बायबल एकाच वर्षात

१. दाविदाची शेवटची वचने ही आहेत: “ज्याला उच्चपदावर चढवले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्राएलाचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो:
२. परमेश्वराचा आत्मा माझ्या द्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले.
३. इस्राएलाचा देव म्हणाला, इस्राएलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवांवर न्यायाने राज्य करणारा, देवाचे भय धरून त्यांच्यावर राज्य करणारा निर्माण होईल.
४. सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल.
५. माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने माझ्याशी निरंतरचा करार केला आहे; तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्‍चित आहे; माझा संपूर्ण उद्धार व अभीष्ट ह्यांचा तो उदय होऊ देणार नाही काय?
६. सर्व अधर्मी लोकांना काट्यांप्रमाणे टाकून देतील, कारण त्यांना हाती धरता येत नाही;
७. जो कोणी त्यांना धरू पाहील त्याला लोखंड व भाल्याचा दांडा घेतला पाहिजे; ती आग लागून जागच्या जागी भस्म होतील.”
८. दाविदाच्या पदरी असलेल्या शूर वीरांची नावे ही: तखमोनचा योशेब-बश्शेबेथ, हा सरदारांचा नायक होता; हाच असनी आदीनो; ह्याने भाला चालवून एका प्रसंगी आठशे माणसे मारली.
९. त्याच्या खालोखाल एलाजार बिन दोदय बिन अहोही हा होता; दाविदाबरोबरच्या तिघा महावीरांपैकी हा एक होता, युद्धासाठी जमा झालेल्या पलिष्ट्यांना तुच्छ लेखून इस्राएल लोक त्यांच्यावर चालून गेले;
१०. तेव्हा आपला हात थकून तलवारीस चिकटेपर्यंत एलाजार पलिष्ट्यांना मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला, त्याच्यामागून लोक गेले ते केवळ लुटालूट करायला.
११. त्याच्या खालोखाल आगे हरारी ह्याचा पुत्र शम्मा हा होता. पलिष्ट्यांनी एकत्र होऊन मसुरीच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले.
१२. त्या शेताच्या मध्यभागी उभे राहून शम्माने शेताचे रक्षण केले व त्या पलिष्ट्यांचा वध केला; त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला.
१३. तीस मुख्य सरदारांतले तिघे जण हंगामाच्या वेळी अदुल्लामाच्या गुहेत दाविदाकडे आले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात तळ देऊन होते.
१४. त्या वेळी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.
१५. दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे.”
१६. त्या तिघा वीरांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नावाने ओतले.
१७. तो म्हणाला, “हे परमेश्वरा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय?” ह्यास्तव तो ते पिईना; त्या तीन वीरांनी हे कृत्य केले.
१८. सरूवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अबीशय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले व त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.
१९. त्या तिघांहून त्याची महती अधिक होती म्हणून तो नायक झाला ना? तरी त्या पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही.
२०. कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले.
२१. त्याने एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार मारले; त्या मिसर्‍याच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला; व त्याने त्या मिसर्‍याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला.
२२. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले.
२३. त्या तिघांहून त्याची महती मोठी होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही. दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले.
२४. यवाबाचा भाऊ असाएल ह्या तिसांपैकी होता; बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,
२५. शाम्मा हरोदी, अलीका हरोदी,
२६. हेलस पलती, इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा,
२७. अबीएजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी,
२८. सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
२९. बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय,
३०. बनाया पिराथोनी, गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दय,
३१. अबी-अलबोन, अर्वाथी, अजमावेथ बरहूमी,
३२. अलीहबा शालबोनी, याशेनाच्या पुत्रांतील योनाथान,
३३. शाम्मा हरारी, शारार अरारी ह्याचा पुत्र अहीयाम,
३४. माकाथीचा पुत्र अहसबय ह्याचा पुत्र अलीफलेट, अहीथोफेल गिलोनी ह्याचा पुत्र अलीयम,
३५. हेस्री कर्मेली, पारय अर्बी,
३६. सोबातील नाथोन ह्याचा पुत्र इगाल, बानी यादी,
३७. सेलक अम्मोनी, सरूवेचा पुत्र यवाब ह्याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
३८. ईरा इथ्री, गारेब इथ्री,
१. परमेश्वराचा कोप इस्राएलावर पुनरपि झाला, आणि इस्राएल व यहूदा ह्यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्याविरुद्ध दाविदाला केली.
२. त्या वेळी राजाबरोबर सेनापती यवाब होता; त्याला राजाने सांगितले की, “दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या सर्व इस्राएल वंशांमध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा म्हणजे त्यांची संख्या मला कळेल.”
३. यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत, आपला देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो आणि माझे स्वामीराजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत; पण माझ्या स्वामीराजांना ही हौस का वाटावी?”
४. तथापि राजाच्या म्हणण्यापुढे यवाब व सैन्याचे सरदार ह्यांचे काही चालेना, आणि यवाब व सैन्यांचे सरदार राजापुढून इस्राएल लोकांची मोजदाद करण्यासाठी निघून गेले.
५. त्यांनी यार्देनेपलीकडे जाऊन गादातील खोर्‍याच्या मध्यभागी असलेल्या अरोएर नगराच्या दक्षिणेस डेरे दिले; तेथून ते याजेराकडे गेले.
६. मग ते गिलाद व तहतीम होदशी ह्या प्रदेशांत गेले; पुढे दान्यान येथे गेले; तेथून वळसा घेऊन ते सीदोनास गेले.
७. नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी ह्यांची सर्व नगरे येथे गेले; तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेस बैर-शेबा येथवर गेले.
८. ते देशभर चहूकडे फिरून नऊ महिने वीस दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले.
९. तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली: धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले.
१०. प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वराला म्हणाला, “हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे; तर हे परमेश्वरा, आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.”
११. दावीद पहाटेस उठला तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेष्टा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की,
१२. “जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो, त्यांपैकी कोणती तुझ्यासाठी करू ती सांग.”
१३. तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला हे सांगितले; त्याने त्याला विचारले, “तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असताना तू त्यांच्यापुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात तीन दिवस मरी यावी? ह्याचा चांगला विचार कर; ज्याने मला पाठवले त्याला मी काय उत्तर देऊ ते पाहा.”
१४. दावीद गादास म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; परमेश्वराच्या हाती आपण पडू या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.”
१५. मग परमेश्वराने इस्राएलात सकाळपासून नेमलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली; आणि दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या लोकांपैकी सत्तर हजार लोक मेले.
१६. पण देवदूताने यरुशलेमेचा नाश करण्यासाठी त्यावर आपला हात उगारला तेव्हा परमेश्वराला त्या अरिष्टाविषयी वाईट वाटले, व त्याने लोकांचा नाश करणार्‍या देवदूतास म्हटले, “आता पुरे कर, आपला हात आटोप.” त्या वेळी परमेश्वराचा दूत अरवना यबूसी ह्याच्या खळ्यानजीक होता.
१७. लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वराला म्हटले, “पाहा, मी पाप केले, मी दुर्मार्गानेही चाललो, पण ह्या मेंढरांनी काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा.”
१८. त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्याला म्हणाला, “वरती जाऊन अरवना यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वरा-प्रीत्यर्थ एक वेदी बांध.”
१९. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले ते मान्य करून दावीद वरती गेला.
२०. तेव्हा अरवना खाली नजर करून पाहतो तर दावीद आपल्या सेवकांसह आपल्याकडे येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले, आणि त्याने बाहेर येऊन राजापुढे भूमीपर्यंत लवून प्रणाम केला.
२१. अरवना म्हणाला, “माझ्या स्वामीराजांचे आपल्या दासाकडे येणे का झाले आहे?” दावीद म्हणाला, “तुझ्यापासून हे खळे विकत घेण्यासाठी मी आलो आहे; लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रीत्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे.”
२२. अरवना दाविदाला म्हणाला, “माझ्या स्वामीराजांना जे काही वाटेल ते घेऊन त्यांनी अर्पण करावे; पाहा, होमबलीसाठी हे बैल आहेत आणि इंधनासाठी मळणीची औते व बैलांचे सामान आहे.
२३. महाराज, अरवना हे सर्व महाराजांना देत आहे.” अरवना राजाला म्हणाला, “आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न होवो.”
२४. राजा अरवानाला म्हणाला, “नाही नाही, ह्या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन; मी आपला देव परमेश्वर ह्याला फुकटचे होमबली अर्पण करणार नाही.” मग दाविदाने पन्नास शेकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले.
२५. दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली. ह्या प्रकारे देशासाठी विनवणी केली ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्राएल लोकांचे त्या मरीपासून निवारण झाले.
७. हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयाण केलेस, (सेला)
८. तेव्हा भूमी कंपित झाली, व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली; देवासमोर, इस्राएलाच्या देवासमोर, सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.
९. हे देवा, तू विपुल पर्जन्य पाठवून दिलास; तुझे वतन कोमेजले होते तेव्हा तू ते यथास्थित केलेस.
१०. त्यात तुझी मंडळी राहिली; हे देवा, तू आपल्या चांगुलपणाने दीनांसाठी बेगमी केलीस.
५. जो गरिबाची कुचेष्टा करतो तो त्याला उत्पन्न करणार्‍याचा अवमान करतो; जो दुसर्‍याच्या विपत्तीमुळे आनंद पावतो त्याला शिक्षा चुकणार नाही;
६. पुत्रपौत्र वृद्धांचा मुकुट होत; मुलांची शोभा त्यांचे वडील होत;
१. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला.
२. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या?”
३. येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.
४. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला२ केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही.
५. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”
६. असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला; आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला,
७. आणि त्याला म्हटले, “जा; शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू.” मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला.
८. ह्यावरून शेजारीपाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय?”
९. कित्येक म्हणाले, “तोच हा.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे;” तो म्हणाला, “मी तोच आहे.”
१०. ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुझे डोळे कसे उघडले?”
११. त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांना लावला आणि मला सांगितले, ‘शिलोह तळ्यावर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.”
१२. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “तो कोठे आहे?” तो म्हणाला, “मला ठाऊक नाही.”
१३. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परूश्यांकडे नेले.
१४. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता.
१५. म्हणून परूश्यांनीही त्याला पुन्हा विचारले, “तुला दृष्टी कशी आली?” तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला. तो मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.”
१६. ह्यावरून परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” दुसरे म्हणाले, “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो?” अशी त्यांच्यामध्ये फूट पडली.
१७. म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस?” त्याने म्हटले, “तो संदेष्टा आहे.”
१८. यहूद्यांनी त्या दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाच्या आईबापांना बोलावून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा असून आता डोळस झाला आहे, हे खरे मानले नाही.
१९. त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला असे म्हणता तो हाच काय? तर आता त्याला दृष्टी कशी आली?”
२०. त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला हे आम्हांला ठाऊक आहे;
२१. तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हांला ठाऊक नाही; किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हांला ठाऊक नाही. त्याला विचारा; तो वयात आलेला आहे, तो स्वत:विषयी सांगेल.”
२२. त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते.
२३. ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्याला विचारा.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide