बायबल एकाच वर्षात

१. इस्राएल लोक आपापल्या नगरांमध्ये राहू लागल्यावर सातवा महिना सुरू झाला तेव्हा लोक एकचित्त होऊन यरुशलेमेत जमा झाले.
२. तेव्हा येशूवा बिन योसादाक व त्याचे बांधव जे याजक आणि जरूब्बाबेल बिन शल्तीएल व त्याचे बांधव ह्यांनी उभे राहून देवाचा माणूस मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणे करण्यासाठी इस्राएलाच्या देवाची वेदी बांधली.
३. त्यांनी वेदीची स्थापना पूर्वीच्या स्थानी केली; कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत वाटत होती; तिच्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण अर्थात नित्य सांजसकाळची होमार्पणे ते करू लागले.
४. त्याप्रमाणेच त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळला आणि दररोज प्रयोजन पडेल तेवढे रोजचे होमबली नियमानुसार अर्पण केले.
५. नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पण केले.
६. सातव्या महिन्याच्या प्रतिपदेपासून ते परमेश्वरास होमबली अर्पू लागले; तथापि परमेश्वराच्या मंदिराचा पाया अद्यापि घातला नव्हता.
७. त्यांनी पाथरवटांना व सुतारांना पैसा दिला आणि पारसाचा राजा कोरेश ह्याच्या परवान्याने गंधसरूची लाकडे लबानोनाहून याफोला जलमार्गाने पोचती करावी म्हणून त्यांनी सीदोनी व सोरी लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू व तेल दिले. मंदिराच्या पुनर्रचनेची सुरुवात
८. यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात जरूब्बाबेल बिन शल्तीएल, येशूवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव जे याजक व लेवी होते त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला; वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले.
९. तेव्हा येशूवा, त्याचे पुत्र व बांधव, कदमीएल व त्याचे पुत्र, यहूदाचे वंशज, हेनादाद व त्याचे पुत्र, आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले.
१०. बांधकाम करणार्‍यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलाचा राजा दावीद ह्याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती कर्णे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशातले लेवी ह्यांना उभे केले.
११. “परमेश्वर चांगला आहे व इस्राएलावर त्याची दया सनातन आहे” असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जयजयकार केला.
१२. तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळांचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी ह्या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यांना रडू कोसळले व त्यांच्यातले पुष्कळ जण हर्षभराने जयघोष करू लागले.
१३. जयघोषाचा नाद व लोकांच्या रडण्याचा नाद ह्यांतील भेद लोकांना कळेना, कारण लोक उच्च स्वराने जयजयकार करत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता.
१. बंदिवासातून आलेले लोक इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधत आहेत असे यहूदा व बन्यामीन ह्यांच्या शत्रूंनी ऐकले,
२. तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;”
३. पण जरूब्बाबेल, येशूवा व इस्राएलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यांना म्हणाले, “आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हांला काही कर्तव्य नाही; तर पारसाचा राजा कोरेश ह्याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर बांधणार.”
४. तेव्हा त्या देशाचे लोक यहूद्यांचे हात कमजोर करून त्यांना मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले.
५. त्यांचा संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्यांच्याशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेवले; पारसाचा राजा कोरेश ह्याच्या सर्व कारकिर्दीत व पारसाचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीपर्यंत हे असे चालले होते.
६. अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहूदा व यरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठवली.
७. अर्तहशश्त ह्याच्या कारकिर्दीत बिश्‍लाम, मिथ्रदाथ, ताबेल व त्यांचे वरकड स्नेही ह्यांनी पारसाच्या राजाला पत्र लिहून पाठवले; हे पत्र अरामी लिपीत व अरामी भाषेत लिहिले होते.
८. राजमंत्री रहूम व लेखक शिमशय ह्यांनी यरुशलेमेविरुद्ध अर्तहशश्त राजाला पुढे लिहिल्याप्रमाणे पत्र पाठवले.
९. त्या प्रसंगी रहूम राजमंत्री, शिमशय लेखक व त्यांचे वरकड स्नेही म्हणजे दिनाई, अफर्सथखी, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, शूशनखी, देहावी, एलामी,
१०. इत्यादी लोक ज्यांना महान व प्रतापी आसनपर ह्याने नदीपार आणून शोमरोन नगरात व महानदाच्या पश्‍चिमेकडील बाकीच्या प्रदेशात वसवले होते, त्यांनी व इतर जनांनी हे पत्र लिहिले.
११. अर्तहशश्त राजाला त्यांनी पत्र पाठवले त्याची नक्कल ही: “नदीच्या पश्‍चिमेकडील आपले सेवक इत्यादी -
१२. महाराजांना कळावे की जे यहूदी आपणाकडून निघून आले ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहचले; त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे; त्यांनी त्याचे कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे;
१३. महाराजांस हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी, कर व जकात द्यायचे नाहीत; एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल.
१४. आम्ही तर दरबाराचे मीठ खात आहोत व महाराजांची अशी अप्रतिष्ठा झालेली पाहणे आम्हांला शोभत नाही म्हणून आम्ही पत्र पाठवून महाराजांना हे कळवत आहोत;
१५. आपल्या वाडवडिलांच्या बखरी आपण शोधून पाहाल तर त्यावरून आपणांस कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजांना व राष्ट्रांना उपद्रव करणारे आहे. प्राचीन काळापासून ह्यात राजद्रोह माजत आला आहे व ह्यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते.
१६. आम्ही महाराजांना हे निक्षून सांगतो की, हे नगर बांधण्यात आले व ह्याचे कोट बांधून तयार झाले तर महानदाच्या पश्‍चिमेकडे आपला काहीच मुलुख राहायचा नाही.”
१७. मग राजाने उत्तर पाठवले की, “रहूम राजमंत्री, शिमशय लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्‍चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही ह्यांना सलाम, इत्यादी -
१८. “तुम्ही आमच्याकडे पाठवलेले पत्र आमच्यासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले.
१९. माझ्या आज्ञेवरून शोध केला त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजांविरुद्ध बंड करीत आले आहे; बंड व राजद्रोह ह्यांचे हे माहेरघरच आहे.
२०. ह्या यरुशलेमेत पराक्रमी राजे होऊन गेले; त्यांनी महानदाच्या पश्‍चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले; लोक त्यांना खंडणी, कर व जकात देत असत.
२१. तर आता असे फर्मान फिरवा की ह्या मनुष्यांनी काम बंद पाडावे, माझ्याकडून दुसरा हुकूम होईपर्यंत त्यांनी नगर बांधू नये.
२२. सांभाळा, ह्या गोष्टींसंबंधाने ढिलाई करू नका; राजाची हानी करणारा असा हा उपद्रव का वाढू द्यावा?”
२३. अर्तहशश्त राजाचे हे पत्र रहूम, शिमशय लेखक व त्यांचे स्नेही ह्यांना वाचून दाखवले, तेव्हा ते त्वरा करून यरुशलेमेस यहूद्यांकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबवले.
२४. ह्या प्रकारे यरुशलेमेतील देवाच्या मंदिराचे काम थांबले आणि पारसाचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षापर्यंत तहकूब राहिले.
११. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
१२. हे प्रभू, माझ्या देवा, मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन, तुझ्या नावाचा महिमा सदोदित वर्णन करीन.
१३. कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस.
१४. हे देवा, उन्मत्त लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत, जुलमी लोकांचा समुदाय माझा जीव घेण्यास पाहत आहे; ते तुला जुमानत नाहीत.
१५. तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.
१६. तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे, आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर.
१७. हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, ह्यासाठी की, तू माझे साहाय्य व समाधान केले आहेस, हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावे.
१७. ज्याला ख्यालीखुशाली आवडते तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षारसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही.
१८. नीतिमानाची खंडणी दुर्जन, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो.
१. “बंधुजनहो व वडीलजनहो, मी जे आता तुम्हांला प्रत्युत्तर करतो ते ऐका.”
२. तो आपल्याबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले. मग त्याने म्हटले:
३. “मी यहूदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो.
४. पुरुष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्त शिक्षा देईपर्यंत मी ह्या पंथाचा पाठलाग केला.
५. त्याविषयी प्रमुख याजक व सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेमेत शासन करण्यास आणावे.
६. मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला.
७. तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली.
८. मी विचारले, ‘प्रभूजी, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’
९. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला अन् ते घाबरले, परंतु माझ्याबरोबर बोलणार्‍याची वाणी त्यांनी ऐकली नाही.
१०. मग मी म्हणालो, ‘प्रभूजी, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.’
११. त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.
१२. मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता, आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
१३. तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, ‘शौल भाऊ, इकडे पाहा.’ तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले.
१४. मग तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावेस; आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी;
१५. कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्यांविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील.
१६. तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’
१७. मग असे झाले की, मी यरुशलेमेस माघारी आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता माझे देहभान सुटले.
१८. तेव्हा मी त्याला पाहिले; तो मला म्हणाला, ‘त्वरा कर, यरुशलेमेतून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.’
१९. तेव्हा मी म्हणालो, ‘प्रभो, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणार्‍यांना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करत असे.
२०. तुझा रक्तसाक्षी१ स्तेफन ह्याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवत होतो आणि त्याचा घात करणार्‍याची वस्त्रे सांभाळत होतो.’
२१. तेव्हा त्याने मला सांगितले, ‘जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”’
२२. ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, “जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही.”
२३. ते ओरडत व आपली वस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळत असता,
२४. सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले.
२५. मग त्यांनी त्याला वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधिपतीला पौलाने म्हटले, “रोमी मनुष्याला व तशात ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?”
२६. हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमी आहे.”
२७. तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमी आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.”
२८. सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकत्वाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमी आहे.”
२९. ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमी आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बांधवले होते.
३०. यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्‍चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते. म्हणून दुसर्‍या दिवशी त्याने त्याला मोकळे केले, आणि मुख्य याजक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकूम करून पौलाला खाली आणून त्यांच्यापुढे उभे केले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide