बायबल एकाच वर्षात

१. सात वर्षांच्या अखेरीस तू कर्जमाफी करावीस.
२. कर्जमाफी करण्याची रीत ही: धनकोने आपल्या शेजार्‍याला दिलेले कर्ज माफ करावे; आपला शेजारी अथवा भाऊबंद ह्यांच्यापासून ते वसूल करून घेऊ नये; कारण परमेश्वराच्या नावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे.
३. परक्यापासून हवे तर कर्ज वसूल करून घ्यावे; पण तुझ्या बांधवांकडे तुझे काही येणे असले तर तू स्वतः ते सोडून दे.
४. तरीपण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हांला अवश्य आशीर्वाद देईल.
५. मात्र तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू मनःपूर्वक ऐकली पाहिजेस आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस.
६. कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील; तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील, पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस; तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालवशील, पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही.
७. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला, तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नकोस, किंवा आपला हात आखडू नकोस,
८. तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड, आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे.
९. लक्षात ठेव, सातवे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नकोस; आपल्या दरिद्री बांधवांकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्‍हाणे केले तर तुला पाप लागेल.
१०. तू त्याला अवश्य दे, व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नकोस; असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल.
११. देशात गरीब लोक नेहमीच असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर.
१२. तुझा बांधव म्हणजे एखादा इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री तुला विकण्यात आली असली तर त्याने किंवा तिने सहा वर्षे दास्य केल्यावर सातव्या वर्षी त्याला किंवा तिला मुक्त करून जाऊ दे.
१३. तू त्याला मुक्त करशील तेव्हा त्याला रिक्त हस्ते पाठवू नकोस;
१४. तर तुझी शेरडेमेंढरे, तुझे खळे व द्राक्षकुंड ह्यांतून उदार हस्ते त्याला दे; तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या प्रमाणात त्याला दे.
१५. तूही मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव; म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे.
१६. तरीपण त्या दासाचा लोभ तुझ्यावर व तुझ्या घराण्यावर जडला असेल व तो आनंदाने तुझ्याबरोबर राहत असून तुला म्हणेल की, ‘मी तुला सोडून जाणार नाही,’
१७. तर त्याचा कान दरवाजावर धरून आरीने टोच म्हणजे तो तुझा कायमचा दास होईल, असेच तुझ्या दासीबाबतही कर.
१८. त्याला मुक्त करून जाऊ देणे तुला जड वाटू देऊ नकोस, कारण सहा वर्षे मोलकर्‍याच्या दुप्पट तुझी सेवाचाकरी त्याने केली आहे; असे केलेस तर तुझा देव परमेश्वर तुझ्या सर्व कामात तुला बरकत देईल.
१९. तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांच्यातले प्रथमजन्मलेले सगळे नर तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मान; प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्याला कोणत्याही कामास लावू नकोस आणि शेरडामेंढरांतल्या प्रथमवत्साची लोकर कातरू नकोस.
२०. परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तू आपल्या घराण्यासह वर्षानुवर्षे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याचे मांस खात जा.
२१. पण त्यांतील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्याच्यात दुसरे कोणतेही व्यंग असले तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नकोस.
२२. वाटल्यास आपल्या गावात तो खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध माणसांनी त्याचे मांस खावे.
२३. मात्र त्याच्या रक्ताचे तू सेवन करू नयेस; तू ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावेस.
१. अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले.
२. परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी शेरडेमेंढरे आणि गाईबैल ह्यांतून वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पावा.
३. त्याच्या मांसाबरोबर खमिराची भाकर खाऊ नये; सात दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दु:खस्मारकाची भाकर खावी, कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास; ह्यामुळे मिसर देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील.
४. सात दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुझ्याजवळ खमीर दिसता कामा नये; तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये.
५. तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यांतील कोणत्याही नगरात वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करता येईल असे नाही,
६. तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथेच ज्या समयी तू मिसर देशातून निघालास त्या समयी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी, संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञपशू अर्पण करावास.
७. आणि तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तू तो शिजवून खावास; मग सकाळी आपल्या डेर्‍यात परत जावेस.
८. सहा दिवस तू बेखमीर भाकरी खाव्यास, आणि सातव्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये.
९. तू सात सप्ताह मोज; उभ्या पिकाला विळा लावल्यापासून सात सप्ताह मोज.
१०. मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सप्ताहांचा सण पाळ.
११. तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी, आणि तुझ्या गावातला लेवी, आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.
१२. तू मिसर देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ.
१३. आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर तू मांडवांचा सण सात दिवस पाळावास;
१४. ह्या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरा, अनाथ व विधवा ह्यांच्यासह तू आनंदोत्सव करावास.
१५. जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सात दिवस सण पाळावास, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यांत तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल.
१६. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणांत तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे; पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये;
१७. तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे.
१८. तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे तू न्यायाधीश व अंमलदार नेमावेस; त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.
१९. विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करते.
२०. नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील.
२१. तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ जी वेदी बांधशील तिच्याजवळ अशेराची काष्ठमूर्ती उभारू नकोस.
२२. तसेच पूजास्तंभ उभारू नकोस, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.
३०. नीतिमानाचे मुख सुज्ञान वदते, त्याची जीभ न्याय उच्चारते.
३१. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते; त्याचे पाय घसरणार नाहीत.
३२. दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो, व त्याला जिवे मारण्यास तो पाहत असतो.
३३. परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही, त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही.
३४. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.
३५. मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला;
३६. पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता; मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही.
१७. ज्याच्या तोंडून सत्याचे उद्‍गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो.
१८. कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.
१९. सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे.
१. तिबिर्य कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती ह्या देशांचा मांडलिक व लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता;
२. आणि हन्ना व कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हा जखर्‍याचा मुलगा योहान ह्याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले.
३. मग तो यार्देनेजवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.
४. हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात जसे लिहिले आहे त्याप्रमाणे झाले. ते असे - “‘अरण्यात घोषणा करणार्‍याची वाणी झाली ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा,’ त्याच्या ‘वाटा नीट करा;
५. प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील,
६. आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.”’
७. तेव्हा जे लोकसमुदाय त्याच्या हातून बाप्तिस्मा घेण्यास त्याच्याकडे निघून येत असत त्यांना तो म्हणत असे, “अहो सापाच्या पिलांनो, भावी क्रोधापासून पळायला तुम्हांला कोणी सावध केले?
८. आता पश्‍चात्तापास योग्य अशी फळे द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.
९. आताच झाडांच्या मुळांशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.”
१०. तेव्हा लोकसमुदाय त्याला विचारीत, “तर मग आम्ही काय करावे?”
११. तो त्यांना उत्तर देई, “ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्याने, ज्याला नाही त्याला एक द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे.”
१२. मग जकातदारही बाप्तिस्मा घेण्यास आले व त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही काय करावे?”
१३. त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका.”
१४. शिपायांनीही त्याला विचारले, “आम्ही काय करावे?” त्याने त्यांना सांगितले, “कोणावर जबरदस्ती करू नका व कुभांड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा.”
१५. तेव्हा लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्व जण योहानाविषयी आपल्या मनात विचार करत असत;
१६. आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, “मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडण्यास मी योग्य नाही, तो येत आहे; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
१७. आपले खळे अगदी स्वच्छ करण्यास व गहू आपल्या कोठारात साठवण्यास त्याचे सूप त्याच्या हातात आहे; पण भूस तो न विझणार्‍या अग्नीत जाळून टाकील.”
१८. आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे व लोकांना सुवार्तेची घोषणा करत असे.
१९. पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे,
२०. त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की, योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले.
२१. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की, आकाश उघडले गेले,
२२. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
२३. येशूने आपल्या कार्याचा आरंभ केला तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्याला योसेफाचा पुत्र असे समजत. योसेफ एलीचा,
२४. तो मत्ताथाचा, तो लेवीचा, तो मल्खीचा, तो यन्नयाचा, तो योसेफाचा,
२५. तो मत्तिथ्याचा, तो आमोसाचा, तो नहूमाचा, तो हेस्लीचा, तो नग्गयाचा,
२६. तो महथाचा, तो मत्तिथ्याचा, तो शिमयीचा, तो योसेखाचा, तो योदाचा,
२७. तो योहानानाचा, तो रेशाचा, तो जरूब्बाबेलाचा, तो शल्तीएलाचा, तो नेरीचा,
२८. तो मल्खीचा, तो अद्दीचा, तो कोसामाचा, तो एल्मदामाचा, तो एराचा,
२९. तो येशूचा, तो अलियेजराचा, तो योरीमाचा, तो मत्ताथाचा, तो लेवीचा,
३०. तो शिमोनाचा, तो यहूदाचा, तो योसेफाचा, तो योनामाचा, तो एल्याकीमाचा,
३१. तो मलआचा, तो मिन्नाचा, तो मत्ताथाचा, तो नाथानाचा, तो दाविदाचा,
३२. तो इशायाचा, तो ओबेदाचा, तो बवाजाचा, तो सल्मोनाचा, तो नहशोनाचा,
३३. तो अम्मीनादाबाचा, तो अरामाचा, तो हेस्रोनाचा, तो पेरेसाचा, तो यहूदाचा,
३४. तो याकोबाचा, तो इसहाकाचा, तो अब्राहामाचा, तो तेरहाचा, तो नाहोराचा,
३५. तो सरूगाचा, तो रऊचा, तो पेलेगाचा, तो एबराचा, तो शेलहाचा,
३६. तो केनानाचा, तो अर्पक्षदाचा, तो शेमाचा, तो नोहाचा, तो लामेखाचा,
३७. तो मथुशलहाचा, तो हनोखाचा, तो यारेदाचा, तो महललेलाचा, तो केनानाचा,
३८. तो अनोशाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide