बायबल एकाच वर्षात

१. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नावाचा एक मनुष्य राहत होता.
२. तो आपल्या आईला म्हणाला, “जी अकराशे चांदीची नाणी तुझ्यापासून हिरावून नेल्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस ते पैसे माझ्याकडे आहेत. मीच ते घेतले होते.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “बाळा, परमेश्वर तुझे कल्याण करो.”
३. त्याने ती अकराशे चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली, “माझ्या मुलाच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत. ह्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते.”
४. त्याने ते पैसे आपल्या आईला परत केले. तेव्हा तिने त्यांतली दोनशे नाणी सोनाराला दिली, आणि त्याने त्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती तयार केली; त्या मूर्ती मीखाच्या घरात ठेवण्यात आल्या.
५. ह्या मीखाचे एक देवघर होते. त्याने एक एफोद आणि काही तेराफीम (कुलदेवतेची मूर्ती) तयार केल्या व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले.
६. त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता; जो तो आपल्याला योग्य दिसेल तसे करत असे.
७. बेथलेहेम-यहूदा येथे यहूदा घराण्यातला एक तरुण लेवी उपरा म्हणून राहत होता.
८. आपल्याला कोठेतरी राहायला जागा मिळाली तर पाहावे म्हणून तो यहूदातील बेथलेहेम नगर सोडून निघाला; आणि प्रवास करत करत एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरी आला.
९. मीखाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” त्याने उत्तर दिले, “यहूदाच्या बेथलेहेमातला मी एक लेवी आहे; आसरा मिळेल तेथे जाऊन राहावे म्हणून मी फिरत आहे.”
१०. मीखा त्याला म्हणाला, “माझ्या येथे राहा. तू माझ्या वडिलासमान हो व पुरोहित म्हणून राहा. मी तुला प्रतिवर्षी दहा चांदीची नाणी व एक पोशाख देईन आणि तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करीन.”
११. मग तो लेवी त्या माणसाबरोबर राहायला तयार झाला; त्याने त्या तरुणाला आपल्या मुलाप्रमाणे वागवले.
१२. मीखाने त्या तरुण लेवीला दीक्षा दिली आणि तो त्याचा पुरोहित होऊन त्याच्या घरी राहू लागला.
१३. मग मीखा म्हणाला, “मी एक लेवी आपला पुरोहित करून ठेवल्यामुळे परमेश्वर माझे कल्याण करील अशी मला आता खात्री आहे.”
१. त्या दिवसांत इस्राएलाचा कोणी राजा नव्हता. त्या वेळेस दान वंशाचे लोक राहण्यासाठी जागा शोधत होते. कारण इतर इस्राएली लोकांबरोबर त्यांना त्यांच्या वाट्याचे वतन अद्याप मिळाले नव्हते.
२. तेव्हा दानवंशजांनी आपल्या कुळातल्या लोकांतून पाच शूर वीर निवडले आणि त्यांना सरा व एष्टावोल येथून देश हेरून पाहण्यास पाठवले; त्यांना ते त्या प्रांताची पाहणी करा असे म्हणाले; ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापर्यंत आले व तेथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.
३. ते मीखाच्या घराजवळ असताना त्यांनी त्या तरुण लेव्याचा आवाज ओळखला तेव्हा ते तिकडे जाऊन त्याला विचारू लागले, “तुला येथे कोणी आणले? तू येथे काय करतोस? तुझे येथे काय काम आहे?”
४. त्याने त्यांना उत्तर दिले, “मीखाने मला वेतन देऊन ठेवले असून मी त्याचा पुरोहित झालो आहे; एवढे त्याने माझ्यासाठी केले आहे.”
५. ते त्याला म्हणाले, “ज्या प्रवासाला आम्ही निघालो आहोत तो यशस्वी होईल की नाही हे देवाला विचारून पाहा.”
६. तो पुरोहित त्यांना म्हणाला, “तुम्ही खुशाल जा; ज्या प्रवासाला तुम्ही निघाला आहात तो परमेश्वराला मंजूर आहे.”
७. मग ते पाच पुरुष निघून लईश येथे गेले. तेथे त्यांना असे दिसून आले की, तेथील लोक सीदोनी लोकांप्रमाणे शांत व निश्‍चिंत आहेत; अन्नधान्याची त्यांना मुळीच वाण नसून ते धनवान आहेत; ते सीदोनी लोकांपासून दूर राहत असून अरामी लोकांशी त्यांचा काही संबंध नाही.
८. नंतर ते सरा व एष्टावोल येथे आपल्या भाऊबंदांकडे परत आले तेव्हा त्यांचे भाऊबंद त्यांना विचारू लागले, “तुम्ही काय खबर आणली आहे?”
९. त्यांनी म्हटले, “आम्ही तो प्रदेश पाहिला असून तो फार उत्तम आहे. चला उठा; आपण त्या लोकांवर हल्ला चढवू. तुम्ही स्वस्थ का बसला आहात? तेथे जाऊन तो देश ताब्यात घेण्याबाबत काही हयगय करू नका.
१०. तेथे गेल्यावर निश्‍चिंत राहणारे लोक तुम्हांला आढळतील. तो देश विस्तीर्ण असून देवाने खरोखर तो तुमच्या हाती दिला आहे. ती जागाच अशी आहे की, तेथे जमिनीच्या कोणत्याही उत्पन्नाची कमतरता नाही.”
११. तेव्हा सरा व एष्टावोल येथून दान कुळातले सहाशे पुरुष सशस्त्र होऊन निघाले.
१२. त्यांनी कूच करून यहूदातील किर्याथ-यारीम येथे तळ दिला. ह्यामुळे त्या स्थळाला आजपर्यंत महाने-दान (दानाची छावणी) असे म्हणतात. ते किर्याथ-यारीमच्या पश्‍चिमेस आहे.
१३. तेथून निघून ते एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घराजवळ आले.
१४. तेव्हा लईश प्रदेश हेरायला गेलेले पाच जण आपल्या बांधवांना म्हणाले, “ह्या घरात एक एफोद, तेराफीम (कुलदेवता), एक कोरीव मूर्ती आणि एक ओतीव मूर्ती आहे हे तुम्हांला माहीत आहे काय? आता काय करायचे ह्याचा विचार करा.”
१५. ते तिकडे वळले आणि मीखाच्या घरी राहणार्‍या तरुण लेवीच्या खोलीत जाऊन त्यांनी त्याचे क्षेमकुशल विचारले.
१६. मग ते दान वंशातले सहाशे सशस्त्र लोक वेशीच्या दरवाजाजवळ उभे राहिले;
१७. तेव्हा देश हेरायला गेलेल्या पाच लोकांनी आत शिरून त्या कोरीव व ओतीव मूर्ती, एफोद व तेराफीम (कुलदेवता) बाहेर आणल्या. त्या वेळेस पुरोहित सहाशे सशस्त्र लोकांसह वेशीच्या दरवाजात उभा राहिला होता.
१८. त्या पाच जणांनी मीखाच्या घरात शिरून त्या कोरीव व ओतीव मूर्ती, एफोद व तेराफीम (कुलदेवता) बाहेर आणल्या तेव्हा पुरोहिताने त्यांना हटकले, “तुम्ही हे काय चालवले आहे?”
१९. ते त्याला म्हणाले, “गप्प बस; तोंड बंद कर, आमच्याबरोबर चल; आमचा वडील व पुरोहित म्हणून राहा. एकाच मनुष्याच्या घरी पुरोहित होऊन राहण्यापेक्षा इस्राएलाच्या एखाद्या वंशाचा व कुळाचा पुरोहित होऊन राहणे अधिक बरे नाही काय?”
२०. हे ऐकून पुरोहित खूश झाला आणि एफोद, कुलदेवता व कोरीव मूर्ती घेऊन त्या लोकांबरोबर गेला.
२१. मग ते मागे फिरून आपल्या वाटेने गेले. त्यांनी आपली मुलेबाळे, पशू आणि सामानसुमान आपल्यापुढे चालवून कूच केले.
२२. ते मीखाच्या घरापासून बरेच दूर गेल्यावर त्याच्या घराच्या आसपास राहणार्‍या लोकांनी जमा होऊन दानाच्या लोकांना जाऊन गाठले.
२३. त्यांनी दानाच्या लोकांना हाका मारल्या; तेव्हा त्यांनी मागे वळून मीखाला विचारले, “काय झाले? तुम्ही इतके जण का जमा झालात?”
२४. तो म्हणाला, “मी स्वतःसाठी केलेले देव व माझा पुरोहित तुम्ही घेऊन चाललात; माझे आता काय राहिले आहे! आणि वर मला विचारता की, काय झाले?”
२५. दानवंशजांनी त्याला म्हटले, “तुझा आवाज चढवू नकोस, नाहीतर आमचे अविचारी लोक तुझ्यावर तुटून पडतील आणि तू व तुझ्या घरचे लोक प्राणास मुकाल.”
२६. मग दानवंशज आपल्या वाटेने चालू लागले. मीखाने पाहिले की, हे लोक आपल्याला भारी आहेत, तेव्हा तो आपल्या घरी परतला.
२७. मीखाने बनवलेल्या वस्तू व त्याचा पुरोहित बरोबर घेऊन ते लईश येथे आले. तेथील लोक शांत व निश्‍चिंत राहत होते. त्यांना त्यांनी तलवारीने मारून त्यांचे नगर जाळून टाकले.
२८. त्या नगराचा बचाव करायला कोणी नव्हता; कारण ते सीदोनापासून दूर होते आणि अराम्यांशी त्या नगरवासीयांचा काही संबंध नव्हता. ते नगर बेथ-रहोबच्या जवळ असलेल्या खोर्‍यात होते. ते नगर पुन्हा वसवून त्यात ते राहू लागले.
२९. त्यांनी त्या नगराला इस्राएलाचा एक मुलगा म्हणजे आपला पूर्वज दान ह्याचे नाव दिले. पूर्वी त्या नगराचे नाव लईश होते.
३०. दानवंशजांनी त्या कोरीव मूर्तीची स्थापना केली; देशाचा पाडाव होईपर्यंत गेर्षोमाचा मुलगा व मोशेचा नातू योनाथान व त्याचे वंशज दानवंशाचे पौरोहित्य करत होते.
७. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.
८. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील.
९. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक.
१०. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
११. तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस.
३३. बुद्धिमानाच्या अंत:करणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामीची गोष्ट तेव्हाच कळते.
३४. नीतिमत्ता राष्ट्राची उन्नती करते; पापाने प्रजेची अप्रतिष्ठा होते.
३५. शहाण्या सेवकावर राजाचा प्रसाद होतो, पण निर्लज्जपणे वागणार्‍यांवर तो रुष्ट होतो.
२४. तो अतिशय खिन्न झाला हे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे!
२५. श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”
२६. ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”
२७. तो म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”
२८. तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.”
२९. त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत,
३०. त्याला ह्या काळात पुष्कळ पटीने, व येणार्‍या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”
३१. तेव्हा त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्याच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत.
३२. म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील,
३३. त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसर्‍या दिवशी पुन्हा उठेल.”
३४. त्यांना ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या.
३५. तो यरीहोजवळ आला तेव्हा असे झाले की, एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता.
३६. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय आहे?”
३७. त्यांनी त्याला सांगितले, “येशू नासरेथकर जवळून जात आहे.”
३८. तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”
३९. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणार्‍यांनी त्याला दटावले; तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.”
४०. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले,
४१. “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.”
४२. येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
४३. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्यामागे चालू लागला; तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide