बायबल एकाच वर्षात

१. दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्‍या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे:
२. “परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला,
३. म्हणून तू त्यांना असे सांग: ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन,’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
४. तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका; त्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी पुकारून सांगितले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गांपासून व आपल्या दुष्कर्मांपासून परावृत्त व्हा; पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो.
५. तुमचे पूर्वज आता कोठे आहेत? संदेष्टे तरी सर्वकाळ जगतात काय?
६. असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”
७. दारयावेशाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या ह्याचा पुत्र जखर्‍या संदेष्टा ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे:
८. “मला रात्री दृष्टान्त झाला तो असा: एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता; त्याच्यामागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते.
९. मी म्हणालो, ‘माझ्या प्रभू, हे कोण आहेत?’ तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, ‘हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.’
१०. तेव्हा मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, ‘पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यांना पाठवले ते हे:’
११. तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभे असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले की, ‘आम्ही पृथ्वीवरून फेरी करून आलो आहोत; पाहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे.’
१२. तेव्हा परमेश्वराचा दिव्यदूत म्हणाला, ‘हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज सत्तर वर्षे यरुशलेम व यहूदाची नगरे ह्यांवर कोपायमान झाला आहेस; त्यांच्यावर तू कोठवर करुणा करणार नाहीस?’
१३. तेव्हा माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला.
१४. मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ‘असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सीयोन ह्यांविषयी मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे.
१५. जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले.
१६. ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे; त्यात माझे मंदिर बांधतील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे; यरुशलेमेवर मापनसूत्र लावतील.
१७. पुन्हा पुकारून सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील; परमेश्वर पुन्हा सीयोनेचे सांत्वन करील, तो पुन्हा यरुशलेमेस निवडील.”’
१८. मी आपले डोळे वर करून पाहिले आणि पाहा, चार शृंगे दृष्टीस पडली.
१९. माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला मी विचारले, “ही काय आहेत?” त्याने मला म्हटले, “ज्यामुळे यहूदा, इस्राएल व यरुशलेम ही परागंदा झाली आहेत ती ही शृंगे.”
२०. आणखी परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.
२१. मी विचारले, “ह्यांचे येथे काय काम?” तो मला म्हणाला, “ज्यांनी यहूदास परागंदा करून कोणाला आपले डोके वर काढू दिले नाही ती ही शृंगे आहेत; परंतु आता त्यांना भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहूदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलले त्यांची शृंगे पाडून टाकावीत म्हणून हे आले आहेत.”
१. मी आपले डोळे वर करून पाहिले तर पाहा, एक मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन उभा आहे.
२. तेव्हा मी विचारले, “तू कोठे जात आहेस?” तो मला म्हणाला, “यरुशलेमेचे माप घेण्यास म्हणजे तिची लांबीरुंदी पाहण्यास मी जात आहे.”
३. आणि पाहा, माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत जाऊ लागला तेव्हा दुसरा दिव्यदूत त्याला भेटण्यास आला.
४. तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल.
५. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायी मी तेजोरूप होईन.”’
६. अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो; मी तर तुम्हांला आकाशातील चार्‍ही वार्‍यांप्रमाणे चोहोकडे विखरले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
७. अगे सीयोने, बाबेलकन्येबरोबर राहणारे, आपला बचाव कर.
८. ज्या राष्ट्रांनी तुम्हांला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी,१ त्याने मला पाठवले आहे; जो कोणी तुम्हांला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील; कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो:
९. “पाहा, मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, व त्यांची सेवा करणारे त्यांना लुटतील; तेव्हा तुम्हांला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.
१०. हे सीयोनकन्ये जयजयकार व उल्लास कर; कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो.
११. त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.
१२. परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरुशलेम निवडील.”
१३. सर्व मानवहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे.
१. तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखवले.
२. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, “अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय?”
३. यहोशवा मलीन वस्त्रे परिधान करून त्या दिव्यदूतापुढे उभा होता.
४. त्याच्यासमोर जे उभे होते त्यांना तो उत्तरादाखल म्हणाला, “त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा.” तो त्याला म्हणाला, “पाहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालत आहे.”
५. मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा.” तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदील व पोशाख घातला; आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता.
६. परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशवास प्रतिज्ञापूर्वक सांगितले की,
७. “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपवलेले सर्व सांभाळले तर तू माझ्या मंदिरात न्याय करशील व माझ्या अंगणाचे रक्षण करशील व तेथे उभे असणार्‍यांत तुझे जाणेयेणे होईल असे मी करीन.
८. आता हे मुख्य याजका, यहोशवा, तू व तुझ्याबरोबर बसणारे तुझे सोबती, तुम्ही ऐका; ती माणसे चिन्हादाखल आहेत; पाहा, मी माझा सेवक जो ‘कोंब’ त्याला आणतो.
९. मी यहोशवापुढे ठेवलेला चिरा पाहा; एका चिर्‍याला सात डोळे आहेत, पाहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन.
१०. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजार्‍यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल.”
१२. हे यरुशलेमे, परमेश्वराचा गौरव कर; हे सीयोने, तू आपल्या देवाचे स्तवन कर.
१३. कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.
१४. तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो; उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो;
१५. तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
१६. तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो.
१७. तो आपल्या बर्फाचा चुर्‍याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
१८. तो आपला हुकूम पाठवून ते वितळवतो; तो आपला वारा वाहवतो तेव्हा पाणी वाहू लागते.
१९. तो याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय विदित करतो.
२०. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा!१
२१. तीन गोष्टींनी भूमी कंपित होते, चार्‍हींचा भार तिला सहन होत नाही;
२२. त्या ह्या: राजा झालेला दास, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख,
२३. लग्न झालेली त्रासदायक स्त्री, व धनिणीची वारस झालेली दासी.
१. नंतर मी ‘मंदिरातून निघालेली एक’ मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा, देवाच्या ‘क्रोधाच्या’ सात वाट्या ‘पृथ्वीवर ओता.”’
२. तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’
३. दुसर्‍याने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा ‘समुद्र’ मृत माणसाच्या रक्तासारखा ‘रक्तमय झाला’ आणि ‘त्यातील’ सर्व प्राणी ‘मरून गेले.’
४. तिसर्‍याने आपली वाटी ‘नद्या’ व पाण्याचे झरे ह्यांत ओतली, ‘आणि त्यांचे रक्त झाले.’
५. तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “हे प्रभू, ‘जो तू पवित्र आहेस, होतास व असणार’, त्या तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू ‘न्यायी’ आहेस;
६. कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”
७. नंतर मी वेदीला१ असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!”
८. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली.
९. माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही.
१०. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या;
११. आणि आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी ‘स्वर्गाच्या’ देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही.
१२. सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’
१३. नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले.
१४. ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात.
१५. (“पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य!”)
१६. त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.
१७. सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”
१८. तेव्हा ‘विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट’ झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की ‘पृथ्वीवर’ मानव ‘झाल्यापासून’ इतका मोठा भूमिकंप ‘कधी झाला नव्हता.’
१९. मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले.
२०. प्रत्येक बेट पळून गेले आणि डोंगरांचा ठावठिकाणाही राहिला नाही.
२१. सुमारे एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून माणसांवर पडल्या; तेव्हा गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘अतिभयंकर’ होती.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide