बायबल एकाच वर्षात

१. परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,
२. “इस्राएल लोकांना सांगा की, पृथ्वीवरील सर्व पशूंपैकी ज्यांचे मांस तुम्ही खावे ते हे:
३. पशूंपैकी ज्यांचे खूर विभागलेले किंवा दुभंगलेले आहेत, व जे रवंथ करतात ते सर्व तुम्ही खावेत;
४. पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर विभागलेले आहेत ते पशू खाऊ नयेत; उंट हा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
५. शाफान१ रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
६. ससा रवंथ करतो पण त्याचा खूर विभागलेला नाही, म्हणून तोही तुम्ही अशुद्ध समजावा.
७. डुकराचा खूर विभागलेला आणि दुभंगलेला आहे पण तो रवंथ करत नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा.
८. त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांच्या शवांना शिवू नये; तुम्ही ते अशुद्ध समजावे.
९. जलचरांपैकी तुम्ही खावेत ते हे: जलाशयांत, समुद्रांत व नद्यांत संचार करणार्‍या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावेत.
१०. जलचरांपैकी ज्या प्राण्यांना पंख अथवा खवले नाहीत असे समुद्रांत व नद्यांत संचार करणारे सर्व जलचर तुम्ही ओंगळ समजावेत;
११. तुम्ही त्यांना ओंगळ समजावे; त्यांचे मांस खाऊ नये, व त्यांची शवे ओंगळ समजावीत.
१२. जलाशयांतल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते सर्व ओंगळ समजावेत.
१३. पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे, कारण ते ओंगळ आहेत: गरुड, लोळणारा गीध, कुरर,
१४. घार, निरनिराळ्या जातींचे ससाणे,
१५. निरनिराळ्या जातींचे कावळे,
१६. शहामृग, गवळण,२ कोकीळ, निरनिराळ्या जातींचे बहिरी ससाणे,
१७. पिंगळा, करढोक, मोठे घुबड,
१८. पांढरे घुबड, पाणकोळी, गिधाड,
१९. करकोचा, निरनिराळ्या जातींचे बगळे,३ टिटवी आणि वाघूळ.
२०. जितके सपक्ष प्राणी चार पायांवर चालतात तितके तुम्ही ओंगळ समजावेत.
२१. पण चार पायांवर चालणार्‍या सपक्ष प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायांसह तंगड्या असतात ते खावेत.
२२. त्यांच्यापैकी तुम्ही खावेत ते हे: निरनिराळ्या जातीचे टोळ, निरनिराळ्या जातींचे नाकतोडे, निरनिराळ्या जातींचे खरपुडे, व निरनिराळ्या जातींचे गवत्ये टोळ.
२३. तथापि चार पायांचे इतर सपक्ष प्राणी तुम्ही ओंगळ समजावेत.
२४. त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवांना शिवेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा.
२५. त्यांच्या शवांचा एखादा भाग जो कोणी उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
२६. ज्या पशूचे खूर विभागलेले असून दुभंगलेले नाहीत व जो रवंथ करीत नाही तो तुम्ही अशुद्ध समजावा. जो कोणी त्याला शिवेल तो अशुद्ध समजावा.
२७. चार पायांवर चालणार्‍या सर्व पशूंपैकी जे आपल्या पंजांवर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावेत, त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
२८. जो त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावेत.
२९. जमिनीवर रांगणार्‍या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावेत ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातींचे सरडे,
३०. चोपय (सापसुरळी), घोरपड, पाल, सांडा व गुहिर्‍या सरड.
३१. जमिनीवर रांगणार्‍या सर्व प्राण्यांपैकी हे तुम्ही अशुद्ध समजावेत. त्यांच्या शवांना जो कोणी शिवेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
३२. त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर तीही अशुद्ध समजावी; मग ते लाकडी पात्र, वस्त्र, कातडे, तरट, किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते शुद्ध होईल.
३३. त्यांच्यापैकी एखादा मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे.
३४. त्या पात्रातील एखादा खाद्यपदार्थ पाण्याने भिजला असल्यास तो अशुद्ध समजावा; आणि असल्या पात्रात काही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे;
३५. आणि त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून पाडून टाकावी; त्यामुळे ती अशुद्ध होते, म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी.
३६. तथापि झरा किंवा विहीर जिच्यात पाण्याचा संचय असतो ती शुद्धच राहते; तरी तिच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध समजावा.
३७. त्यांच्या शवांचा काही भाग पेरण्याच्या बियाणांवर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे.
३८. तथापि ते बियाणे पाण्याने भिजल्यानंतर त्या प्राण्यांच्या शवांचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे.
३९. खाण्याजोग्या पशूंपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी शिवला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
४०. कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.
४१. जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ओंगळ आहेत; ते खाऊ नयेत.
४२. जमिनीवर रांगणार्‍यांपैकी जे सर्व सरपटतात अथवा चार पायांवर चालतात व ज्यांना पुष्कळ पाय आहेत ते तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत.
४३. तुम्ही कोणत्याही जातीच्या रांगणार्‍या प्राण्यांमुळे स्वतःला अशुद्ध करून विटाळू नका.
४४. मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्‍या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका.
४५. कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”
४६. पशू, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांच्यातील
४७. अशुद्ध व शुद्ध, भक्ष्य प्राणी व अभक्ष्य प्राणी हा भेद ओळखण्याचा हा नियम होय.”
१. परमेश्वर मोशेला म्हणाला,
२. “इस्राएल लोकांना सांग: स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाल्यास तिने सात दिवस अशुद्ध राहावे; ऋतुकाली जशी ती दूर बसते तशीच ती अशुद्ध समजावी.
३. आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी.
४. नंतर त्या स्त्रीने आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहेतीस दिवस दूर बसावे. तिची शुद्धी होण्याची मुदत पुरी होईपर्यंत तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये व पवित्रस्थानात जाऊ नये.
५. तिला मुलगी झाल्यास ऋतुकाली जशी ती दूर बसते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध राहावे, आणि आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस दूर बसावे.
६. तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची मुदत पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचा मेंढा आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला दर्शनमंडपाच्या दारी याजकाकडे घेऊन जावा.
७. मग याजकाने ते परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे ती आपल्या रक्तस्रावापासून शुद्ध होईल. मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्रीविषयीचा नियम हा.
८. तिला मेंढा अर्पण करण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले, एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी आणावे, आणि याजकाने तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे म्हणजे ती शुद्ध होईल.”
८. परमेश्वर उत्तम व सरळ आहे, म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो.
९. तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो.
१०. परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणार्‍यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व सत्यपूर्ण आहेत.
११. हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर; कारण ती फार झाली आहे.
१२. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल.
१३. त्याचा जीव सुखासमाधानाने राहील; त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील.
१४. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्‍यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील.
१५. माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील.
१. मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दु:खी.
२. दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते.
३. परमेश्वर नीतिमानाच्या जिवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करतो.
१. काही दिवसांनी तो पुन्हा कफर्णहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले.
२. तेव्हा इतके लोक जमले की दारातदेखील त्यांना जागा होईना; तेव्हा तो त्यांना संदेश देत होता.
३. मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते.
४. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना, म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता ती खाली सोडली.
५. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
६. कित्येक शास्त्री तेथे बसले होते; त्यांच्या मनात असा विचार आला की,
७. ‘हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करतो; एकावाचून म्हणजे देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?’
८. ते स्वतःशी असा विचार करत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने१ लगेच ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता?
९. ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा ‘ऊठ, आपली बाज उचलून चाल,’ असे म्हणणे सोपे?
१०. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (तो पक्षाघाती माणसाला म्हणाला)
११. मी तुला सांगतो, “ऊठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.”
१२. मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला; ह्यावरून सर्व जण थक्क झाले व देवाचा गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
१३. तो तेथून निघून समुद्रकिनार्‍यावर गेला आणि सगळा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला तेव्हा त्याने त्यांना शिक्षण दिले.
१४. तेथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी जकातीच्या नाक्यावर बसलेला दिसला. त्याला त्याने म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला.
१५. नंतर असे झाले की, तो त्याच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले; कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते.
१६. तेव्हा परूश्यांतील शास्त्री ह्यांनी त्याला जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांना म्हटले, “हा जकातदार व पापी लोक ह्यांच्या-बरोबर का जेवतो?”
१७. हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
१८. योहानाचे शिष्य व परूशी उपास करत होते; तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?”
१९. येशू त्यांना म्हणाला, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? वर त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही.
२०. तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल; तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील.
२१. कोणी कोर्‍या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही; लावले तर धड करण्याकरता लावलेले ठिगळ त्याला, म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते.
२२. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यांत घालतात.”
२३. मग असे झाले की तो शब्बाथ दिवशी शेतांमधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले.
२४. तेव्हा परूशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी करू नये ते हे का करतात?”
२५. तो त्यांना म्हणाला, “दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्याबरोबरच्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले,
२६. अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या ‘समर्पित भाकरी’ त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा खाण्यास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”
२७. आणखी तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही;
२८. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचाही प्रभू आहे.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide