१. दावीद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता; ते त्याच्यावर पांघरुणे घालत तरी त्याला ऊब येत नसे.
२. तेव्हा त्याचे सेवक त्याला म्हणाले, “आमच्या स्वामीराजांसाठी एखादी तरुण कुमारी पाहावी; तिने तैनातीला राहून आमच्या स्वामीराजांची शुश्रूषा करावी आणि त्यांना ऊब यावी म्हणून त्यांच्या उराशी निजावे.”
३. मग त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर कुमारीचा शोध केला; तेव्हा त्यांना शुनेमकरीण अबीशग नावाची एक कुमारी आढळली. तिला ते राजाकडे घेऊन आले.
४. ती तरुणी फार सुंदर होती; ती राजाच्या शुश्रूषेस राहून त्याची सेवा करू लागली; पण राजाने तिच्याशी समागम केला नाही. अदोनीया गादी हिरावून घेतो
५. त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, “मी राजा होणार.” त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेवले.
६. “तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता; अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता.
७. त्याने सरूवेचा पुत्र यवाब व अब्याथार याजक ह्यांच्याशी बोलणे केले. ते अदोनीया ह्याच्या पक्षाचे होऊन त्याला मदत करणारे झाले.
८. पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया. नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूर वीर हे अदोनीयाच्या पक्षाला मिळाले नाहीत.
९. अदोनीयाने एन-रोगेलजवळचा जोहेलेथ खडक येथे मेंढे, बैल व पुष्ट पशू ह्यांचा यज्ञ केला आणि आपले बंधू सर्व राजकुमार व राजाचे सर्व यहूदी सेवक ह्यांना आमंत्रण केले;
१०. पण नाथान संदेष्टा, बनाया, शूर वीर व आपला भाऊ शलमोन ह्यांना त्याने आमंत्रण केले नाही.
११. मग शलमोनाची आई बथशेबा हिला नाथान म्हणाला, “आपला स्वामी दावीद ह्याला नकळत हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा होऊन बसला आहे हे तू ऐकले नाहीस काय?
१२. तर मी तुला आता मसलत देतो; तिच्या योगे तू आपला व आपला पुत्र शलमोन ह्याचा प्राण वाचवशील.
१३. तू दावीद राजाकडे जाऊन त्याला विचार: ‘माझे स्वामीराजे, माझा पुत्र शलमोन हा खात्रीने आपल्यामागे राजा होईल आणि आपल्या गादीवर बसेल अशी आणभाक आपण आपल्या दासीशी केली आहे ना? तर अदोनीया कसा राजा होऊन बसला आहे.’
१४. तू राजाशी भाषण करत आहेस तोच मी तुझ्यामागून आत येईन व तुझ्या बोलण्याला पुष्टी देईन.”
१५. मग बथशेबा खोलीत राजाकडे गेली; राजा फार वृद्ध झाला होता, त्याची सेवा शुनेमकरीण अबीशग ही करीत होती.
१६. बथशेबेने राजाला लवून मुजरा केला. त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
१७. तिने म्हटले, “माझे स्वामी, आपण आपला परमेश्वर देव ह्याची आणभाक करून आपल्या दासीला म्हटले होते की, तुझा पुत्र शलमोन माझ्यामागे राजा होऊन माझ्या गादीवर खास बसेल.
१८. पण आता अदोनीया राजा होऊन बसला आहे हे माझ्या स्वामीराजांना ठाऊकदेखील नाही.
१९. त्याने विपुल बैल, पुष्ट पशू व मेंढे ह्यांचा यज्ञ केला आणि सर्व राजकुमार, अब्याथार याजक व सेनापती यवाब ह्यांना आमंत्रण केले, पण आपला दास शलमोन ह्याला त्याने आमंत्रण केले नाही.
२०. माझ्या स्वामीराजानंतर गादीवर कोणी बसावे हे आपल्या तोंडून समजावे म्हणून सर्व इस्राएल लोकांचे डोळे आपल्याकडे लागले आहेत.
२१. नाहीतर जेव्हा आमचे स्वामीराजे आपल्या पितरांजवळ जाऊन निजतील तेव्हा मी व माझा पुत्र शलमोन ह्यांना गुन्हेगार गणतील.”
२२. ती राजाशी बोलत असता नाथान संदेष्टाही आत आला.
२३. लोक राजाला म्हणाले, “पाहा, नाथान संदेष्टा आला आहे.” त्याने राजासमोर होऊन त्याला भूमीपर्यंत लवून मुजरा केला.
२४. नाथान म्हणाला, “हे माझ्या स्वामीराजा, अदोनीया माझ्यामागे राजा होईल व तो माझ्या गादीवर बसेल असे तू सांगितले आहेस काय?
२५. पाहा, आज त्याने खाली जाऊन पुष्कळ बैल, पुष्ट पशू व मेंढे ह्यांचा यज्ञ केला असून सर्व राजकुमार, सेनेचे सरदार व अब्याथार याजक ह्यांनाही आमंत्रण केले; ते आमच्यासमोर खाऊनपिऊन म्हणत आहेत, अदोनीया राजा चिरायू होवो!
२६. पण त्याने मला, तुझ्या सेवकाला आणि सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया व तुझा सेवक शलमोन ह्यांना आमंत्रण केले नाही.
२७. हे सर्व माझ्या स्वामीराजांकडून झाले आहे काय? माझ्या स्वामीराजांमागे गादीवर कोणी बसावे हे तू आपल्या दासांना कळवले नाही.”
२८. दावीद राजा म्हणाला, “बथशेबेस माझ्याकडे बोलवा.” ती राजाच्या हुजुरास येऊन त्याच्यासमोर उभी राहिली.
२९. तेव्हा राजाने आणभाक करून म्हटले, “ज्याने आजपर्यंत माझा प्राण सर्व संकटांतून सोडवला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,
३०. मी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची शपथ घेऊन तुला म्हटले होते की तुझा पुत्र शलमोन माझ्यामागे राजा होईल व तोच माझ्या जागी गादीवर बसेल; मी आज निश्चये तसेच करणार.”
३१. तेव्हा बथशेबेने भूमीपर्यंत लवून राजाला मुजरा करून म्हटले, “माझे स्वामीराज दावीद चिरायू होवोत.”
३२. मग दावीद राजाने म्हटले, “सादोक याजक, नाथान संदेष्टा व यहोयादाचा पुत्र बनाया ह्यांना माझ्याकडे बोलावून आणा.” तेव्हा ते राजासमोर आले.
३३. राजा त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या स्वामींचे सेवक बरोबर घ्या आणि माझा पुत्र शलमोन ह्याला माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन जा;
३४. तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेमावे, आणि कर्णा वाजवून, शलमोन राजा चिरायू होवो असे पुकारावे.
३५. मग तुम्ही त्याच्यामागे चालत इकडे या व तो येथे येऊन माझ्या सिंहासनावर बसेल; तोच माझ्या जागी राजा होईल; इस्राएल व यहूदा ह्यांचा तो अधिपती म्हणून मी त्याला नेमले आहे.”
३६. यहोयादाचा पुत्र बनाया म्हणाला, “आमेन, माझ्या स्वामीराजांचा देव परमेश्वर ह्याचेही असेच म्हणणे आहे.
३७. परमेश्वर माझ्या स्वामीराजांबरोबर राहिला तसाच तो शलमोनाबरोबर राहो, व त्याच्या गादीचा महिमा माझे स्वामीराजे दावीद ह्यांच्या गादीहून अधिक वाढवो.”
३८. तेव्हा सादोक याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया हे करेथी व पलेथी ह्यांना बरोबर घेऊन खाली गेले आणि शलमोनाला दावीद राजाच्या खेचरावर बसवून गीहोन येथे घेऊन गेले.
३९. तेव्हा सादोक याजकाने सभामंडपातील तेलाने भरलेले शिंग घेऊन शलमोनाला अभिषेक केला आणि कर्णा वाजवला; तेव्हा “शलमोन राजा चिरायू होवो” असा लोकांनी घोष केला.
४०. मग सर्व लोक त्याच्यामागे चालले; ते वाजंत्री वाजवत होते व आनंदाचा गजर करत होते, त्या नादाने पृथ्वी दणाणली.
४१. इकडे अदोनीया व त्याचे सर्व आमंत्रित ह्यांचे भोजन आटोपले होते; इतक्यात त्यांच्या कानी हा ध्वनी पडला. यवाबाने रणशिंगाचा आवाज ऐकून म्हटले, “नगरात गलबल्याचा आवाज येतोय तो कसला?”
४२. तो असे बोलत आहे इतक्यात अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान आला; अदोनीया त्याला म्हणाला, “आत ये, तू भला पुरुष आहेस, तू चांगले वर्तमान आणले असावेस.”
४३. योनाथानाने अदोनीयास सांगितले, “आपला स्वामीराजा दावीद ह्याने शलमोनाला खरोखर राजा केले आहे.
४४. त्याच्याबरोबर सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी व पलेथी ह्यांना राजाने पाठवले व त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले;
४५. आणि सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला गीहोन येथे राज्याभिषेक केला व ते तेथून एवढा जयघोष करीत वर गेले की नगर अगदी दणाणून गेले; तुमच्या कानी ध्वनी पडला तो हाच.
४६. शलमोन राजासनावर विराजमान झाला आहे;
४७. आपला स्वामीराजा दावीद ह्याच्याकडे येऊन राजसेवक आशीर्वाद देत आहेत की, ‘आपला देव शलमोनाचे नाव आपल्या नावाहून श्रेष्ठ करो व त्याच्या गादीचा महिमा आपल्या गादीहून वाढवो.’ तेव्हा राजाने पलंगावरून नमन केले.
४८. राजाने असेही म्हटले की, “ज्याने आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांदेखत एकाला माझ्या गादीवर बसवले तो इस्राएलाचा देव धन्य!”’
४९. तेव्हा अदोनीयाचे सगळे पाहुणे घाबरून गेले आणि वाट सापडेल तिकडे पळत सुटले.
५०. अदोनीयाला शलमोनाची दहशत वाटली व तो जाऊन वेदीची शिंगे धरून राहिला.
५१. शलमोनाला कोणी जाऊन सांगितले की, “अदोनीयाला शलमोन राजाची दहशत वाटते आहे; पाहा, तो वेदीची शिंगे धरून राहिला आहे; तो म्हणत आहे की, आपल्या दासाला तलवारीने वधणार नाही अशी आणभाक शलमोनाने आज करावी.”
५२. शलमोन म्हणाला, “तो भला मनुष्य आहे असे दिसल्यास त्याचा एक केसही जमिनीवर पडणार नाही, पण त्याच्या ठायी दुष्टता दिसून आली तर तो प्राणाला मुकेल.”
५३. मग शलमोन राजाने काही लोक पाठवून त्याला वेदीपासून आणवले. त्याने येऊन शलमोन राजाला मुजरा केला; आणि शलमोन त्याला म्हणाला, “तू आपल्या घरी जा.”
१. दाविदाचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला ताकीद देऊन म्हटले,
२. “मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार; तर तू हिंमत धर, मर्दुमकी दाखव.
३. तुझा देव परमेश्वर ह्याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ; त्याच्या मार्गांनी चाल; आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ; म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यशःप्राप्ती होईल.
४. आणि माझ्यासंबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की, जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवील व माझ्यासमोर सत्याने व जिवेभावे चालेल तर इस्राएलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही.
५. सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.
६. तर तू आपल्या बुद्धीचा उपयोग कर; त्याचे पिकलेले केस अधोलोकी शांतीने उतरू देऊ नकोस.
७. पण गिलादी बर्जिल्लय ह्याच्या पुत्रांवर कृपादृष्टी ठेव, आणि ते तुझ्या पंक्तीला बसणार्यांतले असावेत; कारण तुझा भाऊ अबशालोम ह्याच्यापासून मी पळून जात होतो तेव्हा त्याने माझ्याकडे येऊन माझी विचारपूस केली.
८. तसेच तुझ्या पदरी बन्यामिनी गेराचा पुत्र बहूरीमकर शिमी हा आहे; मी महनाइमाला जात होतो त्या दिवशी त्याने मला भारी शिव्याशाप दिले; पण तो माझ्या भेटीला यार्देनेजवळ आला, तेव्हा मी परमेश्वराच्या नामाने त्याच्याशी आणभाक केली की मी तुझ्यावर तलवार धरणार नाही.
९. तरी तू त्याला निर्दोष समजू नकोस; तू सुज्ञ पुरुष आहेस; त्याचे काय करावे हे तुला समजेलच; त्या पिकलेल्या केसाच्या म्हातार्याला रक्ताचे स्नान घालून अधोलोकी पाठव.”
१०. नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याला दावीदपुरात मूठमाती दिली.
११. दाविदाने इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनात व तेहेतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले.
१२. मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्याला चांगली बळकटी आणली.
१३. मग हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे आला; तेव्हा ती त्याला म्हणाली, “तू मित्रभावाने आला आहेस काय?” तो म्हणाला, “होय, मी मित्रभावाने आलो आहे.
१४. मग तो म्हणाला “मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.” ती म्हणाली, “बोल.”
१५. तो म्हणाला, “तुला ठाऊक आहेच की मला राज्य मिळाले होते आणि मी राज्य करावे म्हणून सर्व इस्राएल लोकांचे डोळे माझ्याकडे लागले होते, पण आता राज्यक्रांती होऊन ते माझ्या बंधूस मिळाले आहे. कारण परमेश्वराकडून ते त्याला मिळाले आहे.
१६. आता मी तुझ्याजवळ एक विनंती करीत आहे, तू मला नाही म्हणू नकोस.” ती म्हणाली, “बोल.”
१७. तो म्हणाला, “शलमोन राजा तुला नाही म्हणणार नाही; त्याला सांग की मला शुनेमकरीण अबीशग बायको करून दे.”
१८. बथशेबा म्हणाली, “बरे, मी तुझ्या वतीने राजाजवळ बोलेन.”
१९. बथशेबा अदोनीयाच्या वतीने शलमोन राजाकडे बोलायला गेली. राजा तिचे स्वागत करण्यासाठी उठला व तिला दंडवत घालून आपल्या सिंहासनावर जाऊन बसला; त्याने आपल्या आईसाठी एक आसन मांडायला सांगितले, व ती त्याच्या उजवीकडे बसली.
२०. ती त्याला म्हणाली, “मी तुझ्याजवळ एक लहानशी गोष्ट मागत आहे. तू मला नाही म्हणू नकोस.” राजा तिला म्हणाला, “आई, माग, मी तुला नाही म्हणणार नाही.”
२१. ती म्हणाली, “शुनेमकरीण अबीशग ही तुझा भाऊ अदोनीया ह्याला बायको करून दे.”
२२. शलमोन राजाने आपल्या आईस उत्तर दिले, “अदोनीयासाठी तू शुनेमकरीण अबीशग हीच तेवढी का मागतेस! तो माझा वडील बंधू आहे त्या अर्थी त्याच्यासाठी किंबहुना अब्याथार याजक व सरूवेचा पुत्र यवाब ह्यांच्यासाठी राज्यदेखील माग.”
२३. शलमोन राजाने परमेश्वराची शपथ वाहून म्हटले, “अदोनीयाने ही जी मागणी केली आहे तिच्यामुळे त्याने आपल्या प्राणावर संकट आणले आहे, तसे न घडले तर परमेश्वर माझे तसेच, किंबहुना त्याहूनही अधिक अनिष्ट करो.
२४. ज्या परमेश्वराने माझी स्थापना केली, माझा बाप दावीद ह्याच्या गादीवर मला बसवले आणि आपल्या वचनानुसार माझे घराणे स्थापन केले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, आजच्या आज अदोनीयास देहान्त शासन होईल.”
२५. शलमोन राजाने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला पाठवले; त्याने त्याच्यावर असा हल्ला केला की तो प्राणास मुकला.
२६. अब्याथार याजकाला राजा म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेतीवाडीत जाऊन राहा; तू मरणदंडास पात्र आहेस तरी मी आज तुला मारून टाकत नाही, कारण माझा बाप दावीद ह्याच्यासमक्ष तू परमेश्वर देवाचा कोश वाहत असायचास आणि माझ्या बापाला ज्या ज्या विपत्ती प्राप्त झाल्या त्यांचा वाटेकरी तू होत असायचास.”
२७. एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्वर जे वचन बोलला होता ते पूर्ण करावे म्हणून शलमोनाने अब्याथारास परमेश्वराच्या याजकपदावरून काढून टाकले.
२८. हे वर्तमान यवाबाकडे जाऊन पोहचले; यवाब हा अबशालोमाच्या पक्षाकडे वळला नव्हता; तरी तो अदोनीयाच्या पक्षाकडे वळला होता. यवाब हा परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीची शिंगे धरून राहिला.
२९. “तो परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीजवळ आहे” हे वर्तमान शलमोन राजाला कळले तेव्हा त्याने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला पाठवले, तो त्याला म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.”
३०. बनायाने परमेश्वराच्या मंडपानजीक जाऊन त्याला म्हटले, “राजा म्हणतो बाहेर निघून ये.” तो म्हणाला, “नाही, मी येथेच मरेन.” मग बनायाने राजाकडे परत येऊन सांगितले की यवाबाने मला असे असे उत्तर दिले.
३१. राजा त्याला म्हणाला, “त्याच्याच म्हणण्याप्रमाणे त्याला मारून टाक व त्याला मूठमाती दे, म्हणजे यवाबाने विनाकारण रक्तपात केला आहे ह्या दोषाचे माझ्यावरून व माझ्या बापाच्या घराण्यावरून तू निवारण करशील.
३२. त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील; त्याने तर माझा बाप दावीद ह्याला नकळत आपल्याहून अधिक नीतिमान व भल्या अशा दोन पुरुषांवर म्हणजे इस्राएलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अबनेर आणि यहूदाचा मुख्य सेनापती येथेरचा पुत्र अमासा ह्यांच्यावर तुटून पडून त्यांना तलवारीने जिवे मारले.
३३. त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी व त्याच्या संततीच्या शिरी उलटून सदोदित राहील. तथापि दावीद, त्याचा वंश, त्याचे घराणे व त्याची गादी ह्यांना परमेश्वराकडून सर्वकाळ शांती प्राप्त होईल.”
३४. यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने जाऊन यवाबावर हल्ला करून त्याला ठार मारले, आणि रानातील त्याच्या स्वतःच्या घरी त्याला मूठमाती दिली.
३५. राजाने त्याच्या जागी यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला मुख्य सेनापती नेमले आणि अब्याथाराच्या जागी सादोकाला याजक नेमले.
३६. राजाने शिमीला बोलावून आणून सांगितले, “तू यरुशलेमेत आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नकोस.
३७. ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील हे पक्के समज; तुझ्या रक्तपाताचा दोष तुझ्याच माथी येईल.”
३८. शिमी राजाला म्हणाला, “ठीक आहे, माझ्या स्वामीराजांनी सांगितल्याप्रमाणे आपला दास करील.” शिमी हा बहुत दिवस यरुशलेमेत राहिला;
३९. पण तीन वर्षे लोटल्यावर शिमीचे दोन दास गथचा राजा आखीश बिन माका ह्याच्याकडे पळून गेले; तेव्हा “तुझे दास गथ येथे आहेत” अशी कोणी त्याला खबर दिली.
४०. मग शिमी आपल्या गाढवांवर खोगीर घालून आपल्या दासांचा शोध करण्यासाठी गथास आखीशाकडे गेला व त्यांना तेथून घेऊन आला.
४१. शिमी यरुशलेमेहून गथास गेला होता व आता परत आला आहे हे वर्तमान शलमोनाला सांगण्यात आले;
४२. तेव्हा राजाने शिमीला बोलावून आणून म्हटले, “‘ज्या दिवशी तू येथून निघून कोठेही जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणाला मुकशील हे पक्के ध्यानात ठेव’ असे मी तुला परमेश्वराची शपथ घालून बजावून सांगितले होते ना? आणि तू मला असे म्हणाला होतास ना की, ‘जे मी आता ऐकले ते ठीक आहे?’
४३. तर परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेला सक्त हुकूम हे तू का मानले नाहीत?”
४४. राजा शिमीला म्हणाला, “माझा बाप दावीद ह्याच्याशी जी दुष्टाई तू केली ती सर्व तुझ्या जिवाला ठाऊक आहे, तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे प्रतिफळ तुझ्या शिरी येईल असे करील.
४५. शलमोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील.”
४६. राजाने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला हुकूम केल्यावरून त्याने जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि तो प्राणाला मुकला. शलमोनाच्या हस्ते राज्याला बळकटी आली.
११. प्रभू अनुज्ञा देतो; मंगलवार्ता प्रसिद्ध करणार्या स्त्रियांची मोठी सेना सिद्ध होऊन म्हणते की,
१२. “सैन्यांचे राजे पळ काढतात, पळ काढतात;” आणि घरी राहिलेली गृहिणी लूट वाटून देते.
१३. तुम्ही मेंढवाड्यामध्ये१ पडून राहता काय? ज्याचे पंख रुप्याने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडित आहेत, अशा कबुतरासारखे तुम्ही आहात ना?
१४. सर्वसमर्थाने राजांची दाणादाण केली, तेव्हा सलमोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले.
७. उत्कृष्ट बोलणे मूर्खाला शोभत नाही; मग खोटे बोलणे सरदारास कसे शोभेल?
८. घेणार्याच्या दृष्टीने लाच रत्नासारखी मोलवान आहे; ज्या ज्या कामाकडे तो वळतो ते ते तो चातुर्याने करतो.
९. जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृद्धी करतो; पण जो गत गोष्टी घोकत बसतो त्याला मित्र अंतरतात.
२४. मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसर्यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हांला ठाऊक आहे.”
२५. ह्यावरून त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की, मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते.”
२६. ह्यावर त्यांनी त्याला म्हटले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”
२७. त्याने त्यांना उत्तर दिले, “आत्ताच मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही; पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय?”
२८. तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले, “तू त्याचा शिष्य आहेस; आम्ही मोशेचे शिष्य आहोत.
२९. देव मोशेबरोबर बोलला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक नाही.”
३०. त्या माणसाने त्यांना उत्तर दिले, “हेच तर मोठे आश्चर्य आहे की, तो कोठला आहे हे तुम्हांला ठाऊक नाही; पण त्याने तर माझे डोळे उघडले.
३१. आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो.
३२. जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते.
३३. हा देवापासून नसता तर ह्याला काही करता आले नसते.”
३४. त्यांनी त्याला म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हांला शिकवतोस काय?” मग त्यांनी त्याला बाहेर घालवले.
३५. त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले; आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, “तू मनुष्याच्या१ पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
३६. त्याने उत्तर दिले, “महाराज, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे?”
३७. येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहेस व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.”
३८. तो म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो,” आणि त्याने त्याला नमन केले.
३९. तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे; ह्यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.”
४०. परूश्यांतील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, “आम्हीही आंधळे आहोत काय?”
४१. येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हांला पाप नसते; परंतु आम्हांला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide