१. हबक्कूक संदेष्ट्याला दृष्टान्ताने प्राप्त झालेले देववचन:
२. हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. “जुलूम झाला” असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस.
३. मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.
४. अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट नीतिमानास घेरून सोडतो म्हणून न्याय विपरीत होतो.
५. राष्ट्रांनो, लक्ष देऊन पाहा व आश्चर्यचकित व्हा. कारण तुमच्या काळात मी एक कार्य करतो, तुम्हांला सांगितले तरी तुम्ही विश्वास धरणार नाही.
६. कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात.
७. ते दारुण व भयंकर आहेत; त्यांचा न्याय व त्यांचे वैभव त्यांचे स्वत:चेच आहे.
८. त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्या गरुडासारखे ते धावतात.
९. ते बलात्कार करण्यास सर्व मिळून येतात; त्यांच्या तोंडांचा रोख थेट पुढे असतो; वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.
१०. ते तर राजांना कसपट समजतात व अधिपतींना कवडीमोल मानतात. कोणताही किल्ला असला, तरी तो ते तृणवत गणतात, कारण ते मातीचा ढीग रचून किल्ला सर करतात.
११. शेवटी सोसाट्याचा वारा येऊन ते उडून जातील, स्वपराक्रम हाच ज्यांचा देव त्यांच्यावर दोष येईल.
१२. हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्या पवित्र प्रभू, तू अनादि काळापासून आहेस ना? आम्ही मरणार नाही.१ हे परमेश्वरा, तू त्यांचा न्याय नेमला आहेस. हे दुर्गा, त्याचे शासन व्हावे म्हणून तू त्याला स्थापले आहेस.
१३. तुझे डोळे इतके पवित्र आहेत की दुष्टता तुझ्याने पाहवत नाही, अनाचाराकडे दृष्टी लाववत नाही, तो तू ह्या बेइमानी करणार्यांकडे का पाहत राहतोस? जो आपल्याहून नीतिमान त्याला दुष्ट गिळून टाकतो तेव्हा तू का उगा राहतोस?
१४. तू मानवांना समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहेस, कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूंप्रमाणे त्यांना का केले आहेस?
१५. तो त्या सर्वांना गळाने उचलतो, त्यांना आपल्या जाळ्यात धरतो, आपला पाग टाकून त्यांना गोळा करतो; त्यामुळे तो हर्षित व आनंदित होतो.
१६. तो आपल्या जाळ्यांपुढे यज्ञ करतो, आपल्या पागाला विपुल धूप दाखवतो; कारण त्यांपासून त्याला विपुल धन व पुष्टिकारक अन्न मिळते.
१७. तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय?
१. मी आपल्या पहार्यावर उभा राहीन, किल्ल्यावर पहारा करीन; तो माझ्याबरोबर काय बोलेल आणि माझ्या गार्हाण्याविषयी त्याला मला काय उत्तर देता येईल ते मी पाहीन.
२. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, “हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे.
३. कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही.
४. पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही; नीतिमान तर आपल्या विश्वासाने१ वाचेल.
५. शिवाय त्याचा द्राक्षारस दगा देणारा आहे; तो अहंकारी मनुष्य आहे, तो घरी टिकत नाही, त्याने अधोलोकाप्रमाणे आपली लालसा वाढवली आहे. तो मृत्यूसारखा अतृप्त आहे, तो सर्व राष्ट्रांना आपणाजवळ जमा करतो, सर्व लोकांना आपल्यानजीक एकत्र करतो.”
६. हे सर्व त्याला कवन, कूटवचन लावून बोलणार नाहीत काय? लोक म्हणतील, “आपला माल नव्हे त्याने जो आपली वृद्धी करतो व गहाणांचा बोजा आपणावर लावून घेतो, त्याला धिक्कार असो; असे कोठवर?”
७. तुला चावणारे२ एकाएकी उठावणी करणार नाहीत काय? तुला छळणारे जागे होऊन तू त्यांची लूट होणार नाहीस काय?
८. तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल.
९. विपत्तीच्या हातातून आपला बचाव व्हावा म्हणून आपले घरटे उंच ठिकाणी करावे, ह्या हेतूने जो आपल्या घराण्यासाठी अन्यायाने नफा मिळवतो त्याला धिक्कार असो.
१०. तू बहुत राष्ट्रांना नष्ट केल्यामुळे आपल्या घराण्यावर अप्रतिष्ठा आणली आहेस, आपल्या जिवाचा गुन्हेगार झाला आहेस.
११. कारण भिंतीचा दगड ओरडेल, इमारतीच्या लाकडातील तुळई त्याला उत्तर देईल.
१२. जो रक्ताने नगर बांधतो, अधर्माने शहर स्थापतो त्याला धिक्कार असो!
१३. पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून नव्हे काय?
१४. कारण जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.
१५. जो आपल्या शेजार्याला मद्य पाजतो त्याला धिक्कार असो! तू त्याची नग्नता पाहावी म्हणून आपला संतप्त क्रोध त्यात मिसळून त्याला मस्त करतोस.
१६. सन्मानाने नव्हे तर अप्रतिष्ठेने तुझी तृप्ती झाली, तर तूही पी आणि बेसुंत्यांसारखा हो; परमेश्वराच्या उजव्या हातचा प्याला तुझ्याकडे वळेल, तुझ्या वैभवाची अप्रतिष्ठा होईल.
१७. लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल.
१८. कोरीव मूर्ती ही मूर्तिकाराने कोरून केली ह्यात काय लाभ? खोटा कौल देणार्या ओतीव मूर्तीवर मूर्तिकार, मुक्या मूर्ती करणारा, श्रद्धा ठेवतो ह्यात काय लाभ?
१९. जो काष्ठास म्हणतो, ‘जागे हो’; मुक्या पाषाणास म्हणतो, ‘ऊठ!’ त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकवता येईल काय? पाहा, ती मूर्ती सोन्यारुप्याने मढवली आहे, पण आत पाहावे तर जिवाचा पत्ता नाही.
२०. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे; सर्व धरित्री त्याच्यापुढे स्तब्ध राहो.
१. हबक्कूक संदेष्ट्याची प्रार्थना म्हणजे क्षोभस्तोत्र:
२. हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रकट कर, क्रोधातही दया स्मर.
३. देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे.
४. त्याचे तेज प्रकाशासारखे आहे; त्याच्या हातांतून किरण निघत आहेत; त्याचा पराक्रम तेथे गुप्त आहे.
५. मरी त्याच्यापुढे चालते, जळते इंगळ त्याच्या पायांजवळ निघतात.
६. तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.
७. कूशानाचे डेरे विपत्तीने घेरलेले मी पाहिले; मिद्यान देशाच्या कनाती थरथरत आहेत.
८. परमेश्वर नद्यांवर रागावला आहे काय? नद्यांवर तुझा राग पेटला आहे काय? तुझा क्रोध समुद्रावर खवळला आहे काय? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास काय?
९. तुझे धनुष्य गवसणीबाहेर निघाले आहे. तू आपल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे शिक्षा केली आहे. (सेला) तू पृथ्वी विदारून नद्या वाहवतोस.
१०. पर्वत तुला पाहून विव्हळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारतो, आपले हात वर करतो.
११. तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने, तुझ्या झळकणार्या भाल्याच्या चकाकीने, सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्चल झाले आहेत.
१२. तू संतापून पृथ्वीवर चालतोस, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवून टाकतोस,
१३. तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस; तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करतोस, त्याच्या शिराचे आपटून तुकडे करतोस. (सेला)
१४. त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्या-त्याच्याच भाल्यांनी विंधतोस; माझा चुराडा करण्यासाठी ते माझ्यावर तुफानासारखे लोटले; गरिबांना गुप्तरूपे गिळावे ह्यातच त्यांना संतोष वाटतो.
१५. तू आपले घोडे समुद्रातून, महाजलांच्या राशीवरून चालवतोस.
१६. मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.
१७. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,
१८. तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्या देवाविषयी मी उल्लास करीन.
१९. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो. [मुख्य गवयासाठी, माझ्या तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे]
१. परमेशाचे स्तवन करा!१ हे माझ्या जिवा, परमेश्वराचे स्तवन कर.
२. माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.
३. अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.
४. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.
५. ज्याच्या साहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य!
६. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले; तो सदा आपले सत्यवचन पाळतो.
७. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो; भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
८. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो; परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो.
९. परमेश्वर उपर्यांचे रक्षण करतो; अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो; परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो.
१०. परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो; हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेशाचे स्तवन करा!१
१७. जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोर्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडांची पिले खाऊन टाकतील.
१. नंतर मी एक ‘श्वापद समुद्रातून वर येताना’ पाहिले; त्याला ‘दहा शिंगे’ व सात डोकी असून त्याच्या शिंगांवर दहा मुकुट आणि त्याच्या डोक्यांवर देवनिंदात्मक नावे होती.
२. जे ‘श्वापद’ मी पाहिले ते ‘चित्त्यासारखे’ होते, त्याचे पाय ‘अस्वलाच्या’ पायांसारखे होते व त्याचे तोंड ‘सिंहाच्या’ तोंडासारखे होते; त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला.
३. त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले; तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला; तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करत त्या श्वापदामागून गेली.
४. अजगराने त्या श्वापदाला आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले; आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, “ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढता येईल?”
५. त्याला ‘मोठमोठ्या’ देवनिंदात्मक ‘गोष्टी बोलणारे तोंड’ देण्यात आले, व बेचाळीस महिने त्याला आपले ‘काम चालवण्याची’ मुभा देण्यात आली.
६. त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्गनिवासी लोक ह्यांची निंदा करण्यास तोंड सोडले.
७. ‘पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यांना जिंकण्याची’ त्याला मुभा देण्यात आली; आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांवर त्याला अधिकार देण्यात आला.
८. ‘ज्या कोणाची’ नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकर्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील.
९. ज्या कोणाला कान आहेत तो ऐको.
१०. जो ‘कैदेत जायचा तो कैदेत’ जातो; ‘जो तलवारीने’ जिवे मारील, त्याला ‘तलवारीने’ मरणे भाग आहे. ह्यावरून पवित्र जनांचा धीर व विश्वास दिसून येतो.
११. नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले; त्याला कोकरासारखी दोन शिंगे होती; ते अजगरासारखे बोलत होते.
१२. ते पहिल्या श्वापदाचा सर्व अधिकार त्याच्यासमक्ष चालवते आणि ज्या पहिल्या श्वापदाचा प्राणघातक घाव बरा झाला होता, त्याला पृथ्वीने व तिच्यावर राहणार्या लोकांनी नमन करावे असे करते.
१३. ते मोठी चिन्हे करते; माणसांसमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पडावा असेदेखील करते.
१४. जी चिन्हे त्या श्वापदासमक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणार्यांना ठकवते; म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही, जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणार्यांना ते सांगते.
१५. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली; ह्यासाठी की, श्वापदाच्या मूर्तीने बोलावे आणि ‘जे कोणी’ त्या श्वापदाच्या ‘मूर्तीला नमन करणार नाहीत’ ते जिवे मारले जावेत असे तिने घडवून आणावे.
१६. लहानथोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी;
१७. आणि ज्यांच्यावर ती खूण म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये, असे ते श्वापद करते.
१८. येथे अकलेचे काम आहे; ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे; त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो; ती त्याची संख्या सहाशे सहासष्ट होय.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide