बायबल एकाच वर्षात

१. अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.
२. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.
३. गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.
४. घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.
५. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिर्‍यांचे कान खुले होतील.
६. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.
७. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीच्या ठिकाणी उसळत्या पाण्याचे झरे होतील; कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे ह्यांसहित गवत उगवेल.
८. तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.
९. तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धरलेले संचार करतील.
१०. मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.
१. हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी असे झाले की अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.
२. तेव्हा अश्शूरच्या राजाने लाखीशाहून रब-शाके१ ह्याला मोठ्या सैन्यानिशी हिज्कीया राजाकडे यरुशलेमेस पाठवले. तो परटाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला.
३. त्याच्याकडे खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस आसाफाचा पुत्र यवाह हे गेले.
४. तेव्हा रब-शाके त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला सांगा की राजाधिराज अश्शूरचा राजा म्हणतो, ‘हा तुझा भरवसा कसला?
५. मी म्हणतो, तुझा युद्धसंकल्प व तुझे युद्धबळ ही केवळ वायफळ होत; तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर?
६. पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात ते तसेच होतात.
७. त्या सर्वांना जर तू असे म्हणशील की, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला होता की ह्या एका वेदीपुढे भजन करा, तोच नव्हे का तो देव?
८. आता माझा धनी अश्शूरचा राजा ह्याच्याशी पैज लाव; तुला स्वार बसवण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो.
९. माझ्या धन्याचा कनिष्ठ दर्जाचा एक तरी सरदार कसा पिटाळून लावशील? आणि तू रथ व स्वार मिळवण्याविषयी मिसरावर भिस्त ठेवतोस ना?
१०. मी ह्या देशावर चढाई करून त्याचा विध्वंस करण्यास आलो तो का परमेश्वराच्या सांगण्यावाचून? परमेश्वरानेच मला सांगितले आहे की ह्या देशावर चढाई करून जा व ह्याचा विध्वंस कर.”’
११. मग एल्याकीम, शेबना व यवाह ह्यांनी रब-शाके ह्याला विनंती केली की, “आपल्या ह्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हांला समजते; कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहूदी भाषेत आमच्याशी बोलू नका.”
१२. रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यास मला पाठवले काय? कोटावर बसलेल्यांनी तुमच्याबरोबर आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही मला पाठवले नाही काय?”
१३. मग रब-शाके पुढे होऊन यहूदी भाषेत मोठ्याने म्हणाला, “लोकहो, राजाधिराज अश्शूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका.
१४. राजा म्हणतो, “हिज्कीयास तुम्हांला भुरळ घालू देऊ नका; त्याच्याने तुमचा बचाव व्हायचा नाही.
१५. ‘परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही,’ असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो.”
१६. हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या, आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षीचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा व तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदाचे पाणी प्या;
१७. पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षांचा देश, अन्नाचा व द्राक्षींच्या मळ्यांचा देश ह्यात तुम्हांला नेईन.
१८. ‘परमेश्वर आमचा बचाव करील’ असे बोलून हिज्कीया तुमचे मन न फिरवो. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडवला आहे काय?
१९. हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय?
२०. ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला आहे? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”’
२१. ह्यावर ते गप्प राहिले, त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत; कारण ‘तुम्ही त्याला उत्तर देऊ नये’ अशी राजाची त्यांना ताकीद होती.
२२. मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिज्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्याला रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.
६. त्याच्यावर दुर्जनाला अधिकारी नेम; त्याच्या उजव्या हाताकडे विरोधी उभा राहो.
७. त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी ठरो, आणि त्याची प्रार्थना पाप ठरो.
८. त्याचे दिवस थोडे होवोत; त्याचा हुद्दा दुसरा घेवो.
९. त्याची मुले अनाथ होवोत, व त्याची बायको विधवा होवो.
१०. त्याची मुले भीक मागत फिरोत, आणि ती आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर पडून अन्नान्न करोत.
११. सावकार त्याचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कष्टाची कमाई परके लुटोत.
१२. त्याच्यावर कोणीही दया न करो; त्याच्या अनाथ मुलांची कीव कोणालाही न येवो.
१३. त्याच्या वंशाचा उच्छेद होवो; भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो.
२७. मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही.
२८. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.
१. ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक गोष्ट प्रस्थापित होते.’
२. ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसर्‍या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते, व दुसर्‍यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की, मी फिरून आलो तर गय करणार नाही;
३. ख्रिस्त माझ्या द्वारे बोलतो आहे ह्याचे प्रमाण तुम्हांला पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने शक्तिहीन नाही, तर तुमच्यामध्ये शक्तिमान आहे;
४. कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्याबाबत जिवंत असे राहू.
५. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस१ उतरलेले नाही.
६. पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे.
७. आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये; आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही पसंतीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून.
८. कारण सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते.
९. जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो; व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही प्रार्थना करतो.
१०. ह्यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते ह्यासाठी की, जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये.
११. बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो; तुम्हांला पूर्णता लाभो; समाधान मिळो; तुम्ही एकचित्त व्हा; शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.
१२. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा.
१३. सर्व पवित्र जन तुम्हांला सलाम सांगतात.
१४. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide