बायबल एकाच वर्षात

१. हखल्याचा पुत्र नहेम्या ह्याचा वृत्तान्त: विसाव्या वर्षी किसलेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो,
२. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहूदातून आले; बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहूदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली.
३. त्यांनी मला सांगितले, “बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे; यरुशलेमेचा तटही पडला आहे, व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकल्या आहेत.”
४. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो; मी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली की,
५. “हे स्वर्गीच्या देवा, परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे ह्यांच्यासंबंधाने तू आपला करार पाळतोस व त्यांच्यावर करुणा करतोस;
६. तुझे सेवक इस्राएल लोक ह्यांच्यासाठी मी तुझा दास ह्या वेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे; ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पाहा; आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो; मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे.
७. आम्ही तुझ्यासमोर अतिशय दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे ह्याला विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळले नाहीत.
८. तू आपला सेवक मोशे ह्याला जे सांगितले होते त्याचे स्मरण कर; ते हे की, ‘तुम्ही पातक केल्यास मी तुम्हांला राष्ट्रांमध्ये विखरीन;
९. पण तुम्ही माझ्याकडे वळलात व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चाललात तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यांना एकत्र करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन.’
१०. पाहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडवले आहेस.
११. हे प्रभू, मी विनवणी करतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे. तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे कर.” (ह्या वेळी मी राजाचा प्यालेबरदार होतो.)
१. अर्तहशश्त राजाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेवलेला होता तो मी उचलून राजाला दिला. ह्यापूर्वी मी कधीही त्याच्यासमोर खिन्न दिसलो नव्हतो.
२. राजा मला म्हणाला, “तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे.” तेव्हा मी फार भ्यालो.
३. मी राजाला म्हणालो, “महाराज चिरायू होवोत; माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरणार नाही?”
४. राजाने मला विचारले, “तुझी विनंती काय आहे?” तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली,
५. आणि राजाला म्हटले, “महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असलात तर यहूदा देशात, माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा म्हणजे मी ते बांधीन.”
६. राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, “तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील?” नंतर मला पाठवण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्याला कळवली.
७. मग मी राजाला म्हणालो, “महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहूदा देशात पोहचेपर्यंत महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावांवर मला पत्रे द्यावीत;
८. आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ ह्याला असे पत्र द्यावे की मंदिराच्या गढीच्या दरवाजांसाठी तुळया काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावीत.” माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली.
९. मग मी महानदाच्या पश्‍चिमेकडील प्रांताधिपतींकडे जाऊन त्यांना राजाची फर्माने दिली. राजाने माझ्याबरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठवले होते.
१०. कोणी मनुष्य इस्राएल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास ह्या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यांना फार वाईट वाटले.
११. मी यरुशलेमेस जाऊन पोहचल्यावर तेथे तीन दिवस होतो.
१२. मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली; यरुशलेमेसंबंधाने काय करावे ह्याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्याला सांगितला नाही, आणि माझ्या बसायच्या पाठाळाखेरीज माझ्याबरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते.
१३. मी रात्री खोरेवेशीने बाहेर पडून अजगराच्या झर्‍याकडे, व उकिरडावेशीकडे जाऊन यरुशलेमेचे जे तट पडले होते आणि तिच्या ज्या वेशी अग्नीने जळाल्या होत्या त्यांची पाहणी केली.
१४. मग मी तसाच पुढे झरावेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती.
१५. तेव्हा मी रात्री ओहोळाच्या वाटेने वर चढून कोट लक्षपूर्वक पाहिला; मग मागे वळून खोरेवेशीने परत आत आलो.
१६. मी कोठे गेलो होतो व काय केले होते हे सरदारांना ठाऊक नव्हते; मी अद्यापि यहूदी, याजक, अमीर-उमराव, शास्ते व वरकड कामकरी ह्यांतल्या कोणालाही काहीएक सांगितले नव्हते.
१७. मग मी त्यांना म्हणालो, “आपण केवढ्या दुर्दशेत आहोत हे तुम्हांला दिसतच आहे; यरुशलेम उजाड झाले आहे, व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत; तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू म्हणजे ह्यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हायची नाही.”
१८. माझ्या देवाचा वरदहस्त माझ्यावर आहे हे मी त्यांना सांगितले, व राजा मला काय काय बोलला तेही त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू.” तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली.
१९. हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबीया नावाचा दास आणि गेशेम अरबी ह्यांनी आमची निर्भर्त्सना केली; आम्हांला तुच्छ लेखून ते म्हणाले, “तुम्ही हे काय मांडले आहे? राजाविरुद्ध बंड करता काय?”
२०. मी त्यांना उत्तर दिले की, “स्वर्गीचा देव आम्हांला यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कंबर कसून हे बांधणार; पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा स्मारक राहणार नाही.”
११. तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल काय? विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय?
१२. अंधकारात तुझी अद्भुत कृत्ये प्रकट होतील काय? विस्मरणलोकी तुझे नीतिमत्त्व प्रकट होईल काय?
१३. मी तर, हे परमेश्वरा, तुझा धावा करतो; प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
१४. हे परमेश्वरा, तू माझ्या जिवाचा त्याग का करतोस? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?
१५. मी तरुणपणापासून पीडा पावून मरणोन्मुख झालो आहे; तुझ्या भीतीने मी व्याकूळ झालो आहे.
१६. तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे; तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे.
१७. त्यांनी जलाप्रमाणे मला दिवसभर घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.
१८. तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत, माझ्या परिचयाचा काय तो अंधकारच आहे.
२५. आळश्याची वासना त्याला मारून टाकते; कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात.
२६. कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात; पण नीतिमान देतो, हात आखडत नाही;
१. मग फेस्त सुभ्यात आल्यावर तीन दिवसांनी कैसरीयाहून वर यरुशलेमेस गेला.
२. तेव्हा प्रमुख याजक व यहूद्यांतील मुख्य पुरुष ह्यांनी त्याच्याकडे पौलाविरुद्ध फिर्याद नेली;
३. आणि, मेहेरबानी करून त्याला यरुशलेमेत बोलावून घ्यावे, अशी त्याच्याकडे विनंती केली; वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता.
४. फेस्ताने उत्तर दिले, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे;
५. म्हणून त्या माणसाचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.”
६. मग तो त्यांच्यामध्ये आठ-दहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला; आणि दुसर्‍या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला.
७. तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
८. पौलाने प्रत्युत्तर केले की, “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.”
९. तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, “यरुशलेमेस जाऊन तेथे माझ्यापुढे ह्या गोष्टीविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?”
१०. तेव्हा पौलाने म्हटले, “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता.
११. मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.”
१२. तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.”
१३. मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली.
१४. तेथे ती पुष्कळ दिवस राहिली. तेव्हा फेस्ताने राजापुढे पौलाचे प्रकरण काढून म्हटले, “फेलिक्साने बंदीत ठेवलेला एक माणूस येथे आहे.
१५. मी यरुशलेमेस गेलो होतो तेव्हा त्याच्यावर यहूद्यांच्या मुख्य याजकांनी व वडिलांनी फिर्याद करून त्याच्याविरुद्ध ठराव व्हावा म्हणून विनंती केली.
१६. त्यांना मी उत्तर दिले की, आरोपी व वादी हे समोरासमोर येऊन आरोपाविषयी प्रत्युत्तर देण्याची आरोपीला संधी मिळण्यापूर्वी कोणालाही शिक्षेकरता सोपवून देण्याची रोमी लोकांची रीत नाही.
१७. म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसर्‍या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणण्याचा हुकूम केला.
१८. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्यांबाबत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही;
१९. केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता.
२०. तेव्हा ह्याची चौकशी कशी करावी हे मला सुचेना म्हणून मी त्याला विचारले, ‘यरुशलेमेस जाऊन तेथे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय?’
२१. तेव्हा ‘बादशहाच्या निकालासाठी मला ठेवावे’ अशी पौलाने मागणी केल्यावरून मी हुकूम केला की, ‘ह्याला कैसराकडे पाठवीपर्यंत कैदेत ठेवावे.”’
२२. अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “त्या माणसाचे म्हणणे ऐकावे असे माझ्याही मनात आहे,” त्याने उत्तर दिले, “उद्या आपल्याला त्याचे म्हणणे ऐकायला मिळेल.”
२३. दुसर्‍या दिवशी अग्रिप्पा व बर्णीका ही मोठ्या थाटामाटाने येऊन सरदार व नगरातील मुख्य लोक ह्यांच्यासह दरबारात गेली आणि फेस्ताने हुकूम दिल्यावर पौलाला तेथे आणण्यात आले.
२४. तेव्हा फेस्त म्हणाला, “अग्रिप्पा राजे व आमच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्या माणसाला तुम्ही पाहता ना? ‘ह्याला ह्यापुढे जिवंत ठेवू नये’ असे ओरडत यहूद्यांच्या सर्व समुदायाने यरुशलेमेस व येथेही मला अर्ज केला.
२५. परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही असे मला कळून आले, आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठवण्याचे मी ठरवले.
२६. ह्याविषयी मी आपल्या स्वामीला निश्‍चित असे लिहिण्यासारखे काही नाही, तुमच्यापुढे व विशेषेकरून अग्रिप्पा राजे, आपणापुढे ह्याला आणले आहे; अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहिण्यास सापडेल.
२७. कारण बंदिवानास पाठवताना त्याच्यावरील दोषारोप न कळवणे मला ठीक दिसत नाही.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide