१. पहाडी रानशेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरिणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय?
२. त्यांचे महिने केव्हा भरतात ह्याचे गणित तुला करता येते काय? त्यांचा प्रसवकाळ तुला कळतो काय?
३. त्या ओणवून आपली पिले वितात; त्या प्रसूतिवेदनांपासून मुक्त होतात.
४. त्यांची पिले धष्टपुष्ट होऊन रानात वाढतात; ती त्यांना सोडून जातात, त्यांच्याकडे परत येत नाहीत.
५. रानगाढवाला कोणी स्वैर फिरू दिले? त्याला बंधमुक्त कोणी केले?
६. त्याचे निवासस्थान मी रुक्ष मैदानातील क्षारभूमी केले आहे.
७. नगरातील गजबजीचा त्याला तिटकारा असतो; हाकणार्याचा शब्द त्याच्या कानी पडत नाही.
८. डोंगरावर जे काही सापडेल ते त्याचा चारा; तो हरतर्हेची हिरवळ शोधत फिरतो.
९. रानबैल तुझी सेवा करण्यास मान्य होईल काय? तो रात्रीचा गव्हाणीत राहील काय?
१०. त्याच्या गळ्यात जुंपणी बांधून त्याला शेताच्या तासात तू चालवशील काय? तो तुझ्यामागून खोर्यातील जमीन कोळपील काय?
११. त्याचे बळ मोठे आहे म्हणून तू त्याच्यावर भिस्त ठेवशील काय? अथवा त्याच्यावर आपले काम सोपवशील काय?
१२. तो तुझे धान्य घरी आणील व तुझ्या खळ्यातले धान्य जमा करील असा त्याचा तुला भरवसा आहे काय?
१३. शहामृगीचे पंख आनंदाने फडफडतात; तिचे पिसारे व पर माया करण्याच्या कामी पडतात काय?
१४. ती आपली अंडी जमिनीच्या हवाली करते, ती धुळीत उबवते.
१५. ती कोणाच्या पायाखाली चिरडतील, किंवा कोणी वनपशू ती तुडवील, ह्याचे तिला भान नसते.
१६. ती आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हतच; आपले श्रम निष्फळ झाले तरी ती निश्चिंत राहते;
१७. कारण देवाने तिला बुद्धिहीन असे उत्पन्न केले आहे; तिच्या वाट्याला अक्कल आली नाही.
१८. ती आपली मान उंच उभारून आपले पंख फडफडवत धावते, तेव्हा ती घोड्याला व स्वाराला हसते.
१९. घोड्याला बळ तू देतोस काय? त्याच्या मानेवर हलणार्या आयाळीचे पांघरूण तू घालतोस काय?
२०. त्याला पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय? त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो.
२१. तो मैदानात टापा मारतो, तो आपल्या बलाचा अभिमान मिरवतो, तो हत्यारबंद शिपायांशी सामना करण्यास पुढे सरसावतो.
२२. तो भीतीस हसतो, व घाबरत नाही, तलवारीपासून मागे हटत नाही.
२३. भाता, चमकणारा भाला व बरची ही त्याच्यावर आपटून खणखणतात.
२४. तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो; रणशिंगाचा नाद ऐकताच तो अनावर होतो.
२५. रणशिंग जेव्हाजेव्हा वाजते तेव्हा तो ‘अहा!’ म्हणतो; लढाई, सरदारांची गर्जना व रणशब्द ह्यांचा वास तो दुरून काढतो.
२६. ससाणा तुझ्या चातुर्याने उडतो आणि दक्षिणेकडे उडून जाण्यास तो पंख फडफडवतो काय?
२७. गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो व उंच ठिकाणी घरटे करतो काय?
२८. तो खडकात वस्ती करतो, खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोटे करतो.
२९. तेथून तो आपले भक्ष्य निरखतो; त्याच्या नेत्रांना ते दूरवर दिसते.
३०. त्याची पिले रक्त चाखतात; जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो.”
१. परमेश्वराने ईयोबाला आणखी म्हटले,
२. “हा बोल लावणारा सर्वसमर्थाशी आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणार्याने आता उत्तर द्यावे.”
३. मग ईयोबाने परमेश्वराला उत्तर दिले.
४. “पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो.
५. एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही; मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही.” देवाच्या सामर्थ्याचे मूर्त स्वरूप
६. मग परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला:
७. “आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला विचारतो, मला सांग.
८. तू माझे न्याय्यत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय?
९. देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय?
१०. तू आपणास महिमा व प्रताप ह्यांनी भूषित कर; तेज व ऐश्वर्य धारण कर.
११. तुझ्या क्रोधाला भरते येऊ दे, आणि प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याची मानखंडना कर.
१२. प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याला खाली पाड आणि दुष्टाला जागच्या जागी तुडव.
१३. त्या सर्वांना मातीस मिळव; त्यांची तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.
१४. मग तुझा उजवा हात तुझा उद्धार करतो, अशी तुझी मीही प्रशंसा करीन.
१५. तुझ्याबरोबर निर्माण केलेल्या बेहेमोथास१ पाहा; तो बैलाप्रमाणे गवत खात असतो.
१६. पाहा, त्याच्या कंबरेत ताकद असते; त्याच्या पोटाच्या स्नायूंत सामर्थ्य असते.
१७. देवदारूच्या फांदीसारखे तो आपले शेपूट हलवतो; त्याच्या जांघांचे स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात.
१८. त्याची हाडे जणू काय पितळेच्या नळ्या, त्याच्या फासळ्या जणू काय लोखंडाचे गज.
१९. तो देवाची प्रमुख कृती आहे; त्याच्या निर्माणकर्त्याने त्याला तलवारीने सज्ज केले आहे.
२०. डोंगर त्याला चारा पुरवतात; तेथे सर्व वनपशू क्रीडा करतात.
२१. तो कमलिनीखाली, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत पडून राहतो.
२२. कमलिनी त्याच्यावर छाया करतात; ओहोळातले वाळुंज त्याला घेरतात.
२३. पाहा, नदीच्या पुराचा लोट त्यावर आला तरी तो डगमगत नाही; यार्देनेसारखा नदीचा प्रवाह झपाट्याने वाहून त्याच्या तोंडावर आदळला तरी तो निर्भय राहतो.
२४. तो सावध असता त्याला कोण धरील? पाशात पकडून त्याच्या नाकात वेसण कोण घालील?”
१. दाविदाचे स्तोत्र. दया व न्याय ह्यांविषयी मी गाईन; हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन,
२. मी सुज्ञतेने, सरळ मार्गाने चालेन; तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन.
३. मी अनुचित गोष्ट आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही; अनाचाराचा मी तिरस्कार करतो; तो मला बिलगणार नाही.
४. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल; मी वाइटाशी परिचय ठेवणार नाही.
२९. हाय हाय कोण म्हणतो? अरे अरे कोण करतो? भांडणतंट्यात कोण पडतो? गार्हाणी कोण सांगतो? विनाकारण घाय कोणास होतात? धुंदी कोणाच्या डोळ्यांत असते?
३०. जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात, जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांच्या.
१. तुमच्यापैकी कोणाएकाचा दुसर्याबरोबर वाद असला, तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनीतिमानांपुढे नेण्याचे धाडस करत आहे काय?
२. किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करतील हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हायचा आहे, तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय?
३. आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हांला ठाऊक आहे ना? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच.
४. तुम्हांला व्यावहारिक प्रकरणांचा न्यायनिवाडा करायचा आहे, तर मंडळीत जे हिशेबात नाहीत त्यांना कसे नेमता?
५. तुम्हांला लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो. ज्याला भावाभावांचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुमच्यामध्ये नाही, असे आहे की काय?
६. परंतु भाऊ भावावर फिर्याद करतो, आणि तीही विश्वास न ठेवणार्यांपुढे करतो हे कसे?
७. तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमची हानीच आहे; त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही? त्यापेक्षा नाडणूक का सोसून घेत नाही?
८. उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करता, आणि ती बंधुजनांची करता.
९. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे,
१०. चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे१ ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
११. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.
१२. “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही; “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.
१३. “अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे;” पण त्या दोहोंचाही अंत देव करील. पण शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे; आणि शरीरासाठी प्रभू आहे.
१४. देवाने प्रभूला उठवले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवील.
१५. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावेत काय? कधीच नाही!
१६. जो कसबिणीशी जडला तो व ती एकशरीर आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? कारण “ती दोघे एकदेह होतील” असे तो म्हणतो.
१७. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत.
१८. जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.
१९. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही;
२०. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide