बायबल एकाच वर्षात

१. योशीया राज्य करू लागला तेव्हा तो आठ वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकतीस वर्षे राज्य केले.
२. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गांनी त्याचा पूर्वज दावीद चालला त्यांनीच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही.
३. आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद ह्याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुशलेम ह्यांतून काढून टाकू लागला.
४. लोकांनी त्याच्यासमक्ष बआल मूर्तींच्या वेद्या मोडून टाकल्या; त्यांच्या वरच्या भागी असलेल्या सूर्यमूर्ती त्याने फोडूनतोडून टाकल्या; अशेरामूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती त्याने फोडून त्यांचे चूर्ण केले व ते चूर्ण जे त्यांना यज्ञ करीत असत त्यांच्या कबरांवर पसरले.
५. पुजार्‍यांच्या अस्थी त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या; ह्याप्रमाणे त्याने यहूदा व यरुशलेम ही शुद्ध केली.
६. त्याने मनश्शे, एफ्राईम, शिमोन व नफताली येथपर्यंतच्या शहरांत व त्यांच्या सभोवतालच्या ओस पडलेल्या जागी तसेच केले.
७. त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरामूर्ती व कोरीव मूर्ती कुटून त्यांचे चूर्ण केले आणि इस्राएल देशातल्या सर्व सूर्यमूर्ती त्याने तोडूनफोडून टाकल्या आणि मग तो यरुशलेमेस परत आला.
८. आपल्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाने देशाची व मंदिराची शुद्धी केल्यावर आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिराची दुरुस्ती करण्यास शाफान बिन असल्या, नगराचा कारभारी मासेया आणि योवाह बिन योवाहाज अखबारनवीस ह्यांना पाठवले.
९. ते मुख्य याजक हिल्कीया ह्याच्याकडे गेले आणि द्वारपाळ लेवी ह्यांनी मनश्शे, एफ्राईम, इस्राएलाचे अवशिष्ट लोक, सर्व यहूदा व बन्यामीन आणि यरुशलेमनिवासी ह्या सर्वांकडून जो पैसा लेव्यांनी जमा करून देवाच्या मंदिरात आणला होता तो त्यांनी त्याच्या स्वाधीन केला.
१०. त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्‍या कामगारांच्या हाती दिला, आणि त्या मंदिराची जी मोडतोड झाली होती ती दुरुस्त करण्याकडे तो त्या कामगारांनी लावला.
११. तासलेले चिरे, कैच्यांसाठी लाकूड आणि यहूदाच्या राजांनी मोडून टाकलेल्या घरांसाठी कडीपाट विकत घेण्यास त्यांनी तो पैसा सुतार व बांधकाम करणारे ह्यांना दिला.
१२. त्या माणसांनी ते काम सचोटीने केले; त्यांच्यावर देखरेख करण्यास नेमलेले मरारी वंशातील लेव्यांपैकी यहथ व ओबद्या, आणि कहाथी वंशातील जखर्‍या व मशुल्लाम हे होते; गायनवादनाचे मर्म जाणणारे लेवी हेही होते.
१३. बोजे वाहणार्‍यांवरही ते देखरेख करीत आणि हरप्रकारचे काम करणार्‍यांकडून ते काम करवून घेत; लेव्यांपैकी काही लेखक, कारभारी व द्वारपाळ होते.
१४. परमेश्वराच्या मंदिरात आणलेला पैसा बाहेर आणत असता मोशेच्या द्वारे दिलेला परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ हिल्कीया याजकाला सापडला.
१५. हिल्कीयाने शाफान चिटणीस ह्याला सांगितले की, “परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” मग हिल्कीयाने तो ग्रंथ शाफानास दिला.
१६. शाफान तो ग्रंथ घेऊन राजाकडे गेला आणि त्याला त्याने अशी खबर दिली की, “तुझ्या दासांना जे काही काम सोपवले होते ते ते करीत आहेत;
१७. आणि परमेश्वराच्या मंदिरात जो पैसा मिळाला तो थैल्यांत भरून देखरेख करणारे व कामगार ह्यांच्या हवाली केला आहे.”
१८. शाफान चिटणीसाने राजाला आणखी असे सांगितले की, “हिल्कीया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे.” शाफानाने तो राजाला वाचून दाखवला.
१९. त्या नियमशास्त्रातली वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली.
२०. मग राजाने हिल्कीया, अहीकाम बिन शाफान, अब्दोन१ बिन मीखा, शाफान चिटणीस व राजसेवक असाया ह्यांना आज्ञा केली की,
२१. “हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरासंबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे आणि इस्राएल व यहूदा ह्यांत जे शिल्लक राहिले आहेत त्यांच्यातर्फे परमेश्वराला प्रश्‍न करा. ह्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे ते करण्याच्या बाबतीत आमच्या वाडवडिलांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून परमेश्वराने क्रोधाची वृष्टी आमच्यावर केली आहे, ती फार मोठी आहे.”
२२. मग हिल्कीया व राजाने आज्ञा केलेले इतर लोक हे संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे गेले. ही शल्लूम बिन ताकहत२ बिन इस्रा नावाच्या जामदाराची स्त्री असून त्या वेळी यरुशलेमेत दुसर्‍या पेठेत राहत होती; तिच्याकडे जाऊन तिला त्यांनी हे कळवले.
२३. तेव्हा ती त्यांना म्हणाली, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ज्या पुरुषाने तुम्हांला माझ्याकडे पाठवले त्याला जाऊन सांगा:
२४. ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, यहूदाच्या राजासमोर जो ग्रंथ वाचला त्यात लिहिलेल्या सर्व शापांप्रमाणे मी ह्या स्थानावर व येथील रहिवाशांवर अनिष्ट आणीन.
२५. कारण त्या लोकांनी मला सोडून देऊन अन्य देवांपुढे धूप जाळला आहे आणि आपल्या हातांनी घडवलेल्या सर्व वस्तूंमुळे मला संतप्त केले आहे म्हणून ह्या स्थानावर माझ्या क्रोधाची वृष्टी झाली आहे; तो शांत व्हायचा नाही.
२६. तथापि ज्याने तुम्हांला परमेश्वराला प्रश्‍न करण्यास पाठवले त्या यहूदाच्या राजाला जाऊन सांगा: इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ही वचने ऐकून
२७. तुझे हृदय मृदू झाले, तू देवापुढे नम्र झालास आणि ह्या स्थानाविरुद्ध व येथल्या रहिवाशांविरुद्ध मी सांगितले ते ऐकून तू दीन होऊन आपली वस्त्रे फाडून माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.
२८. पाहा, मी तुला तुझ्या पितरांशी मिळवीन; तुला तुझ्या कबरेत शांतीने पोचवतील; जो गहजब मी ह्या स्थळावर व येथल्या रहिवाशांवर आणणार आहे तो तू आपल्या डोळ्यांनी पाहणार नाहीस.” त्यांनी परत येऊन राजाला हे कळवले.
२९. मग राजाने यहूदातील व यरुशलेमेतील सर्व वडील जनांना बोलावणे पाठवून जमा केले.
३०. यहूदा येथील सर्व लोक, यरुशलेमेतले सर्व रहिवासी, याजक, लेवी अशा सर्व आबालवृद्धांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली.
३१. मग राजाने आपल्या स्थानी उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, ‘मी परमेश्वराचे अनुसरण करीन, त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन व त्या ग्रंथातील कराराच्या वचनांप्रमाणे वर्तेन.’
३२. मग यरुशलेमेत व बन्यामिनात जे सर्व लोक आढळले त्यांना त्याने आपल्या करारात सामील केले. यरुशलेमकर आपल्या वडिलांच्या देवाच्या कराराप्रमाणे वागू लागले.
३३. इस्राएल लोक ज्या सर्व प्रदेशांत होते तेथून योशीयाने सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि जितके इस्राएल त्यांना मिळाले तितक्या सर्वांना त्याने त्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला लावले, त्याच्या सर्व कारकिर्दीत त्यांनी आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याला अनुसरायचे सोडले नाही.
१. योशीयाने परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळला; पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणाचा यज्ञपशू मारला.
२. त्याने याजकांच्या सेवेचा क्रम लावून दिला आणि परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले.
३. जे लेवी सर्व इस्राएल लोकांना शिकवत असत व परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र झाले होते त्यांना त्याने सांगितले की, “इस्राएलाचा राजा दावीद ह्याचा पुत्र शलमोन ह्याने बांधलेल्या मंदिरात पवित्र कोश ठेवा; ह्यापुढे तुम्हांला आपल्या खांद्यांवर बोजा वागवण्याची जरूरी नाही; तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर व त्याची प्रजा इस्राएल ह्यांची सेवा करा.
४. इस्राएलाचा राजा दावीद व त्याचा पुत्र शलमोन ह्या दोघांनी लिहून ठेवलेल्या विधींना अनुसरून आपल्या पितृकुळांप्रमाणे आपापल्या क्रमानुसार सेवा करण्यास सिद्ध व्हा.
५. जे तुमचे भाऊबंद आहेत त्यांच्या पितृकुळांच्या विभागांप्रमाणे पवित्रस्थानी तुम्ही उभे राहा, म्हणजे त्यांच्या एकेका भागाप्रीत्यर्थ लेव्यांच्या पितृकुळातील एकेका भागाने सेवा करावी.
६. वल्हांडणाचा यज्ञपशू मारा, आपणांस पवित्र करा आणि मोशेच्या द्वारे सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनानुसार वागण्यास आपल्या बांधवांना सिद्ध करा.”
७. जे लोक तेथे हजर होते त्या सर्वांना योशीयाने वल्हांडणाच्या यज्ञासाठी राजाच्या मालमत्तेतून तीस हजार शेरडेमेढरे व तीन हजार बैल दिले.
८. सरदारांनी लोकांना, याजकांना व लेव्यांना स्वेच्छार्पणे दिली. देवाच्या मंदिराचे कारभारी हिल्कीया, जखर्‍या व यहीएल ह्यांनी वल्हांडणाच्या यज्ञांसाठी याजकांना दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे व तीनशे बैल दिले.
९. कोनन्या व त्याचे बंधू शमाया व नथनेल, हशब्या, यइएल व योजाबाद ह्या लेव्यांच्या प्रमुखांनी लेव्यांना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाच्या यज्ञांसाठी दिले.
१०. ह्या प्रकारे उपासनेची सिद्धता होऊन राजाज्ञेप्रमाणे याजक आपापल्या स्थानी आणि लेवी आपापल्या क्रमानुसार उभे राहिले.
११. मग वल्हांडणाचे यज्ञपशू वधले; बली देणार्‍याच्या हातून रक्त घेऊन याजक ते शिंपडत होते आणि लेवी त्या पशूंची कातडी काढत होते.
१२. मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे परमेश्वराला अर्पण करण्यास लोकांच्या पितृकुळांच्या विभागाप्रमाणे देता यावी म्हणून ही होमार्पणे त्यांनी निराळी ठेवली. बैलांचेही त्यांनी तसेच केले.
१३. त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचे मांस विधीप्रमाणे भाजले आणि पवित्र अर्पणे त्यांनी पातेल्यांत, हंड्यांत व कढयांत शिजवून लोकांना लागलीच पोचती केली.
१४. नंतर त्यांनी स्वत:साठी व याजकांसाठी तयारी केली, कारण अहरोनाचे वंशज जे याजक ते रात्र पडेपर्यंत होमबली व चरबी अर्पण करण्यात गुंतले होते; म्हणून लेव्यांनी स्वत:साठी व अहरोनवंशज ह्यांच्यासाठी तयारी केली.
१५. दावीद, आसाफ, हेमान आणि राजाचा द्रष्टा यदूथून ह्यांच्या आज्ञेप्रमाणे आसाफ वंशातले गायक आपापल्या ठिकाणी होते, आणि द्वारपाळ प्रत्येक द्वाराजवळ होते; त्यांना आपले काम सोडून जावे लागले नाही, कारण त्यांचे भाऊबंद जे लेवी त्यांनी त्यांच्यासाठी तयारी केली.
१६. ह्या प्रकारे त्याच दिवशी योशीया राजाच्या आज्ञेप्रमाणे परमेश्वराच्या सर्व उपासनेची तयारी झाली आणि वल्हांडण सण पाळण्याची व परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्याची सिद्धता झाली.
१७. त्या प्रसंगी जे इस्राएल लोक हजर होते त्यांनी वल्हांडण सण पाळला आणि सात दिवस बेखमीर भाकरीचा सण पाळला.
१८. शमुवेल संदेष्ट्याच्या काळापासून ह्या सणाप्रमाणे वल्हांडण सण इस्राएलात केव्हाही पाळण्यात आला नव्हता; योशीया, याजक, लेवी, हजर असलेले सर्व यहूदी व इस्राएल लोक व यरुशलेमनिवासी ह्यांच्याप्रमाणे पूर्वी कोणत्याही इस्राएलाच्या राजाने अशा प्रकारे वल्हांडण सण पाळला नव्हता.
१९. योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडण सण पाळण्यात आला.
२०. त्यानंतर योशीयाने मंदिराची सिद्धता केल्यावर मिसरचा राजा नखो हा फरात नदीजवळील कर्कमीश नगरावर स्वारी करण्यास निघाला; तेव्हा योशीया त्याच्याशी सामना करण्यास गेला.
२१. पण त्याने त्याच्याकडे आपले वकील पाठवून सांगितले की, “यहूदाच्या राजा, मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? आज मी तुझ्यावर नव्हे तर ज्या घराण्याशी माझे वैर आहे त्यावर स्वारी करण्यास निघालो आहे; देवाने मला त्वरा करण्यास सांगितले आहे, तर माझ्याबरोबर देव आहे, त्याच्याशी विरोध करू नकोस; त्याने तुझा नाश करावा असे न होवो.”
२२. तथापि योशीया त्याच्याकडून आपला मोर्चा न फिरवता त्याच्याशी लढण्यास वेशांतर करून गेला; देवाचे वचन नखोच्या द्वारे प्राप्त झाले होते ते न जुमानता तो मगिद्दोच्या खोर्‍यात युद्ध करण्यास आला.
२३. तिरंदाजांनी योशीया राजाला बाण मारले तेव्हा तो आपल्या सेवकांना म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, मला येथून घेऊन चला.”
२४. तेव्हा त्याच्या सेवकांनी त्याला रथावरून उतरवून त्याच्या दुसर्‍या रथावर बसवले व यरुशलेमेस नेले; तेथे तो मृत्यू पावला व त्यांनी त्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरस्तानात मूठमाती दिली; तेव्हा सर्व यहूदा व यरुशलेम ह्यांनी योशीयासाठी शोक केला.
२५. यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.
२६. योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याने केलेली सत्कृत्ये,
२७. म्हणजे अथपासून इतिपर्यंत त्याची सर्व कृत्ये इस्राएल व यहूदा ह्यांच्या राजांच्या बखरींत लिहिली आहेत.
१. मग देशातल्या लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला त्याच्या जागी यरुशलेमेत राजा केले.
२. यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले.
३. मिसराच्या राजाने यरुशलेमेत येऊन त्याला पदच्युत केले व देशावर त्याने शंभर किक्कार रुपे व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.
४. मिसरच्या राजाने त्याचा भाऊ एल्याकीम ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले व त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले. त्याचा भाऊ यहोआहाज ह्याला नखो मिसर देशास घेऊन गेला.
५. यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता व त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
६. त्याच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने स्वारी केली व त्याला बाबेलास घेऊन जाण्यासाठी त्याने त्याच्या पायांत बेड्या ठोकल्या.
७. नबुखद्नेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे बाबेलास नेऊन तेथील आपल्या मंदिरात ठेवली.
८. यहोयाकीमाची बाकीची कृत्ये, त्याने केलेली अमंगळ कृत्ये, त्याच्या ठायी आढळून आलेले दुष्कर्म ही सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्या राजांच्या बखरीत लिहिली आहेत; त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन१ हा राजा झाला.
९. यहोयाखीन आठ२ वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत तीन महिने व दहा दिवस राज्य केले; परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
१०. वर्षारंभी नबुखद्नेस्सराने सैन्य पाठवून तो व त्याच्याबरोबर परमेश्वराच्या मंदिरातली मोलवान पात्रे ही बाबेलास आणली आणि त्याचा भाऊ सिद्कीया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले.
११. सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले.
१२. त्याने आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते केले; यिर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्याला आदेश देत असताही तो त्याच्यासमोर नम्र झाला नाही.
१३. नबुखद्नेस्सर राजाने त्याला देवाची शपथ वाहायला लावली होती; त्याच्याविरुद्धही त्याने बंड केले; त्याने आपली मान ताठ केली, आणि इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे तो वळला नाही, त्याने आपले मन कठीण केले.
१४. त्याप्रमाणे सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्रांच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करून घोर पातक केले, आणि जे मंदिर परमेश्वराने यरुशलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले.
१५. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यांना आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती;
१६. पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.
१७. त्याने त्यांच्यावर खास्द्यांच्या राजाची स्वारी आणली; त्याने त्यांच्या तरुण पुरुषांना त्यांच्याच पवित्रस्थानाच्या घरात तलवारीने वधले; त्याने तरुणांवर व कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही; परमेश्वराने सर्वांना त्याच्या हाती दिले.
१८. देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला.
१९. खास्दी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला, तेथील वाडे आग लावून जाळले व त्यांतल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला.
२०. जे तलवारीच्या तडाख्यातून वाचले त्या सर्वांना तो राजा बाबेलास घेऊन गेला; पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले;
२१. परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुरे होऊन देशास शांततेचा३ काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले; देश ओस पडला होता तोवर म्हणजे सत्तर वर्षे पुरी होईपर्यंत त्यात शांतता नांदत होती.
२२. यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश ह्याच्या मनास त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फर्मान पाठवले की,
२३. “पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर ह्याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत व मला आज्ञा केली आहे की यहूदातील यरुशलेमेत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध. तर तुमच्यापैकी त्याच्या सर्व लोकांतील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो. त्याने तेथे जावे.”
१. दाविदाची प्रार्थना. हे परमेश्वरा, कान लाव, मला उत्तर दे; मी दीन व दरिद्री आहे.
२. माझ्या जिवाचे रक्षण कर, कारण मी तुझा भक्त आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणार्‍या सेवकाचे तारण कर.
३. हे प्रभू, माझ्यावर कृपा कर; कारण मी दिवसभर तुझा धावा करतो.
४. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर; मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो.
५. हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.
१३. गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही.
१४. एकान्ती दिलेली देणगी राग शमवते, पदरात झाकलेली लाच तीव्र कोप शमवते.
१३. तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”
१४. तो ऐकत नाही हे पाहून “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो,” असे म्हणून आम्ही स्वस्थ राहिलो.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide