बायबल एकाच वर्षात

१. इस्राएलांपैकी ज्यांना कनान देशातील युद्धांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी
२. आणि इस्राएल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना त्याचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही:
३. पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी.
४. परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्राएलाच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्यासाठी परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.
५. अशा प्रकारे इस्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यामध्ये राहू लागले.
६. ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्राएल लोकांना सोडवतो
७. इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले;
८. म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचे दास्य केले.
९. इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडवणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली.
१०. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले.
११. त्यानंतर चाळीस वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. मवाबाच्या हातांतून एहूद इस्राएलांना सोडवतो
१२. पुन्हा इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करू लागले; त्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले म्हणून परमेश्वराने मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे इस्राएलावर वर्चस्व स्थापले.
१३. तेव्हा त्याने अम्मोनी व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन इस्राएलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरीचे नगर हस्तगत केले.
१४. म्हणून इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे अठरा वर्षे दास्य केले.
१५. मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांना सोडवणारा म्हणून उभे केले; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हस्ते इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला नजराणा पाठवला.
१६. एहूदने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकवली.
१७. त्याने मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढे नजराणा सादर केला; एग्लोन हा फार लठ्ठ होता.
१८. नजराणा दिल्यानंतर त्याने नजराणा घेऊन आलेल्या लोकांची रवानगी केली;
१९. पण गिलगालाजवळील पाषाणमूर्तींपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत येऊन म्हणाला, “महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे.” राजा म्हणाला, “गप्प राहा.” तेव्हा त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले.
२०. एहूद त्याच्याजवळ आला त्या वेळी तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद त्याला म्हणाला, “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे.” तेव्हा तो आसनावरून उठला.
२१. मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार उपसून त्याच्या पोटात खुपसली;
२२. पात्याबरोबर मूठही आत गेली आणि चरबीत रुतून बसली. त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; ती पार्श्वभागी निघाली होती.
२३. मग बाहेर देवडीवर जाऊन एहूदाने माडीचे दरवाजे लावून कुलूप लावले.
२४. तो निघून गेल्यावर हुजरे येऊन पाहतात तर माडीचे दरवाजे बंद असल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले; तेव्हा त्यांना वाटले की, तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.
२५. ते वाट पाहून थकले; तो माडीचे दरवाजे उघडत नाहीत असे पाहून त्यांनी किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तर, त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता.
२६. ते वाट पाहत होते तितक्यात एहूद पळून पाषाणमूर्तींच्या पलीकडे सईरा येथे जाऊन पोहचला.
२७. तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला.
२८. तो त्यांना म्हणाला, “माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वराने तुमचे मवाबी शत्रू तुमच्या हाती दिले आहेत.” तेव्हा त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाही पार जाऊ दिले नाही.
२९. त्या वेळी त्यांनी मवाब्यांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीही वाचला नाही.
३०. अशा प्रकारे मवाब त्या दिवशी इस्राएलाच्या काबूत आला. ह्यानंतर देशाला ऐंशी वर्षे स्वास्थ्य लाभले.
३१. एहूदनंतर अनाथाचा मुलगा शमगार हा पुढे आला; त्याने सहाशे पलिष्ट्यांना बैलाच्या पराणीने जिवे मारले; अशा प्रकारे त्यानेही इस्राएलाची सुटका केली.
१. एहूद मृत्यू पावल्यावर इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले.
२. तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.
३. त्याच्याकडे नऊशे लोखंडी रथ असून त्याने वीस वर्षे इस्राएल लोकांचा अनन्वित छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला.
४. त्या वेळेस लप्पिदोथाची बायको दबोरा संदेष्ट्री ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.
५. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल ह्यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे; इस्राएल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत.
६. तिने अबीनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश-नफताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, “तू नफताली व जबुलून ह्यांच्यातले दहा हजार पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा अशी आज्ञा इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना?
७. तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सीसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे कीशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन, आणि त्याला तुझ्या हाती देईन.”
८. बाराक तिला म्हणाला, “तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाहीतर जाणार नाही.”
९. ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.
१०. बाराकाने जबुलून व नफताली ह्यांना केदेश येथे बोलावले; मग त्याच्यामागोमाग दहा हजार पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली.
११. मोशेचा सासरा१ होबाब ह्याचे वंशज जे केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता.
१२. इकडे सीसरा ह्याला खबर लागली की, अबीनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे,
१३. तेव्हा सीसरा ह्याने आपले एकंदर नऊशे लोखंडी रथ आणि हरोशेथ-गोयीम येथून आपल्याजवळचे सर्व लोक कीशोन नदीवर जमा केले.
१४. दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून उतरले.
१५. परमेश्वराने सीसरा, त्याचे सर्व रथ व सर्व सेना ह्यांचा बाराकासमोर तलवारीने धुव्वा उडवला; तेव्हा सीसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला.
१६. इकडे बाराकाने हरोशेथ-गोयीमापर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला; आणि सीसराची सर्व सेना तलवारीने पडली; त्यातला एकही वाचला नाही.
१७. सीसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेर्‍याकडे पायी पळून गेला; कारण हासोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे ह्यांचे सख्य होते.
१८. तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे! भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेर्‍यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले.
१९. तो तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला दे बरे! मला तहान लागली आहे.” तेव्हा तिने दुधाची बुधली उघडून त्याला दूध प्यायला दिले व त्याला झाकले.
२०. तो तिला म्हणाला, “डेर्‍याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की, येथे एखादा पुरुष आहे काय? तर नाही म्हणून सांग.”
२१. मग हेबेराची बायको याएल हिने डेर्‍याची मेख आणि हातोडा हाती घेऊन, आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेख ठोकली; ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारे तो मेला.
२२. बाराक सीसराचा पाठलाग करत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, “चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करत आहात तो मी तुम्हांला दाखवते.” तो तिच्याबरोबर आत जाऊन पाहतो तर सीसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेख ठोकलेली होती.
२३. अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याचा देवाने इस्राएल लोकांपुढे धुव्वा उडवला.
२४. इस्राएल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला.
९. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले.
१०. हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे; तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे;
११. तुझ्या न्यायकृत्यांमुळे सीयोन डोंगर आनंद पावो; यहूदाच्या कन्या उल्लासोत.
१२. सीयोनेसभोवती फिरा, तिला फेरा घाला; तिचे बुरूज मोजा;
१३. तिच्या कोटांकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हांला सांगता येईल.
१४. कारण हा देव आमचा सनातन देव आहे; तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.
१८. भोळे मूर्खतारूप वतन पावतात, पण शहाणे ज्ञानरूप मुकुट धारण करतात.
१९. दुर्जन सज्जनांपुढे नमतात, दुष्ट लोक नीतिमानाच्या दारापुढे नमतात.
२५. त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते; तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला,
२६. “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
२७. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.
२८. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?
२९. नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील,
३०. ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’
३१. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसर्‍या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, ‘जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?’
३२. जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील.
३३. म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.
३४. मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल?
३५. ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide