बायबल एकाच वर्षात

१. मग दानापासून बैर-शेबापर्यंतचे सर्व इस्राएल लोक व गिलादातले लोक बाहेर पडले व त्यांची मंडळी एकत्र येऊन मिस्पा येथे परमेश्वरासमोर जमा झाली.
२. लोकांचे सर्व नायक आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतले सैनिक मिळून चार लक्ष धारकरी पायदळ देवाच्या प्रजेच्या मेळ्यात सामील झाले.
३. इस्राएल लोक मिस्पात जमा झाल्याची बातमी बन्यामिनी लोकांच्या कानी गेली. इस्राएल लोकांनी विचारले, “हे दुष्कृत्य कसे घडून आले, ते आम्हांला सांगा.”
४. त्या खून झालेल्या स्त्रीचा नवरा जो लेवी ह्याने उत्तर दिले, “मी आपल्या उपपत्नीबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात रात्री मुक्कामाला आलो.
५. आणि गिब्यातल्या लोकांनी रात्री घराला गराडा घातला; माझा खून करण्याचा त्यांचा बेत होता, आणि त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला व ती मेली.
६. तेव्हा मी माझ्या उपपत्नीला घरी आणून तिचे तुकडे केले आणि इस्राएलाच्या वतनांतील सर्व प्रांतात पाठवून दिले; कारण त्या लोकांनी इस्राएलामध्ये कामांध व निर्लज्ज कृत्य केले होते.
७. तर इस्राएल लोकहो, तुम्ही सर्व आता आपला अभिप्राय व मसलत द्या.”
८. तेव्हा सर्व लोक एकमताने उठले व एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही तंबूत जाणार नाही; आपल्यातल्या कोणीही परतायचे नाही.
९. आपण असे करू या: गिब्यावर कोणी हल्ला करायचा ते चिठ्ठ्या टाकून ठरवू.
१०. मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषांमागे दहा, हजारामागे शंभर, आणि दहा हजारांमागे एक हजार असे पुरुष निवडू; ते सैन्यासाठी भोजनसामग्री आणतील व आपण बन्यामिनाचे गिबा येथे जाऊन तेथील लोकांनी इस्राएलामध्ये जे निर्लज्ज कृत्य केले आहे त्याबद्दल त्यांचे पारिपत्य करू.”
११. अशा प्रकारे सर्व इस्राएल लोक एकजुटीने त्या नगरासमोर जमा झाले.
१२. मग इस्राएल वंशांनी बन्यामिनाच्या सर्व वंशाकडे जासूद पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये हे कसले दुष्कृत्य घडले आहे?
१३. गिब्यातील त्या बदमाशांना आमच्या हवाली करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारून इस्राएलातून ही दुष्टाई काढून टाकू.” पण बन्यामिनी लोक आपले भाऊबंद इस्राएल लोक ह्यांचे म्हणणे ऐकायला तयार होईनात.
१४. ह्याउलट बन्यामिनी लोक आपापल्या नगरांतून बाहेर पडून इस्राएल लोकांशी लढण्यासाठी गिबा येथे जमा झाले.
१५. त्या दिवशी गिब्यात राहणारे सातशे निवडक वीर सोडून निरनिराळ्या नगरांतून आलेल्या धारकरी बन्यामिन्यांची संख्या सव्वीस हजार होती.
१६. त्या सर्व लोकांमध्ये सातशे निवडक पुरुष डावरे होते; त्यांच्या गोफणीचा नेम तसूभरदेखील चुकत नसे.
१७. बन्यामीन सोडून बाकीच्या इस्राएल लोकांतले धारकरी पुरुष चार लक्ष भरले; हे सगळे लढवय्ये होते.
१८. मग इस्राएल लोक निघून बेथेल येथे गेले आणि त्यांनी देवाला विचारले, “बन्यामिनी लोकांशी आमच्या वतीने लढण्यासाठी प्रथम कोणी चाल करून जावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “प्रथम यहूदाने जावे.”
१९. इस्राएल लोकांनी पहाटेस उठून गिब्यासमोर तळ दिला.
२०. इस्राएल लोक बन्यामिनाशी लढण्यासाठी बाहेर पडले. गिबा येथे त्यांच्याशी लढायला इस्राएल लोकांनी फळी उभारली.
२१. तेव्हा बन्यामिनी लोक गिब्यातून बाहेर पडले आणि त्यांनी त्या दिवशी बावीस हजार इस्राएल पुरुष धुळीस मिळवले.
२२. हे ऐकून इस्राएल पुरुषांनी हिंमत धरून जेथे पहिल्या दिवशी फळी उभारली होती तेथेच पुन्हा दुसरी फळी उभारली.
२३. इस्राएल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले; आणि “आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढायला पुन्हा जावे काय?” असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “त्यांच्यावर चाल करून जा.”
२४. दुसर्‍या दिवशी इस्राएल लोक बन्यामिनी लोकांशी सामना देण्यासाठी पुढे निघाले.
२५. बन्यामिनी लोक दुसर्‍या दिवशी त्यांच्याशी सामना करायला गिब्याहून निघाले, आणि त्या दिवशीही त्यांनी इस्राएलाचे अठरा हजार लोक धुळीस मिळवले. ते सर्व धारकरी होते.
२६. मग सर्व इस्राएल लोक मिळून बेथेल येथे जाऊन परमेश्वरापुढे रडत बसले; त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे केली.
२७. ह्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्‍न केला. (कारण त्या दिवसांत देवाच्या कराराचा कोश तेथेच होता.
२८. आणि अहरोनाचा नातू, एलाजाराचा मुलगा फिनहास हा त्या काळी त्या कोशाच्या सेवेस असे.) लोकांनी परमेश्वराला विचारले, “आमचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्याशी लढायला पुन्हा एकदा जावे काय? किंवा लढण्याचे सोडून द्यावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “चाल करून जा; कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन.”
२९. नंतर इस्राएलाने गिब्याच्या सभोवती लोक दबा धरून बसवले.
३०. तिसर्‍या दिवशी इस्राएल लोकांनी बन्यामिन्यांवर पुन्हा हल्ला केला आणि पूर्वीप्रमाणेच गिब्यासमोर फळी उभारली.
३१. तेव्हा बन्यामिनी त्या लोकांशी सामना करायला बाहेर पडले; त्या वेळी इस्राएल लोकांनी त्यांना आपल्यामागे नगरापासून बरेच दूर झुलवत नेले; खुल्या मैदानातून एक हमरस्ता बेथेलास व दुसरा गिब्याकडे जातो, त्यांच्या दरम्यान पूर्वीप्रमाणेच बन्यामिन्यांनी हाणमार सुरू केली व इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे त्यांनी मारली.
३२. बन्यामिनाचे लोक म्हणाले, “आता पहिल्याप्रमाणेच आपल्यासमोर त्यांचा मोड होत आहे.” पण इस्राएल लोक म्हणाले, “आपण पळण्याचे सोंग करून त्यांना नगरापासून दूर हमरस्त्यांपर्यंत झुलवत नेऊ.”
३३. मग सर्व इस्राएल लोकांनी आपल्या जागा सोडून बाल-तामार येथे फळी उभारली, आणि गिब्याच्या परिसरात दबा धरून बसलेले इस्राएल लोक आपल्या ठिकाणावरून झपाट्याने पुढे धावले.
३४. सर्व इस्राएलातले निवडक दहा हजार लोक गिब्यावर चालून आले व तेथे तुंबळ युद्ध जुंपले. आपल्यावर अनर्थ येऊन ठेपला आहे ह्याची बन्यामिन्यांना कल्पना नव्हती.
३५. परमेश्वराने इस्राएलापुढे बन्यामिनाचा मोड केला; त्या दिवशी इस्राएल लोकांनी पंचवीस हजार एकशे बन्यामिनी लोकांचा संहार केला, ते सर्व धारकरी होते.
३६. तेव्हा आपला मोड झाल्याचे बन्यामिन्यांच्या लक्षात आले. इस्राएल लोक बन्यामिन्यांपुढून मागे सरले, कारण गिब्याजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर त्यांची भिस्त होती.
३७. दबा धरणार्‍यांनी त्वरा करून गिब्यावर छापा घातला आणि पुढे सरसावून सर्व नगराचा तलवारीने नाश केला.
३८. इस्राएल लोक आणि दबा धरणारे ह्यांच्यामध्ये असा संकेत ठरला होता की, दबा धरणार्‍यांनी नगरात धूर करून त्याचा लोट वर चढेल असे करावे.
३९. इस्राएल लोक लढाईत मागे सरू लागले तेव्हा बन्यामिन्यांनी हल्ला चढवून त्यांचे तीस लोक ठार केले. बन्यामिन्यांना वाटले की, पहिल्या लढाईप्रमाणेच आपल्यापुढे खरोखरच त्याचा मोड होत आहे;
४०. इकडे नगरातून धुराचा लोट वर चढू लागला. बन्यामिनी मागे वळून पाहतात तर सगळ्या नगरात धूरच धूर होऊन आकाशाकडे त्याचा लोट चालला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले.
४१. इस्राएल लोक उलटले तेव्हा बन्यामिन्यांची गाळण उडाली. आपल्यावर संकट येऊन ठेपले आहे असे त्यांच्या लक्षात येऊन चुकले.
४२. तेव्हा ते इस्राएल लोकांना पाठ दाखवून रानाकडे पळत सुटले; इस्राएल लोकांनी त्यांचा पिच्छा पुरवला; तसेच नगरातून बाहेर निघालेल्यांनी त्यांच्यामध्ये घुसून त्यांचा धुव्वा उडवला.
४३. त्यांनी बन्यामिन्यांना घेरले व नोहा येथून१ त्यांच्या पाठीस लागून पूर्वेस गिब्यासमोर त्यांची धूळधाण केली.
४४. बन्यामिनाचे अठरा हजार लोक पतन पावले. ते सर्व शूर वीर होते.
४५. निसटलेले मात्र रिम्मोनाच्या खडकाकडे रानाच्या वाटेने पळून गेले. हमरस्त्यांवर गाठलेल्यांपैकी पाच हजार लोक इस्राएल लोकांनी टिपून मारले आणि गिदोमापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवून त्यांतले आणखी दोन हजार लोक मारले.
४६. अशा प्रकारे बन्यामिनाचे पंचवीस हजार धारकरी लोक त्या दिवशी कामास आले; ते सर्व शूर वीर होते.
४७. त्यांतले सहाशे लोक निसटून रानाच्या वाटेने रिम्मोन खडकावर पोहचले, तेथे ते चार महिने राहिले.
४८. मग इस्राएल लोकांनी बन्यामिन्यांवर उलटून हाती लागलेली माणसे व जनावरे ह्यांचा संहार केला. तसेच जी गावे त्यांना आढळली ती सर्व आग लावून त्यांनी बेचिराख केली.
१. इस्राएल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती की, “आपल्यांपैकी कोणीही बन्यामिन्यांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत.”
२. ते बेथेल येथे गेले आणि संध्याकाळपर्यंत देवासमोर बसून त्यांनी मोठ्याने रडून आकांत केला.
३. ते म्हणाले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आज इस्राएलाचा एक वंश कमी झाला आहे; असे का घडून यावे?”
४. दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून त्यांनी तेथे एक वेदी बांधली आणि होमबली व शांत्यर्पणे केली.
५. मग इस्राएल लोक विचारपूस करू लागले, इस्राएलाच्या कोणत्याही वंशांपैकी परमेश्वरासमोर भरलेल्या मेळाव्याला आले नव्हते असे कोणी आहेत काय? कारण त्यांनी गंभीर प्रतिज्ञा केली होती, की, “जे मिस्पा येथे परमेश्वरासमोर येणार नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”
६. आपला बंधू बन्यामीन ह्याच्या बाबतीत इस्राएल लोकांना पस्तावा झाला; कारण ते म्हणू लागले, “आज इस्राएलातून एका वंशाचा उच्छेद झाला आहे.
७. आपण तर परमेश्वराची शपथ वाहिली आहे, आपल्यापैकी कोणीही त्यांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत, तेव्हा त्यांतले जे उरले आहेत त्या प्रत्येकाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे बरे?”
८. त्यांनी विचारपूस केली, “मिस्पा येथे परमेश्वरासमोर आले नव्हते असे इस्राएल वंशांतले कोण आहेत?” तेव्हा त्यांना कळले की, याबेश-गिलादाहून त्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी कोणीही छावणीत आले नव्हते.
९. कारण लोकांची मोजदाद केली तेव्हा याबेश-गिलाद येथे राहणार्‍यांपैकी कोणीही तेथे हजर नव्हते असे आढळून आले होते.
१०. तेव्हा मंडळीने शूर अशा बारा हजार लोकांना तिकडे पाठवले; त्यांनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जाऊन याबेश-गिलादाच्या रहिवाशांचा बायकापोरांसह तलवारीने संहार करा.
११. तुम्ही करायची कामगिरी ही की, सर्व पुरुष आणि पुरुषांशी संबंध केलेल्या सर्व स्त्रिया ह्यांचा तुम्ही समूळ नाश करावा.”
१२. पुरुषांशी संबंध न आलेल्या चारशे तरुण मुली याबेश-गिलाद येथील रहिवाशांत त्यांना आढळल्या. त्या त्यांनी कनान देशातील शिलो येथल्या छावणीत आणल्या.
१३. नंतर रिम्मोन खडकाजवळ जे बन्यामिनी राहत होते. त्यांच्याकडे सर्व मंडळीने लोक पाठवून त्यांच्याशी तहाचे बोलणे केले.
१४. तेव्हा बन्यामिनी परत आले आणि याबेश-गिलादातल्या स्त्रियांपैकी ज्या मुली वाचल्या होत्या त्या त्यांना बायका करून देण्यात आल्या, पण त्या त्यांना पुरल्या नाहीत.
१५. परमेश्वराने इस्राएल वंशात तूट पाडली म्हणून लोक बन्यामिनाबाबत पस्तावा करू लागले.
१६. मंडळीतील वडील जन विचारू लागले, “बन्यामिनी स्त्रियांचा नाश झाला असल्यामुळे उरलेल्या प्रत्येक बन्यामिनी माणसाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे?”
१७. लोक म्हणाले, “बन्यामिनाच्या वाचलेल्या लोकांना वतन दिले पाहिजे, म्हणजे इस्राएलातला एक वंश नामशेष होणार नाही.
१८. त्यांना मुली देणे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, कारण इस्राएल लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे की, जो आपली मुलगी बन्यामिनाला देईल तो शापित होईल.”
१९. मग ते म्हणाले, “शिलो नगरात दरवर्षी परमेश्वरासाठी उत्सव होत असतो; हे नगर बेथेलच्या उत्तरेस बेथेलाहून शखेमास जाणार्‍या हमरस्त्याच्या पूर्वेस आणि लबोनाच्या दक्षिणेस वसलेले आहे.”
२०. आणि त्यांनी बन्यामिन्यांना आज्ञा केली, “तुम्ही जाऊन द्राक्षमळ्यात दबा धरून बसावे व पाळत ठेवावी.
२१. आणि शिलोच्या मुली नृत्यासाठी बाहेर पडताच द्राक्षमळ्यातून बाहेर निघावे आणि त्यांच्यातल्या एकेकीला एकेकाने धरून बायको करण्यासाठी बन्यामीन देशात अथवा प्रांतात घेऊन जावे.
२२. त्यांचे वडील अथवा भाऊबंद तुमच्याकडे गार्‍हाणे घेऊन आले तर तुम्ही त्यांना सांगा, कृपया त्या दान म्हणून आम्हांला ठेवून घेऊ द्या; कारण त्या आमच्यासाठी बायका म्हणून आम्ही युद्धात घेतल्या नाहीत आणि तुम्हीही त्या आम्हांला दिल्या नाहीत, म्हणून तुम्हांला दोष लागत नाही.”
२३. त्याप्रमाणे बन्यामिनी लोकांनी केले; त्यांनी त्या नृत्य करणार्‍या मुलींतून आपल्या संख्येइतक्या मुली पकडून बायका करून घेतल्या. मग ते निघून आपल्या वतनाला परत गेले आणि नगरे वसवून त्यांत राहू लागले.
२४. त्या वेळेस इस्राएल लोक तेथून निघून आपापल्या वंशाकडे व आपापल्या कुळांकडे गेले. जो तो आपापल्या वतनाला परत गेला.
२५. त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता; ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी.
१२. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;
१३. म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील.
१४. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.
१५. हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील.
१६. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता; होमबलीही तुला प्रिय नाही.
१७. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
१८. तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर, यरुशलेमेचे कोट बांधून काढ;
१९. म्हणजे नीतिमत्त्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निःशेष होमबली तुला आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोर्‍हे अर्पण करतील.
१. मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.
२. सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते.
३. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.
१. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता.
२. तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता.
३. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता.
४. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला; कारण येशूला त्या वाटेने जायचे होते.
५. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”
६. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.
७. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.”
८. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”
९. येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.
१०. कारण मनुष्याचा पुत्र ‘हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे.”’
११. ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला; कारण तो यरुशलेमेजवळ होता, आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते.
१२. तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला.
१३. त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’
१४. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’
१५. मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावण्यास सांगितले.
१६. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’
१७. त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’
१८. नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’
१९. त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’
२०. मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती.
२१. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’
२२. तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय?
२३. मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’
२४. मग त्याने जवळ उभे राहणार्‍यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’
२५. ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’
२६. मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल.
२७. आता ज्या माझ्या वैर्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide