याने त्याला जिवे मारावे.
२०. कोणी एखाद्याला द्वेषबुद्धीने ढकलून दिले, किंवा टपून बसून त्याला काही फेकून मारले आणि त्यामुळे तो मेला;
२१. अथवा कोणी वैरभावाने त्याला ठोसा मारल्यामुळे तो मेला, तर मारणार्‍याला अवश्य जिवे मारावे; तो खुनी होय; रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने खुनी सापडेल तेथे त्याला जिवे मारावे.
२२. तथापि कोणी वैरभावाने नव्हे पण अचानक एखाद्याला ढकलले किंवा टपून न बसता त्याच्यावर एखादे शस्त्र फेकले, किंवा ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा हातात घेऊन नकळत कोणावर फेकला,
२३. आणि त्यामुळे तो मेला, आणि तो त्याचा शत्रू नसला अथवा त्याने त्याची हानी करू पाहिली नसली,
२४. तर मंडळीने मारणार्‍याचा आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याचा न्याय ह्या नियमानुसार करावा.
२५. मग मनुष्यवध करणार्‍या त्या मनुष्याला, रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याच्या हातून सोडवून ज्या शरणपुरात तो पळून गेला होता तेथे त्याला मंडळीने पुन्हा पोचते करावे; आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहावे.
२६. पण मनुष्यवध करणारा ज्या शरणपुरात पळून गेला असेल त्याच्या सीमेबाहेर जर तो कधी गेला,
२७. आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने त्या शरणपुराच्या सीमेबाहेर त्याला गाठले, आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने त्याला जिवे मारले तर त्या रक्तपाताचा दोष त्याला लागायचा नाही.
२८. कारण मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणार्‍याने शरणपुरातच राहायचे होते; पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे.
२९. तुमच्या पिढ्यानपिढ्यासाठी तुमच्या सर्व वस्तीच्या ठिकाणी ह्या गोष्टी तुमच्या न्यायाचे विधी म्हणून नेमलेल्या आहेत.
३०. कोणी एखाद्या मनुष्याचा खून केला तर साक्षीदारांच्या साक्षीवरून त्या खून करणार्‍याला जिवे मारावे; पण एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून कोणाला जिवे मारू नये.
३१. मनुष्यवध करणारा देहान्त शासनास पात्र ठरला तर त्याच्या प्राणाबद्दल खंडणी घेऊन त्याला सोडून देऊ नये, पण त्याला अवश्य जिवे मारावे.
३२. त्याचप्रमाणे शरणपुरात पळून गेलेल्या मनुष्याबद्दल काही खंडणी घेऊन त्याला याजक मरण्यापूर्वी आपल्या वतनात राहण्यास परत जाऊ देऊ नये.
३३. ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका; कारण खुनाने देश भ्रष्ट होतो, आणि रक्तपात करणार्‍या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्‍चित्त होऊ शकत नाही.
३४. ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका, कारण मी परमेश्वर इस्राएल लोकांमध्ये वसत आहे.”
१. मग योसेफ वंशाच्या कुळांपैकी गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याच्या वंशातील पितृकुळाचे प्रमुख पुरुष मोशेकडे येऊन त्याला व इस्राएल लोकांच्या पितृकुळांच्या सरदारांना म्हणाले,
२. “परमेश्वराने आमच्या स्वामीला आज्ञा केली होती की, इस्राएल लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटून द्यावा; परमेश्वराने आमच्या स्वामीला आणखी अशी आज्ञा केली होती की, आमचा बंधू सलाफहाद ह्याच्या वतनाचा हिस्सा त्याच्या मुलींना द्यावा.
३. पण इस्राएल लोकांच्या इतर कोणत्याही वंशातल्या पुरुषांशी त्याचा विवाह झाला तर आमच्या वाडवडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा कमी होईल आणि ज्या वंशात त्या जातील त्या वंशाच्या वतनात तो मिळवला जाईल, आणि आमच्या हिश्शाच्या वतनातून तो कमी होईल.
४. मग इस्राएल लोकांचे योबेलवर्ष आल्यावरही ज्या वंशात त्या गेल्या असतील त्याच्या वतनात तो मिळवला जाईल; अशाने त्यांचे वतन आमच्या वाडवडिलांच्या वंशाच्या वतनातून कमी होईल.”
५. तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना आज्ञा केली की, “योसेफाचे वंशज म्हणतात ते बरोबर आहे.
६. सलाफहादाच्या मुलींसंबंधाने परमेश्वराने अशी आज्ञा केली आहे की, ‘त्यांना आवडेल त्याच्याशी त्यांनी विवाह करावा, पण आपल्या बापाच्या वंशाच्या कुळातच त्यांनी विवाह करावा.’
७. इस्राएल लोकांचे वतन एका वंशातून दुसर्‍या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांतील प्रत्येकाने आपल्या बापाच्या वंशाच्या वतनाला चिकटून राहावे.
८. इस्राएल लोकांच्या कोणत्याही वंशातील कोणत्याही मुलीला वतन मिळालेले असेल तर तिचा विवाह तिच्या बापाच्या वंशाच्या कुळातल्या मुलाशीच व्हावा; अशाने इस्राएल लोकांतील प्रत्येकाला आपल्या वाडवडिलांचे वतन मिळेल.
९. कोणतेही वतन एका वंशातून दुसर्‍या वंशात जाऊ नये; इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशाने आपल्याच वतनाला चिकटून राहावे.”
१०. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सलाफहादाच्या मुलींनी केले;
११. सलाफहादाच्या मुली महला, तिरसा, होग्ला, मिल्का व नोआ ह्यांनी आपल्या चुलत भावांशी विवाह केला.
१२. योसेफपुत्र मनश्शे ह्याच्या वंशातल्या कुळातच त्यांचा विवाह झाला म्हणून त्यांचे वतन त्यांच्या बापाच्या कुळाच्या वंशात कायम राहिले.
१३. मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशेच्या द्वारे परमेश्वराने जे नियम व विधी इस्राएल लोकांना लावून दिले ते हे होत.
१७. हे प्रभू, कोठवर पाहत राहशील? त्यांनी योजलेल्या अरिष्टापासून माझा जीव, तसाच तरुण सिंहापासून माझा प्राण सोडव.
१८. मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन.
१९. माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत; विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत;
२०. कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही; देशात शांततेने राहणार्‍यांविरुद्ध ते मसलती करतात.
२१. माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, “अहाहा! अहाहा! आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे.”
२२. हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नकोस; हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नकोस.
२३. हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्यायनिवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून ऊठ, जागृत हो.
२४. हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्यायनिवाडा कर; ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत.
२५. “अहाहा! आमच्या मनासारखे झाले,” असे ते आपल्या मनात न म्हणोत; “आम्ही त्याला गिळून टाकले” असे ते न म्हणोत.
२६. माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजीत होवोत; माझ्यापुढे तोरा मिरवणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत.
२७. माझ्या न्याय्य पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत; आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणार्‍या परमेश्वराचा गौरव होवो, असे ते सतत म्हणोत.
२८. माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील.
३. मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण नीतिमानांचे मूळ ढळत नाही.
२५. त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता.
२६. ‘यहूद्यांचा राजा’ असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लावला होता.
२७. त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.
२८. [‘आणि अपराध्यांत तो गणलेला होता’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला.]
२९. मग जवळून जाणार्‍यायेणार्‍यांनी ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा केली की, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या,
३०. आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये.”
३१. तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसांत थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्‍यांचे तारण केले, त्याला स्वत:चा बचाव करता येत नाही.
३२. इस्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.” त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेली माणसेही त्याची निंदा करत होती.
३३. सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.
३४. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
३५. तेव्हा जवळ उभे राहणार्‍यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.”
३६. आणि कोणीएकाने धावत जाऊन स्पंज ‘आंबेने’ भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला’, आणि म्हटले, “असू द्या, एलीया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू.”
३७. मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला.
३८. तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.
३९. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.”
४०. काही स्त्रियांही दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरीया व सलोमे ह्या होत्या;
४१. तो गालीलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करत असत; ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेस आलेल्या दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या.
४२. ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती; हा तयारीचा दिवस म्हणजे शब्बाथाच्या आदला दिवस होता.
४३. म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले; हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता.
४४. तेव्हा तो इतक्यात कसा मेला ह्याचे पिलाताला नवल वाटले; आणि त्याने शताधिपतीला बोलावून घेऊन विचारले, “त्याला मरून बराच वेळ झाला की काय?”
४५. शताधिपतीकडून ते कळल्यावर त्याने ते शव योसेफाच्या स्वाधीन केले.
४६. त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्याभोवती गुंडाळले; मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसवली.
४७. त्याला कोठे ठेवले हे मग्दालीया मरीया व योसेची आई मरीया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide