बायबल एकाच वर्षात

१. “योनाथानाप्रीत्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय?” अशी चौकशी दाविदाने केली.
२. शौलाच्या घराण्याचा सीबा नामक एक सेवक होता, त्याला दाविदाकडे बोलावून आणण्यात आले; राजाने त्याला विचारले, “तू सीबा आहेस काय?” त्याने म्हटले, “मीच तो आपला दास.”
३. राजाने विचारले, “ज्याच्यावर देवाप्रीत्यर्थ मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय?” सीबा राजाला म्हणाला, “योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायांनी लंगडा आहे.”
४. राजाने त्याला विचारले, “तो कोठे आहे?” सीबाने राजाला म्हटले, “तो लो-दबार येथे माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरी असतो.”
५. तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्याला लो-दबाराहून माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरून बोलावून आणले.
६. मफीबोशेथ बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मफीबोशेथा!” तो म्हणाला, “आपला दास हजर आहे.”
७. दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, तुझा बाप योनाथान ह्याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन; तुझा बाप शौल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन; आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस.”
८. तो प्रणाम करून म्हणाला, “आपण अशा माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?”
९. मग राजाने शौलाचा सेवक सीबा ह्याला बोलावून सांगितले, “जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या पुत्राला देतो.
१०. तर तू आपले पुत्र व चाकर ह्यांच्यासह त्याच्या जमिनीची लागवड कर; तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणत जा; पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेथ माझ्या पंक्तीला नित्य भोजन करील.” सीबाचे पंधरा पुत्र व वीस चाकर होते.
११. सीबा राजाला म्हणाला, “माझे स्वामीराजे ह्यांनी आपल्या दासाला केलेल्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही आपला दास करील.” ह्याप्रमाणे मफीबोशेथ इतर राजपुत्रांप्रमाणे दाविदाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे.
१२. मफीबोशेथास मीखा नावाचा एक लहान पुत्र होता. सीबाच्या घरी राहणारे सर्व जण मफीबोशेथाचे चाकर होते.
१३. मफीबोशेथ यरुशलेमेत राहिला; कारण तो राजाच्या पंक्तीस नित्य भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी लंगडा होता.
१. पुढे अम्मोनी लोकांचा राजा मृत्यू पावला व त्याच्या जागी त्याचा पुत्र हानून राज्य करू लागला.
२. तेव्हा दावीद म्हणाला, “हानूनाचा बाप नाहाश ह्याने आपल्यावर दया केली तशीच मी त्याच्या पुत्रावर दया करीन.” म्हणून दाविदाने त्याच्या पित्याच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन करायला आपल्या सेवकांच्या हाती त्याला सांत्वनाचा निरोप पाठवला. मग दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले.
३. त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार आपला स्वामी हानून ह्याला म्हणाले की, “दाविदाने आपले सांत्वन करण्यासाठी लोक पाठवले आहेत ते आपल्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शवण्याकरता पाठवले आहेत असे आपल्याला वाटते काय? ह्या नगराची पाहणी व टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून दाविदाने आपले चाकर पाठवले आहेत; नाही काय?”
४. तेव्हा हानूनाने दाविदाच्या सेवकांना पकडले व त्यांची अर्धीअर्धी दाढी काढवून व त्यांची वस्त्रे मधोमध कुल्ल्यापर्यंत कापून टाकून त्यांना पाठवून दिले.
५. हे वर्तमान ऐकून दाविदाने त्यांची वाटेत गाठ घ्यायला माणसे पाठवली; कारण त्यांना मोठी लाज वाटत होती. राजाने त्यांना सांगून पाठवले की, “तुमची दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीहो येथे राहा मग इकडे या.”
६. दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.
७. हे ऐकून दाविदाने यवाबाला योद्ध्यांच्या सर्व सैन्यासह पाठवले.
८. तेव्हा अम्मोनी लोकांनी बाहेर पडून वेशीनजीक युद्धासाठी व्यूह रचला; इकडे सोबा व रहोब येथले अरामी आणि तोब व माका ह्यांचे शिपाई निराळ्या ठिकाणी मैदानात होते.
९. आपल्या मागे व पुढे व्यूह रचला आहे हे यवाबाने पाहून इस्राएली लढवय्यांपैकी निवडक शिपाई घेऊन त्यांना अराम्यांसमोर उभे केले;
१०. वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्याने अम्मोन्यांसमोर त्यांची व्यूहरचना केली.
११. तो म्हणाला, “अरामी माझ्याहून प्रबल होऊ लागले तर तू माझे साहाय्य कर, पण अम्मोनी तुझ्याहून प्रबल झाले तर मी तुझे साहाय्य करीन.
१२. हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.”
१३. मग यवाब व त्याच्याबरोबरचे लोक अराम्यांशी युद्ध करायला जवळ गेले, तेव्हा ते त्याच्यापुढून पळून गेले;
१४. अरामी पळून गेले हे पाहून अम्मोनी लोकही अबीशय ह्याच्यापुढून पळून जाऊन नगरात शिरले. तेव्हा यवाब अम्मोन्यांशी लढण्याचे सोडून यरुशलेमेस परत आला.
१५. इस्राएलापुढे आपण पराजित झालो असे अरामी लोकांनी पाहिले तेव्हा ते एकत्र जमा झाले.
१६. हदरेजराने१ जासूद पाठवून महानदापलीकडील अराम्यांना आणवले; हदरेजराच्या सैन्याचा सेनापती शोबख ह्याच्या नायकत्वाखाली ते हेलाम येथे आले.
१७. हे ऐकून दाविदाने अवघ्या इस्राएलास एकत्र केले व यार्देनेपार जाऊन तो हेलामास पोहचला. तेथे अरामी दाविदाविरुद्ध व्यूह रचून त्याच्याशी लढले.
१८. तेव्हा अरामी इस्राएलापुढून पळून गेले आणि दाविदाने अराम्यांचे सातशे रथी व चाळीस हजार राऊत ठार केले आणि त्यांचा सेनापती शोबख ह्याला घायाळ केले; तो तेथेच गतप्राण झाला.
१९. इस्राएलापुढे आपण पराजित झालो हे पाहून हदरेजर राजाचे जितके अंकित होते तितक्यांनी इस्राएलांशी सल्ला केला व ते त्यांचे अंकित झाले; आणि अम्मोनी लोकांना इतःपर साहाय्य करण्याची अराम्यांना धास्ती वाटली.
१. मुख्य गवयासाठी; दाविदाचे संगीतस्तोत्र. हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते.
२. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते.
३. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे. तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील.
४. तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य; तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्रस्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.
५. हे आमच्या तारणार्‍या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस.
६. तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस.
७. तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवतोस;
८. म्हणून जे सीमान्त प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातांना भितात; दिवसाचा उदय व अस्त ह्यांच्या द्वारे तू गजर करवतोस.
२०. जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य.
२१. जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. मधुर वाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो.
१. ह्यानंतर येशू गालीलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला.
२. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती.
३. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला.
४. यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता.
५. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?”
६. हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत, हे त्याला ठाऊक होते.
७. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.”
८. त्याच्या शिष्यांपैकी एक जण, म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला,
९. “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?”
१०. येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले.
११. येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले.
१२. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.”
१३. मग जेवणार्‍यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.
१४. तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”
१५. मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला.
१६. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले,
१७. आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमास जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला, तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता.
१८. आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता.
१९. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले;
२०. परंतु तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.”
२१. म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली; तेवढ्यात त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा किनार्‍यास लागला.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide