बायबल एकाच वर्षात

१. “अबशालोमासाठी राजा विलाप करीत आहे” असे यवाबाच्या कानी आले.
२. “राजा आपल्या पुत्रासाठी दु:ख करीत आहे” असे लोकांनी ऐकल्यामुळे त्या दिवशीचा तो विजय सर्व लोकांना शोकरूप झाला.
३. युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवतात त्याप्रमाणे लोक लपतछपत नगरात आले.
४. राजा आपले मुख झाकून मोठा विलाप करून म्हणाला, “अरेरे! माझ्या पुत्रा अबशालोमा! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!”
५. यवाब घरात राजाकडे जाऊन म्हणू लागला, “आपल्या सेवकांनी आज आपला, आपल्या पुत्रांचा, कन्यांचा, पत्नींचा आणि आपल्या उपपत्नींचा प्राण वाचवला आहे; त्या आपल्या सेवकांचे तोंड आपण आज काळे केले आहे.
६. आपण आपल्या द्वेष्ट्यावर प्रेम करता आणि आपणावर प्रेम करणार्‍यांचा द्वेष करता. आपण आज असे प्रकट केले आहे की, सरदार व सेवक हे आपणाला काहीच नव्हत; अबशालोम जिवंत राहिला असता आणि आम्ही सर्व मेलो असतो तर आपणाला बरे वाटले असते असे मला आज समजून आले आहे.
७. तर आता उठून बाहेर जा आणि आपल्या सेवकांचे समाधान करा; नाहीतर मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की, आपण बाहेर गेला नाहीत, तर आज रात्री आपल्याजवळ एकसुद्धा मनुष्य राहायचा नाही; आणि बाळपणापासून कधी ओढवले नाही असले संकट आपल्यावर ओढवेल.”
८. तेव्हा राजा उठून वेशीत जाऊन बसला. राजा वेशीत बसला आहे हे सर्व लोकांना कळले तेव्हा सर्व लोक राजासमोर आले. इकडे इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांकडे पळून गेले. दावीद यरुशलेमेस परत येतो
९. इस्राएलाच्या सर्व वंशातल्या लोकांचा आपसात वाद चालला होता; ते म्हणू लागले की, “राजाने आम्हांला आमच्या शत्रूंच्या हातातून सोडवले, पलिष्ट्यांच्या हातातून आमचा बचाव केला; पण आता तो अबशालोमाच्या भीतीने देश सोडून पळून गेला आहे.
१०. आपण अबशालोमास राज्याभिषेक केला, पण तो युद्धात पडला; तर आता राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काही बोलत नाही हे काय?”
११. मग दावीद राजाने सादोक व अब्याथार याजकांना सांगून पाठवले की, “यहूदी वडील जनांना सांगा, ‘राजाला मंदिरात परत न्यावे असे इस्राएल लोकांचे बोलणे चालले आहे हे राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या मंदिरात नेण्याच्या बाबतीत तुम्ही सर्वांच्या मागे का राहता?
१२. तुम्ही तर माझे भाऊबंद, माझ्या हाडामांसाचे आहात, तर राजाला परत घेऊन जाण्याच्या कामी तुम्ही सर्वांच्या मागे का?
१३. अमासाला सांगा की, तू तर माझ्या हाडामांसाचा ना? तू यवाबाच्या ठिकाणी कायमचा सेनापती झाला नाहीस तर देव माझे त्या मानाने व त्याहूनही अधिक पारिपत्य करो.”’
१४. ह्या प्रकारे त्याने यहूदाच्या लोकांना एकदिल करून त्यांची मने वळवली; त्यांनी राजाकडे सांगून पाठवले की, “आपण आपले सर्व सेवक घेऊन माघारी या.”’
१५. राजा मागे परतून यार्देनेपर्यंत आला आणि यहूदी यार्देन नदीच्या अलीकडे राजाला घेऊन येण्यासाठी गिलगाल येथे सामोरे गेले.
१६. यहूद्यांबरोबर बहूरीम येथील बन्यामिनी शिमी बिन गेरा हाही त्वरा करून दावीद राजाला सामोरा गेला.
१७. त्याच्याबरोबर एक हजार बन्यामिनी पुरुष होते; त्याप्रमाणेच शौलाच्या घराण्यातला सेवक सीबा हा आपले पंधरा पुत्र व वीस चाकर ह्यांना घेऊन तेथे आला; ते राजापुढे यार्देनेच्या पलीकडे पायी गेले.
१८. राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेवली होती. राजा यार्देन उतरून जाण्यासाठी आला तेव्हा गेराचा पुत्र शिमी त्याच्या पाया पडून म्हणाला,
१९. “माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये, ज्या दिवशी माझे स्वामीराज यरुशलेम सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले त्याचे स्मरण करू नये. महाराजांनी ते मनात ठेवू नये.
२०. आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे; म्हणून पाहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे.”
२१. सरूवेचा पुत्र अबीशय म्हणाला, “शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला तर त्याचा वध करू नये काय?”
२२. दावीद म्हणाला, “सरूवेच्या पुत्रांनो, मला तुमच्याशी काय कर्तव्य आहे? कारण आज तुम्ही विरोधी झाला आहात, इस्राएलातल्या कोणाचा आज वध करावा काय? आज मी इस्राएलाचा राजा आहे हे मला कळत नाही काय?”
२३. मग राजा शिमीस म्हणाला, “तू प्राणाला मुकणार नाहीस.” राजाने त्याच्याशी आणभाक केली.
२४. शौलाचा नातू मफीबोशेथ हा राजाच्या भेटीसाठी आला; राजा निघून गेला होता तेव्हापासून तर तो सुखरूप घरी परत येईपर्यंत त्याने आपले पाय धुतले नव्हते; आपली दाढी नीटनेटकी केली नव्हती व वस्त्रेही धुतली नव्हती.
२५. यरुशलेमकर राजाला भेटायला गेले तेव्हा राजाने विचारले, “मफीबोशेथा, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”
२६. तो म्हणाला, “माझे स्वामीराज, माझ्या सेवकाने मला फसवले; आपला दास पंगू आहे म्हणून आपल्या दासाने विचार केला की, मी आपल्या गाढवावर खोगीर घालून त्यावर स्वार होऊन महाराजांकडे जावे.
२७. माझ्या सेवकाने स्वामीराजांकडे माझी चहाडी केली आहे; पण माझे स्वामीराज देवदूतासारखे आहेत; आता आपल्या मर्जीस येईल तसे करा.
२८. माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्‍यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?”
२९. राजा त्याला म्हणाला, “तू आपल्या गोष्टी पुन्हा का काढतोस? माझी आज्ञा आहे की, तू व सीबा जमीन वाटून घ्या.”
३०. मफीबोशेथ राजाला म्हणाला, “माझे स्वामीराज सुखरूप आपल्या मंदिरी आले आहेत, तर सीबालाच ती सर्व जमीन घेऊ द्या.”
३१. मग बर्जिल्लय गिलादी हा रोगलीम येथून आला आणि राजाला यार्देनेपार पोचवण्यासाठी त्याच्याबरोबर नदी उतरून गेला.
३२. बर्जिल्लय फार वयातीत होता; त्याचे वय ऐंशी वर्षांचे होते. राजा महनाईम येथे तळ देऊन राहिला होता तेव्हा बर्जिल्लयाने त्याला अन्नपाणी पुरवले होते; तो फार मोठा मनुष्य होता.
३३. राजा बर्जिल्लयाला म्हणाला, “माझ्याबरोबर चल; मी तुला यरुशलेमेत आपल्याजवळ ठेवून तुझे पालनपोषण करीन.”
३४. बर्जिल्लय राजाला म्हणाला, “माझ्या आयुष्याचे आता किती दिवस उरले आहेत की मी महाराजांबरोबर यरुशलेमेस जावे?
३५. आज मी ऐंशी वर्षांचा आहे; ह्या वयात मला बर्‍यावाइटाचा भेद काय समजणार? आपला दास जे काही खातोपितो त्याची चव त्याला कळते काय! गाणार्‍यांचा व गाणारणींचा शब्द मला ऐकू येतो काय? तर आपल्या दासाने माझ्या स्वामीराजांना भार का व्हावे?
३६. आपला दास महाराजांबरोबर फक्त यार्देनेपार येत आहे; महाराजांनी ह्याचा एवढा मोठा मोबदला मला काय म्हणून द्यावा?
३७. आपल्या दासाला परत जाऊ द्या. म्हणजे माझ्या स्वतःच्या गावी माझ्या आईबापाच्या कबरस्तानाजवळ मी मरेन; पण आपला दास किम्हाम हा हजर आहे. त्याला माझ्या स्वामीराजांबरोबर पलीकडे जाऊ द्या; मग आपणाला वाटेल ते त्याचे करा.”
३८. राजा म्हणाला, “किम्हामाने माझ्याबरोबर पलीकडे यावे; तुला बरे वाटेल तसे मी त्याचे करीन; तू जे काही मला सांगशील ते मी तुझ्यासाठी करीन.”
३९. मग सारे लोक यार्देनेपलीकडे गेले; राजाही पलीकडे गेला; राजाने बर्जिल्लयाचे चुंबन घेऊन त्याचे अभीष्ट चिंतले; आणि तो स्वस्थानी परत गेला.
४०. ह्या प्रकारे राजा नदी उतरून गिलगालास गेला; किम्हामही त्याच्याबरोबर गेला, यहूदाचे सर्व लोक व अर्धे इस्राएल लोक राजाला पलीकडे घेऊन गेले.
४१. तेव्हा सर्व इस्राएल येऊन राजाला म्हणू लागले, “आमचे बांधव यहूदाचे लोक हे आपणाला चोरून छपवून घेऊन आले; महाराजांना त्यांच्या परिवाराला व त्यांच्या सर्व लोकांना यार्देनेपार आणले असे का?”
४२. तेव्हा सर्व यहूद्यांनी इस्राएल लोकांना उत्तर दिले, “महाराज आमचे जवळचे आप्त आहेत, तर तुम्ही ह्याबद्दल का रुसता? आमच्या खाण्यापिण्याबद्दल महाराजांना काही खर्च झाला आहे काय? त्यांनी आम्हांला काही इनाम दिले आहे काय?”
४३. इस्राएल लोक यहूद्यांना म्हणाले, “महाराज दहा हिश्शांनी आमचे आहेत; तुमच्याहून आमचा दाविदावर जास्त हक्क आहे; तर तुम्ही आम्हांला तुच्छ समजून आमच्या महाराजांना माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला का घेतला नाही?” इस्राएल लोकांच्या भाषणापेक्षा यहूदी लोकांचे भाषण कठोरपणाचे होते.
१. बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”
२. तेव्हा सर्व इस्राएल लोक दाविदाला सोडून देऊन बिक्रीचा पुत्र शबा ह्याच्यामागून गेले; पण यार्देनेपासून यरुशलेमेपर्यंतचे यहूदी लोक आपल्या राजाला धरून राहिले.
३. दावीद यरुशलेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या दहा उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेवल्या होत्या त्यांना त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतूद केली; पण त्याने त्यांच्याशी समागम केला नाही. त्या आमरण वैधव्यदशेत तशाच अटकेत राहिल्या.
४. मग राजा अमासाला म्हणाला, “तीन दिवसांच्या आत यहूदा वंशाचे लोक जमा कर आणि तूही हजर हो.”
५. अमासा यहूदा वंशाच्या लोकांना बोलावण्यासाठी गेला, पण नेमून दिलेल्या मुदतीबाहेर त्याला विलंब लागला.
