१. अहीथोफेल अबशालोमाला म्हणाला, “मला परवानगी दे म्हणजे मी बारा हजार पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करतो,
२. तो थकला-भागलेला व कमकुवत असता मी त्याच्यावर छापा घालून त्याला घाबरे करीन; त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील; आणि मग मी राजालाच तेवढे मारीन;
३. आणि मी सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणीन; ज्याच्यामागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणायचे; ह्या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील.”
४. ही गोष्ट अबशालोमाला व इस्राएलाच्या सर्व वडील जनांना पसंत पडली.
५. मग अबशालोम म्हणाला, “हूशय अर्की ह्यालाही बोलावून आणा; त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू.”
६. हूशय आला तेव्हा अबशालोम त्याला म्हणाला, “अहिथोफेल अमुक अमुक मसलत देत आहे; त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय? नाहीतर तू तरी काही मसलत सांग.”
७. हूशय अबशालोमाला म्हणाला, “अहीथोफेलाने ह्या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही.”
८. हूशय आणखी म्हणाला, “तू आपल्या बापाला व त्याच्याबरोबरच्या पुरुषांना चांगला ओळखतोस; ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असताना जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे; तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहायचा नाही.
९. पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल.
१०. म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत.
११. माझी तुला अशी मसलत आहे की, दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्राएल लोक, समुद्रकिनार्यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करायला जा.
१२. मग तो असेल तेथे त्याच्यावर आपण एकदम छापा घालू आणि जमिनीवर दंव पडते त्याप्रमाणे आपण त्याच्यावर जाऊन पडू म्हणजे त्याचा व त्याच्याबरोबरच्या लोकांचा आपण मागमूस राहू देणार नाही.
१३. तो जर एखाद्या नगरात गेला असला तर सर्व इस्राएल लोक त्या नगरास दोर लावून ते नदीत ओढून टाकतील; तेथे एक खडाही राहणार नाही.”
१४. अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती.
१५. मग हूशयाने सादोक व अब्याथार याजक ह्यांना सांगितले की, “अहीथोफेलाने अबशालोमाला व इस्राएलाच्या वडील जनांना अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली.
१६. तर लवकर जासूद पाठवून दाविदाला सांग की, आज रात्री रानातील नदीच्या उताराजवळ राहू नका; कसेही करून पार उतरून जा, नाहीतर राजा व त्याच्याबरोबरचे सर्व लोक नष्ट होतील.”
१७. योनाथान व अहीमास हे एन-रोगेल येथे राहत होते; ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यांना खबर देत असे; त्यांनी जाऊन दावीद राजाला हे वर्तमान सांगितले.
१८. पण एका पोराने त्यांना पाहून अबशालोमाला जाऊन सांगितले; तेव्हा ते त्वरेने निघून बहूरीमातील एका मनुष्याच्या घरी गेले; त्याच्या चौकात एक विहीर होती तिच्यात ते उतरले.
१९. तेव्हा एका स्त्रीने एक चादर घेऊन विहिरीच्या तोंडावर पसरली व तिच्यावर काही भरडलेले धान्य पसरले, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात आले नाही.
२०. अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले; ते तिला म्हणाले, “अहीमास व योनाथान कोठे आहेत?” तेव्हा त्या स्त्रीने त्यांना म्हटले, “ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत.” त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेला गेले.
२१. ते निघून गेल्यावर ते पुरुष विहिरीतून बाहेर निघाले; त्यांनी जाऊन दावीद राजाला खबर दिली, आणि ते दाविदाला म्हणाले, “उठा, नदीचा पार उतरून लवकर पलीकडे जा; अहीथोफेलाची तुमच्याविरुद्ध अमुक अमुक मसलत आहे.”
२२. तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे सर्व लोक यार्देनेपार गेले. सकाळी उजाडले तेव्हा यार्देनेच्या पलीकडे गेला नाही असा कोणीच मागे राहिला नाही.
२३. आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले.
२४. मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला.
२५. अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा ह्याला सेनापती नेमले. यवाबाची आई सरूवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती; हिच्या अबीगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्राएली पुरुष गेला होता, त्याचा पुत्र हा अमासा होय.
२६. इस्राएल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला.
२७. दावीद महनाईम येथे आला तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बातला नाहाशाचा पुत्र शोबी व लो-दबारातील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील बर्जिल्लय गिलादी ह्यांनी
२९. मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला; हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व थकलेले असतील असे त्यांना वाटले.
१. दाविदाने दाने आपल्याबरोबरच्या लोकांची मोजदाद केली व त्यांच्यावर सहस्रपती व शतपती नेमले.
२. मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”
३. लोकांनी म्हटले, “आपण येऊ नये; कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यांना काही वाटणार नाही; आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यांना काही वाटायचे नाही; पण आपण तर आमच्यातल्या दहा हजारांच्या ठिकाणी आहात; म्हणून आपण नगरात राहूनच आम्हांला कुमक पाठवावी हे उत्तम.”
४. राजा त्यांना म्हणाला, “तुम्हांला योग्य वाटते तसे मी करतो.” मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला, आणि लोक शंभरशंभर, हजारहजार असे बाहेर निघाले.
५. राजाने यवाब, अबीशय व इत्तय ह्यांना आज्ञा केली की, “त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमाविषयी आपल्या सरदारांना जी आज्ञा दिली ती सर्व लोकांनी ऐकली.
६. ह्या प्रकारे ते लोक इस्राएल लोकांशी सामना करण्यासाठी रणांगणात गेले, आणि एफ्राइमाच्या रानात लढाईला तोंड लागले.
७. तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्राएल लोकांचा मोड झाला; त्या दिवशी एवढा संहार झाला की वीस हजार लोक कामास आले.
८. लढाई देशभर चालली; त्या दिवशी तलवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला.
९. अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता; खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्यांखालून चालले असताना अबशालोमाचे डोके त्या वृक्षाला अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्याखालून निघून गेले.
१०. हे पाहून एका माणसाने यवाबाला सांगितले की, “अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला.”
११. यबावाने त्या खबर देणार्या माणसाला म्हटले, “तू त्याला तसे पाहून तेथल्या तेथे मारून जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा शेकेल रुपे व कमरबंद दिला असता.”
१२. तो माणूस यवाबाला म्हणाला, “हजार रुपये माझ्या हातावर ठेवले तरी मी राजकुमारावर हात टाकणार नाही; कारण तुमच्यातल्या कोणीही त्या तरुण पुरुषाला म्हणजे अबशालोमाला हात लावू नये अशी आज्ञा राजाने तुला, अबीशयाला व इत्तयाला दिली ती आम्हांला माहीत आहे.
१३. मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता; तूही माझ्याविरुद्ध झाला असतास कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही.”
१४. यवाब म्हणाला, “तुझ्या नादी लागून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.” मग त्याने हाती तीन तीर घेऊन एला वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमाच्या वक्षस्थळी ते भोसकले.
१५. यवाबाच्या दहा शस्त्रवाहक तरुण पुरुषांनी त्याच्याभोवती जमून त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले.
१६. मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा लोक इस्राएलाचा पाठलाग करण्याचे सोडून परतले; कारण यवाबाने लोकांची गय केली.
१७. तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्यांकडे गेले.
१८. आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात घेऊन अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारला होता, तो राजाच्या खोर्यात आहे. त्या मनोर्याला त्याने आपले नाव दिले; आजपर्यंत त्याला अबशालोमाचा स्मारकस्तंभ म्हणत आले आहेत.
१९. सादोकाचा पुत्र अहीमास म्हणाला की, “परमेश्वराने आपल्या शत्रूंचे पारिपत्य केले आहे, तर आता धावत जाऊन ही खबर राजाला देऊ द्या.”
२०. यवाब त्याला म्हणाला, “आज ही खबर घेऊन जाऊ नकोस; दुसर्या एखाद्या दिवशी ती घेऊन जा; पण आज ती नेऊ नकोस; कारण राजाचा पुत्र मृत्यू पावला आहे.”
२१. नंतर यवाब एका कूशी माणसाला म्हणाला, “तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग.” तेव्हा तो कूशी यवाबाला नमन करून धावत गेला.
२२. सादोकाचा पुत्र अहीमास पुन्हा यवाबाला म्हणाला, “काहीही होवो पण मलाही कूशीच्या मागोमाग दौड करू दे.” यवाब म्हणाला, “माझ्या मुला, इनाम मिळण्याजोगी खबर काही तुझ्याजवळ नाही, तर का दौड करतोस?”
२३. तो म्हणाला, “काहीही होवो, मला धावत जाऊ दे.” त्याने त्याला म्हटले, “धाव.” तेव्हा अहीमास दौड करून मैदानाच्या वाटेने कूशीच्या पुढे निघून गेला.
२४. दावीद वेशीच्या दोन्ही दरवाजांच्या दरम्यान बसला होता, आणि पहारेकरी वेशीवर चढून तटावर गेला होता; त्याने दूर नजर करून पाहिले तर एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.
२५. पहारेकर्याने पुकारून राजाला ते सांगितले तेव्हा राजा म्हणाला, “तो एकटाच येत असला तर तो काहीतरी खबर घेऊन येत आहे.” इतक्यात तो मनुष्य धावत धावत जवळ येऊन पोहचला.
२६. पहारेकर्याने दुसरा एक मनुष्य धावत येताना पाहिला; तेव्हा त्याने वेसकर्याला हाक मारून सांगितले, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे.” राजा म्हणाला, “तोही काही खबर आणत असावा.”
२७. पहारेकरी म्हणाला, “पहिल्याची दौड सादोकाचा पुत्र अहीमास ह्याच्या दौडीसारखी आहे असे मला वाटते.” राजा म्हणाला, “तो भला मनुष्य आहे, त्याने काही चांगली खबर आणली असावी.”
२८. मग अहीमासाने येऊन “महाराजांचे क्षेम असो,” असे म्हटले, आणि जमिनीपर्यंत लवून राजाला मुजरा केला व म्हटले, “आपला देव परमेश्वर धन्य आहे, त्याने माझ्या स्वामीराजांवर हात उचलणार्या माणसांना आपल्या काबूत दिले आहे.”
२९. राजाने विचारले, “तरुण अबशालोम खुशाल आहे ना?” अहीमास म्हणाला, “यवाबाने एका सेवकाला व आपला दास जो मी त्याला पाठवले तेव्हा माझ्या दृष्टीला मोठी गर्दी पडली, पण काय झाले ते मला कळले नाही.”
३०. राजा त्याला म्हणाला, “बाजूला सरून येथे उभा राहा.” तेव्हा तो बाजूस होऊन तेथे उभा राहिला.
३१. इतक्यात कूशीही येऊन म्हणाला, “स्वामीराजांसाठी मी खबर आणली आहे; परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे.”
३२. राजाने कूशीला विचारले, “तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना?” कूशी म्हणाला, “माझ्या स्वामीराजांचे शत्रू व जे कोणी आपली हानी करायला उठतील त्यांचे त्या तरुणासारखे होवो!”
३३. तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्गार काढले; “माझ्या पुत्रा अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा: तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरेरे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!!”
१६. अहो देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, ऐका; त्याने माझ्या जिवासाठी जे केले आहे ते मी सांगतो.
१७. मी आपल्या मुखाने त्याचा धावा केला, माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.
१८. माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता;
१९. पण देवाने ऐकलेच आहे; माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे.
२०. देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही.
३१. पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो;
३२. ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्यापेक्षा श्रेष्ठ होय.
२८. ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरीपण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही.
२९. मी तर त्याला ओळखतो; कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.”
३०. ह्यावरून ते त्याला धरण्यास पाहत होते; तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती.
३१. तेव्हा लोकसमुदायातील बर्याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक काय करणार आहे?”
३२. लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले; आणि मुख्य याजक व परूशी ह्यांनी त्याला धरण्यास कामदार पाठवले.
३३. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे, मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.
३४. तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.”
३५. ह्यामुळे यहूदी आपसांत म्हणाले, “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यांस शिकवणार काय?
३६. ‘तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हांला सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ ह्या त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय?”
३७. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
३८. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”
३९. (ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.)
४०. लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणत होते, “हा खरोखर तो संदेष्टा आहे.”
४१. कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येतो काय?
४२. ‘दाविदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलेहेमात’ दावीद होता त्या गावातून ख्रिस्त ‘येणार’ असे शास्त्रात सांगितले नाही काय?”
४३. ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली.
४४. त्यांच्यातील कित्येक जण त्याला धरायला पाहत होते. तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही.
४५. मग मुख्य याजक व परूशी ह्यांच्याकडे कामदार आले; त्यांना ते म्हणाले, “तुम्ही त्याला का आणले नाही?”
४६. कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”
४७. त्यावरून परूशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसला आहात काय?
४८. अधिकार्यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?
४९. पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”
५०. त्याच्याकडे पूर्वी आलेला निकदेम हा त्यांच्यापैकी एक होता तो त्यांना म्हणाला,
५१. “एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्यावाचून व तो काय करतो ह्याची माहिती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”
५२. त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलातले आहात काय? शोध करून पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही.”
५३. [मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide