बायबल एकाच वर्षात

१. अलीहू आणखी म्हणाला,
२. “‘देवावरील माझी फिर्याद न्यायाची आहे,’ असे तू म्हणतोस काय? हे तुला म्हणण्याचा हक्क आहे असे तुला वाटते काय?
३. ह्यास्तव तू म्हणतोस की ‘तुला१ काय लाभ होणार? मी पाप केले असते तर माझे काय कमी झाले असते?’
४. मी तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांनाही उत्तर देतो;
५. आकाशाकडे दृष्टी देऊन पाहा; हे नभोमंडळ पाहा, हे तुझ्याहून उंच आहे.
६. तू पाप केलेस तर देवाचे काय जाते? तुझे अपराध बहुत असले तर त्याचे काय बिघडणार?
७. तू नीतिमान असलास तर तू त्याला काय देणार? तुझ्यापासून त्याला काय मिळणार?
८. तुझ्या अधर्माचे फळ तुझ्यासारख्या मानवालाच बाधेल; तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ मानवसंततीलाच लाभेल;
९. अतिशय जुलूम झाला म्हणजे लोक आक्रोश करतात; जबरदस्त लोकांचा हात त्यांच्यावर पडला म्हणजे ते साहाय्यासाठी आरोळी मारतात.
१०. तरीपण असे कोणीही म्हणत नाही की ‘जो रात्रीची स्तोत्रे गायला देतो, तो माझा निर्माणकर्ता कोठे आहे?’
११. जो आम्हांला पृथ्वीवरील पशूंहून अधिक शिकवतो, आणि आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान देतो, तो कोठे आहे?’
१२. दुर्जनांच्या उन्मत्तपणामुळे ते असा आक्रोश करतात, पण कोणी ऐकत नाही.
१३. देव निरर्थक ओरड खरोखर ऐकत नाही; सर्वसमर्थ तिच्याकडे लक्ष देत नाही.
१४. तू म्हणतोस की त्याचे दर्शन मला घडत नाही; पण हा तुझा वाद त्याच्यासमोरच आहे, तर तू त्याची वाट पाहत राहा;
१५. पण आता त्याने कोपून दंड केला नाही, त्याने अपराधांकडे फारसे लक्ष पुरवले नाही;
१६. म्हणून ईयोब आपले तोंड उघडून निरर्थक भाषण करतो, आणि अज्ञानाने वाद माजवतो.”
१. अलीहू आपले भाषण पुढे चालवून म्हणाला,
२. “अंमळ थांब; देवाच्या वतीने आणखी काही बोलण्याजोगे आहे, असे मी तुला दाखवतो.
३. मी दुरून आपले ज्ञान आणून आपल्या उत्पन्नकर्त्याचे न्याय्यत्व स्थापित करीन.
४. माझे शब्द वास्तविक खोटे नाहीत; हा पूर्ण ज्ञानी पुरुष तुझ्यापुढे उभा आहे.
५. पाहा, देव समर्थ आहे तरी तो कोणाला तुच्छ मानत नाही; त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे.
६. तो अधर्म्यांना वाचवत नाही; तो दीनांचा न्याय करतो.
७. तो नीतिमानांवरील आपली दृष्टी काढत नाही, तर त्यांना राजांबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापतो, व त्यांची उन्नती होते.
८. त्यांना बेड्यांनी जखडले, दुःखरूप रज्जूंनी त्यांना बांधून ठेवले,
९. तर त्यांची कृती व त्यांचे अपराध ह्यांची त्यांना जाणीव करून देतो, त्यांनी उन्मत्तपणाचे वर्तन केले असे त्यांना दाखवून देतो.
१०. त्यांचे कान उघडून ते बोध घेतील असे तो करतो, आणि त्यांना अधर्म सोडायला सांगतो.
११. हे ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवतील, आपली वर्षे सुखाने काढतील;
१२. पण त्यांनी ऐकले नाही तर ते शस्त्राने ठार होतील; ज्ञानप्राप्तीवाचून त्यांचा प्राणान्त होईल.
१३. जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगतात; त्याने त्यांना बांधले असता ते धावा करीत नाहीत.
१४. ते भरज्वानीत मरतात; त्यांचा प्राण अमंगळ पुरुषांप्रमाणे नाश पावतो;
१५. तो दुःखितांना त्यांच्या दुःखाच्या द्वारे सोडवतो; विपत्तीच्या द्वारे त्यांची कानउघाडणी करतो.
१६. तो तुलाही दुःखाच्या जबड्यातून सोडवून संकोच नाही अशा प्रशस्त स्थली नेतो; तुझ्या मेजावर मिष्टान्नाची रेलचेल होईल.
१७. तू दुष्टांसारखा दोषारोप करीत राहशील; तर दोषारोप व न्यायदंड ह्यांच्या तावडीत तू सापडशील.
१८. आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नकोस; हा खंड भारी आहे म्हणून बहकू नकोस.
१९. तुझ्या अपार संपत्तीचा तुझ्या संपत्तीच्या सार्‍या बळाचा काही उपयोग होईल काय?
२०. लोक जागच्या जागी नष्ट होतील अशा रात्रीची उत्कंठा धरू नकोस.
२१. सांभाळ, दुष्टतेकडे वळू नकोस; ती तुला दुःखापेक्षा पसंत वाटत आहे.
२२. पाहा, देव आपल्या सामर्थ्याने थोर कृत्ये करतो; त्याच्यासमान शिक्षण देणारा कोण आहे?
२३. त्याला मार्ग लावून देणारा कोण आहे? ‘तू अधर्म केला आहे’ असे त्याला कोण म्हणणार?
२४. लोकांनी गायनरूपे त्याच्या करणीचा महिमा वर्णन केला आहे, त्या गाण्याचे स्मरण ठेव.
२५. सर्व माणसे ती करणी पाहत राहतात; मानव ती करणी दुरून पाहतो.
२६. पाहा, देव थोर आहे, तो आम्हांला अगम्य आहे; त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे.
२७. तो जलबिंदू आकर्षतो; त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात;
२८. मेघ त्यांची वृष्टी करतात; ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करतात.
२९. मेघांचा पसारा, मेघमंडपातील गडगडाट ह्याचे ज्ञान कोणाला होईल?
३०. पाहा, तो आपणाभोवती प्रकाश पसरतो; त्याने समुद्रतल व्यापतो.
३१. ह्यांच्या योगाने तो राष्ट्रांचा न्याय करतो, अन्नाची विपुलता करतो.
३२. तो विद्युल्लता आपल्या हाती धरून तिने अचूक आघात करावा अशी तिला आज्ञा करतो.
३३. मेघगर्जना त्याच्या येण्याची खबर देते; गुरेढोरेही तो येत आहे असे कळवतात.
१. परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो.
२. परमेश्वर सीयोनेत थोर आहे; तो सर्व लोकांहून परम थोर आहे.
३. ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत; पवित्र तोच आहे.
४. राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे; तू सरळता प्रस्थापित केली आहेस; तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहेस.
५. परमेश्वराची, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा; पवित्र तोच आहे.
६. त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
७. मेघस्तंभांतून तो त्यांच्याशी बोलला; त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले.
८. हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस; तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास.
९. परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.
२२. तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.
२३. सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस.
२४. नीतिमानाचा बाप फार उल्लासतो; सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याच्याविषयी आनंद पावतो.
२५. तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो,
१. आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हांला मानावे.
२. कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे.
३. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा, ह्याचे मला काहीच वाटत नाही, मी स्वतःचादेखील न्यायनिवाडा करत नाही.
४. कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोषी ठरतो असे नाही; माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे.
५. म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.
६. बंधुजनहो, मी तुमच्याकरता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपुल्लोसाला लागू केल्या आहेत; ह्यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आमच्यापासून शिकावा म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकासाठी दुसर्‍यावर फुगणार नाही.
७. तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?
८. तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात! इतक्यातच धनवान झाला आहात! आम्हांला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात! तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.
९. कारण मला वाटते, देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहोत!
१०. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे; आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त; तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत.
११. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत; आम्ही ठोसे खात आहोत, आम्हांला घरदार नाही.
१२. आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो; आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करतो;
१३. आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत.
१४. तुम्हांला लाजवण्यासाठी मी हे लिहीत नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हांला बोध करण्यासाठी लिहितो.
१५. कारण तुम्हांला ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ बाप नाहीत; मी तर तुम्हांला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे.
१६. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.
१७. ह्या कारणास्तव मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे; तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे; मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षणपद्धतीची आठवण तो तुम्हांला देईल.
१८. मी तुमच्याकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत.
१९. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन; तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन.
२०. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही, पण सामर्थ्यात आहे.
२१. तुमची काय इच्छा आहे? मी तुमच्याकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide