१. तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, असे म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडवले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस.
२. तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन; नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत; अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस; ज्वाला तुला पोळणार नाही.
३. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे; मी तुझ्यासाठी मिसर खंडादाखल दिला आहे, तुझ्याबद्दल कूश व सबा दिले आहेत.
४. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन.
५. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी तुझा वंश उगवतीकडून आणीन; मावळतीकडून तुला मी एकत्र करीन.
६. मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या;
७. ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडले त्या सर्वांना घेऊन या.”
८. डोळे असून आंधळे, कान असून बहिरे अशा लोकांना घेऊन या!
९. सर्व राष्ट्रे एकत्र जमोत, लोक एकवटोत; अशा गोष्टी त्यांतला कोण सांगेल? पूर्वी घडलेल्या गोष्टी त्यांनी आम्हांला ऐकवाव्यात; त्यांनी आपले खरे करण्यास साक्षी आणावेत; त्यांनी ते ऐकून म्हणावे की हे खरे आहे.
१०. परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “तुम्ही मला ओळखावे, माझ्यावर भाव ठेवावा व मी तोच आहे, माझ्यापूर्वी कोणी देव नव्हता व माझ्यानंतरही कोणी होणे नाही हे तुम्हांला समजावे म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात, तू माझा निवडलेला सेवक आहेस.
११. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही.
१२. मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले व समजावले; तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता; म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात व मीच देव आहे” असे परमेश्वर म्हणतो.
१३. “येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?”
१४. परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन.
१५. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे; मी इस्राएलाचा उत्पन्नकर्ता, तुमचा राजा आहे.”
१६. जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करतो,
१७. ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर ह्यांना बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत, त्यांच्याने उठवत नाही, ते विझले आहेत, वातीप्रमाणे मालवले आहेत, असा जो परमेश्वर तो म्हणतो की:
१८. “पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका.
१९. पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.
२०. वनपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार;
२१. मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.
२२. हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाहीस; हे इस्राएला, माझा तुला कंटाळा आला.
२३. तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही.
२४. तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाहीस, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस; तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केलीस, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणवलेस.
२५. मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.
२६. मला स्मरण दे, आपण एकमेकांशी वाद करू; तुझे खरे ठरावे म्हणून आपली बाजू सांग.
२७. तुझ्या मूळ पुरुषाने पातक केले, तुझे मध्यस्थ माझ्याशी फितुरी करीत आले आहेत.
२८. म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.
१. तर आता माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या इस्राएला, ऐक;
२. परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व साहाय्यकर्ता असे म्हणतो; हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या यशुरूना, भिऊ नकोस.
३. कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन; मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी करीन.
४. वाहत्या पाण्याजवळ जसे वाळुंज उगवते, तसे ते गवतामध्ये उगवतील.
५. तेव्हा कोणी म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे;’ कोणी याकोबाचे नाव घेईल; कोणी आपल्या हाताने मी परमेश्वराचा, असे लिहील आणि इस्राएल हे उपनाव घेईल.”
६. इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो: “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.
७. मी प्राचीन काळच्या लोकांची स्थापना केली तेव्हापासून माझ्यासारखा संदेश प्रकट करणारा कोण आहे? कोणी असला तर त्याने बोलावे व माझ्यापुढे प्रतिपादन करावे; त्यांनी भावी गोष्टी व आता होणार्या गोष्टी सांगाव्यात.
८. भयभीत होऊ नका, थरथर कापू नका; मी मागेच तुला हे ऐकवले आहे व कळवले की नाही? तुम्ही माझे साक्षी आहात, माझ्यावेगळा कोणी देव आहे काय? माझ्यावेगळा कोणी दुर्ग नाही; मला कोणी ठाऊक नाही.”
९. कोरीव मूर्ती घडवणारे सर्व शून्यवत आहेत; त्यांचे रम्य विषय काही कामाचे नाहीत; त्याविषयी साक्ष देणार्यांना दृष्टी नाही किंवा अक्कल नाही; म्हणून ती देणार्यांना लज्जा प्राप्त होईल.
१०. हा देव कोणी घडवला? ही मूर्ती कोणी व्यर्थ ओतली?
११. पाहा, त्याचे सर्व अनुयायी फजीत होतील; ही मूर्ती घडवणारे माणसेच आहेत; ते सर्व एकत्र जमोत, पुढे येवोत, भयभीत होवोत, ते सारे लज्जित होवोत.
१२. लोहार छिन्नी पाजवतो, तो पेटलेल्या कोळशांनी काम करतो, हातोड्यांनी मूर्तीला आकार आणतो, तो आपल्या बाहुबलाने ती घडतो; त्याला भूक लागते व त्याची शक्ती गळते; तो पाणी प्याला नाही तर व्याकूळ होतो.
१३. सुतार सूत धरतो; गेरूने आखणी करतो; तिच्यावर रंधा फिरवतो, व कैवाराने खुणा करतो; आणि ती घरात ठेवण्याजोगी व्हावी म्हणून तिला मनुष्याचा आकार व सौंदर्य देतो.
१४. कोणी आपणासाठी गंधसरू तोडतो; सुरू व अल्लोन झाडे घेतो; तो वनवृक्षांतून जून झाडे निवडतो; तो देवदारूचे झाड लावतो आणि पावसाने ते वाढते.
१५. ते मनुष्यास सरपणाच्या कामी पडते; त्यातले काही लाकूड घेऊन त्याने तो शेक घेतो; ते पेटवून त्यावर भाकरी भाजतो; तो त्याचा देवही बनवतो व त्याच्या पाया पडतो; तो त्याची कोरीव मूर्ती करतो व तिचे भजनपूजन करतो.
१६. त्यातले अर्धे लाकूड तो अग्नीत जाळतो; त्या अर्ध्यावर मांस भाजून खातो व तृप्त होतो; तो शेकताना म्हणतो, “मला ऊब येत आहे, मला शेक लागत आहे.”
१७. तो त्याच्या उरलेल्या भागाचा देव घडतो, म्हणजे कोरीव मूर्ती आपल्यासाठी बनवतो; तो तिच्या पाया पडतो, तिचे भजनपूजन करतो; तिची प्रार्थना करतो; तो तिला म्हणतो, “माझे तारण कर, तू माझा देव आहेस.”
१८. अशांना कळत नाही, समजत नाही; त्यांचे डोळे लिंपले असल्यामुळे त्यांना दिसत नाही; त्यांची हृदये लिंपली असल्यामुळे त्यांना समजत नाही.
१९. कोणी हे ध्यानात आणत नाही; “त्याचा अर्धा भाग आपण अग्नीत जाळला, त्याच्या निखार्यांवर भाकर भाजली, मांस भाजून खाल्ले आणि त्याच्या अवशेषाची अमंगल वस्तू मी कशी बनवू? झाडापासून काढलेल्या लाकडाच्या पाया मी कसा पडू?” असे म्हणण्याइतके कोणाला ज्ञान नाही, अक्कल नाही.
२०. तो राख भक्षण करतो, त्याचे हृदय मूढ झाल्यामुळे तो बहकला आहे; तो आपला जीव वाचवू शकत नाही; “माझ्या उजव्या हातात आहे ती साक्षात लबाडी नव्हे काय?” असे तो म्हणत नाही.
२१. हे याकोबा, हे इस्राएला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव; तू माझा सेवक आहेस; मी तुला घडले आहे, तू माझा सेवक आहेस; हे इस्राएला, तुझा मला विसर पडायचा नाही.
२२. तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीतशी केली आहेत; माझ्याकडे फीर, कारण मी तुला उद्धरले आहे.
२३. हे आकाशा, जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे; अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्षनाद करा; अहो पर्वतांनो, हे वना, त्यातील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जयजयकार करा; कारण परमेश्वराने याकोबाला उद्धरले आहे; तो इस्राएलाच्या ठायी आपला प्रताप प्रकट करतो.
२४. तुझा उद्धारकर्ता, गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, “मी वस्तुमात्राचा कर्ता परमेश्वर आहे; मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला तेव्हा माझ्याजवळ कोण होते?
२५. खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.
२६. मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे; मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘तिच्यात वस्ती होवो;’ यहूदाच्या नगरांविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येवोत, त्यांच्या उजाड झालेल्या स्थलांचा जीर्णोद्धार मी करीन;’
२७. मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’
२८. मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’
१. दाविदाचे स्तोत्र. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.”
२. परमेश्वर तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.”
३. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.
४. परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही; ती अशी की, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.”
५. तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा बिमोड करील;
७. मार्गाने चालत असता तो ओहोळातले पाणी पिईल; आणि आपले डोके वर करील.
५. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वत:ला शहाणा समजेल.
६. जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो तो आपले स्वत:चे पाय कापून घेतो, त्याचे नुकसान त्याच्या पदरी पडते.
७. लंगड्याचे पाय जसे कमजोर तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन असते.
८. मूर्खाला मान देणारा, गोफणीत गोटा घट्ट बांधणार्यासारखा आहे.
९. मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्या इसमाच्या हातात शिरणार्या काट्यासारखे आहे.
१. आता मी म्हणतो की, वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो;
२. पण बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभार्यांच्या स्वाधीन असतो.
३. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो;
४. परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.
५. ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा.
६. तुम्ही पुत्र आहात, म्हणून देवाने “अब्बा! बापा!” अशी हाक मारणार्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणांत पाठवले आहे.
७. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस तर ख्रिस्ताच्या द्वारे देवाचा वारसही आहेस.
८. तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता;
९. पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्त्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता?
१०. वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता.
११. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.
१२. बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही होतो. तुम्ही माझे काही वाईट केले नाही.
१३. तुम्हांला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हांला ठाऊक आहे;
१४. आणि तुमची परीक्षा होण्याइतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा, माझा स्वीकार केलात.
१५. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते.
१६. मग मी तुम्हांला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?
१७. ते लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे; तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला वेगळे ठेवू पाहतात.
१८. तुम्हांला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे केवळ मी तुमच्याजवळ आहे तेव्हाच करावे असे नाही.
१९. माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत.
२०. ह्या वेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्यासंबंधाने मी बुचकळ्यात पडलो आहे.
२१. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा.
२२. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.
२३. तरी दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला.
२४. ह्या गोष्टी दृष्टान्तरूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे दोन करार होत; एक तर सीनाय पर्वतावरून केलेला; तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार, म्हणजे हागार आहे.
२५. हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे; ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे.
२६. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.
२७. शास्त्रात असे लिहिले आहे, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत.”
२८. बंधुजनहो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात.
२९. परंतु त्या वेळेस देहस्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे.
३०. पण शास्त्रलेख काय म्हणतो? “त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे; कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही.”
३१. म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide