बायबल एकाच वर्षात

१. मग सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे जमा होऊन म्हणू लागले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत;
२. गतकाळी शौल आमच्यावर राजा असताना इस्राएलाची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता; आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की, ‘माझी प्रजा इस्राएल ह्यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”’
३. ह्या प्रकारे इस्राएल लोकांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला आणि परमेश्वराने शमुवेलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा नेमले.
४. नंतर दावीद व सर्व इस्राएल लोक यरुशलेमेस गेले (ह्यालाच यबूस असे म्हणतात); त्या देशाचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत असत.
५. यबूस येथल्या रहिवाशांनी दाविदाला सांगितले की, “तू येथे येऊ नकोस.” तथापि दाविदाने सीयोन नावाचा गड सर केला; त्यालाच दावीदपूर म्हणतात.
६. दावीद म्हणाला, “जो कोणी सर्वांच्या आधी यबूसी लोकांना मार देईल तो मुख्य सेनापती होईल.” सरूवेचा पुत्र यवाब हा प्रथम चढाई करून गेला म्हणून त्याला सेनापती केले.
७. दावीद त्या गडात राहू लागला म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले.
८. त्याने नगराला चोहोकडून म्हणजे मिल्लोपासून सभोवार कोट बांधला आणि यवाबाने बाकीच्या नगराचा जीर्णोद्धार केला.
९. दावीद अधिकाधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर असे.
१०. इस्राएलाविषयी परमेश्वर बोलला होता त्यानुसार दाविदाच्या ज्या शूर वीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात साहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत.
११. दाविदाकडे असलेल्या शूर वीरांची नावे ही: हखमोन्याचा पुत्र याशबाम हा तिसांचा१ नायक असून त्याने तीनशे लोकांवर भाला चालवून त्यांना एका प्रसंगी मारून टाकले.
१२. त्याच्या खालोखाल अहोही दोदय ह्याचा पुत्र एलाजार हा होता; तो तिघा महावीरांपैकी एक होता.
१३. तो पस-दम्मीम२ येथे दाविदाबरोबर होता; तेथे पलिष्ट्यांनी एकत्र होऊन जवाच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले.
१४. त्यांनी त्या शेतामध्ये उभे राहून त्याचे रक्षण करून पलिष्ट्यांचा संहार केला; त्या प्रसंगी परमेश्वराने त्यांना मोठा विजय प्राप्त करून देऊन त्यांचा बचाव केला.
१५. मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात छावणी देऊन होते.
१६. त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.
१७. दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर किती बरे!”
१८. त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतले.
१९. तो म्हणाला, “हे माझ्या देवा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून हे आणले आहे.” म्हणून तो ते पिईना. त्या तिघा वीरांनी हे कृत्य केले.
२०. यवाबाचा भाऊ अबीशय हा त्या तिघांचा प्रमुख होता; त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले; त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.
२१. त्या तिघांमध्ये त्याची महती विशेष होती म्हणून तो त्यांचा नायक झाला; तरी तो पहिल्या तिघांच्या योग्यतेस पोहचला नाही.
२२. कबसेल येथला एक मनुष्य होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नावाच्या पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहास ठार केले.
२३. मग त्याने पाच हात उंचीच्या एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार केले; त्या मिसर्‍याच्या हाती साळ्याच्या तुरीसारखा एक भाला होता; पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्या भाल्याने त्याचा वध केला.
२४. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले.
२५. त्या तिसांहून त्याची महती विशेष होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही; दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले.
२६. सैन्यातील वीर हे: यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमाच्या दोदोचा पुत्र एलहानान,
२७. शम्मोथ हरोरी, हेलस पलोनी,
२८. इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा, अबियेजेर, अनाथोथी,
२९. सिब्बखय हूशाथी, ईलाय अहोही,
३०. महरय नटोफाथी, बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेद,
३१. बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी,
३२. गाशाच्या ओढ्यांजवळचा हूरय अबीएल अर्बाथी,
३३. अजमावेथ बहरूमी, अलीहबा शालबोनी,
३४. गिजोनकर हाशेमाचे पुत्र, हरारी शागे ह्याचा पुत्र योनाथान,
३५. हरारी साखार ह्याचा पुत्र अहीयाम, ऊराचा पुत्र अलीफल,
३६. हेफेर मखेराथी, अहीया पलोनी,
३७. हेस्री कर्मेली, एजबयाचा पुत्र नारय,
३८. नाथानाचा भाऊ योएल, हग्रीचा पुत्र मिभार,
३९. सेलक अम्मोनी, सरूवेचा पुत्र यवाब ह्याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
४०. ईरा इथ्री, गारेब इथ्री,
४१. उरीया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद,
४२. रऊबेनी शीजा ह्याचा पुत्र अदीना. हा रऊबेन्यांचा सरदार, त्याच्याबरोबर तीस जण असत,
४३. माकाचा पुत्र हानान, योशाफाट मिथनी,
४४. उज्जीया अष्टराथी, होथाम अरोएरी ह्याचे पुत्र शमामा व यहीएल,
४५. शिम्रीचा पुत्र यदीएल व त्याचा भाऊ योहा तीसी,
४६. अलिएल महवी व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्या, इथ्मा मवाबी,
१. दावीद सिकलाग येथे कीशाचा पुत्र शौल ह्याच्या भीतीने लपून राहत होता त्या वेळी जे त्याच्याकडे आले व ज्यांनी त्याला युद्धात कुमक केली ते शूर वीर हे:
२. ते धनुर्धारी असून उजव्याडाव्या अशा दोन्ही हातांनी गोफणगुंडे व धनुष्यबाण मारीत असत; हे शौलाच्या भाऊबंदांपैकी असून बन्यामिनी वंशातले होते.
३. त्यांच्यातला प्रमुख अहीएजर व दुसरा योवाश, हे गिबावासी शमा ह्याचे पुत्र; तसेच अजमावेथ ह्याचे पुत्र यजिएल व पेलेट, बराका व अनाथोथी येहू;
४. गिबोनी इश्माया हा तिसांतला एक महावीर असून त्या तिसांवर नायक होता; आणि यिर्मया, यहजिएल, योहानान, गदेराचा योजाबाद,
५. एलूजय यरीमोथ, बाल्या, शमर्‍या, हरूफी शफाट्या,
६. एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर व याशबाम हे कोरहाचे वंशज;
७. आणि गदोरी यरोहामाचे पुत्र योएला व जबद्या,
८. दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे:
९. एजेर मुख्य, ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा,
१०. मिश्मन्ना चवथा, यिर्मया पाचवा,
११. अत्तय सहावा, एलीएल सातवा,
१२. योहानान आठवा, एलजाबाद नववा,
१३. यिर्मया दहावा आणि मखबन्नय अकरावा.
१४. हे गादी सेनानायक होते; त्यांच्यातला कनिष्ठ शंभरांच्या तोडीचा होता व त्यांच्यातला श्रेष्ठ हजारांच्या तोडीचा होता.
१५. पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहते तेव्हा ह्यांनीच नदीपार जाऊन पूर्व व पश्‍चिम ह्या दोन दिशांकडल्या खोर्‍यांतील लोकांना पळवून लावले.
१६. बन्यामिनी व यहूदी लोकांपैकीही काही लोक दाविदाकडे गढीत गेले.
१७. दावीद त्यांना सामोरा जाऊन म्हणाला, “तुम्ही केवळ मित्रभावाने कुमक करण्यासाठी माझ्याकडे आला असल्यास माझे मन तुमच्याशी जडून राहील; पण तुम्ही माझ्याशी दगा करून मला शत्रूंच्या हाती देण्यासाठी आला असाल तर आपल्या पूर्वजांचा देव हे पाहून तुम्हांला शासन करो, कारण माझ्या हातून काही उपद्रव झालेला नाही.”
१८. मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.
१९. शौलाबरोबर युद्ध करण्यासाठी दावीद पलिष्ट्यांसह आला तेव्हा मनश्शेच्या लोकांपैकी काही लोक दाविदाला सोडून गेले होते. (तरी दाविदाने पलिष्ट्यांना साहाय्य केले नाही, कारण पलिष्ट्यांच्या सरदारांनी आपसांत सल्लामसलत करून त्याला घालवून दिले; ते म्हणाले, “तो आमची शिरे जोखमीत घालून आपला स्वामी शौल ह्याला पुन्हा जाऊन मिळायचा.”)
२०. तो सिक्लाग येथे गेला तेव्हा मनश्शेतले अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, सिलथय हे मनश्शेचे सहस्रपती फितून त्याच्याकडे गेले.
२१. त्यांनी लुटारूंच्या टोळीपासून दाविदाचे रक्षण केले; ते सर्व शूर वीर असून सेनानायक होते.
२२. दररोज लोक दाविदाची कुमक करण्यासाठी त्याला येऊन मिळत; शेवटी त्याची देवाच्या सेनेसारखी मोठी सेना बनली.
२३. परमेश्वराच्या वचनानुसार शौलाचे राज्य दाविदाच्या हाती द्यावे म्हणून जे लोक युद्ध करण्यासाठी हत्यारबंद होऊन हेब्रोन येथे त्याच्याकडे आले त्यांच्या प्रमुखांची गणती ही:
२४. यहूदी लोकांतले ढालबरची धारण करणारे, लढण्या-साठी हत्यारबंद झालेले लोक सहा हजार आठशे,
२५. शिमोनी वंशातले लढाईस सिद्ध झालेले शूर वीर सात हजार शंभर;
२६. लेव्यांतले चार हजार सहाशे इतके होते.
२७. अहरोन घराण्याचा नायक यहोयादा होता, त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते.
२८. सादोक नावाचा एक तरुण महावीरही आला; त्याच्याबरोबर त्याच्या बापाच्या घराण्यातले बावीस सेनानायक आले.
२९. शौलाचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्यापैकी तीन हजार आले; कारण हा वेळपावेतो बहुतेक बन्यामिनी लोक शौलाच्या घराण्यास धरून होते.
३०. एफ्राइमी लोकांतले महावीर जे आपापल्या पितृकुळांतील नामांकित पुरुष होते ते वीस हजार आठशे आले.
३१. मनश्शेच्या अर्ध्या वंशातले अठरा हजार लोक दाविदाला राजा करण्यास आले; त्यांची नावे नोंदण्यात आली.
३२. कालप्रवृत्ती ओळखून इस्राएलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इस्साखार वंशातील दोनशे नायक आले; त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते.
३३. युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन सैन्याचा व्यूह रचून चालून जाणारे जबुलून वंशातले पन्नास हजार योद्धे आले; त्यांना व्यूहरचना चांगली करता येत असून त्यांचे मन दुटप्पी नसे.
३४. नफताली वंशातले सेनानायक एक हजार व त्यांच्याबरोबर ढाल व भाला धारण करणारे सदतीस हजार आले.
३५. सैन्याची व्यूहरचना करणारे दान वंशातले अठ्ठावीस हजार सहाशे योद्धे आले.
३६. सैन्याची व्यूहरचना करणारे व सैन्याबरोबर लढाईस जाणारे आशेर वंशातले चाळीस हजार योद्धे आले.
३७. यार्देनेच्या पूर्वेस राहणारे रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यातले एक लक्ष वीस हजार लोक युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन आले.
३८. हे सर्व व्यूहरचना करणारे योद्धे दाविदाला सर्व इस्राएलाचा राजा करावे म्हणून हेब्रोन येथे खर्‍या मनाने आले; दाविदाला राजा करावे म्हणून वरकड सर्व इस्राएल लोकही एकदिल झाले.
३९. ते तेथे तीन दिवस दाविदाबरोबर खातपीत राहिले, कारण त्यांच्या भाऊबंदांनी त्यांच्यासाठी सर्व सामग्री तयार केली होती.
४०. ह्याखेरीज त्यांच्या आसपास जे राहत होते म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली ह्या प्रांतांपर्यंत जे राहत होते त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल आदिकरून भोजनवस्तू, गाढवे, उंट, खेचरे व बैल ह्यांवर लादून आणल्या; त्याप्रमाणेच त्यांनी बैल व शेरडेमेंढरे पुष्कळ आणली, कारण इस्राएलात उत्सव चालला होता.
१६. जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले; ती भयाने कंपित झाली, खोल जलेही खळबळली.
१७. मेघांनी वर्षाव केला; आभाळ कडाडले; तुझे बाणही सुटले.
१८. तुझ्या गर्जनेचा शब्द झंझावातात होता; विजांचा पृथ्वीवर लखलखाट झाला; भूमी कंपित होऊन डळमळली.
१९. समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावले दिसली नाहीत.
२०. मोशे व अहरोन ह्यांच्या हस्ते तू आपले लोक कळपांप्रमाणे नेले.
१७. जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्यांची फेड परमेश्वर करील.
१८. काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नकोस,
१९. क्रोधिष्ट मनुष्याने आपला दंड भोगला पाहिजे, कारण त्याला एकदा दंडमुक्त केले तर तसे पुनःपुन्हा करावे लागेल.
१. प्रमुख याजक म्हणाला, “ह्या गोष्टी अशाच आहेत काय?”
२. तेव्हा तो म्हणाला, “बंधुजनहो व वडिलांनो, ऐका. आपला पूर्वज अब्राहाम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम्या देशात असता ‘गौरवशाली देवाने’ त्याला दर्शन देऊन म्हटले,
३. ‘तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल.’
४. तेव्हा तो खास्द्यांच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला; मग त्याचा पिता मृत झाल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले.
५. पण त्यात त्याला वतन ‘दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही;’ त्याला मूलबाळ नव्हते तरी हा देश ‘त्याचा व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे’ अभिवचन देवाने त्याला दिले.
६. देवाने आणखी असे सांगितले की, ‘त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून चारशे वर्षे जाचतील.
७. ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन,’ असे देवाने सांगितले; आणि ‘त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा ह्या स्थळी करतील.’
८. त्याने त्याला ‘सुंतेचा करार’ लावून दिला; हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला; ‘त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली;’ मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.
९. नंतर कुलपतींनी ‘हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले’; पण ‘देव त्याच्याबरोबर होता’,
१०. त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.
११. मग ‘सर्व मिसर व कनान ह्या देशांत दुष्काळ पडून’ त्यांच्यावर जबर संकट आले आणि आपल्या पूर्वजांना अन्न मिळेनासे झाले.
१२. ‘तेव्हा मिसर देशात धान्य आहे हे ऐकून याकोबाने’ तुमच्याआमच्या पूर्वजांना पहिल्या खेपेस पाठवले.
१३. मग दुसर्‍या खेपेस ‘योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली’; आणि योसेफाचे कूळ फारो राजाला कळले.
१४. तेव्हा योसेफाने, आपला पिता याकोब व आपले सगळे नातलग ‘म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्यांना’ बोलावून घेतले.
१५. ह्याप्रमाणे ‘याकोब मिसर देशात गेला’ आणि तेथे तो व आपले पूर्वजही ‘मरण पावले;
१६. त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून’ रोख रुपये ‘देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना’ पुरले.
१७. मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात ‘वाढून संख्येने पुष्कळ झाले.
१८. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत’ असे चालले.
१९. तो राजा आपल्या ‘लोकांबरोबर कपटाने वागला’ आणि त्यांची बालके ‘जगू’ नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले; असे त्याने आपल्या पूर्वजांना ‘छळले’.
२०. त्याच काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण ‘तीन महिनेपर्यंत’ त्याच्या पित्याच्या घरी झाले;
२१. मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide