बायबल एकाच वर्षात

१. त्या दिवशी दबोरा आणि अबीनवामाचा मुलगा बाराक ह्यांनी गाइलेले गीत हे:
२. “इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.
३. राजेहो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.
४. हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले.
५. परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनायदेखील थरारला.
६. अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या दिवसांत, याएलेच्या दिवसांत राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करत.
७. मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी नेते उरले नव्हते; मुळीच उरले नव्हते.
८. लोकांनी नवे नवे देव निवडले. तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?
९. माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे. ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
१०. शुभ्र गर्दभांवर स्वारी करणार्‍यांनो, अमूल्य गालिच्यांवर बसणार्‍यांनो, वाटेने चालणार्‍यांनो, ह्याचे गुणगान करा.
११. पाणवठ्यांवर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्राएलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. त्या समयी परमेश्वराचे प्रजानन वेशींवर चालून गेले.
१२. जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या मुला, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.
१३. तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्यासाठी वीरांविरुद्ध सामना करायला उतरले.
१४. अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले.
१५. इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोर्‍यात धावले. रऊबेनाच्या पक्षांमध्ये मोठी चर्चा झाली.
१६. खिल्लारांसाठी वाजवलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
१७. गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजांपाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनार्‍यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यांवर बसून राहिला.
१८. जबुलून व नफताली ह्या लोकांनी आपल्या प्रांतातील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.
१९. राजे येऊन लढले; त्या वेळी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहांजवळ तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट घेतली नाही.
२०. आकाशातून तारे लढले; त्यांनी आपापल्या कक्षेतून सीसराशी लढाई केली.
२१. कीशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जिवा, हिंमत धरून पुढे चाल.
२२. त्या वेळी घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला.
२३. परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या. त्यातल्या रहिवाशांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वराला साहाय्य करायला, वीरांविरुद्ध परमेश्वराला साहाय्य करायला ते आले नाहीत.
२४. केनी हेबेर ह्याची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य! डेर्‍यात राहणार्‍या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!
२५. त्याने पाणी मागितले तर तिने त्याला दूध दिले; श्रीमंतांना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले.
२६. तिने आपला एक हात मेखेला, आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले.
२७. तिच्या पायांजवळ तो वाकला, पडला, निश्‍चल झाला; तिच्या पायांजवळ तो वाकला, पडला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.
२८. सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यायला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथांच्या चाकांना कोणी खीळ घातली?
२९. तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले, हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले:
३०. त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एकेक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्त्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्त्रे. लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यात भूषण म्हणून पांघरण्यासाठी एकदोन रंगीबेरंगी वस्त्रे मिळाली नसतील ना?
३१. हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणार्‍या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.
१. इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले; तेव्हा परमेश्वराने त्यांना सात वर्षे मिद्यानाच्या हाती दिले.
२. मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले.
३. मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत;
४. आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करत व इस्राएलात अन्न, शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे वगैरे काहीएक उरू देत नसत.
५. कारण ते आपले पशू व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत.
६. मिद्यानामुळे इस्राएलाची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला.
७. मिद्यानाच्या जाचामुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला,
८. तेव्हा परमेश्वराने इस्राएल लोकांकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हांला बाहेर आणले;
९. मिसर्‍यांच्या आणि जे कोणी तुम्हांला गांजत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हांला सोडवले आणि त्यांना तुमच्यापुढून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हांला दिला;
१०. आणि मी तुम्हांला म्हणालो की, मीच तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोर्‍यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिऊ नका; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही.”
११. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला; त्या वेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता.
१२. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”
१३. गिदोन त्याला म्हणाला, “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हांला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हांला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.”
१४. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, “तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडव; मी तुला पाठवले आहे ना?”
१५. तो त्याला म्हणाला, “प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कूळ मनश्शे वंशात सर्वांत दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.”
१६. परमेश्वर त्याला म्हणाला, “खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात सार्‍या मिद्यानाला तू मारशील.”
१७. तो त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव.
१८. मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून तू जाऊ नकोस.” तो म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन.”
१९. गिदोनाने आत जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी केल्या; त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले.
२०. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव व त्यावर रस्सा ओत.” त्याप्रमाणे त्याने केले.
२१. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला, आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या; ह्यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला.
२२. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, “हाय, हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे.”
२३. परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे क्षेम असो; भिऊ नकोस, तू मरायचा नाहीस.”
२४. मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हे-शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले; अबियेजर्‍यांच्या अक्रा येथे ती आजपर्यंत आहे.
२५. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, “आपल्या बापाचा गोर्‍हा म्हणजे दुसरा गोर्‍हा जो सात वर्षांचा आहे तो घे; तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक.
२६. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्‍या गोर्‍ह्याचे हवन कर.”
२७. गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले.
२८. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोर्‍हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे.
२९. ते एकमेकांना विचारू लागले, “हे काम कोणी केले असावे?” विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, “हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे.”
३०. मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.”
३१. तेव्हा योवाश आपल्यावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल; तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणार्‍याविरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी.”
३२. म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल (बआलाने बाजू लढवावी) असे ठेवले. तो म्हणाला, “त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी.”
३३. नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्‍यात तळ दिला.
३४. परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले.
३५. आणि त्याने मनश्शेत सर्वत्र जासूद पाठवले तेव्हा तेही त्याला येऊन मिळाले. त्याप्रमाणेच आशेर, जबुलून व नफताली ह्यांच्याकडे त्याने जासूद पाठवले, आणि तेही त्याला येऊन मिळण्यासाठी निघाले.
३६. मग गिदोन देवाला म्हणाला, “तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्राएलाचा उद्धार करणार असलास,
३७. तर पाहा, मी ह्या खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; रात्री फक्त तिच्यावर दहिवर पडून बाकी सर्व जमीन कोरडी राहिली, तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्राएलाचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल.”
३८. तसाच प्रकार घडून आला. दुसर्‍या दिवशी पहाटे उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यातले दहिवर पिळून एक वाटीभर पाणी काढले.
३९. मग गिदोन देवाला म्हणाला, “माझ्यावर रागावू नकोस; मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतीती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि सार्‍या जमिनीवर दहिवर पडू दे.”
४०. त्या रात्री देवाने तसेच केले; म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहिवर पडले.
१. मुख्य गवयासाठी; कोरहाच्या मुलाचे स्तोत्र. अहो सर्व लोकहो, हे ऐका; जगात राहणारे उच्च व नीच,
२. श्रीमंत व दरिद्री लोकहो, तुम्ही सर्व कान द्या.
३. माझे मुख ज्ञान वदणार आहे; माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार.
४. मी दृष्टान्ताकडे कान लावीन; मी वीणेवर गाणी गाऊन गूढवचन उलगडून सांगेन.
५. मला फसवणार्‍यांचा दुष्टपणा मला वेढतो; अशा विपत्काली मी का भ्यावे?
६. ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात, व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.
७. कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही; किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.
८. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही;
९. कारण त्याच्या जिवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार.
२०. गरिबाचा द्वेष त्याचा शेजारीही करतो, पण श्रीमंताला चाहणारे बहुत असतात.
२१. जो आपल्या शेजार्‍याचा तिरस्कार करतो तो पापी होय, पण गरिबांवर दया करतो तो धन्य होय.
१. सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते.
२. तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.”
३. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला:
४. “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही?
५. ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो;
६. आणि घरी येऊन मित्रांना व शेजार्‍यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’
७. त्याप्रमाणे ज्यांना पश्‍चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणार्‍या आनंदापेक्षा पश्‍चात्ताप करणार्‍या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.
८. तसेच अशी कोण स्त्री आहे की, तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यांतून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही?
९. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’
१०. त्याप्रमाणे, पश्‍चात्ताप करणार्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide