१. मोशे आणि इस्राएलमधील वडीलधारे, लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, “आज मी देणार असलेल्या सर्व आज्ञा पाळा.
२. तुमचा देव परमेश्वर देणार असलेल्या प्रदेशात तुम्ही लौकरच यार्देन नदी ओलांडून जाणार आहात. त्यादिवशी मोठ्या शिला उभारा. त्यांना गिलावा करा.
३. त्यावर या आज्ञा आणि शिकवण लिहून काढा. यार्देन नदी उतरुन जाल त्या दिवशी हे करा. नंतरच परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, तो देणार असलेल्या त्या धनधान्यसंपन्न भूमीत पाऊल टाका. परमेश्वर, तुमच्या पूर्वजांचा देव ह्याने हा प्रदेश तुम्हाला देण्यासाठी वचन दिले आहे.
४. “यार्देन नदी ओलांडून गेल्यावर माझ्या आजच्या आज्ञा पाळा. एबाल पर्वतावर या गिलावा केलेल्या शिला उभारा.
५. तसेच तुमचा देव परमेश्वर ह्यासाठी दगडी वेदी तयार करा. दगड फोडण्यासाठी लोखंडी हत्यार वापरु नका.
६. वेदी अखंड, न घडलेल्या दगडाची असावी. आणि त्यावर होमबली अर्पण करा.
७. तेथे शांत्यार्पणांचे यज्ञ करुन भोजन करा. सर्वजण आनंदाने एकत्र जमून हे करा.
८. मग शिलांवर ही वचन सुवाच्य अक्षरात लिहा.”
९. मोशे आणि याजक इस्राएल लोकांशी बोलले. मोशे म्हणाला, “हे इस्राएला, शांत रहा! आणि ऐक! आज तू तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रजेतील झालास.
१०. तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे वागा. मी आज देतो त्या त्याच्या आज्ञा आणि नियम पाळा.
११. त्याच दिवशी मोशेने लोकांना हे ही सांगितले,
१२. ते यार्देन नदी पार करुन जातील तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन यांनी आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे.
१३. तसेच रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान व नफताली यांनी शाप वाचून दाखवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.
१४. “लेवींनी सर्वांना मोठड्याने असे सांगावे,
१५. “मूर्ती घडवून तिची गुप्तपणे स्थापना करणारा शापित असो. या मूर्ती म्हणजे कोणा कारागिराने लाकूड, दगड किंवा धातू यांच्यापासून घडवलेल्या असतात. परमेश्वराला अशा गोष्टींचा तिटकारा आहे! “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
१६. “नंतर लेवींनी लोकांना सांगावे ‘आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
१७. “परत लेवींनी म्हणावे, ‘शेजाऱ्याच्या शेताची हद्द दाखवणारी खूण जो सरकवतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
१८. “लेवींनी म्हणावे, ‘आंधळ्याला फसवून त्याचा रस्ता चुकवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
१९. “लेवींनी म्हणावे ‘परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
२०. “लेवींनी म्हणावे ‘वडीलांच्या बायकोशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
२१. “लेवींनी म्हणावे ‘पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
२२. “लेवींनी म्हणावे, ‘सख्क्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
२३. “लेवींनी म्हणावे, ‘सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’
२४. “लेवींनी म्हणावे, ‘दुसऱ्याचा खून करणारा तो जरी पकडला गेला नाही तरी शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’
२५. “लेवींनी म्हणावे, ‘निरपराध व्यक्तीला ठार मारण्यासाठी जो पैसे घेतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’
२६. “लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’
१. “आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल.
२. तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकलेत तर तुम्हांला हे आशीर्वाद मिळतील:
३. “तुम्हाला तुमच्या नगरात आणि शेतात परमेश्वराचे आशीर्वाद मिळतील.
४. परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर मुलेबाळे होतील. त्याच्या आशीर्वादाने तुमची भूमी सफल होईल. तुमच्या पाळीव प्राण्यांना परमेश्वराच्या आशीर्वादाने भरपूर पिल्ले होतील व ह्या वासरा-करडांवर परमेश्वराचे आशीर्वाद राहतील.
६. तुम्ही आत याल आणि बाहेर जाल तेव्हा तुम्हाला सदासर्वकाळ परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल.
७. “तुमच्यावर चाल करुन येणाऱ्या शत्रूला पराभूत करण्यास तुम्हाला परमेश्वराचे साहाय्य होईल. एका वाटेने आलेला शत्रू सात वाटांनी सैरावैरा पळत सुटेल.
८. “परमेश्वराच्या कृपेने तुमची कोठारे भरलेली राहतील. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात तुमची भरभराट होईल.
९. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवलेत आणि त्याच्या आज्ञा पाळल्यात तर आपल्या वचनाला जागून तो तुम्हाला आपली पवित्र प्रजा करुन घेईल.
१०. परमेश्वराच्या नावाने तुम्ही ओळखले जाता हे पाहिल्यावर इतर राष्ट्रातील लोकांना तुमचा धाक वाटेल.
११. “परमेश्वराने द्यायचे कबूल केलेल्या या देशात तुम्हाला भरपूर संतती होईल. गाईचे खिल्लार वाढेल. पीक चांगले येईल.
१२. आपले आशीर्वादाचे भांडार तो तुमच्यासाठी खुले करील. योग्यवेळी तुमच्या भूमीवर पाऊस पडेल. तुमच्या सर्व कामात त्याचे आशीर्वाद मिळतील. तुम्ही इतर राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्हाला कर्ज काढावे लागणार नाही.
१३. आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा.
१४. या शिकवणीपासून परावृत होऊ नका. डावी उजवी कडे वळू नका. इतर दैवतांची उपासना करु नका.
१५. “पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील.
१६. “नगरात आणि शेतात तुम्ही शापित व्हाल.
१७. तुमच्या धान्याच्या टोपल्या आणि पिठाच्या पराती शापित होतील आणि त्या रिकाम्या राहतील.
१८. परमेश्वराच्या शापाने तुम्हाला फार संतती होणार नाही, जमिनीत पीक चांगले येणार नाही, गुराढोरांचे खिल्लार फार वाढणार नाही. वासरे - करडे शापित होतील.
१९. बाहेर जाताना आणि आत येताना परमेश्वर तुम्हाला शाप देईल.
२०. “तुम्ही दुष्कृत्ये करुन परमेश्वरापासून परावृत झालात तर तुमच्यावर संकटे कोसळतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात अडचणी येतील व तुम्ही हताश व्हाल. तुमचा विनाविलंब समूळ नाश होईपर्यंत हे चालेल. परमेश्वराच्या मार्गापासून विचलित होऊन तुम्ही भलतीकडे गेल्यामुळे असे होईल.
२१. जो प्रदेश काबीज करायला तुम्ही जात आहात तेथून तुम्ही पूर्णपणे नष्ट होईपर्यंत परमेश्वर तुम्हाला भयंकर रोगराईने ग्रस्त करील.
२२. परमेश्वर तुम्हाला रोग, ताप, सूज यांनी शिक्षा करील. उष्णता भयंकर वाढेल आणि अवर्षण पडेल. पिके होरपळून आणि कीड पडून करपून जातील. तुमचा नाश होईपर्यंत ही संकटे तुमच्या पाठीस लागतील.
२३. आकाशात ढग दिसणार नाही. आकाश लखलखीत पितळेसारखे तप्त आणि पायाखालची जमीन लोखंडासारखी घट्ट होईल.
२४. परमेश्वर पाऊस पाडणार नाही. आकाशातून फक्त धूळ आणि वाळू यांचा वर्षाव होईल. तुमचा नाश होईपर्यंत हे चालेल.
२५. “शत्रू तुम्हांला पराभूत करतील. शत्रूवर तुम्ही एका दिशेने चढाई कराल आणि सात दिशांनी पळ काढाल. तुमच्यावरील संकटे पाहून पृथ्वीवरील इतर लोक भयभीत होतील.
२६. तुमच्या प्रेतांवर जंगली श्र्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.
२७. “परमेश्वराने पूर्वी मिसरच्या लोकांना गळवांनी पीडित केले तसेच तो यावेळी तुम्हाला करील. गळवे, वाहणारी खरुज, सतत कंड सुटणारा नायटा अशा गोष्टींनी तो तुम्हांला शासन करील.
२८. वेड, अंधत्व, भांबावलेपण यांनी तुम्ही ग्रस्त व्हाल.
२९. भर दिवसा आंधळ्यासारखे चाचपडत चालाल. प्रत्येक कामात अपयशाचे धनी व्हाल. लोक तुम्हाला एकसारखे नागवतील, दुखावतील. आणि तुम्हाला कोणी त्राता राहणार नाही.
३०. “तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यात राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही.
३१. लोक तुमच्यादेखत तुमच्या गायी कापतील पण त्याचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्या मेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हाला कोणी सोडवणारा नाही.
३२. “तुमच्या मुला-मुलींचे इतर लोक अपहरण करतील. दिवसामागून दिवस तुम्ही त्यांचा शोध घ्याल. वाट पाहता पाहता तुमचे डोळे शिणतील. पण ती सापडणार नाहीत. आणि देव तुमच्या मदतीला येणार नाही.
३३. “तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील.
३४. जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल.
३५. तुमच्या गुडघ्यांवर, पायांवर, पावलांपासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर ठसठसणारी बरी न होणारी गळवे उठतील. अशा रीतीने परमेश्वर तुम्हाला शासन करील.
३६. “तुम्ही तुमच्या पूर्वजांनी कधी न पाहिलेल्या अशा देशात तुमची व तुमच्या राजाची रवानगी परमेश्वर करील. तुम्ही तेथे काष्ठ पाषाणाच्या अन्य देवतांची पूजाअर्चा कराल.
३७. तुमच्यावर येणारी संकटे पाहून तेथील लोक विस्मयचकित होतील. त्यांच्या चेष्टेचा आणि निंदेचा तुम्ही विषय व्हाल.
३८. “तुमच्या शेतात भरपूर पीक येईल पण त्यातले तुमच्या पदरात थोडेच पडेल. कारण बरेचसे टोळधाड फस्त करील.
३९. तुम्ही द्राक्षमळा लावून त्यात खूप मेहनत कराल. पण द्राक्षं किंवा द्राक्षारस तुम्हाला मिळणार नाही. कारण कीड ते खाऊन टाकील.
४०. तुमच्या जमिनीत जैतून वृक्ष जिकडे तिकडे येतील पण त्यांचे तेल मात्र तुम्हाला मिळणार नाही. कारण फळ जमिनीवर गळून, तेथेच सडून जातील.
४१. तुम्हाला मुलं-बाळं होतील पण ती तुम्हाला लाभणार नाहीत. त्यांचे अपहरण होईल.
४२. टोळधाडीने तुमच्या झाडांचे, शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होईल.
४३. तुमच्या गावात राहाणाऱ्या परकीयांची उन्नती होईल आणि तुमची अधोगती होईल.
४४. ते तुम्हाला कर्ज देतील, तुमच्याजवळ त्यांना उसने द्यायला काही असणार नाही. सर्व शरीरावर मस्तकाचे नियंत्रण असते त्याप्रमाणे ते तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. तुम्ही जणू तूच्छ बनून राहाल.
४५. “तुमचा देव परमेश्वर ह्याने जे सांगितले ते तुम्ही ऐकले नाही, त्याच्या आज्ञा आणि नियम यांचे पालन केले नाही तर हे सर्वशाप तुमचा नायनाट होईपर्यंत तुमचा पिच्छा पुरवतील.
४६. तुम्हाला व तुमच्या वंशजांना हे परमेश्वराचे शाप कायमचे भोवतील. ते पाहून इतर लोक आश्चर्यचकित होतील.
४७. “सर्व तऱ्हेची समृद्धी असताना तुम्ही आनंदाने व उत्साहित मनाने तुमचा देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही म्हणून
४८. परमेश्वराने पाठविलेल्या शत्रूसमोर तुम्हाला नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही तहान भूकेने गांजलेले दीन, सर्व तऱ्हेने वंचित असे व्हाल. परमेश्वर तुमच्या मानेवर जोखंड ठेवील. ते तुम्हाला बाजूला करता येणार नाही. तुमच्या अंतापर्यंत ते तुम्हांला वागवावे लागेल.
४९. “दूरच्या राष्ट्रातील शत्रूला परमेश्वर तुमच्यावर पाठवील. त्यांची भाषा तुम्हाला समजणार नाही. गरुडांसारखे ते झेपावत येतील.
५०. ते क्रूर असतील. वृद्धांचा ते मान राखणार नाहीत. लहानांना दया दाखवणार नाहीत.
५१. तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही.
५२. “ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी आपले रक्षण करील असे तुम्हाला वाटेल. पण ती तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या प्रदेशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.
५३. “तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.
५४. “तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत.
५५. खायला काहीच शिल्लक उरणार नाही तेव्हा तो आपल्या मुलांचाच घास करेल. आणि त्या मांसात तो कोणालाही-अगदी आपल्या घरातल्यांनाही-वाटेकरी होऊ देणार नाही. शत्रूच्या वेढ्यामुळे आणि छळामुळे असे विपरीत घडेल.
५६. “तुमच्यामधील अतिशय कोमल ह्दयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.
५७. पण लपूनछपून मुलाला जन्म देऊन ते नवजात बालक व प्रसूतिसमयी बाहेर पडणारे सर्व काही ती भुकेने व्याकुळ झाल्यामुळे खाऊन टाकील. जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या शहरांना वेढा घालील आणि यातना सहन करायला लावील, त्यावेळी वरील सर्व वाईट गोष्टी घडून येतील.
५८. “या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि विस्मयकारी तुमचा देव परमेश्वर ह्याचा आदर करा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर
५९. तुमच्यावर व तुमच्या वंशजांवर संकटे कोसळतील, भयंकर रोगराई पसरेल.
६०. अशा रोगराईला आणि उपद्रावांना तुम्ही मिसरमध्ये तोंड दिलेले आहे. त्यांची तुम्हाला धास्ती वाटत असे. त्या सगळ्यातून तुम्हाला पुन्हा जावे लागेल.
६१. या ग्रंथात नसलेले उपद्रव आणि रोगसुद्धा परमेश्वर तुमच्या मागे लावील. तुमचा समूळ नाश होईपर्यंत तो हे करील.
६२. आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक राहाल.
६३. “तुमची भरभराट करायला आणि तुमची संरव्या वाढवायला जसा त्याला आनंद वाटत होता तसाच आनंद त्याला तुमचा नाश करायला आणि तुम्हांला रसानळाला न्यायला वाटेल. तुम्ही जो देश काबीज करायला जात आहात तेथून तुम्हाला हुसकावून लावले जाईल.
६४. परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.
६५. “या इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला शांती लाभणार नाही. परमेश्वर तुमचे मन काळजीने पोखरुन टाकील. तुमचे डोळे शीणतील तुम्ही बेचैन व्हाल.
६६. तुम्ही नेहमी संकटग्रस्त आणि धास्तावलेले राहाल. तुम्हाला जिवाची खात्री वाटणार नाही. रात्रंदिवस तुम्ही झुरणीला लागाल.
६७. सकाळी तुम्ही म्हणाल, ‘ही रात्र असती तर बरे! आणि रात्री म्हणाल, ‘ही सकाळ असती तर किती बरे!’ तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल.
६८. परमेश्वर तुम्हाला जहाजातून पुन्हा मिसरला पाठवील. जेथे तुम्हाला पुन्हा कधी परतून जावे लागणार नाही असे मी म्हणालो होतो तेथे परमेश्वर तुमची रवानगी करील. मिसरमध्ये तुम्ही शत्रूंचे दास म्हणून स्वत:ची विक्री करु बघाल पण कोणीही तुम्हाला विकत घेणार नाही.
१२. परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ. या आयुष्यात तुझ्याबोरबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
१३. परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस. मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे. मी थोड्याच वेळात जाणार आहे.
७. काही लोक श्रीमंतीचा आव आणतात पण त्यांच्या जवळ मात्र काहीच नसते. दुसरे लोक आपण गरीब आहोत असे भासवतात पण ते खरोखरच श्रीमंत असतात.
८. श्रीमंत माणसाला जीव वाचवण्यासाठी पैसे मोजावे लागतात पण गरीबांना अशा धमक्या कधीच मिळत नाहीत.
२७. “माझे ऐकणाऱ्यांना मी सांगतो. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. जे तुमचा द्धेष करतात, त्यांचे चांगले करा.
२८. जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हांला वाईट वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
२९. जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसरा पण गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्याला तुमचा सदराही घेऊ द्या.
३०. जे तुम्हांला मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमचे घेतो ते परत मागू नका.
३१. लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हांला वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
३२. तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले, तर तुम्ही काय विशेष केले? पापी लोकसुद्धा, जे त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात.
३३. तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात.
३४. ज्यांच्याकडून तुम्हांला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
३५. पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा. व कोणतीही अपेक्षा न ठेवता उसने द्या, मग तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतन्घ व दुष्ट लोकांवर दया करतो.
३६. जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा.
३७. ʇदुसऱ्यांचा न्याय करु नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला दोषी ठरविले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.
३८. दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हांलाही दिले जाईल. तुमच्या पदरात हलवून, दाबून, ओसंडून वाहणारे उत्तम माप ओतले जाईल. जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता त्याच मापाने तुम्हांला दिले जाईल.”
३९. त्याने त्यांना एक गोष्ट सांगितली: “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खडुचात पडणार नाहीत काय?
४०. कोणताही शिष्य त्याच्या गुरुच्या पातळीला जाऊ शकत नाही. पण प्रत्येक मनुष्य जेव्हा तो पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच असतो.
४१. ʇतू आपल्या भावाच्या डोळ्यतील कुसळ का पाहतोस? स्वत:च्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही काय?
४२. तू तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस, “बंधु, तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे.’ तुझ्या स्वत:च्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही? ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.
४३. “कोणतेही चांगले झाड असे नाही की जे वाईट फळ देते, किंवा कोणतेही वाईट झाड असे नाही की जे चांगले फळ देते.
४४. कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजिरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत.
४५. चांगला मनुष्य त्याच्या अंत:करणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंत:करणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो. कारण मनुष्याच्या अंत:करणात जे असते तेच तो मुखाद्वारे बोलतो.
४६. “तुम्ही मला प्रभु, प्रभु, का म्हणता, आणि मी जे सांगतो ते तुम्ही का करीत नाही?
४७. प्रत्येक जण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकतो व त्या आज्ञा पाळतो-तो कसा आहे हे मी तुम्हांला दाखवितो:
४८. तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला, तेव्हा नदीचे पाणी घरावर आदळले. पण पाण्याने ते हलले नाही. कारण ते चांगले बांधले होते.
४९. पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, तो, ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, नदीच्या पुराचे पाणी घरावर आदळते व ते घर लगेच कोसळते आणि घर पूर्णपणे नष्ट होते.”
Marathi Bible 2006
Marathi Bible: Easy-to-Read Version 2006 World Bible Translation Center