६. तेव्हा दावीद अबीशय ह्याला म्हणाला, “आता बिक्रीचा पुत्र शबा हा अबशालोमापेक्षाही आमचे अधिक वाईट करणार; तर तू आपल्या स्वामीचे लोक बरोबर घेऊन त्याचा पाठलाग कर, नाहीतर तो तटबंदी नगराचा आश्रय करून आमच्या दृष्टिआड लपून राहील.”
७. तेव्हा यवाबाचे सैनिक, करेथी व पलेथी व सर्व शूर वीर अबीशयामागून गेले; बिक्रीचा पुत्र शबा ह्याचा पाठलाग करण्यासाठी ते यरुशलेमेतून बाहेर पडले.
८. ते गिबोनातल्या मोठ्या शिळेजवळ जाऊन पोहचले तेव्हा अमासा त्यांना येऊन भेटला. यवाबाने आपल्या अंगात चिलखत घातले होते आणि वरून कमरबंद कसलेला असून म्यानात घातलेली एक तलवार कमरेला लटकवली होती, तिचे म्यान निघून ती खाली पडली.
९. यवाबाने अमासाला विचारले, “बंधो, तू खुशाल आहेस ना?” असे म्हणून यवाबाने चुंबन घेण्याच्या निमित्ताने अमासाची दाढी उजव्या हाताने धरली.
१०. यवाबाच्या हाती असलेल्या तलवारीकडे अमासाचे लक्ष गेले नाही; त्याने अमासाच्या पोटात ती भोसकून त्याची आतडी जमिनीवर पाडली; त्याने त्याला पुन्हा वार केला नाही; तेवढ्यानेच त्याचा प्राण गेला, मग यवाब व त्याचा भाऊ अबीशय ह्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचा पाठलाग केला.
११. यवाबाच्या त्या मंडळीपैकी एक जण अमासाजवळ राहून म्हणाला, “जो कोणी यवाबाच्या पक्षाचा व दाविदाला अनुकूल असेल त्याने यवाबाच्या मागून जावे.”
१२. अमासा भर रस्त्यात रक्तात लोळत पडला होता. सर्व लोक स्तब्ध उभे आहेत असे त्या माणसाने पाहिले तेव्हा त्याने अमासाला सडकेवरून काढून एका शेतात नेले; तेथेही जो येतो तो स्तब्ध उभा राहतो असे पाहून त्याने त्याच्यावर एक वस्त्र टाकले.
१३. त्याला सडकेवरून काढून नेल्यावर सर्व लोक बिक्रीचा पुत्र शबा ह्याचा पाठलाग करण्यासाठी यवाबाच्या मागून गेले.
१४. नंतर यवाब इस्राएली वंशाच्या लोकांतून जाऊन आबेल व बेथ-माका येथपर्यंत गेला व बेर्‍यांच्या सर्व प्रदेशातून गेला; मग तेही एकवट होऊन त्याच्या मागून गेले.
१५. मग त्यांनी बेथ-माकाचे आबेल येथे शबा ह्याला घेरले, आणि नगरासमोर त्यांनी मोर्चा लावला; तो बाहेर कोटासमोर होता. मग यवाबाबरोबरचे सर्व लोक तट पाडण्यासाठी त्यावर आघात करू लागले.
१६. तेव्हा नगरातून एका शहाण्या बाईने हाक मारून म्हटले, “ऐका हो, ऐका; यवाबाला सांगा, अंमळ जवळ ये, मला तुला काही सांगायचे आहे.”
१७. तो तिच्याजवळ गेला तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “यवाब तो तूच काय?” तो म्हणाला, “होय, मीच तो.” मग ती त्याला म्हणाली, “तुझ्या दासीचे म्हणणे ऐक.” तो म्हणाला, “सांग, मी ऐकतो.”
१८. ती म्हणाली, “प्राचीन काळी लोक म्हणत की मसलत विचारायची तर ती आबेल नगरात विचारावी व असे केले म्हणजे झाले.
१९. शांतिप्रिय व विश्वासपात्र अशा इस्राएलांपैकी मी आहे. तू इस्राएलाच्या एका मातृनगराचा नाश का करू पाहत आहेस; परमेश्वराचे वतन तू का ग्रासू पाहतोस?”
२०. यवाब म्हणाला, “मी ते ग्रासून टाकावे अथवा त्याचा विध्वंस करावा ही गोष्ट माझ्यापासून दूर राहो; अगदी दूर राहो.
२१. हा प्रकार काही तसा नव्हे. एफ्राईम डोंगरातल्या शबा बिन बिक्री नावाच्या एका माणसाने दावीद राजावर हात उचलला आहे; तेवढा माणूस आमच्या स्वाधीन करा म्हणजे मी नगर सोडून जाईन.” ती स्त्री यवाबाला म्हणाली, “त्या माणसाचे शिर तटावरून तुझ्याकडे फेकू.”
२२. मग त्या स्त्रीने ही आपली शहाणपणाची मसलत सर्व लोकांपुढे मांडली. तेव्हा त्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचे शिर छेदून यवाबाकडे फेकून दिले. यवाबाने रणशिंग वाजवले आणि सर्व लोक नगराजवळून पांगून आपापल्या डेर्‍यांकडे गेले. आणि यवाब यरुशलेमेस राजाकडे परत गेला.
२३. यवाब इस्राएलाच्या सर्व सैन्यावर होता; यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी ह्यांच्यावर होता;
२४. अदोराम वेठबिगारीवर होता; अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा अखबारनवीस होता;
२५. शबा चिटणीस होता; सादोक व अब्याथार हे याजक होते;
२६. आणि याइरी ईरा दाविदाचा एक मुख्य मंत्री होता.
१. मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने गायचे संगीतस्तोत्र. देवाने आमच्यावर दया करावी व आम्हांला आशीर्वाद द्यावा; त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा; (सेला)
२. ह्यासाठी की, पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे.
३. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत.
४. राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत; कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. (सेला)
५. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत; सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत.
६. भूमीने आपला उपज दिला आहे; देव, आमचा देव, आम्हांला आशीर्वाद देवो.
७. देव आम्हांला आशीर्वाद देवो, व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.
३३. पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून होतो.
१. एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा.
१. पण येशू जैतुनांच्या डोंगराकडे गेला.
२. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला.
३. त्या वेळी व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परूशी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले,
४. “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली.
५. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा; तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?”
६. त्याला दोष लावायला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला.
७. आणि ते त्याला एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा.”
८. मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला.
९. हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती.
१०. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?”
११. ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा; ह्यापुढे पाप करू नकोस.]
१२. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
१३. ह्यावरून परूशी त्याला म्हणाले, “तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.”
१४. येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली, तरी माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे; मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही.
१५. तुम्ही देहबुद्धीने न्याय करता; मी कोणाचा न्याय करत नाही.
१६. आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे; कारण मी एकटा नाही तर मी आहे व ज्याने मला पाठवले तोही आहे.
१७. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे.
१८. मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो.”
१९. ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही; तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
२०. तो मंदिरात शिकवत असता ही वचने जामदारखान्यात बोलला; तरी त्याला कोणी धरले नाही, कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती.
२१. ह्यानंतर येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापांत मराल; मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”
२२. ह्यावर यहूदी म्हणाले, “‘मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही’ असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही?”
२३. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे, तुम्ही ह्या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही.
२४. म्हणून मी तुम्हांला सांगितले की, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहे१ असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.”
२५. ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुम्ही कोण आहात?” येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला जे सांगत आलो तेच नाही का?२
२६. मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे; परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो.”
२७. तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide